Next
‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानांत भारतीय खाद्यपदार्थ
अस्सल चव देण्यासाठी आणि खर्चबचतीसाठी कंपनीचा निर्णय
BOI
Friday, January 11, 2019 | 02:59 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत आता प्रवाशांना भारतीय खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत. प्रवाशांना अस्सल भारतीय आणि चवदार पदार्थ देण्याच्या हेतूसह खानपान सेवेवर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. यामुळे ‘एअर इंडिया’च्या विमानाने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाता-येता अशा दोन्ही वेळा भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. 


आधीच तोट्यात असलेल्या ‘एअर इंडिया’ने सध्या काही ठरावीक आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये स्टॉकहोम, कोपनहेगन, बर्मिंगहॅम आणि माद्रिद या ठिकाणांचा समावेश आहे. एअर इंडियाने या ठिकाणी जाणाऱ्या विमानफेऱ्यांसाठी भारतातून जातानाच भारतीय खाद्यपदार्थांचा साठा बरोबर नेण्यास सुरुवात केली आहे. परतीच्या प्रवासात हे खाद्यपदार्थ प्रवाशांना देण्यात येणार आहेत. परदेशातील ही शहरे भारतीय शहरांच्या तुलनेत खूपच महाग आहेत. या शहरांमध्ये खाद्यपदार्थ विकत घेणे खूप महाग पडते. दर वर्षी खानपान सेवेसाठी एअर इंडियाला ६०० ते ८०० कोटी रुपये खर्च येतो. भारतात खाद्यपदार्थ विकत घेणे हे परदेशात खाद्यपदार्थ घेण्यापेक्षा तीन ते चार पटींनी स्वस्त आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे ‘एअर इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंग खरोला यांनी सांगितले. 

‘एअर इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंग खरोला
‘येत्या काही महिन्यांत कंपनी आखाती देशांच्या विमान फेऱ्यांमध्येदेखील भारतीय खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात करणार आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने सुरू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जुलै २०१७मध्ये कंपनीने इकॉनॉमी क्लासमध्ये, तसेच देशांतर्गत फेऱ्यांमध्ये मांसाहारी जेवण न देण्याचा निर्णय घेतला होता. भारतातून आखाती देश, सिंगापूर आणि युरोपातील काही देशांमध्ये जाणाऱ्या विमानांमध्ये भारतातूनच खाद्यपदार्थ घेऊन जाणे शक्य आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. परदेशी केटरर्सकडून भारतीय पदार्थ बनवून घेतले, तरी त्यांना भारतीय चव येऊ शकत नाही. अस्सल चवीचे स्वादिष्ट भारतीय खाद्यपदार्थ भारतातच बनवून घेऊन प्रवाशांना दिल्यास त्यांना उत्कृष्ट चवीचे खाद्यपदार्थ खाता येतील. खर्चात बचत होण्याबरोबरच हा आणखी एक लाभ कंपनीला होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. 

‘एअर इंडिया’वर सध्या ४८ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज असून, यातील सरकारी निर्गुंतवणुकीचा मे २०१८मध्ये करण्यात आलेला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. २००७मध्ये ‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये झालेल्या विलीनीकरणानंतर कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. स्पर्धा, विमानतळ वापराचे शुल्क, चलन विनिमय दरातील तफावत आदी कारणांमुळे तोट्याचे प्रमाण वाढत असल्याचे नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search