Next
भाताच्या आगरात जोंधळ्याचे चांदणे
BOI
Tuesday, October 31, 2017 | 09:45 PM
15 1 0
Share this article:

पालशेत (गुहागर) : भाताचे आगर अशी ओळख असलेल्या कोकणात खरीप हंगामात ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील पालशेत येथील माधव वसंत सुर्वे असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.

कोकणात विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत खरीप हंगामात भात आणि नाचणी हीच पारंपरिक पिके घेतली जातात. कोकणात पडणाऱ्या अति पावसामुळे या पिकांव्यातिरिक्त इतर पिकांना येथील वातावरण फारसे पोषक नाही; मात्र माधव सुर्वे यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे कोकणातही अपारंपरिक पिके घेता येऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे.

कोकणात दर वर्षी सरासरी तीन ते साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. कोकणातील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खरीप हंगामात भात आणि नाचणी या पिकांची पेरणी केली जाते. भात पिकाची कापणी झाल्यानंतर रब्बी हंगामात कुळीथ, कडवे वाल अशा कडधान्यांची शेती केली जाते. यापेक्षा अधिक पिके घेण्यास शेतकरी अनुत्सुक असतात. कारण त्यासाठी आवश्यक असणारा मुबलक पाणीसाठा उपलब्ध नसतो; मात्र अलीकडच्या काळात येथील शेतकरी आपल्या जागेत विविध प्रकारचे प्रयोग करू लागले आहेत. कलिंगड, हळद, केळी अशा पिकांची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करण्याचे प्रयोग करण्याची आणि त्यातून अर्थार्जन करण्याची मानसिकता वाढू लागली आहे.

असाच एक प्रयोग तीन महिन्यांपूर्वी पालशेत येथील आंबा व्यापारी आणि प्रयोगशील शेतकरी माधव सुर्वे यांनी केला. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या २० गुंठे जागेत ज्वारीची लागवड केली आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या शब्दांत सांगायचे झाले, तर ‘जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’ अशी स्थिती त्यांच्या शेतात लवकरच दिसणार आहे. कारण ज्वारीची टपोरी कणसे आता डोलू लागली आहेत. त्यामुळे कोकणात खरीप हंगामात ज्वारीची लागवड यशस्वी होऊ शकते, असे संकेत त्यांच्या प्रयोगातून मिळाले आहेत.

ज्वारी हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी विभागातील प्रमुख पीक. पर्जन्यमान कमी असलेल्या भागात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. अति पाऊस असल्यास कणसांत दाणे भरायला अडचण निर्माण होते. परिणामी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोकणातील शेतकरी सहसा हे पीक घेत नाहीत; मात्र सुर्वेंनी हा प्रयोग केला.

सुर्वें दुग्धोत्पादनही घेत असल्याने त्यांच्या संकरित गायी आहेत. त्यातच त्यांच्या ज्वारीच्या प्रयोगाची बीजे आहेत. त्यांच्याकडे सहा दुभत्या जर्सी गायी आहेत. या जनावरांना वैरण म्हणून पाच किलो हिरवा चारा, १५ किलो मुरघास, पाच किलो भाताचा पेंढा व इतर पशुखाद्य असा एकूण २५ किलो एवढा आहार दररोज ते खाऊ घालतात. दुधापासून तयार होणारे मावा, पनीर, पेढे, लस्सी, आइस्क्रीम हे पदार्थही बनवून ते विकतात. या दुभत्या जनावरांच्या वैरणीसाठी त्यांनी २० गुंठे क्षेत्रावर चारा पिकांच्या हायब्रिड नेपीयर, यशवंत अशा जातींची लागवड केली आहे.

सुर्वे म्हणाले, ‘हिरवा चाऱ्यासाठी ज्वारीचे बियाणे आणायला कराड (जि. सातारा) येथील राहुल कृषी विक्री केंद्रात गेलो होतो. तेव्हा त्यांनी तुम्ही ज्वारीचे पीकच का घेत नाही, असा प्रश्न मला केला. आम्ही सांगितलेल्या पद्धतीनुसार याची पेरणी केली, तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल, असे विक्री केंद्राकडून सांगण्यात आले. ‘प्रयोग करायला काय हरकत आहे, पीक नाही आले तर कडबा, चारा तरी नक्की होणार,’ असा विचार करून मी ज्वारीची पेरणी केली. त्यासाठी पाच किलो संकरित ज्वारीचे बियाणे आणले. सुरुवातीला पॉवर टिलरने नांगरणी केली. पाऊस कमी झाल्यानंतर श्रावण महिन्यात १५ ऑगस्टला ज्वारीची पेरणी केली. साधारण एक फूट बाय १० सेंटीमीटर अंतरावर पेरणी केली. सुरुवातीला एक ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत, २० किलो सुफला १५:१५:१५ हे खत वापरले. एका महिन्यानंतर २५ किलो १८:४६:० डीएपी हे खत वापरले.’

कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्यासमवेत माधव सुर्वे (मागे)या लागवडीसाठी गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सुर्वे यांनी आवर्जून सांगितले. ‘कोकणातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांनीही आपल्या जागेत असा प्रयोग करून पाहायला हरकत नाही,’ असे सुर्वे म्हणाले.

‘रब्बी हंगामात या पिकाचा प्रयोग केल्यास तो यशस्वी होऊ शकतो; पण ते खरीप हंगामात भात किंवा नाचणी पिकाला पर्यायी ठरू शकत नाही. कारण कोकण हा अतिवृष्टीचा प्रदेश आहे आणि हे पीक मुसळधार पावसात तग धरू शकत नाही. रब्बी हंगामात जमिनीत ओलावा असल्याने प्रयोगशील शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड करायला हरकत नाही,’ असा विश्वास गजेंद्र पौनीकर यांनी व्यक्त केला.


संपर्क : माधव सुर्वे -
९४२०३ ११४९९, ७७९८४ ४१७०४
गजेंद्र पौनीकर, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, गुहागर : ९४२०९ ७२४०२

(सुर्वे यांच्या ज्वारीच्या शेताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 156 Days ago
Has this been a success ? If this is a ' success '. has it been tried elsewhere ? Have these stories been written about ?
0
0
Gadre shrikant ramkrishna About
Congrats madhava keep it up dattaguru maharaj ki jay
0
0
GAJENDRA Paunikar About
छान प्रयोग. प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
0
0

Select Language
Share Link
 
Search