Next
देस-परदेस : बहुसांस्कृतिक चित्रे आणि शिल्पांचे प्रदर्शन
BOI
Thursday, December 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ब्रिटिश म्युझियम, नवी दिल्लीचे नॅशनल म्युझियम इत्यादींच्या सहकार्यातून आणि गेट्टी फाउंडेशन व टाटा ट्रस्ट यांच्या सौजन्याने अनेक तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘देस-परदेस’ हे भव्य प्रदर्शन २०१७-१८मध्ये मुंबईत साकारण्यात आले होते. त्या प्रदर्शनाची काही वैशिष्ट्ये आपण ‘स्मरणचित्रे’ सदराच्या मागील भागात जाणून घेतली. आजच्या भागात पाहू या त्या प्रदर्शनाची आणखी काही वैशिष्ट्ये.
.......
एका लांबच लांब कापडावर पूर्णाकृती मानवाकृती रेखाटलेला एक पट देस-परदेस प्रदर्शनाच्या दालनात मांडला होता. मध्य युगातल्या कलेवरचा हा भाग होता. गुजरातमध्ये रंगवलेला हा कापडी पट त्यावरील व्यक्तीच्या अंगावरील कपड्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्याचे कारण असे, की तो जरी १५व्या शतकातील असला, तरी इजिप्त येथील पुरातत्त्वीय उत्खनात २८०० वर्षांपूर्वीच्या भारतीय कापडाचे जे नमुने सापडले आहेत, त्याच्याशी ते साम्य दाखवणारे आहेत. या पटावरील कापडावर जे ठसाकाम म्हणजे ब्लॉक प्रिंटिंग केलेले आहे, ते आजही भारतात गुजरात, राजस्थानच्या भागात होत असते. म्हणजे इजिप्तच्या भागाशी राजस्थान, गुजरातचा व्यापार होता आणि भारतीय कलात्मक दर्जेदार वस्तूंना येथे मागणी होती. या प्रदेशांचे अनेक प्रकारचे, बहुपदरी संबंध होते, याचा हा पुरावा होता. येथील उत्खननातील कापडाचे नमुनेदेखील या प्रदर्शनात ठेवलेले होते. 

आफ्रिकी पुरुषाचे एक लघुचित्र या प्रदर्शनात होते. त्या चित्राचे स्वरूप लघुचित्र (लहान आकारातले) प्रकारचे आहे. गडद त्वचेच्या रंगावर पारदर्शक पांढरा पोशाख आणि गुलाबी पार्श्वभूमी फार आकर्षक वाटते. लहानशा कागदावर अपारदर्शक रंग व सोन्याचा वापर करून केलेले हे चित्र अहमदनगर येथील १६०५-१० या काळातील आहे. राष्ट्रीय संग्रहालयातील हे महत्त्वाचे चित्र मुद्दाम या प्रदर्शनासाठी आणले गेले होते. मजेशीर गोष्ट पाहा. चित्र दख्खनी लघुचित्र शैलीत केलेले आहे. चित्रविषय आफ्रिकेतील व्यक्ती आहे आणि चित्र तयार झालेय अहमदनगरला. हे सगळे म्हणजे भारतीय कलेतील सौंदर्याचे खरे कारण आहे. 

सर्वांत महत्त्वाचे चित्र या प्रदर्शनात होते ते म्हणजे रेब्रा या हॉलंडच्या चित्रकाराचे रेखाचित्र. मुघल बादशहा अकबराचे हे चित्र हॉलंडच्या चित्रकाराने भारतातून हॉलंडला नेल्या गेलेल्या लघुचित्रांवरून केलेले होते. रेब्राचा कालखंड १६०६ ते १६६९ असा होता आणि मुघल चित्रे साधारणत: १५२६ ते १७६१ या काळात घडलेली होती. व्यक्ती भारतातील, चित्रकार डच आणि चित्र रेखाटले होते हजारो मैलांवर. हे घडले होते फक्त व्यापार, दळणवळण आणि देवाणघेवाणीमुळे. अलीकडे रेब्राच्या या मुघलसंचाच्या चित्रांवर एक पुस्तिका प्रकशित झाली आहे. ती पाहण्यासारखी आहे.

आधुनिक कालखंडावरील प्रदर्शनातील मांडणीमध्ये गंभीर, मजेशीर आणि दुर्मीळ कलाकृती होत्या. भारतीय संविधानाची मूळ स्वरूपातील प्रिंट होती. या संविधानाचे डिझाइन नंदलाल बोस यांच्या देखरेखीखाली झाले. सजावटीतील सुलेखन प्रेमबिहारी नारायण रायजादा यांचे आहे. एकूणच संविधानाच्या डिझाइनच्या मूळ प्रिंटचे पान पाहणे हा एक वेगळा अनुभव होता. म्हणून स्मरणचित्रांच्या या प्रवासात माझ्या लेखी ते महत्त्वाचे आहे. 

स्वातंत्र्य चळवळीतील देशसेविका हा राष्ट्रध्वज घेतलेल्या महिलांच्या चित्राचा प्रिंट होता. ही एक जाहिरात होती. राजा मोतीलाल पूना मिल्स या स्वदेशी कंपनीच्या सुती कापडाची एजंटने केलेली रंगीत जाहिरात. एकूणच सौंदर्यबोध आजच्यापेक्षा वेगळा होता. ते मिलच लेबल होते आणि आजच्या लेबलच्या मनाने आकाराने फारच मोठे होते.
 
याच दालनात सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल हिने रेखाटलेले दोन नग्न स्त्रियांचे चित्र होते. त्यामध्ये एक गोरी आणि एक गडद त्वचेची स्त्री होती. नव्या कलेचा भाग म्हणून ती मांडली असली, तरी त्यामध्ये फक्त दृश्य रूपातून, व्यक्तीच्या रंगाबाबत आणि सामाजिक जाणिवांबाबत अनेक प्रश्न विचारले गेले होते. 

एक सर्वस्वी वेगळी कलाकृती पुढील भागात होती. ट्रकचे मोठाले टायर्स घेऊन त्यांच्यावर कोरीव काम करून आतमध्ये सोनेरी रंग भरला होता. हा रंग टायरच्या काळ्या रंगाला विरोधी होता. ब्रिटिश संग्रहालयातील ही कलाकृती म्हणजे ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांनी आधुनिक माध्यमात केलेली कलाकृती होय. 

थ्रोन ऑफ वेपन्सत्याच दालनात ‘थ्रोन ऑफ वेपन्स’ नावाची खुर्ची-शिल्प मांडलेले होते. हत्यारे वापरून केलेली ही खुर्ची म्हणजे शिल्प होते. नुसतीच जोडाजोडी नव्हती. त्याला एक समानतापूर्ण रचना होती. बंदुका, एके ४७ यांसारख्या अनेक शस्त्रांचा वापर या खुर्चीच्या रचनेत होता. ही एक महान कलाकृती होती. खूप बोलकी होती. २००१ सालची ही कलाकृती मोझांबिक मधील ख्रिस्तोव्हा कॅनहॉवटो या शिल्पकराची होती. 

‘थाळी फेकणारा मीरॉन या प्रसिद्ध ऐतिहासिक शिल्पापासून स्फूर्ती घेऊन कोरियन शिल्पकाराने थाळी फेकणारा कोरियन नेता हे शिल्प केले होते. ते पांढरे शिल्पदेखील खूप आकर्षक होते. 

कर्नाटकातील शिल्पकार तल्लूर याचे शिल्प मला सर्वांत आकर्षक वाटले. नटराजाच्या पारंपरिक धातुशिल्पातील बाह्य वर्तुळाचा (अग्नीचे वर्तुळ) वापर करून नटराज म्हणजे शिवाच्या वैश्विक (तांडवाचे) नृत्याचे रूपांतर पृथ्वीच्या ओबडधोबड स्वरूपात करून त्यावर पैसे म्हणजे नाणी चिकटवली होती. अर्थकारण, प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास, पृथ्वीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश अशा अनेक समस्या एकाच शिल्पात तल्लूरने मांडल्या होत्या. या पाच फूट शिल्पाशेजारीच एक लहान, जलरंगातील चित्र होते. पिवळ्या पार्श्वभूमीवर चंद्र तोंडात घेतलेल्या राहूचे निळ्या रंगातील शीर, त्या चित्राला लहानशी केशरी चौकट.

हे पूर्ण प्रदर्शन म्हणजे एकूणच मानवी संस्कृतीचा सर्व काळातील भारतीय संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा आढावा होता. सर्व कलाकृती एकमेकांशी आणि बहुसंस्कृतींशी जोडलेल्या होत्या. प्रदर्शन मांडणी तर आदर्श स्वरूपातील होती. संशोधक, सामान्य माणसे, तज्ज्ञ, कलावंत अशा नाना लोकांनी हे प्रदर्शन आपापल्या दृष्टीने पाहिले. कोणी कसेही पाहिले, तरी सर्व स्तरांतील लोकांची उत्सुकता शमवण्याची व जागवण्याची ताकद या प्रदर्शनातील कलाकृतींत आणि मांडणीत होती. म्हणून तर तो अनुभव चिरस्मरणीय ठरला आहे.

(या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search