Next
क्रेडिट कार्ड कसे वापराल?
BOI
Saturday, March 24, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीने केला, तर आपणास अनेक फायदे घेता येतात; मात्र क्रेडिट कार्ड हे एक दुधारी शस्त्र आहे याची जाणीव कार्डधारकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्डच्या सुयोग्य वापराबाबत जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.......
आजकाल क्रेडिट कार्ड ही मध्यमवर्गीयांची एक गरज झाली आहे. किमान एक तरी क्रेडिट कार्ड बहुतेकांकडे असतेच. एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्डस् बाळगणारेही अनेक जण दिसून येतात. ‘कॅशलेस’च्या जमान्यात क्रेडिट कार्डला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातील बहुतेक जण कार्डचा वापर विविध प्रकारच्या पेमेंटसाठी करत असतात, तर फार थोडे जण याचा वापर आकस्मिक येणाऱ्या खर्चांसाठी करीत असल्याचे दिसून येते. क्रेडिट कार्ड हे दुधारी शस्त्र आहे याची जाणीव कार्डधारकास असणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचा वापर योग्य रीतीने केला तर अनेक फायदे घेता येतात. 

बँकेने दिलेली क्रेडिट मर्यादेपर्यंतची रक्कम कार्डधारकाला किमान वीस दिवस, तर कमाल पन्नास दिवस बिनव्याजी वापरता येते. क्रेडिट कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर केला, तर आपण कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता व त्यामुळे आपली समाजातील तसेच, बँका व अन्य वित्तीय संस्थांकडील पत खालावली जाऊन आपण आर्थिक अडचणीत येऊ शकता. आजकाल बँका सहजासहजी क्रेडिट कार्ड देऊ करत नाहीत. नव्याने खाते उघडणाऱ्याला सुरुवातीला डेबिट कार्ड देऊ केले जाते व खात्यावरील व्यवहार समाधानकारक वाटल्यासच क्रेडिट कार्ड देऊ केले जाते. क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येऊ शकतो, हे पाहू या.

बिनव्याजी उचल मर्यादा (इंटरेस्ट फ्री क्रेडिट लिमिट) : 
प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला एका ठराविक मर्यादेपर्यंत रकमेची उचल घेता येते. यालाच कार्डचे क्रेडिट लिमिट अथवा क्रेडिट लाइन असे म्हणतात. ही मर्यादा कार्डधारकाची आर्थिक क्षमता विचारात घेऊन ठरविली जाते. उदा. आपल्या कार्डचे क्रेडिट लिमिट एक लाख रुपये इतके असेल, तर आपल्याजवळ अथवा बँकेत शिल्लक नसतानासुद्धा आपण एक लाखापर्यंत खरेदी अथवा बिल पेमेंट करू शकता. विशेष म्हणजे त्याची परतफेड आपण बिलाच्या देय तारखेपर्यंत (ड्यू डेट) कधीही करू शकता. या रकमेवर कोणतीही व्याज आकारणी केली जात नाही. थोडक्यात बिलाची देय रक्कम या कालावधीसाठी आपणास बिनव्याजी दिली जाते. हा कालावधी किमान वीस दिवस व कमाल पन्नास दिवसांच्या दरम्यान कितीही असू शकतो. तो आपण कार्ड कोणत्या तारखेला वापरले आहे यावर अवलंबून असतो. सध्या नेट बँकिंगमुळे आपण अगदी शेवटच्या दिवशी पेमेंट करून जास्तीत जास्त कालावधीचा लाभ करून घेऊ शकतो. बहुतेक सर्व क्रेडिट कार्डांची बिल डेट महिन्याच्या दहा तारखेच्या जवळपास असते व पेमेंट डेट तीस तारखेच्या जवळपास असते. 

परतफेडीसाठी २० ते ५० दिवसांचा कालावधी :
समजा, हा एप्रिल महिना आहे आणि कार्डधारकाचे क्रेडिट लिमिट एक लाख रुपये इतके आहे, तर कार्डधारक दहा एप्रिलपासून नऊ मेपर्यंतच्या कालावधीत आपल्या कार्डवर जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचीच खरेदी करू शकेल. समजा, त्याने या कालावधीत वेळोवेळी केलेली खरेदी ७५ हजार रुपयांची असेल, तर त्याला दहा मे रोजी (बिल डेट) नऊ मेपर्यंतचे ७५ हजार रुपयांचे बिल पाठविले जाईल. या बिलाचे पेमेंट त्याने २९मेपर्यंत (पेमेंट डेट) करणे आवश्यक असेल. त्याने दहा एप्रिलला ४५ हजार रुपयांची, २५ एप्रिलला वीस हजार रुपयांची व नऊ मे रोजी दहा हजार रुपयांची खरेदी केली असेल तर या एकूण ७५ हजार रुपयांचे पेमेंट २९ मेपर्यंत करणे जरूरीचे आहे. थोडक्यात दहा एप्रिलला केलेल्या खरेदीचे पेमेंट करण्यासाठी त्याला ५० दिवसांचा, २५ एप्रिलला केलेल्या खरेदीसाठी ३५ दिवसांचा, तर नऊ मे रोजी केलेल्या खरेदीचे पेमेंट करण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी मिळतो. यासाठी व्याज आकारले जात नाही.

व्यवहारांची नोंद (रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन) :
क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटचे स्टेटमेंट कार्डधारकाला दर महिन्याला मिळत असते. त्यामुळे खर्चाचे वेगळे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण करत असलेल्या खर्चाचा तपशील व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते; मात्र यासाठी एकच क्रेडिट कार्ड वापरणे जरूरीचे असते. अनेक क्रेडिट कार्ड बाळगणे टाळलेलेच बरे.

विविध ऑफर्स : 
बहुतेक सर्व क्रेडिट कार्डवर वेळोवेळी निरनिराळ्या ऑफर्स देऊ केल्या जातात. कार्ड वापरावर रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. असे रिवॉर्ड पॉइंट्स रीडीम करता येतात. कार्डवर खरेदी केल्यास काही वेळा कॅशबॅकसुद्धा (पाच ते दहा टक्के) दिली जाते. अशा ऑफर्स साधारणपणे सणासुदीच्या काळात मोठ्याप्रमाणात दिसून येतात.

विमा सुरक्षा कवच (कार्ड श्रेणीनुसार) :
क्रेडिट कार्ड धारकाला विविध प्रकारचे विमा सुरक्षा कवच मिळत असते. बऱ्याचदा कार्डधारकाला याची माहिती नसते. प्रामुख्याने सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम व प्रीमियम या कार्डच्या श्रेणी असतात. त्यानुसार विमा सुरक्षा कवच मिळते.
- कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास एक ते चार लाखापर्यंत (कार्ड श्रेणीनुसार) रक्कम वारसास दिली जाते. विमान अपघातात मृत्यू झाला, तर दहा ते चाळीस लाख (कार्ड श्रेणीनुसार) रुपये वारसास दिले जातात. यासाठी मृत्यूच्या दाखल्यासह व अपघाताच्या अन्य तपशिलासह अपघात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत क्लेम दाखल करणे आवश्यक असते. कार्डधारकाच्या नावावर असलेल्या रकमेपैकी पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम माफ केली जाते.
- कार्डवर खरेदी केलेल्या वस्तूंच्या खरेदी तारखेपासून १८० दिवसांच्या आत चोरी, खराबी अथवा आगीत जळणे असा प्रकार घडल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते.
- कार्ड चोरीला गेल्यास अथवा गहाळ झाल्यास, तशी नोटीस कार्ड कंपनीला दिल्यास तेथून पुढे होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कार्डधारकावर राहत नाही.

सिबिल स्कोअर : 
आजकाल कोणतेही कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहतात. तो समाधानकारक असेल तरच कर्जमागणी अर्ज विचारात घेतला जातो. हा स्कोअर ३५० ते ९५०च्या दरम्यान असतो व तो जितका जास्त तितका चांगला. आपण क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेत केले असेल व आपले क्रेडिट लिमिट योग्य प्रकारे वापरले असेल, तर कार्डधारकाचा क्रेडिट स्कोअर आपोआप चांगला राहतो व कार्डधारकाची पत वाढते.

तातडीच्या वेळी उपयुक्तता : 
इमर्जन्सीच्या वेळी क्रेडिट कार्ड खूप उपयोगी पडते. (उदा. अकस्मात येणारे गंभीर आजारपण, अचानक करावा लागणारा प्रवास किंवा खरेदी) प्रसंगी क्रेडिट कार्डवर एटीएममधून रोख रक्कमसुद्धा काढता येते. शक्यतो क्रेडिट कार्डने एटीएमवर रोख रक्कम काढण्याचे टाळावे. कारण त्यावर आकारले जाणारे व्याजदर जास्त असतात.

क्रेडिट कार्डचे तोटे :
- पैसे नसतानाही अनावश्यक खरेदी केली जाऊ शकते.
- बऱ्याचदा कार्डवरील नियमित वापर पाहून कार्डधारकाला क्रेडिट लिमिट वाढवून दिले जाते. वाढीव लिमिटमुळे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते.
- बहुतेक सर्व क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून कार्डधारकाला बिल पेमेंटसाठी ईएमआयची सुविधा देऊ करतात; मात्र वरकरणी ही सुविधा आकर्षक वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती फसवी असते. ते कसे हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल. लेखात वर दिलेल्या उदाहरणातील ७५ हजार रुपये बिल २९ मे अखेर पूर्णपणे भरल्यास कार्डधारकाला ही रक्कम बिनव्याजी वापरता येईल; मात्र काही कारणाने संपूर्ण रक्कम देय तारखेच्या आत भरणे शक्य नसेल, तर कार्डधारक बिलाच्या किमान पाच टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम १२ समान हप्त्यांत भरू शकतो. यामुळे कार्डवरील उर्वरित बाकी अनियमित होत नाही; मात्र उर्वरित रकमेवर १२ ते १५ टक्के दराने व्याज आकारणी केली जाते. या सुविधेमुळे कार्डधारकाला अन्य कर्जांसाठी करावी लागणारी पूर्तता (उदा. कर्जमागणी अर्ज, जामीनदार, कर्जाचे कारण, तारण, डॉक्युमेंट) न करताही अगदी विनासायास एका वर्षासाठी कर्ज मिळू शकते. आजकाल बऱ्याच कंपन्यांच्या कार्डवर ही सुविधा उपलब्ध असते. असे असले, तरी शक्यतो ही सुविधा न वापरलेलीच बरी. ही सवलत वापरल्यास व्याज आकारणी अशी केली जाते.
समजा, कार्डधारकाने पहिल्या वापरातच कार्डचे सगळी लिमिट वापरले आणि पुढे दरमहा पाच टक्के इतकेच पेमेंट केले, तर ही ७५ हजार रुपयांची परतफेड करण्यास त्याला ४५ महिने इतका कालावधी लागेल. म्हणून ही सुविधा शक्यतो वापरू नये. काही अपरिहार्य कारणाने ही सुविधा वापरावी लागली, तर उर्वरित रक्कम पुढील एक-दोन हप्त्यांत चुकती करावी, जेणेकरून आपण कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाही. 
कार्डधारकाला पुढीलप्रमाणे विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते.
- वार्षिक फी, तसेच नूतनीकरण फी.
- लेट पेमेंट चार्जेस 
- रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम चार्जेस 
- अवाजवी व्याजदर  

थोडक्यात असे म्हणता येईल, की क्रेडिट कार्ड ही खरोखरीच एक उपयुक्त सुविधा आहे; मात्र त्यासाठी कार्डधारकाला आर्थिक शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा कार्डधारक कर्जाच्या सापळ्यात अडकून पडू शकतो.

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search