Next
स्वीकाराच्या दिशेने एक पाऊल...!
BOI
Monday, December 17, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत आणताना त्यावर हिंदीचा सगळा रंग टाकण्याची काळजी आपल्याकडे घेतली जाते. अलीकडच्या काळात मात्र त्यात बदल होताना दिसतो आहे. म्हणूनच ‘येवडू’, ‘चिरुता’, ‘तेरी’, ‘बयमा इरुक्कु’ किंवा अगदी रजनीकांतचा ‘कबाली’ असे चित्रपट कोणतेही नामांतर न होता हिंदीत येतात. दुसरीकडे तेलुगूत ‘तडका’, ‘मिर्ची’, ‘रगडा’ आणि तमिळमध्ये ‘सरकार’ अशी नावे चित्रपटांना मिळतात. तेव्हा समाज खरोखरच खुला झालाय, नव्यासाठी स्वागतशील झालाय याचा दाखला मिळतो.
.........
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सुपरस्टार रजनीकांतच्या 2.0 चित्रपटातील एक दृश्य. हवेत नाहीशा होणाऱ्या मोबाइलचा शोध घेत तो अळक्कुण्ड्रम या ठिकाणी येतो. चित्रपटात हे नाव जसेच्या तसे दाखविले आहे. विशेष म्हणजे हिंदी आवृत्तीतही हेच नाव आहे. हे एक आक्रीतच म्हणायला पाहिजे. कारण दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत आणताना त्यावर हिंदीचा सगळा रंग टाकण्याची काळजी आपल्याकडे घेतली जाते. या बाबतीत तीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘अप्पू राजा’ चित्रपटाचे उदाहरण पाहता येईल. कमल हासन याने अफलातून अभिनय करून रंगविलेल्या बुटक्या नायकासाठी हा चित्रपट प्रसिद्ध आहे. तमिळमधील ‘अबूर्व सगोदरगळ’ या चित्रपटाची ही डब आवृत्ती. यातील एका दृश्यात कमल हासन आणि नायिका ऊटीला गेलेले असतात; पण हे दृश्य तुम्ही तमिळ किंवा तेलुगूत पाहिले तरच दिसेल. कारण हिंदीत या ऊटीचे लोणावळा-खंडाळा झालेले दिसते, तर चेन्नईचे मुंबई! कारण इथे (म्हणजे उत्तर भारतात) आणताना चित्रपटात तीच नावे ठेवली तर ‘लोक काय म्हणतील’ हा प्रश्न! मग पडद्यावरचे दृश्य आणि ऐकू येणाऱ्या संवादात काही मेळ नसला तरी चालेल!

इतके कशाला, अलीकडच्या वर्षांत गाजलेल्या ‘सिंगम’ चित्रपटाचे उदाहरण घ्या. ‘सूर्या सिंगम’ या नावाने हा चित्रपट हिंदीत आला होता. मूळ चित्रपटात सिंगम हा नल्लूर गावचा असतो, तर खलनायक चेन्नईचा. त्यामुळे त्याची भाषा चेन्नईच्या धाटणीची असते; मात्र हिंदीत येताना त्यातील खलनायक हरयाणवी भाषेत बोलायला लागतो. रवी तेजाच्या मूळ तेलुगू चित्रपटात तो तेलुगूत हिंदी मिसळतो, इकडे हिंदीत येताना तो मराठी होतो.

त्या पार्श्वभूमीवर 2.0 या चित्रपटामधील या एका दृश्याचे महत्त्व लक्षात येते. चित्रपट उद्योगाच्या सुरुवातीला युसुफ खानला दिलीपकुमार व्हावे लागले, हमीद अली खानला अजित व्हावे लागले किंवा बद्रुद्दीनला जॉनी वॉकर व्हावे लागले. आज मात्र शाहरुख खान, सलमान खान किंवा आमीर खानला आपली नावे बदलावी लागत नाहीत. हा बदल जेवढा क्रांतिकारक, तेवढाच हाही बदल क्रांतिकारक म्हणावा लागेल. हिंदीत डब झालेले दाक्षिणात्य चित्रपट नुसत्याच मोठ्या संख्येने येत नाहीत, तर ते आपला विशिष्ट स्वाद, रंग आणि स्वभावासह येत आहेत ही त्यातली खरी गोम आहे.

टीव्हीवर चित्रपट वाहिन्यांचा सुकाळ झाला, तेव्हा त्यांच्याकडे सामग्री खूप होती. परंतु ती प्रेक्षकांनाही हवीशी वाटायला हवी होती. ‘पुलं’च्या भाषेत, ‘या माध्यमांची सांस्कृतिक भूक मोठी आहे.’ ती भूक भागवायची तर होती; पण तृप्तीचा ढेकर प्रेक्षकांनी द्यायला हवा होता. ती तृप्ती जेव्हा बॉलिवूडच्या चित्रपटांतून मिळेनाशी झाली, तेव्हा भारतीय प्रेक्षकांच्या भावनांशी सुसंगत असलेले चित्रपट हाच त्यांचा हुकमी एक्का होता. अशा वेळी हा दाक्षिणात्य मसाला पुरेपूर कामी येतो. साधारण २००४च्या सुमारास ‘इंद्रा द टायगर’ या चित्रपटाने ही वाट घालून दिली आणि आजही हाच चित्रपट कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर दिसतो. यातून या मसाल्याचा ठसका किती असेल, याची कल्पना येईल. यापैकी बहुतेक दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्ट्या (तथाकथित) हिंदी चित्रपटांपेक्षा श्रेष्ठ असतात. हे चित्रपट अतिशय खुबीने बनलेले असतात आणि चाकोरीबाहेरच्या कथा त्यात असतात, असे कारण या चित्रपटांच्या वाढत्या संख्येमागे दिले जाते. 

...मात्र आतापर्यंत ‘खतरनाक खिलाडी’, ‘एक ज्वालामुखी’, ‘जलाकर खाक कर दूंगा’ किंवा ‘खिलाडी १ ते १०’ अशी काहीही नावे टाकून या वाहिन्या असे दाखवत होत्या, जणू या चित्रपटांना जागा देणे ही त्यांची मजबुरी आहे. हे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये जणू दाक्षिणात्य चित्रपट दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. प्रेक्षक हे चित्रपट पाहत आहेत. तमिळ, तेलुगू, मल्याळम किंवा कन्नड या भाषांमधील चित्रपट हिंदीत आणण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यातून त्यांना गल्लाही मिळतो आणि इतरांवर मातही करता येते. 

डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या यशाचा मासला बघायचा असेल, तर सोनी वाहिनीकडे पाहायला हवे. ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’च्या आकडेवारीनुसार, या वाहिनीच्या सोनी मॅक्स आणि सोनी वाह या दोन चित्रपट वाहिन्या हिंदी चित्रपट श्रेणीतील पहिल्या दोन स्थानांवर आहेत. बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांचे हक्क या वाहिनीकडे आहेत, ही केवळ एक चुणूक! खुद्द या वाहिनीने आपल्या या यशाचे श्रेय दक्षिण भारतीय डब केलेल्या चित्रपटांना दिले आहे. 

‘प्रेक्षक या सिनेमांच्या विरोधात नाहीत, उलट त्यांचा आनंदच घेत आहेत अशा जगभरातील प्रेक्षकांची संख्या वाढत आहे, हे आम्हाला आकडेवारीतून कळत होते. त्याची चाचणी घेण्यासाठी आम्ही संशोधनाचा भाग म्हणून हे चित्रपट दाखवले,’ असे ‘सोनी मॅक्स क्लस्टर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसायाचे प्रमुख नीरज व्यास यांनी काही महिन्यांपूर्वी मिंट या वृत्तपत्राला सांगितले होते. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या बाजारपेठांमध्येही दक्षिणी सिनेमा पाहण्याबाबत काहीच आक्षेप नाही. केवळ लिप सिंक (ओठांच्या हालचालींशी संवादाचा मेळ) आणि पडद्यावरील भावनांनुसार डबिंग केले की झाले! ही क्लृप्ती वाहिन्यांना लक्षात यायलाही वेळ लागला. म्हणूनच अन्य वाहिन्यांवरही दाक्षिणात्य चित्रपटांचेच अधिराज्य दिसते. सोनी वाहिनीवर बॉलिवूडच्या चित्रपटांशी या चित्रपटांचे प्रमाण ६०:४० असे आहे, तर ‘यूटीव्ही अॅक्शन’वर ३५ ते ४० टक्के असे आहे. हिंदीत डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचेच हे द्योतक आहे. खासकरून छोट्या पडद्यावर तर दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवुडच्या चित्रपटांवर मात केली असल्याचेच दिसते. 

‘बाजारपेठ आता परिपक्व होत असून डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांची लोकप्रियता सर्वच थरांमध्ये वाढत आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनातही ती दिसून येते. डब केलेल्या चित्रपटांबद्दल प्रेक्षक अधिकाधिक खुले होत आहेत. उत्पादनमूल्ये महत्त्वाची आहेत. अन् तमिळ आणि तेलुगू चित्रपट अधिक सहजतेने स्वीकारले जातात. यामागे अनेक कारणे आहेत,’ असे ‘व्हायकॉम १८’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक म्हणतात. 

एक काळ होता, की दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे रजनीकांत, कमल हासन आणि चिरंजीवी यांच्या पलीकडे कोणाची नावे प्रेक्षकांना माहीत नव्हती. आज त्यांच्या बरोबरीने किंबहुना अधिक नागार्जुन, प्रभास, विजय, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर ही नावे प्रेक्षकांना ओळखीची आहेत. रवी तेजा, गोपीचंद, महेश बाबू, पवन कल्याण यांचा स्वतःचा चाहता वर्ग तयार झाला आहे.

म्हणूनच ‘येवडू’, ‘चिरुता’, ‘तेरी’, ‘बयमा इरुक्कु’ किंवा अगदी रजनीकांतचा ‘कबाली’ असे चित्रपट कोणतेही नामांतर न होता हिंदीत येतात. ते कोणाला खटकतही नाहीत. दुसरीकडे तेलुगूत ‘तडका’, ‘मिर्ची’, ‘रगडा’ आणि तमिळमध्ये ‘सरकार’ अशी नावे चित्रपटांना मिळतात. तीही कोणाला खटकत नाहीत. तेव्हा समाज खरोखरच खुला झालाय, नव्यासाठी स्वागतशील झालाय याचा दाखला मिळतो. ही सांस्कृतिक देवाणघेवाण अशी दोन्ही बाजूंनी चालली तरच ती पुढे जाईल, हेही नक्की!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search