Next
गुंतवणुकीचे फाटक उघडण्यासाठी हवी ‘फाटका’ची पूर्तता .....
BOI
Saturday, May 12, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

आता आपण कुठेही गुंतवणुकीच्या उद्देशाने खाते उघडण्यास गेलो, तर ‘केवायसी’सोबतच ‘फाटका’ म्हणजेच ‘फॉरीन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स अॅक्ट’बाबतची पूर्तता करणे आवश्यक असते. याबाबतची सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात ...
...........
गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भारतात गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर परदेशात गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. असे आर्थिक व्यवहार पारदर्शी असावेत आणि उभय देशांना अशा व्यवहारांची माहिती अपोआप व सहज मिळावी, म्हणून भारत व अमेरिका यांच्या ‘फाटका’ ‘फॉरीन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स अॅक्ट’ नावाचा आंतरराष्ट्रीय करार झाला आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला आता ‘फाटका’चा स्वयंप्रमाणित (सेल्फ डिक्लरेशन) विहित नमुना अर्ज ‘केवायसी’साठीच्या कागदपत्रांसोबतच भरून देणे बंधनकारक झाले आहे. याचा मुख्य उद्देश उभय देशातील कर चुकवेगिरीला आळI घालणे हाच आहे.

‘फाटका’ची पूर्तता ही केवायसी व्यतिरिक्त करावी लागते. याचाच अर्थ असा, की केवायसी पूर्तता केली असली, तरी ‘फाटका’बाबतची पूर्तता करणे आता प्रत्येकावर बंधनकारक आहे. ‘फाटका’ची पूर्तता करण्यासाठी आधार नंबर असण्याची आवश्यकता नाही. आपण भारताव्यतिरिक्त अन्य देशात प्राप्तिकर भरत असाल, तर त्या देशातील पॅनसदृश नंबरची झेरॉक्स सोबत जोडणे आवश्यक असते. 

हा फॉर्म भरणे अगदी सोपे असते. आपण हा फॉर्म स्वत: डाउनलोड करूनसुद्धा भरू शकता. तसेच, ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करता अथवा केलेली असते, तिथे हे फॉर्म अगदी सहज उपलब्ध असतात. यामुळे आता बँकेत खाते उघडताना, म्युच्युअल फंडात, तसेच ‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक करताना ‘फाटका’ची पूर्तता करावीच लागते.

ज्या गुंतवणूकदारांनी एक जुलै २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१५च्या दरम्यान खाते उघडून गुंतवणूक केली आहे, अशा सर्व गुंतवणूकदारांनी ‘फाटका’बाबतची पूर्तता ३१ ऑगस्ट २०१६अखेर करणे अपेक्षित होते. तशा आशयाच्या सूचना सर्व वित्तीय संस्थांना प्राप्तिकर खात्यामार्फत या पूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या खात्याबाबत अशी पूर्तता दिलेल्या मुदतीत होणार नाही असे खाते गोठविण्यात यावे व जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत खात्यावर व्यवहार करू न देण्याबाबतही वित्तीय संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, या कामाची व्याप्ती विचारात घेता ही मुदत ३० एप्रिल २०१७पर्यंत वाढविण्यात आली होती; मात्र आता ही वाढीव मुदतसुद्धा संपुष्टात आली असल्याने, ज्यांनी अद्याप ही पूर्तता केलेली नाही अशांची खाती गोठविली जाऊ शकतात.

तेव्हा, आपण ‘फाटका’बाबतची पूर्तता केली आहे की नाही, याची प्रत्येकाने खात्री करून घेणे आवश्यक आहे. नसल्यास ती पूर्तता त्वरित करावी जेणेकरून आपले खाते गोठविले जाणार नाही.


- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link