Next
सूरज रे जलते रहना...
BOI
Sunday, May 19, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपट, नाट्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिलेले कलावंत पृथ्वीराज कपूर यांचा २९ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘सूरज रे जलते रहना...’ या गीताचा...
...........
ज्या झाडाचा आधार घेऊन एखादा वेल मोठा होतो, त्या झाडापेक्षा तो वेलच कधी कधी फळा-फुलांनी बहरून लोकांचे लक्ष वेधतो. ‘वेल कसा बहरला आहे बघा! किती सुंदर वेल आहे. फुलेही छान आली आहेत,’ असे वेलाचे कौतुक केले जाते. ती नावाजली जाणारी फुले वेलाचीच असतात, ते मोठेपण वेलालाच मिळायला हवे! पण हेही तितकेच खरे असते, की जेव्हा तो वेल जमिनीतून नुकताच वर येऊ लागलेला असतो, तेव्हा त्याला ज्या झाडाने आधार दिलेला असतो, ज्या झाडाने त्याला वर वर जायला प्रोत्साहन दिलेले असते, ते झाडही त्या वेलाच्या मोठेपणात तेवढेच सहभागी असते. त्या वेलाचे कौतुक होते पण दुर्दैवाने त्या झाडाचे महत्त्व फारसे कोणाच्या लक्षातच येत नाही. 

हिंदी चित्रपटसृष्टीवर खोलवर ठसा उमटवणाऱ्या राज कपूर या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वाबाबत व त्याचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल असेच घडले आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापेक्षा राज कपूर दसपट सरस होते, असे काही चित्रपटप्रेमी, जाणकार म्हणतात. हे विधान अर्धसत्य आहे. राज कपूर सरस होते; पण पृथ्वीराज कपूर काहीच नव्हते हे म्हणणे चूक ठरेल. आणि यासाठी आपण पृथ्वीराज कपूर यांच्या कारकिर्दीवर नजर टाकतो, तेव्हा काय दिसते? 

पृथ्वीराज कपूर केवळ अभिनेते म्हणून प्रसिद्ध नव्हते. बोलपटांआधी त्यांनी मूकपटांतही भूमिका केल्या होत्या. त्याही आधी त्यांनी हिंदी नाटकात भूमिका केली होती. इम्पिरियल फिल्म कंपनीच्या ‘चॅलेंज’ या चित्रपटात ‘एक्स्ट्रा’च्या भूमिकेपासून त्यांनी चित्रपटसृष्टीत सुरुवात केली होती. स्टेज शो, नाटक यांचे वेड असलेल्या या कलावंताने १९२९मध्ये ‘पृथ्वी थिएटर्स’ची स्थापना केली होती. वास्तविक पाहता त्या काळात बीए, एलएलबी अशा पदव्या पदरी असल्यावर एखाद्याने वकिली करून सुखवस्तू जीवन पत्करले असते; पण अभिनय, नाटक यांची जन्मजात आवड असणाऱ्या पृथ्वीराजजींनी केवळ स्वतःचेच आयुष्य नाटक, सिनेमाकरिता वाहून घेतले नाही, तर आपल्या मुलांनाही त्यामध्ये तरबेज केले. 

मुघल-ए-आझम, जिंदगी, एक नन्ही-मुन्नी सी लडकी थी, तीन बहुरानीयाँ असे १९६० ते १९७० या काळातील पृथ्वीराज यांच्या भूमिका असलेले चित्रपट पाहून त्यांच्याबद्दलची विधाने करणे अल्पमतीचे प्रदर्शन ठरेल. १९३१च्या पहिल्या बोलपटापासून (आलमआरा) १९७६च्या ‘बाँबे बाय नाइट’ या चित्रपटापर्यंत अंदाजे ८०-९० चित्रपटांत नायक अगर चरित्रनायक म्हणून भूमिका केलेल्या पृथ्वीराजजींच्या सर्वच भूमिका अविस्मरणीय होत्या, असे नव्हे; पण तरीही व्ही. शांताराम यांच्या ‘दहेज’मधील त्यांनी साकार केलेला विवश पिता विसरता येत नाही. 

जुन्याला कवटाळून बसून, नवीन पिढीचे वागणे बघून भडकून उठणारा, ‘कल आज और कल’मधील ‘कल’चा हट्ट धरणारा आजोबा म्हणजे पृथ्वीराजजी नातवाच्या दिग्दर्शनाखालीही अप्रतिम अभिनय करून बाजी मारून नेतात, हे विसरता येत नाही. खाकान, लुटेरा, नागपंचमी, परदेसी, हरिश्चंद्र तारामती इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आज आवर्जून आठवायला बसले तर आठवत नाहीत हे सत्य आहे; पण ‘बलराम श्रीकृष्ण’ या पौराणिक चित्रपटातील त्यांनी साकार केलेला शिवभक्त बाणासुर विसरता येत नाही. 

पौराणिक चित्रपटांतही अभिनयाचे मोल असते, हे रामायण, महाभारत मालिकांनी दाखवून दिले आहे; पण त्यापूर्वी ते शाहू मोडक, पृथ्वीराज कपूर यांसारख्या अभिनेत्यांनी दाखवून दिले होते. घराण्याची इभ्रत जपणारा सासरा ही ‘जिंदगी’ चित्रपटातील त्यांची भूमिकाही त्यांनी अशीच छानपणे सादर केली होती. ‘तीन बहुरानीयाँ’मधील त्यांनी उभा केलेला सासरा तर वेगळ्याच ढंगाचा होता. 

‘मुघल-ए-आझम’मधील अकबर मन:पटलावरून पुसला जात नाही. पृथ्वीराजजी जसे ‘मुघल-ए-आझम’मध्ये दिसतात, तसाच इतिहासातील अकबर असणार हे मनाने ठामपणे स्वीकारले आहे. ‘हुक्म की तामील की जाए’ हा त्यांचा संवाद मनात दरारा निर्माण करणारा होता. सलीम-अनारकलीचे प्रेम पटत असूनही कर्तव्यकठोर शहेनशहाला ते सारे विसरून कर्तव्यच करावे लागते, ही शहेनशहा अकबराची व्यथा चेहऱ्यावरील रेषेरेषेतून साकार करणारे पृथ्वीराज कपूर पाहिल्यानंतर ‘हा राज कपूरचा बाप होता’ हे उद्गार ओठातून बाहेर पडतात. ‘हुक्म की तामील की जाए’ असे कठोरपणे सांगणारा शहेनशहा, सलीमच्या आईपुढे ‘सलीम की माँ तुम समझती क्यों नहीं’ या शब्दांत व्याकूळ भाव चेहऱ्यावर आणून अभिनयाचे जे दर्शन घडवतो, तेव्हा ते मघाचे कठोर पृथ्वीराजजी हेच का, हा प्रश्न पडतो. 

अभिनयाबरोबरच आकर्षक व भारदस्त व्यक्तिमत्त्व हे पृथ्वीराजजींचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच ‘आवारा’ चित्रपटात ते न्यायाधीश होते व न्यायाधीशच वाटले. मुलाच्या दिग्दर्शनाखालील त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाचा नायक राज कपूर हा आवारा, गुंड असा असतो व तो या न्यायाधीशाला एक सभ्य व प्रतिष्ठित इसम समजत असतो; पण त्यांच्यामधील स्वार्थीपणा दिसून आल्यावर राज कपूरच्या तोंडी एक वाक्य आहे - ‘आज तक मैं अपने आप को एक आवारा, बदचलन और गुंडा समझता था । लेकिन आज मुझे मालूम हुआ, की तुम इस मेंभी मेरे बाप हो!’ राज कपूरच्या या संवादानंतर संतापलेले पृथ्वीराजजी आजही विसरता येत नाहीत. 

राज कपूर अलौकिक प्रतिभेचे कलावंत होते; पण त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणावेळी पृथ्वीराजजी नाटक, चित्रपट क्षेत्रात एक वजनदार व्यक्ती असूनही पृथ्वीराजजींनी राज कपूर यांना दिग्दर्शक केदार शर्मांकडे सहायक म्हणून पाठवले आणि त्यांना सांगितले, की ‘हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला कोणत्याही सवलती देऊ नका, तुमच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना जसे वागवता, तसेच वागवा.’

वास्तविक पाहता पृथ्वीराजजींच्या नावाचा आधार घेऊन एखाद्या चित्रपटाचा नायक होणे त्या वेळी राज कपूरना अवघड नव्हते; पण एखाद्या क्षेत्रात वजनदार व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा बाप जेव्हा पृथ्वीराजजींइतका कठोर होतो, तेव्हा ‘राज कपूर’ निर्माण होतो. त्या वेळी अभिनय व दिग्दर्शन या कला रक्तातच असणाऱ्या राज कपूर यांचे सोने पृथ्वीराजजींच्या कठोर वागणुकीच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघाले होते. 

एक आदर्श निर्माता, अभिनेता, पिता असलेले पृथ्वीराज हिंदी चित्रपट जगातील पहिले राज्यसभा सदस्य होते. १९५२ ते १९६० या काळात ते राज्यसभा सदस्य होते. १९६३मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवलेले होते. १९७१मध्ये ते दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाले होते. 

तीन नोव्हेंबर १९०६ रोजी पेशावर येथे जन्मलेला हा कलावंत २९ मे १९७२ रोजी इहलोकीची यात्रा संपवून या दुनियेतून निघून गेला. हिंदी चित्रपटसृष्टीत कपूरांना तोटा नाही; पण काळावरही ठसा उमटवणारे कपूर फारच थोडे. राज कपूर त्यातलेच एक! परंतु वेलाला सुरुवातीच्या काळात आधार देणारे झाडही तेवढेच मोठे असते नाही का? तद्वत पृथ्वीराजजींचे मोठेपण होते. 

अशा या पृथ्वीराजजींच्या या महिन्यातील स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्यावर चित्रित झालेले एक आशयसंपन्न सुनहरे गीत पाहू या. 

चित्रपट १९६३चा ‘हरिश्चंद्र तारामती.’ गायक हेमंतकुमार, संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार कवी प्रदीप! 

स्वप्नातही दिलेले वचन पाळणारा आदर्श राजा हरिश्चंद्र याचे हे कथानक पडद्यावर साकार करताना पृथ्वीराजजींना मुख्य भूमिका देण्यात आली होती. सत्याने वागणारा हरिश्चंद्र सर्व काही दान करून नगरामधून बाहेर पडतो, या पार्श्वभूमीवर हे गीत सुरू होते. प्रत्यक्ष नायक गात नाही, फक्त आवाज ऐकू येतो. ते गीत नायकाचे वर्तन दर्शवते, त्याला मार्गदर्शन करते व ओघानेच हरिश्चंद्रासारखे वर्तन ठेवून जे जगू इच्छितात, त्यांची व्यथा, कथा सांगते व पथदर्शन करते. हेमंतकुमार यांचा धीरगंभीर आवाज सांगतो - 

करोडों की जिंदगी के लिए 
सूरज रे जलते रहना

या जगाला (सत्याचा) प्रकाश देण्यासाठी, करोडो जिवांना जिवंत ठेवण्यासाठी हे सूर्यदेवा (सूर्याप्रमाणे तेजस्वी राजा असा गर्भितार्थ येथे आहे.) तू प्रकाशमान बनून राहा (जळत राहा.) 

हे गीत सूर्याला उद्देशून आहे; पण ते केवळ सूर्याला उद्देशून नाही, तर हरिश्चंद्रासारख्या मानवांनाही उद्देशून आहे. म्हणूनच अशा मानवांना (ओघानेच सूर्याला) सांगितले जाते - 

जगत कल्याण की खातिर तू जन्मा है 
तू जग के वास्ते हर दु:ख उठा रे 
भले ही अंग तेरा भस्म हो जाए 
तू जल जल के यह किरण लुटा रे 
लिखा है येही तेरे भाग में 
की तेरा जीवन रहे आग में

(हे सूर्या) या जगाच्या कल्याणसाठी तुझा जन्म झाला आहे. या जगाकरिता तू (वाट्याला येणारे) प्रत्येक दु:ख स्वीकार! स्वत: जळून तू हे प्रकाशमान किरण सर्वांपर्यंत पोहोचव. त्यापायी तुझे शरीर जळून भस्म झाले (तरी त्याची तू फिकीर करू नकोस) तरी चालेल. (कारण) तुझ्या प्रारब्धातच लिहिले आहे, की  तुझे जीवन हे आगीतच राहणार आहे. 

सूर्याचे प्रतीक वापरून लिहिलेल्या या गीतात कवी प्रदीपजी सत्याने चालणाऱ्या, जगणाऱ्या मानवाला पुढे सांगतात -

करोडो लोग पृथ्वी के भटकते है 
करोडो आँगनो में है अंधेरा 
अरे जब तक न हो घर घर में उजियाला 
समझ ले अधुरा काम है तेरा 
जगत उद्धार में अभी देर है 
अभी तो दुनिया में अंधेरा है 
सूरज रे जलते रहना

(दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना सुख मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या हे सूर्यासारख्या तेजस्वी मानवा) या पृथ्वीवरील करोडो लोक (जीवनाची योग्य दिशा/मार्ग न मिळाल्याने) भटकत आहेत. (अज्ञानाचा) अंध:कार करोडो लोकांच्या अंगणात (जीवनात)रून राहिला आहे. अरे, जोपर्यंत प्रत्येक घरात हा (सौख्याचा, ज्ञानाचा) उजेड पडत नाही (तोपर्यंत तू) समज, की तुझे कार्य पूर्ण झालेले नाही. (हे विसरू नकोस, की) या जगाचा उद्धार होण्यास अजून अवकाश आहे (आणि या) जगात अद्याप (दु:खाचा/अज्ञानाचा) अंध:कार आहे. म्हणूनच हे ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवा, तू जळत राहा, की ज्यामुळे ही सृष्टी प्रकाशमान होईल. 

अर्थपूर्ण व प्रतीकांचा वापर करून लिहिलेले हे गीत आणि या वेळी पडद्यावर प्रजाजनांचा निरोप घेणारे, चेहऱ्यावर सात्विकतेचे भाव असणारे ‘हरिश्चंद्रा’च्या रूपातील पृथ्वीराजजी! त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search