Next
केसरबाई केरकर, प्रकाश मेहरा, हॅरिसन फोर्ड
BOI
Friday, July 13, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

१९७७ साली ब्रह्मांडाच्या प्रवासावर निघालेल्या ‘नासा’च्या व्हॉएजर यानात ठेवलेल्या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरच्या काही विविध आवाजांबरोबरच ज्यांच्या आवाजातली ‘जात कहां हो अकेली गोरी’ ही भैरवी पाठवली गेली त्या सूरश्री केसरबाई केरकर, यशस्वी चित्रपट दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा १३ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
..... 
केसरबाई केरकर 

१३ जुलै १८९२ रोजी फोंड्यामध्ये (गोवा) जन्मलेल्या केसरबाई केरकर या जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका म्हणून विख्यात आहेत. अगदी लहान वयातच उस्ताद अब्दुल करीम खां आणि रामकृष्णबुवा वझे, तर वयाच्या तिशीनंतर पुढची अनेक वर्षं उस्ताद अल्लादिया खान यांच्यासारखे गुरू लाभलेल्या केसरबाईंनी खयाल गायकीमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कोलकात्याच्या संगीत प्रवीण संगीतानुरागी सन्मान समितीने त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या हस्ते ‘सूरश्री’ ही उपाधी बहाल केली होती. १९७७साली ‘नासा’ने एक महत्त्वाकांक्षी मोहीम आखून व्हॉएजर हे यान दिगंताच्या प्रवासाला पाठवून दिलं आणि त्यात पृथ्वीतलावरचे अनेक आवाज, अनेक देखावे असणारी एक गोल्डन रेकॉर्ड ठेवली. त्यामागचा हेतू हा होता, की जर अथांग अंतरिक्षात असणाऱ्या एखाद्या प्रगत सृष्टीतल्या मानवाला हे यान आणि त्यावरची तबकडी सापडलीच, तर पृथ्वीवरच्या जैववैविध्याचे व्हिडिओज आणि विविध भाषेतले आवाज कळावेत. त्या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये केसरबाईंनी गायलेली ‘जात कहाँ हो अकेली गोरी’ या भैरवीचंही रेकॉर्डिंग आहे! १९५२ साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. भारत सरकारतर्फे त्यांना १९६९ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १६ सप्टेंबर १९७७ रोजी त्यांचं निधन झालं. 
...... 

प्रकाश मेहरा 

१३ जुलै १९३९ रोजी बिजनौरमध्ये (उत्तर प्रदेश) जन्मलेले प्रकाश मेहरा हे अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांचे दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘हसीना मान जाएगी’ हा त्यांनी १९६८ साली दिग्दर्शित केलेला आणि शशी कपूरचा डबल रोल असलेला सिनेमा. त्यातली सर्वच गाणी गाजली होती; मात्र ते खऱ्या अर्थाने पट्टीचे यशस्वी दिग्दर्शक मानले गेले ते १९७३ सालच्या ‘जंजीर’मुळे. या सिनेमाने त्यांनाच नव्हे, तर अमिताभ बच्चनलाही लोकमान्यता मिळाली. ‘अँग्री यंग मॅन’ हे बिरूद याच सिनेमामुळे अमिताभला चिकटलं. पुढे मेहरांनी हाथ की सफाई, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, ज्वालामुखी, लावारिस, नमक हलाल, शराबी, जादुगार, खून पसीना असे अनेक सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिली सिनेमे दिले. सलीम-जावेद ही जोडी आणि अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या यशात मोठाच वाटा होता. २००६ साली त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. १७ मे २००९ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. 
...... 

हॅरिसन फोर्ड 

१३ जुलै १९४२ रोजी इलिनॉयमध्ये जन्मलेला हॅरिसन फोर्ड हा अत्यंत यशस्वी अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. तो स्वतः विमान आणि हेलिकॉप्टरचा पायलट आहे आणि ‘स्टार वॉर्स’च्या आबालवृद्धांना वेड लावून गेलेल्या फिल्म-सीरिजमध्ये त्याने मिलेनियम फाल्कन या स्टारशिपचा पायलट म्हणूनच काम केलं होतं आणि तो प्रेक्षकांच्या नजरेत भरला. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या ‘इंडियाना जोन्स’ या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत त्या फिल्म सीरिजमधेही त्याने शॉन कॉनरीबरोबर धमाल उडवून दिली. त्यामुळे तो जगभरच्या सिनेरसिकांचा लाडका अभिनेता झाला. फोर्स १० फ्रॉम नेव्हरॉन, अपोकॅलिप्स नाऊ, ब्लेड रनर, विटनेस, दी फ्युजिटिव्ह, साब्रिना, एअरफोर्स वन, पॅरनोइया, फायरवॉल - असे त्याचे इतर गाजलेले सिनेमे आहेत. 
.....

यांचाही आज जन्मदिन :
प्रख्यात वास्तुरचनाकार लेखक फिरोज रानडे (जन्म : १३ जुलै १९२६, मृत्यू : २४ नोव्हेंबर २०१३) (त्यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link