Next
‘पॉझिटिव्हिटी’ त्यांच्या रक्तातच आहे!
देवरुखातील बंधू कोळवणकर यांचे आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान
संदेश सप्रे
Saturday, October 27, 2018 | 01:20 PM
15 0 0
Share this story

देवरुख : रक्तदान करण्याबद्दल जनजागृती चांगलीच वाढली आहे. तरीही एखाद-दुसऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी नसते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील उदय गणपत उर्फ बंधू कोळवणकर यांचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ठरते. आता ५२ वर्षांचे असलेल्या उदय यांनी आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान केले असून, दूरच्या ठिकाणीही स्वखर्चाने जाऊन त्यांनी गरजू रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. ‘ए पॉझिटिव्ह’ हा रक्तगट असलेल्या उदय यांच्या रक्तातच ‘पॉझिटिव्हिटी’ आहे ती अशी!

पत्नी आणि मुलासह कोळवणकर देवरुखात वास्तव्याला असून, ते एका स्थानिक पतसंस्थेसाठी पिग्मी जमा करण्याचे काम करतात. नियमित पाच ते सात किलोमीटर अंतर सायकल चालवत आपले काम करणारे बंधू व्यायामावर आणि निरोगी राहण्यावर भर देतात. रात्री-अपरात्री कधीही त्यांना फोन आला, की जिथे कुठे गरज असेल तिथे स्वखर्चाने जाऊन ते रक्तदान करतात. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे, तर सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईत जाऊनही त्यांनी गरजू रुग्णांना रक्त दिले आहे. 

१९८३मध्ये उदय यांना स्वतःच्या आईला तिच्या आजारपणात रक्त देण्याची वेळ आली. त्या वेळी  आजच्या एवढे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्या काळात उद्भवलेल्या स्थितीनंतर त्यांनी गरजूंना रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत त्यांनी ९१ वेळा रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक वेळा गौरवण्यात आले आहे. 

उदय कोळवणकरदेवरुखातील ‘ब्लड डोनर मॅन’ अशीच त्यांची ओळख आहे. त्याशिवाय त्यांनी डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर देहदानाचा अर्ज भरला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत्रदानाचाही अर्ज भरला आहे. 

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या शरीरातील रक्ताने एखाद्याचे प्राण वाचत असतील, तर त्यासाठी प्रत्येकाने नक्कीच पुढाकार घ्यायला हावा. याच भावनेतून मी हे रक्तदान अभियान राबवत आहे. शतक होण्याकडे लक्ष नाही; पण जोपर्यंत झेपेल तोपर्यंत गरजूंना रक्त देण्यासाठी मी सदैव तयार असेन,’ असे ते सांगतात.

कुणालाही, कधीही ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्यास ९९७५८ ५२०३० या आपल्या क्रमांकावर संपर्क साधायला सांगायचेही ते विसरत नाहीत!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link