Next
लघुपटातून पाहिलेला चित्रकार ‘नैनसुख’
BOI
Thursday, January 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चित्र आणि लघुपटातील दृश्यनैनसुख हा पहाडी शैलीतील लघुचित्रे काढणारा चित्रकार १८व्या शतकात होऊन गेला. नावाप्रमाणेच त्याची चित्रे डोळ्यांना सुखावणारी आहेत. प्रा. डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी त्याच्यावर संशोधन केले असून, अमित दत्ता यांनी त्याच्यावर उत्तम लघुपट तयार केला आहे. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज नैनसुख आणि त्याच्यावरील लघुपटाबाबत...
............
नैनसुखनैनसुख नावाच्या चित्रकाराशी माझा परिचय अमित दत्ता या चित्रपट कलावंताच्या लघुपटाद्वारे झाला. त्यापूर्वी नैनसुख या पहाडी शैलीतील लघुचित्रे काढणाऱ्या चित्रकाराची चित्रे फक्त पुस्तकामध्ये आणि एखादे चित्र संग्रहालयात पाहिले होते. परंतु भारतीय लघुचित्रकारावरील इतका प्रभावी चित्रपट अमित दत्ता यांनी तयार केला आहे, की जणू आपण त्या काळात वावरत आहोत असा आभास होतो.

पहाडी राज्यामधील गुलेर या लहानशा राज्यात १८व्या शतकात (१७१० ते १७७८) हा चित्रकार राजा बळवंत सिंह याच्या दरबारात होता. ‘नैनसुख’चा अर्थ ‘डोळ्यांना सुखावणारा’ असा आहे. त्याच्या नावाप्रमाणेच या चित्रकाराची चित्रे खरोखरच डोळ्यांना सुखावणारी आहेत. पंडित सेऊ हे त्याचे वडील चित्रकार होते. माणकू हा त्याचा मोठा भाऊदेखील पहाडी लघुचित्रकारांपैकी महत्त्वाचा चित्रकार मानला गेला आहे.

पंडित सेऊ यांनी काढलेले चित्र

थोडक्यात ही दोन चित्रकार मुले आणि त्यांचे चित्रकार वडील अशा तिघांचा चित्रांचा लहानसा ‘कारखाना’ होता. म्हणजे आजच्या भाषेत ‘स्टुडिओ’ होता. १७४०च्या सुमारास ही मंडळी ‘जसोटा’ येथे राजपूत राजा मान झोरोवर सिंह आणि त्याचा पुत्र बळवंत सिंह यांच्या राजाश्रयाला आली आणि राजाच्या मृत्यूपर्यंत (१७६३) तेथेच कार्यरत राहिली.

लघुपटातील दृश्य

प्रा. डॉ. बी. एन. गोस्वामीनैनसुख या चित्रकारावरील मुळातील संशोधन डॉ. बी. एन. गोस्वामी या पंजाब विद्यापीठातील प्राध्यापक महोदयांनी केले आहे. या संशोधनासाठी ते जगभर प्रख्यात आहेत. मेट्रोपॉलिटन संग्रहालय, ब्रिटिश संग्रहालय, भारतीय आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्य संमेलन इत्यादी महत्त्वाच्या व्यासपीठांवर त्यांना नैनसुखबद्दल त्यांनी केलेल्या संशोधनाबाबत बोलायला पाचारण केले जाते. नैनसुखच्या विविध संग्रहालयांतील चित्रांना सुसंगत पद्धतीने मांडून त्याचे जीवनचरित्र गोस्वामींनी मांडले. नैनसुखची काही माहिती मिळते का, हे शोधण्यासाठी ते काशीत गेले होते. तेथे पंड्यांकडे वंशावळी असतात. त्यात नैनसुखबाबत काही पाहता येईल, म्हणून त्यांनी हा संशोधनाचा मार्ग निवडला. तेथे काही पंड्यांमधील वादात अडकलेल्या कागदपत्रात काही माहिती त्यांना मिळाली नाही. 

लघुपटातील दृश्य

बऱ्याच खटपटीनंतर त्यांना कागदांचा एक गठ्ठा मिळवण्यात यश आले. तो गठ्ठा उघडून पाहिल्यावर अर्थातच त्यांना अत्यानंद झाला. त्याचे कारण म्हणजे त्यात नैनसुखचे हस्ताक्षर तर होतेच होते, परंतु त्याने स्वत:बद्दलही लिहिले होते. शांडिल्य गोत्राचा, कुटुंबाचा उल्लेख त्यात होता. राजा बळवंत सिंहाच्या अस्थीविसर्जनाला तो तेथे (काशीला) आला होता. या कागदावर त्याने शंकर-पार्वती चित्र रेखाटले होते. अशा अनेक अंगांनी गोस्वामींनी या चित्रकारावर अभ्यास केला. ब्रिटिश संग्रहालयाने भारतीय लघुचित्रांवर एक मोठे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यासाठी अमित दत्ता यांनी ‘नैनसुख’ नावाने लघुपट केला होता. त्यातील मांडणीने लघुचित्राकडे पाहण्यासाठी नवी दृष्टी मिळाली.

लघुपटातील दृश्य

या लघुपटात चित्रकार त्याच्या काळात वावरत असतो. जागोजागी बसून चित्रे काढत असतो. राजाचे दैनंदिन जीवन, व्यक्तिचित्रे या व्यतिरिक्त आजूबाजूच्या कित्येक गोष्टी त्याने चित्रांत टिपल्या आहेत. दरबारातील वादक, नर्तक, नृत्यांगना त्याने चितारल्या आहेत. इतकेच काय, पण राजाची दाढी करणारा नाभिक आणि राजा यांचेही चित्र त्याने काढले आहे. अमित दत्ता यांनी आपल्या लघुपटात हे सारे जिवंत केले आहे. नैनसुखच्या चित्रांतील गोष्टन् गोष्ट त्यांनी नाट्यरूपांतर करून आपल्या समोर लघुपटाच्या रूपात मांडली आहे. हे मांडताना अतिरंजकतेचा लवलेशही कोठे नाही आणि वास्तवाचा अट्टाहास नाही. नैनसुख हा नैनसुखच्या पद्धतीनेच जणू द्विमितीत दाखवावा तसा दाखवला आहे. काहीतरी वेगळी नजर, समज आणि निर्मितीक्षमता अमित दत्ताच्या ठायी आहे. 

अमित दत्ताअमित दत्ता गेली काही वर्षे हिमाचलच्या पहाडी प्रदेशात लघुपट करीत आहेत. त्यांचे फिल्मचे शिक्षण पुण्याच्या ‘एफटीआयआय’मध्ये झाले आहे. एखादे लघुचित्र ते अर्धा-अर्धा तास पाहतात. इतके पाहिल्यावर आपल्यासाठी एखाद्या किंवा अर्ध्या मिनिटाचे दृश्य लघुपटात साकारतात. ही दृश्ये लघुपटात जिवंत प्रकट होतात.

अमित दत्ता यांचा हा लघुपट नैनसुखच्या चित्रांचा परिचय करून देणारा आहे. त्यासाठी गोस्वामींच्या संशोधनाचा वापर करण्यात आला आहे. सर्वसाधारणत: अशा लघुपटात-माहितीपटात तज्ज्ञांच्या मुलाखती वगैरे येतात. ते सगळे टाळून, त्याचा काळ, तेथील ठिकाणे इत्यादी वापरून दत्ता यांनी वेगळाच परिणाम साधला आहे.

नैनसुख व इतरही लघुचित्रकार आपले आत्मचित्र (सेल्फ पोर्ट्रेट्स) करीत असत. ही आत्मचित्रे एका बाजूने पाहिल्यासारखी असतात. चित्रकार स्वतःला एका बाजूने पाहून आत्मचित्र काढतो, तेव्हा त्याला काही आरसे लागणार, हे लक्षात घेऊन तीन आरशांचा एक ‘स्टँड’ दत्ता यांनी या लघुपटात घेतला आहे. जसोटाला या चित्रकारांच्या घराच्या माडीवरील कारखान्यात नैनसुख आत्मचित्रणात मग्न आहे, या दृश्यात तो स्टँड दिसतो. मला त्याच्या ऐतिहासिक संदर्भाबद्दल उत्सुकता होती. पुण्यातील फिल्म संग्रहालयात उमेश कुलकर्णी यांनी त्यांना बोलावले होते तेव्हा या ‘स्टँड’बद्दल मी विचारले. दत्ता यांनी तो अंदाजाने केला होता. त्याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही, असे त्यांनी सांगितले. 

नैनसुखचे आत्मचित्र पाहण्यासारखे आहे आणि तेही अमित दत्ता यांच्यासारख्यांचे डोळे आणि कॅमेऱ्याच्या नजरेतून. अनेकदा त्यातील दृश्ये आणि नैनसुखची चित्रे डोळ्यांसमोर येतात. माझ्या स्मरणचित्रांच्या पटलावर नैनसुख, त्याचे दर्शन घडविणारे डॉ. गोस्वामी आणि अमित दत्ता यांचा वेगळाच परिणाम झाला आहे.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(अमित दत्ता यांनी नैनसुख या चित्रकारावर केलेल्या लघुपटाचा ट्रेलर सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search