Next
तीस फुटी कात्री आणि एटीडी
BOI
Thursday, January 11 | 06:45 AM
15 0 0
Share this story

तेव बेसमरचे कात्रीचे शिल्प

चित्रांतून, शिल्पातून नि एकंदरच कलाकृतींतूनही एखादा विचार प्रभावीपणे देता येतो, हे अनेक कलाकारांच्या कलेतून दिसते. तेव बेसमर हा डच कलावंतही त्यापैकीच एक. हद्दीच्या भिंतींतून जमिनींचे विभाजन कसे होते हे दर्शविणारे त्याचे कात्रीचे शिल्प, तसेच शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्यांना समाजाने सामावून घेण्याचा संदेश देणारे सळ्यांचे शिल्प पाहिल्यावर त्याचा अंदाज येतो. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या त्याबद्दलच्या आठवणी...
...........
चित्रकलेचे शिक्षण घेताना तिसऱ्या वर्षाला नापास झाल्यावर काय करायचे, मधल्या एका वर्षामध्ये आपण काही करू शकू का, असे विचार मनात यायला सुरुवात झाली होती. चित्र काढण्याच्या नादाला सुरुवात झाली होतीच. नापास होणे हा त्या प्रक्रियेचाच एक भाग होता. तेव्हा त्या मनःस्थितीत असतानाच ‘ए. टी. डी. कर,’ असा सल्ला कोणीतरी दिला. 

पुण्याच्या सदाशिव पेठेतील एक जुना वाडा. खालच्या म्हणजे तळमजल्यावर काही लक्षात न राहिलेल्या, चेहरा नसलेल्या खिडक्या व दारे; मात्र डाव्या बाजूचा निळा जिना. जिन्याला लावलेल्या जाळ्या. त्याच्या चौकटीच्या होणाऱ्या सावल्या. वर गेल्यावर असलेली लांबुळकी बाल्कनी. त्या उघडणारी दोन दारे. दारातून आत गेल्यावर गेरूने रंगवलेला काहीसा गूढ वाटणारा वर्ग. वर्गातले डेस्क लाकडी. अधे-मध्ये एखाद-दुसरा इझल. ऑइल रंगाचा, टर्पेंटाइनचा आणि जवसाच्या तेलाचा वास इथून-तिथून येतोय. नेहमी प्रमाणे उशीर झाल्याने रिकाम्या डेस्कखालच्या स्टुलावर बसलो. 

नजर सहज वर गेली. वर दोन फूट बाय दोन फुटांच्या काचेच्या पेट्या होत्या. पेट्यांमध्ये हरतऱ्हेचे पक्षी, स्टफ केलेले, एकदम आकर्षक होते. नजर पुढे गेली. खरे तर आवाजाच्या दिशेने नजर जात होती. कुर्ता घातलेली एक व्यक्ती सकाळी सकाळी विद्यार्थ्यांना चित्रकलेबाबत काही न सांगता इतरच काही बोलत होती. अभिनव कला महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत येता-जाता कधी कधी ते दिसत. त्यामुळे ऐकून होतो ते हेच चव्हाण सर.

सुधाकर चव्हाणए. टी. डी. म्हणजे आर्ट टीचर्स डिप्लोमा. या भावी कलाशिक्षकांना शिकवण्याचे काम ते व्रतस्थासारखे करीत असत. त्या वर्गात काळ्या-पांढऱ्या रंगातील एक फोटो लटकवलेला असे. कोटातली ती व्यक्ती म्हणजे लेले सर. चव्हाणांपूर्वी ते हा कोर्स चालवीत असत. चव्हाणांच्या काळात हा वर्ग सर्वस्वी वेगळा होता. अनेक विद्यार्थी चित्रकलेचा पाच वर्षांचा सरकारी अभ्यासक्रम पूर्ण झाला, की मग या वर्गात येत. अशी चव्हाणांच्या या ‘एटीडी’ची ख्याती होती. खरे तर तेव्हा दहावीनंतर एक वर्षाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण झाला, की मग लगेचच या कोर्सला प्रवेश घेण्याची व्यवस्था होती. परंतु पाच वर्षांच्या कोर्सपेक्षा येथे काही जास्त शिकता येते, असा लौकिक तेव्हा होता.

गोष्ट १९९२ची. चव्हाणांनी एकदा वर्गात एक परदेशी पाहुणा आणला. तेव बेसमर त्याचे नाव. हा डच चित्रकार. चव्हाणांना त्याने रस्त्यात कला महाविद्यालयाचा पत्ता विचारला खरा; पण त्यांनी त्याला आपल्या ‘एटीडी’वर यायला सांगितले. तसा तो आला होता. हाताच्या हालचाली तो अत्यंत झपाट्याने करीत असे. चेहऱ्यावरचे हावभाव चटाचटा बदलत असे. भाषेची अडचण त्याच्या या ‘बॉडी लँग्वेज’मुळे पळून गेली होती. ‘उद्या येताना इंपेरियल पेपर, पेन्सिली व चारकोल आणा,’ असे चव्हाणांनी मुलांना सांगितले आणि तो दिवस संपला.कात्रीचे शिल्पतेव हा डच चित्रकार, शिल्पकार व विचारवंत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील मुले काहीशा कमी प्रमाणात प्रतिक्रिया देतात. त्याच्या एका भाषणात त्याने विचारले, की कोणी ‘दी सॅटनिक व्हर्सेस’ हे सलमान रश्दींचे पुस्तक वाचले आहे का? सगळा वर्ग चिडीचूप. अर्थात साठ टक्के मुले मराठी माध्यमाची. वीस टक्के मुले काही तरी थोडे-फार समजणारी व उरलेली इंग्रजी माध्यमाची. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या गोऱ्या-गोमट्या मुलीच जास्त. त्यांचा वाचनाशी संबंध तसा फारसा नाहीच; पण या प्रश्नाचे त्याला अपेक्षित उत्तर एकानेही दिले नाही. उत्तर सोपे होते, ‘भारतात या पुस्तकाला कायद्याने बंदी आहे. तेव्हा ते वाचायचा प्रश्नच येत नाही.’ त्याला उत्तर न मिळाल्याने मग त्याने विचारवंत-कलावंत प्रवाहाविरुद्ध कशा प्रकारे कलाकृती लेखन, नाटक करीत असतात, वगैरेंवर भाष्य केले. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. फार भारावून टाकले होते तेव्हा त्याने. मग ‘एटीडी’च्या एकुलत्या एक प्रोजेक्टरवर त्याचा स्लाइड शो झाला. 

पुढच्या फ्रेममध्ये बसवलेल्या त्या पातळ स्लाइड्स एक-एक करून त्या प्रोजेक्टरमध्ये घालायच्या-काढायच्या. म्हणजे त्याच्यातील चित्र समोरच्या भिंतीवर दिसायचे. तेवने अनेक चित्रे व शिल्पे दाखवली. तो हॉलंडमधील सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी शिल्पे करीत असे. त्यातील काही त्याने दाखवली. चित्रकलेत डोळ्यांना चांगले दिसण्यापलीकडेही काही विचार असतात वगैरे माहिती नव्यानेच पुढे येत होती. मग नंतर कधी तरी ‘आर्ट हिस्ट्री’त हीच ती ‘कॉन्सेप्च्युअल आर्ट’ वगैरे मुद्दे समजत गेले. 

त्या वेळची तेवची दोन शिल्पे स्पष्ट आठवत आहेत. एक म्हणजे कात्रीचे शिल्प. ३०-४० फूट उंचीची कात्री हिरवळीवर खोचलेली. एक टोक जमिनीत घुसलेले व दुसरे टोक बाहेर. जणू जमीन कापतेय ती कात्री! बहुधा कात्री गुलाबी रंगाची होती. त्यामागील संकल्पना अशी, की जमिनीचे तुकडे होऊ नयेत. अनेक गोष्टी तो ते शिल्प दाखवताना बोलत होता. शेती, घरे यांच्या हद्दीच्या भिंतींमध्ये जगभर कित्येक एकर जमिनी वाया जातात, असे काही विचार त्याने मांडले. 


दुसऱ्या एका शिल्पात त्याने तुरुंगातील कैद्यांबाबत विचार मांडला होता. तेवने त्याच्या मायदेशात कुठल्याशा तुरुंगाच्या बाहेर हे शिल्प मांडले होते. त्या शिल्पात अनेक सळ्या उंचच उंच गेल्या होत्या व त्यांच्यावर एक संगमरवरी ठोकळा पेलला गेला होता. सळ्या स्टीलच्या, पॉलिश्ड होत्या आणि दगड इंडियन ग्रॅनाइट होता. त्या सळ्या हलत्या होत्या. फादर व नन्स (आध्यात्मिक दृष्टीने) पॉलिश्ड आहेत, त्यांनी तळागाळातील लोकांना उचलावे, असा काहीसा त्याचा विचार होता. शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्याकडे समाजाने ‘तो आपल्यातलाच एक आहे,’ अशा दृष्टीने पाहावे. त्याला आधार देऊन सामावून घेऊन सामान्य आयुष्य जगायला मदत करावी, असा काहीसा संदेश त्याला यातून द्यायचा होता. समाजाच्या हजारो हातांनी हा भार तोलून धरावा, असे त्याला या कलाकृतीमधून सुचवायचे होते. अशा स्वरूपाचे त्याचे शिल्पकाम होते. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील चौका-चौकांतील नेत्यांचे पुतळे पाहून त्याला अस्वस्थता येत असे. नेत्यांच्या पुतळ्यांपेक्षा चांगल्या कलाकृती-शिल्पे सार्वजनिक जागेत नाहीत, याचे त्याला सतत आश्चर्य वाटे.

त्याने पाच- सात दिवसांची कार्यशाळा घेतली होती. जवळपास कोठेतरी बांधकाम सुरू होते. त्यातले काही बांबू त्याने वर्ग रिकामा करून मध्ये-मध्ये बांधले... जमिनीपासून छतापर्यंत... पहिल्या दिवशी त्याने सगळ्यांना त्या बांबूच्या भोवताली गोलाकार बसवलं आपापल्या बोर्डवर कागद लावून बांबू ज्या- त्या जागेवरून कसे दिसतात, ते काढायला सांगितले. वर्ष-दोन वर्षे चित्रकला शिकलेली ती मुले.... अशा प्रकारे चित्रे काढण्यात तरबेज.. त्यांनी त्या दिवशी त्या बांबूची सपाटून ड्रॉइंग्ज केली. पुढे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याने बांबू सोडून दोन बांबूंच्या अधे-मधे दिसणाऱ्या गोष्टी रेखाटायला सांगितल्या. पुन्हा तीच तऱ्हा. ढीगभर ड्राइंग्ज तयार. चौथ्या-पाचव्या दिवशी मात्र मुले बिथरली... गांगरली... जमेना झाले! ड्राइंग करता येईना. तेवने सांगितले होते, की बांबू व मागे दिसणारे घटक, यांच्या मध्ये काहीतरी अवकाश आहे ते रेखाटा. मुले पार गडबडली. इथे काही तरी अमूर्त वगैरे असते, अशी काही दृश्यांच्या संदर्भातील संकल्पना असू शकते, वगैरेंबाबत चर्चाच न करता त्याने ‘एटीडी’च्या मुलांना तो अनुभव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

स्थानिक शिक्षकांपैकी सुधाकर चव्हाणांसारखे बोटावर मोजण्यासारखे कलाशिक्षक सोडले, तर असे विचार इतक्या प्रभावीपणे देणारी फारशी माणसे तेव्हा तरी नव्हतीच. त्यामुळे तेवने दिलेले अनुभव जास्त प्रभावी वाटले. तो पुढे तीन-चार वेळा पुण्यात आला. त्याने कधी पुण्यात प्रदर्शने केली नाहीत. एखादी सायकल भाड्याने घेऊन तो फिरत असे. 

अशाच एका भेटीत मी काढत असलेली चित्रे त्याला दाखवली. तेव्हा तो म्हणाला, ‘कित्येकदा काहीही न करण्यातही बरेच काही करण्यासारखे असते. तुझी चित्रे खूप अस्वस्थ आहेत. कधी कधी काहीही न करता नुसताच स्वस्थ बसत जा.’ 

उंचापुरा, टक्कल असलेला, नाकेला, बोलका आणि खुला तेव नंतर मात्र कोणाच्याच संपर्कात नव्हता. त्याचा तेव्हाचा मित्र राजन पेंढारकर काही काळापुरता त्याच्या संपर्कात होता. तेवचा संपर्क इतकाच असला, तरी त्याने न सांगता दिलेल्या संकल्पना मात्र सतत सोबती झालेल्या होत्या. सुधाकर चव्हाणांच्या या ‘एटीडी’मध्ये असे अनेक उपक्रम चालत. म्हणूनच चित्रकला शिक्षणात तेव्हा हा ‘एटीडी’चा वर्ग मुलांचा ‘फेव्हरिट’ होता. तेथे तेव्हा बरेच काही चालत असे आणि मुलांच्या हाती दुर्मीळ काही लागत असे. म्हणूनच त्या आठवणींना स्मरणचित्रांचे मोल आहे.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaishali About 330 Days ago
Superb info Nitin, Kash me pashan la na karta tuzya barobar chavan siran kade ATD kela asta ..
0
0
Meenor Lambor. About 336 Days ago
Very Nice article by Dr nitin hadap. .
1
0
Satish Pimple About 336 Days ago
श्री सुधाकर चव्हाण यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे,ते माझे मित्र आहेत,त्यांच्या विषयी व तेव बेसमर, त्यांची अद्भुत शिल्पे याविषयी उद्बोधक माहिती या लेखातून मिळाली. आपणास शुभेच्छा
1
0
Nandkishor p saindane About 336 Days ago
सर तुमचं लिखान आणि त्यातील अनुभव तेम्ही जीवंत माडंनि या अनुभवातून मी नेहमी जातो चव्हाण सराणां मी भेटलो व त्याच्या बाबतींत आज तुम्ही अजुन नवि बाजु दाखवली .
1
0

Select Language
Share Link