Next
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘शिवपुत्र महोत्सवा’चे आयोजन
BOI
Wednesday, May 08, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘शिवस्फूर्ती प्रतिष्ठान’ व ‘शिवस्पर्श प्रकाशन’ यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा ‘शिवपुत्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी दर वर्षीप्रमाणे ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’, व ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत. इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे व ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

रविवारी (१२ मे) बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून रोख रक्कम रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, शाल व ग्रंथ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या शुभहस्ते तसेच जि. प. सदस्य रोहित पवार व पुणे मनपाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञेश मोळक यांनी दिली.

शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे इतिहास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी हे पुरस्कार दिले जातात. या दोन्हीं पुरस्कारांचे हे १६वे वर्ष आहे. आजवर डॉ. प्रभाकर ताकवले, डॉ. अमोल कोल्हे, नितीन देसाई, डॉ. बाबा आढाव, ॲड. अनंत दारवटकर, शाहीर संभाजी भगत, स्व. प्रमोद मांडे, इंद्रजित सावंत, चंद्रशेखर शिखरे, प्रा. मा. म. देशमुख यांना शिवपुत्र छत्रपती शंभू राजे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

तसेच सुशीला संकपाळ, डॉ. सुवर्णा निंबाळकर, कार्तिकी गायकवाड, अनिसा सय्यद, अंकिता गुंड, कॉ. मुक्ता मनोहर, इंदिरा गायकवाड, ल्युसी कुरियन इत्यादी महिलांना, महाराणी ताराराणी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडसीपणे काम करणाऱ्या महिलेस हा पुरस्कार दिला जातो. 

दत्ताजी नलावडेयंदाचे पुरस्कारार्थी दत्ताजी नलावडे हे ज्येष्ठ पत्रकार, शिवव्याख्याते व इतिहास संशोधक असून, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ व वीर मावळ्यांचा अप्रकाशित इतिहास त्यांनी निर्भीडपणे मांडला आहे. भारत सरकार व टपाल खाते यांच्या वतीने राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज व जीवा महाले ही तीन टपाल पाकिटे काढली गेली, यासाठी नलावडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. विविध विषयांवर त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत.

विद्याताई बाळविद्याताई बाळ या ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्या असून, १९६४ ते १९८६ अशी २२ वर्षे त्यांनी किर्लोस्कर प्रकाशनाच्या ‘स्त्री’ मासिकात काम केले आहे. त्यानंतर १९८९मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाची सुरुवात करून आजपर्यंत त्या या मासिकाच्या मुख्य संपादिका म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांच्या तीन अनुवादित कादंबऱ्या, तीन स्फूट लेखांचे संग्रह, एक चरित्र लेखन, तीन संपादित पुस्तके असे  साहित्य प्रकाशित आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराबरोबर सर्व परिवर्तनवादी चळवळींशी त्यांची बांधिलकी आहे. 

याव्यतिरिक्त या शिवपुत्र महोत्सवात छत्रपती संभाजी महाराज विशेषांक तसेच ॲड. शैलजा मोळक लिखित काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक दत्तक योजनेतील १५ विद्यार्थ्यांना मदत म्हणून चेक वाटप करण्यात येणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 105 Days ago
As regards. Vidya Bal , her tireless efforts certainly deserve recognition .
0
0

Select Language
Share Link
 
Search