Next
‘राष्ट्रीय ग्रंथसूची निर्मिती हीच वाचनसंस्कृतीतील क्रांती!’
BOI
Monday, August 28, 2017 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

वैष्णवी कुलकर्णीसंगणक आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहितीचा स्फोट होत असणाऱ्या आजच्या काळात देशातील स्वातंत्र्योत्तर काळात प्रकाशित झालेल्या सर्व भाषांमधील पुस्तकांची एकत्रित सूची उपलब्ध झाली तर? अशी सूची ‘इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी’ या कोलकात्यातील संस्थेमार्फत केली जाते. या संस्थेत सहायक संपादक म्हणून कार्यरत असलेल्या वैष्णवी कुलकर्णी नुकत्याच पुण्यात आल्या होत्या. त्यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे विवेक सबनीस यांनी साधलेला हा संवाद...
................
कोलकाता येथील केंद्रीय संदर्भ ग्रंथालय आणि संस्कृती मंत्रालय यांच्या वतीने पुण्यात नुकताच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने भारतीय भाषांमधील ग्रंथांची भारतीय राष्ट्रीय सूची (इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी - आयएनबी) या संस्थेतील सहायक संपादक वैष्णवी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. केंद्रीय संदर्भ ग्रंथालयातर्फे त्यांनी संपादित केलेल्या मराठी बालसाहित्य सूचीच्या भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूचीमधल्या २००१ ते २००६मधल्या नोंदींचा ग्रंथही पुण्यात प्रकाशित झाला. कुलकर्णी यांच्याशी झालेला हा संवाद...

- स्वातंत्र्योत्तर काळात ‘आयएनबी’सारखी संस्था सातत्याने काम करते आहे. तिचे नेमके महत्त्व काय आहे? 
- भारतीय राष्ट्रीय सूचीचे (इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी - आयएनबी) काम १९५८पासून सुरू झाले असले, तरी त्या आधी भारतीय संदर्भ ग्रंथालयाची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑगस्ट १९५५मध्ये झाली. दोघांच्या समन्वयातूनच भारतातील इंग्रजीसह महत्त्वाच्या १४ भाषांमधील ग्रंथनिर्मितीची नोंद एका सूचीच्या स्वरूपात सुरू झाली. त्यामध्ये मराठी, बंगाली, गुजराथी, हिंदी, कन्नड, मैथिली, मल्याळम, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तमीळ, तेलुगू आणि उर्दू यांचा समावेश करण्यात आला. देशातील या १४ भाषांमध्ये होणाऱ्या पुस्तकांच्या प्रकाशित आवृत्त्यांची नोंद करण्यासाठी त्याची एक प्रत कोलकात्याच्या भारतीय संदर्भ ग्रंथालयास पाठवणे बंधनकारक आहे. तसेच या पुस्तकाची प्रत्येकी एक प्रत दिल्ली, चेन्नई आणि मुंबईतील राष्ट्रीय ग्रंथालयांकडे पाठवणे आवश्यक आहे. हे सारे १९५४मध्ये घटनेने तयार केलेल्या पुस्तके व समाचारपत्र प्रदान कायद्यानुसार होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता प्रत्येक प्रकाशकाने त्याचे प्रत्येक प्रकाशित पुस्तक प्रकाशित झाल्यावर ३० दिवसांमध्ये भारतीय संदर्भ ग्रंथालयाला ‘बेलवेदरे, कोलकाता - ७०००२७’ या पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाईही होऊ शकते. यातून देशातील सर्व भाषांमधील पुस्तकांची नेमकी संख्या, विषयवार माहिती व लेखन सूची अधिकाधिक व्यापक व समृद्ध करणे शक्य आहे. त्या दृष्टीने आयएनबी ही देशातील अधिकृत असणारी पहिली राष्ट्रीय पातळीवरील सरकारी ग्रंथसूची मातृसंस्था आहे. त्यामुळे आजच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात तिचे हे काम अनन्यसाधारण आहे. 

प्रातिनिधिक फोटो- देशातील इतक्या व्यापक पातळीवरचे ग्रंथसूचीचे हे महाकाय काम एकत्र करताना त्यात सुसूत्रता यावी, यासाठी तेव्हा कोणता मार्ग निवडला? 
- या सर्व भाषांमधील पुस्तके सूचीसाठी नोंदवताना त्याचे वर्गीकरण, शीर्षक, लेखकाचे नाव, प्रकाशन स्थळ, वर्ष, पुस्तकाचा आकार, किंमत, भाषा इत्यादी अनेक तपशील विचारात घेतले गेले. या सर्व भाषा भिन्न असल्या, तरी त्यांची एकत्रित नोंद आधी रोमन लिपीत करण्यात आली, ज्यात त्या त्या भाषेतील उच्चारांना धरून शास्त्रशुद्ध असणाऱ्या ‘डायक्रिटिकल मार्क्स’चा वापर करण्यात आला. कारण मराठीतील दानव हा शब्द घेतला तर ‘द’चा काना व ‘द’ आणि ‘ड’चे स्पेलिंग ‘डी’ असेच होते. तसेच ‘न’ आणि ‘ण’ यांना ‘एन’ असेच संबोधले जाते. त्यामुळे त्यातील नेमका भेद त्यात ‘डायक्रिटिकल मार्क्स’चा वापर केल्यामुळे वाचणाऱ्यांना कळतो. संगणकातील भाषांसाठी सुरुवातीला पुण्यातील सी-डॅक संस्थेने या भाषांसाठी तयार केलेले जिस्ट हे भाषा सॉफ्टवेअर, तसेच नंतर युनिकोड व मार्क २१ या ग्रंथालय सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. त्यामुळे ते त्या भाषेतील कोणालाही, तसेच त्यातून रोमन लिपीत रूपांतरित करता येते. स्थानिक व रोमन लिपीतील ग्रंथसूची हेच या प्रकल्पाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. 

- ...पण हे सारे काम व भाषिक सूची जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग वापरला आहे? 
- हा विचार अगदी सुरुवातीपासूनच करण्यात आल्यामुळे १९५८पासून ६३पर्यंत या सूची क्रमाक्रमाने ‘आयएनबी’च्या त्रैमासिकातून प्रसिद्ध होत गेल्या. नंतर १९६४पासून वार्षिक खंडांमधून, तर १९८०नंतर काही काळ द्वैवार्षिक खंडाच्या स्वरूपात सूची प्रसिद्ध झाल्या. पुढे १९९३पर्यंत ते मासिकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होत गेले आणि त्याचे वार्षिक खंडही २०००पर्यंत प्रसिद्ध होत गेले आहेत. त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संगणकावर साठवून त्याच्या सीडी व पुस्तके, खंड जिज्ञासूंपर्यंत पोहोचवण्याचे काम आजपर्यंत चालू आहे. १९५८पासून आजपर्यंत देशातील इंग्रजी व मराठीसह सर्व १४ भाषांमधील एकंदर नोंदींपैकी सुमारे सहा लाखांहून अधिक पुस्तकांच्या नोंदी ‘आयएनबी’च्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत! याशिवाय मराठी, आसामी, बंगाली, हिंदी आणि मल्याळम् या भाषांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्येही छापील सूची उपलब्ध आहेत. 

- ग्रंथसूची तयार करण्याचे देशपातळीवरील हे अवाढव्य काम नक्कीच मोठे आहे. आज व भविष्यात त्याचा नेमका लाभ कोणाला होतो आहे आणि होईल?  
- भारतातील बहुभाषक संस्कृती आणि भाषिक विविधता हेच आपले खरे शक्तिस्थान आहे. तसेच तो आपला ऐतिहासिक वारसाही आहे. ‘आयएनबी’च्या या सर्वव्यापी ग्रंथसूची उपक्रमामुळे सर्व स्थानिक भाषक ग्रंथसंस्कृतीला आपोआप प्रोत्साहन व बळ मिळणार आहे. ‘आयएनबी’चा हा उपक्रम केवळ आजच्या समकालीन वाचक, अभ्यासक, संशोधकांसाठी नाही, तर तो येणाऱ्या सर्व पिढ्यांनाही तितकाच उपयोगी ठरणार आहे. यातून देशातील बहुआयामी ग्रंथसूचीची व्याप्ती अधिकाधिक वाढत जाताना त्यातील अडचणींचे स्वरूप व त्यांचे निराकरण करण्याचे मार्गही सापडतील. ही देशव्यापी ग्रंथसूची हीच आपल्या देशाची स्वामित्व हक्क दाखविणारी भाषिक निर्मिती आहे. त्याचा उपयोग शालेय, महाविद्यालयीन, तसेच संशोधनविषयक कामांत, देशातील सर्व ग्रंथालयांमध्ये आणि विशेषत: प्रकाशन संस्था आणि पुस्तक विक्रेते यांना होणार आहे. विषय, तसेच भाषावार ग्रंथसूचीचा प्रसार व त्याची प्रत्यक्ष विक्री हीच मंडळी करतील. त्यांना आपापल्या, तसेच देशातील इतर भाषांमधील ग्रंथनिर्मितीसंबंधीची अधिकृत आकडेवारीही लागेल तेव्हा उपलब्ध होणार आहे. या ग्रंथसूचीमुळे आपोआपच त्याचे वर्गीकरण आणि त्यातील नेमकी माहिती अधिकाधिक पारदर्शी स्वरूपात प्रकाशक, विक्रेते ते वाचक यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्या ‘आयएनबी’चे मासिक व वार्षिक अंक नियमित मिळत असल्यामुळे त्याचा या सर्व लाभार्थींनी उपयोग करून घ्यायला हवा. एकप्रकारे ही वाचनसंस्कृतीतील क्रांतीच ठरेल!

- मराठी पुस्तकनिर्मिती करणाऱ्या प्रकाशकांसाठी काय सांगाल? 
- प्रकाशकांशिवाय कोणतीही ग्रंथनिर्मिती अशक्य आहे. आपण छापलेले प्रत्येक पुस्तक सर्वदूर पसरलेल्या वाचकांपर्यंत पोहोचावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी आधी आपल्या पुस्तकाची प्रत भारतीय संदर्भ ग्रंथालयाकडे व इतर तीन ग्रंथालय संचालनालयांकडे न विसरता वेळेत पाठवायला हवी. तसेच पुस्तके व समाचार पत्र प्रदान कायद्याचे कसोशीने पालन करायला हवे. यातून तयार होणारी राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथसूची मराठी प्रकाशकांना महाराष्ट्रात, देशात, तसेच परदेशातही प्रसिद्धीसाठी उपयोगी ठरणार आहे. यातून पुस्तकांच्या प्रसिद्धीचे हे बहुमोल काम आयएनबी मोफत करत आहे, याचा सर्वांनीच लाभ घ्यायला हवा. यातून मराठी मायमाऊलीची सेवा आपण जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे करू शकणार आहोत. तसेच जगभर पसरलेल्या मराठी वाचकांपर्यंत आपली पुस्तकेही पोहोचवू शकणार आहोत. भविष्यात ई-बुक्स निर्मिती करणाऱ्या प्रकाशकांनाही याचा लाभ होणार आहे.

- मराठी बालसाहित्य सूचीच्या संपादक म्हणून असणारा तुमचा अनुभव कसा होता? त्यात एकंदर किती नोदी झाल्या आहेत? 
- माझा हा अनुभव खूपच आनंददायी होता. मराठीतील बालसाहित्यासंबंधी काही भरीव काम करण्याची संधी मला या प्रकल्पामुळे मिळाली. महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात त्याचे प्रकाशन झाले हा आनंद वेगळा आहेच! महाराष्ट्राच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे, प्रकाशक ल. म. कडू व मराठी प्रकाशक संघाचे राजीव बर्वे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. राष्ट्रीय पातळीवर मराठीतील बालसाहित्याचा परीघ किती आहे याचा अंदाज मला आला. यात मराठीतील विविध प्रकारच्या बालसाहित्यातील गेल्या १६ वर्षांमधील सुमारे चौदाशे नोंदी आहेत. 

- तुमच्या कारकिर्दीतील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 
- धन्यवाद! 

(आयएनबी संस्थेची वेबसाइट : http://inbonline.nic.in/)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
SV ( Ram)Kolhatkar. About
Can I see the list? Also I would like to speak on tele with Vaishnavee Kulkarnee.My tele no 020 24477918 office/09823082644 .
0
0
Anant Kulkarni Kem About
It's a very good facility for the reader & user of the books. I like it.
0
0

Select Language
Share Link
 
Search