Next
‘कट्टरतावाद कमी करण्यासाठी समाजाने जागरूक असणे आवश्यक’
खालिद शाह यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, July 17, 2019 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

‘तरुण मुले दहशतवादाकडे का वळतात’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना (डावीकडून) खालिद शाह, शांती मॅरीएट डिसुझा, राहुल चंदावरकर, अरुण वाखलू, कर्स्टीन हस्स व लुट्झ ह्युबनर.

पुणे : ‘दहशतवादी फक्त मदरशातूनच येतात असे नाही, तर उच्चशिक्षित लोकही या मार्गाला लागतात. या मुलांना राजकारण माहीतच नाही. याचाच गैरफायदा इसिस, हिसबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटना घेतात. त्यांच्याच शाळा असल्याने तेथून बाहेर पडणारी मुले आपोआप कट्टरता वादाकडे वळतात. याविषयी समाजानेच जागरूक राहणे आवश्यक आहे’, असे मत नवी दिल्ली येथील ‘ऑब्झर्व्ह रिसर्च फाउंडेशन’शी संलग्न असलेले व काश्मीर वाद, विद्रोह आणि सीमा दहशतवाद या विषयावर संशोधनात्मक अभ्यास करणारे खालिद शाह यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर व मॅक्सम्युलर भवन यांच्यावतीने ‘तरुण मुले दहशतवादाकडे का वळतात’ या विषयावरील ‘टूवर्डस पीस’ या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सोमवारी ‘युथ रॅडीकलायझेशन’ (तरुण दहशतवादाकडे का वळतात) विषयावर तज्ज्ञांचे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात खालिद शाह यांच्याबरोबर प्रगती लीडरशीपचे संचालक व प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाखलू, दहशतवाद आणि संघर्ष या विषयाच्या संशोधक व ‘मंत्रया’च्या संस्थापक अध्यक्षा शांती मॅरीएट डिसुझा, जर्मनीतील प्रसिद्ध नाटककार लुट्झ ह्युबनर व जर्मन रंगकर्मी कर्स्टीन हस्स सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार राहुल चंदावरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले आदी उपस्थित होते. या वेळी ‘युथ रॅडीकलायझेशन’ या विषयांवरील लघुपट दाखविण्यात आले. याबरोबरच या विषयावरील स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

जम्मू-काश्मीरच्या दहशतवादाविषयी बोलताना खालिद शाह म्हणाले, ‘अगदी १५-१६ वर्षांची मुले दहशतवादाकडे वळतात. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या बाहेर काहीही बघितलेले नसते. त्यांच्यासाठी हिंदू हे मुस्लिमांपेक्षा एकदम वेगळे आहेत, असेच मनावर ठसलेले असते. आपण सगळे माणसे आहेत असे समजतच नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मवाद ठासून भरलेला आहे. तेथील दहशतवादी संघटना सामाजिक माध्यमांचा वापर करून तरुणांना भडकवत असतात. या सगळ्याकडे समाजाने डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे’.

वाखलू म्हणाले, ‘लहान वयातच तरुण दहशतवादाकडे का वळतात? हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यानुसार उपाय केला तर तो परिणामकारक ठरू शकतो. या तरुणांच्या मनात एकप्रकारचा एकाकीपणा असतो. त्यांच्याशी बोलून, त्यांच्या समस्या समजून घेत, त्यांना आपलेसे केले, तर कदाचित हा एकाकीपणा कमी होऊ शकतो;तसेच त्यांना सामाजिक कार्यात, निर्णयप्रक्रियेत गुंतवून व्यस्त करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे त्यांना आपण या दहशतवादातून बाहेर काढू शकतो. दहशतवादाकडे वळणाऱ्या १२ ते १६ वर्षे या लहान वयोगटातील मुलांमध्ये खूप राग असतो. या वयात त्यांना योग्य दिशा मिळत नाही, प्रशासनाचे त्यांच्याकडे लक्ष नसते आणि समाजात त्यांना एकाकीपण जाणवतो. अशावेळी पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, समाज, शिक्षक सगळ्यांनीच एकत्र येऊन त्यांचीही मानसिकता, विचाराची दिशा बदलविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. २१ वे शतक हिंसेसाठी ओळखले न जाता संवादाचे शतक म्हणून ओळखले जायला हवे. दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. प्रत्येक धर्मात शांतातेलाच महत्त्व दिले आहे;पण कट्टरवादी लोक प्रत्येक धर्मात असतात. त्यातूनच दहशतवाद वाढत आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बेल्जीयम आणि डेन्मार्कचे मॉडेल आणावे, त्यांनी दहशतवादाकडे वाळलेल्या मुलांना समाजाशी जोडण्यासाठी चांगले काम केले आहे’.

अफगाणिस्तानातील दहशतवादाविषयी शांती मॅरीएट डिसुझा म्हणाल्या, ‘अफगाणिस्तानात बेरोजगारी, चांगल्या शिक्षणाचा अभाव, सतत युद्धजन्य परिस्थिती यामुळे तेथील तरुण फार तणावाखाली असतो. बाहेरून चांगले शिक्षण घेऊन आले, तरी येथे रोजगार मिळत नसल्याने असंतोष आहे. मुलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील सरकार हे फक्त नावापुरते असून तालिबानच कार्यरत आहे. त्यामुळे येणारा आंतरराष्ट्रीय निधी लोकांपर्यंत न पोहचता सर्व दहशतवादाकडे वळतो. यामुळे येथील लोकांमध्ये फार राग, अस्वस्थता आहे. त्यामुळे तरुण अमलीपदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यांच्या या रागाला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे’.

‘जर्मनीत स्थलांतराची पार्श्वभूमी जास्त असल्याने येथे नीतिमूल्यांचा अभाव जाणवतो. दहशतवाद बाहेरून येतो हा समज चुकीचा असून तो आपल्याकडेच निर्माण होत असतो;पण तो का निर्माण होतो? दहशतवाद्यांच्या डोक्यात नेमके काय चालले असते? हे समजून घेणे गरजेचे असते,’ असे मत लुट्झ ह्युबनर यांनी व्यक्त केले.

कर्स्टीन म्हणाल्या, ‘राजकारण आणि शिक्षणाने लोकांचे मुल्यांकन करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे तटस्थतेने बघणे गरजेचे आहे. तरुण दहशतवादाकडे वळण्याची खूप कारणे असतात, जे सामान्यपणे ओळखणे कठीण आहे. यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. त्यांना या विषयावर विचार करायला लावण्यासाठी आम्ही नाटकाचे माध्यम निवडले आहे’.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search