Next
१८ वर्षांच्या चिन्मयने लिहिलेले उत्तम नाटक - संगीत चंद्रप्रिया
संगीत रंगभूमीचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याची ग्वाही देणारा नाट्यप्रयोग
BOI
Sunday, April 07, 2019 | 12:45 PM
15 1 0
Share this article:‘संगीत चंद्रप्रिया’
हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, ते चिन्मय किरण मोघे या अवघ्या १८ वर्षांच्या प्रतिभासंपन्न तरुणाने लिहिले आहे. सर्वार्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या या नाटकाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.........
मराठी संगीत रंगभूमीची परंपरा १९व्या शतकात सुरू झाली. विष्णुदास भावे यांनी सन १८४३मध्ये सांगलीत ‘संगीत सीतास्वयंवर’चा पहिला प्रयोग सादर केला. त्यानंतर जणू संगीत नाटकांची घोडदौडच सुरू झाली. सांगली हे ‘नाट्यपंढरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, कृ. प्र. खाडिलकर, राम गणेश गडकरी यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर, वि. वा. शिरवाडकर, मो. ग. रांगणेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी स्वर्गीय संगीताचा आनंद प्रेक्षकांना दिला. सुरुवातीचे नाटककार हे संगीताचे उत्तम जाणकार होते आणि तेच दिग्दर्शकही होते. स्वयंवर, सौभद्र, मानापमान, शाकुंतल, मृच्छकटिक, शारदा, एकच प्याला, संशयकल्लोळ, विद्याहरण, ययाती आणि देवयानी, देवमाणूस या क्रमाने पुढे मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, कुलवधू, ते महानिर्वाण, संगीत देवबाभळी आणि आता संगीत चंद्रप्रिया या नाटकांपर्यंत आपण येऊन पोहोचतो. पं. भास्करबुवा बखले, मा. दीनानाथ, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव आणि पुढे जितेंद्र अभिषेकी यांनी अवीट गोडीची नाट्यगीते निर्माण केली. 

बालगंधर्व’ हे रंगभूमीवरचे सर्वश्रेष्ठ गायक कलाकार. पन्नास वर्षे त्यांनी अनेक नाटके गाजवली. मा. दीनानाथ, नानासाहेब जोगळेकर, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर, चिंतामणराव कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार, रामदास कामत हे लोकप्रिय पुरुष गायक, तसेच, मीनाक्षी, जयमाला शिलेदार, हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, आशालता वाबगावकर इत्यादी स्त्री-गायिका होत्या. 

अभिजात संगीत नाटकांची परंपरा लुप्त होत आहे का, अशी परिस्थिती असताना वि. वा शिरवाडकर, वसंतराव कानेटकर, विद्याधर गोखले, बाळ कोल्हटकर यांच्यासारखे नाटककार पुढे आले. संगीत रंगभूमीला पुन्हा उजाळा मिळाला. नाटक आणि संगीत हे मराठी माणसाचे वेड आहे. रंगभूमी काय किंवा चित्रपट क्षेत्र काय - त्यात चढ-उतार होतच असतात. या व्यवसायांचे स्वरूप काळानुसार बदलत असते. ते क्रमप्राप्त आहे. पुन्हा नवे नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार पुढे येतात आणि ‘अच्छे दिन’ निर्माण होतात. राज्य सरकारतर्फे नाट्यमहोत्सव (स्पर्धा) सुरू होऊन खूप वर्षे झाली. आता संगीत नाट्यस्पर्धांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हौशी रंगभूमीप्रमाणेच व्यावसायिक पातळीवरही नवे प्रयोग होत आहेत. 

चिन्मय मोघेहा झाला मराठी संगीत रंगभूमीचा धावता आढावा. नुकतेच एक संगीत नाटक रसिकरंजनासाठी दाखल झाले आहे. कवी समर उर्फ चिन्मय किरण मोघे लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत चंद्रप्रिया.’ नाटकाचा सहावा प्रयोग नुकताच पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात पाहिला. सर्वांगसुंदर सादरीकरण, संहिता उत्कृष्ट, दिग्दर्शन आणि अभिनय उत्तम, संगीत अत्यंत श्रवणीय. अगदी १९व्या शतकातील संगीत नाटकांच्या दिव्य-भव्य काळात गेल्यासारखे वाटले. गीतेही समरनेच लिहिली आहेत. विलक्षण प्रतिभासंपन्न लेखक समर हा अवघ्या १८ वर्षांचा असून तो पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये ‘मराठी’ विषय घेऊन ‘बीए’ करत आहे आणि पहिल्या वर्षाला आहे. त्याचे वडील किरण मोघे हे सध्या नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. ते पाच-सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीला असताना मी चिन्मयला पाहिले होते. या नाटकाशिवाय त्याची अन्य साहित्यनिर्मिती पाहा - सोळाव्या वर्षीच ‘शिवप्रताप’ हे तीन हजार श्लोकांचे महाकाव्य त्याने लिहून पूर्ण केले. त्यात ११६ सर्ग आणि २० वृत्ते आहेत. इतक्या वृत्तांचा सतत वापर असलेले हे जगातील पहिले महाकाव्य ठरेल. त्याशिवाय ‘चंद्रदूत’ हे मराठीतील पहिलेच दूतकाव्य. त्यात ८२ दीर्घ श्लोक, दोन खंड आणि तीन वृत्ते आहेत. ‘मधुपुष्प’ आणि ‘चंद्रवेल’ हे दोन अप्रकाशित गज़लसंग्रह तयार आहेत. ‘प्रेमगंध’ ही त्याची मराठी कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. त्याने ‘संगीत चंद्रप्रिया ‘हे नाटक केवळ पाच दिवसांत लिहिले. पात्रे आणि भूमिका ठरल्यानंतर दोन महिने तालमी झाल्या आणि नाटक रंगभूमीवर आले. त्यातील १२ नाट्यपदे चिन्मयनेच तयार केली. असे प्रासादिक साहित्य ज्याच्या लेखणीतून उतरले, त्या तरुण लेखकाचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. 

‘संगीत चंद्रप्रिया’ लिहिण्यामागचा उद्देश सांगताना चिन्मय म्हणतो, ‘गुप्त काळाचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा इतिहास पुढे आणावा आणि स्त्रीचे रक्षण करण्याचे भान व्यवस्थेला असावे, हे मांडण्याची आवश्यकता वाटली. संगीत नाटकांची परंपरा यापुढेही अखंड चालावी, यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे.’

चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर‘मुद्राराक्षस’ हे विशाखदत्ताचे गाजलेले नाटक. त्याने अन्य साहित्य आणि काव्यरचनाही केल्या. परंतु त्या जाळण्यात आल्या किंवा काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यानेच लिहिलेल्या ‘देवीचंद्रगुप्त’ या काव्यग्रंथाचा अल्प भाग आज उपलब्ध आहे. त्याच्या आधारे ‘चंद्रप्रिया’ बेतण्यात आलेले आहे. अर्थात, येथे कल्पनाशक्तीला भरपूर वाव होता. समर्थ, गोळीबंद संवादांद्वारे लेखकाने त्या विषयाला उत्तम न्याय दिला आहे ‘मुद्राराक्षस’ नाटकात चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य कौटिल्याशी संबंधित घटना आहेत, तर ‘देवी चंद्रगुप्त’मध्ये समुद्रगुप्ताच्या घराण्यातील रामगुप्त (चंद्रगुप्त) हे ऐतिहासिक पात्र आहे. विशाखदत्ताचा नेमका काळ सांगता येत नसला, तरी तो गुप्तकाळात साधारण इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात झाला असावा. वीररस प्रधानता हे त्याचे वैशिष्ट्य होते. समुद्रगुप्त चौथ्या शतकातील (इ. स. ३३५-८०) सम्राट होता. 

‘संगीत चंद्रप्रिया’ ही सम्राट चंद्रगुप्त (दुसरा) याची दोन अंकी प्रेमकथा आहे. एके काळी संगीत नाटक रात्रभर चालत असे. आवडलेल्या गाण्यांना वारंवार ‘वन्स मोअर’ मिळत असे. आता प्रेक्षकांकडे तेवढा वेळ आणि सहनशक्ती नाही. अर्थात संगीत नाटकांची आवड मात्र तेवढीच आहे. उत्तम संगीत असलेली आटोपशीर, पण उत्कंठापूर्ण नाटके आली, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळणारच यात शंका नाही. ‘चंद्रप्रिया’ त्याच दर्जाचे नाटक आहे. चंद्रगुप्त आणि त्याची प्रेयसी ध्रुविका ही प्रमुख पात्रे आहेत. चिन्मय जोगळेकर व अस्मिता चिंचाळकर या कसलेल्या, दमदार गायक कलावंतांनी त्या भूमिका अप्रतिम सादर केल्या आहेत. शास्त्रीय रागदारीवर आधारित बारा गाणी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवून जातात. जगदेव वैरागकर यांनी दिलेले संगीत (कुणाचेही नाव न घेता) गतकाळातील ख्यातनाम नाट्यसंगीतकारांच्या तोडीचे आहे. 

चंद्रगुप्ताच्या वेडसर, दुर्बळ थोरल्या भावाची भूमिका विश्वास पांगारकर यांनी उत्तम वठवली आहे. काही राजकीय कारणामुळे ध्रुविकाचे लग्न त्याच्याशी होते; परंतु त्याच वेळी शकांचे राज्यावर आक्रमण होते. स्वत:ला आणि जनतेला त्रास होऊ नये, राज्य सुरक्षित राहावे, म्हणून तो राणीला शक राजाच्या स्वाधीन करण्यास तयार होतो. अशा गंभीर परिस्थितीत आपल्या प्रेमिकेला संरक्षण देऊन चंद्रगुप्त शक राजावर अकस्मात हल्ला करून त्याला ठार करतो. थोरला भाऊ गादीवर बसण्यास लायक नाही, तो राजद्रोही आहे, या वास्तवाला मंत्रिगणांकडून मान्यता मिळाल्यामुळे भावाला पदच्युत करून चंद्रगुप्त सम्राट बनतो आणि अद्याप ‘पवित्र’ असलेल्या ध्रुविकेशी लग्न करतो, असे नाटकाचे थोडक्यात कथानक आहे. 

चिन्मय मोघेच्या नाट्यलेखनात जबरदस्त ताकद आहे. प्रत्येक शब्द आणि वाक्य विचारपूर्वक लिहिलेले आहे. कथानकाला ओघ आहे. गाणी योग्य जागी टाकलेली आहेत. वैभवी जोगळेकर, नीला इनामदार आणि आकाश भडसावळे या अन्य कलाकारांच्या भूमिकाही छान सादर झाल्या आहेत. चिन्मयने इतक्या लहान वयात घेतलेली साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी पाहून आश्चर्य वाटते. पूर्व जन्मातील अभ्यास आणि संशोधन सोबत घेऊन हा अवतरला काय ? किंवा (अतिशयोक्ती वाटेल पण) विशाखदत्त स्वत: आपले अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्माला आला काय, असे वाटते. 

तो अशीच संगीत नाटके आणि काव्य लिहीत राहो, हीच अपेक्षा! संगीत रंगभूमीला पुन्हा सुवर्णकाळ प्राप्त होवो! इति शम्!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(संगीत नाटक आणि नाट्यसंगीत यांबद्दल संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार मधुवंती पेठे यांनी लिहिलेले लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे या 
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ, सेवाव्रती दाम्पत्याची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search