Next
कॅसाब्लांका
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, October 24 | 12:45 PM
15 0 0
Share this story

अनेक विलक्षण गोड क्षणांनी भारून टाकणारं, रिक आणि इल्साच्या आगळ्या प्रेमाची कथा मांडणारं ‘कॅसाब्लांका’चं भूत एकदा मानगुटीवर बसलं की आयुष्यभर उतरत नाही... उपाय एकच असतो... निवांत सुट्टीचा दिवस गाठायचा आणि ‘कॅसाब्लांका’ची डीव्हीडी लावून त्यात हरवून जायचं... ‘सिनेसफर’मध्ये आज पाहू या त्याच सिनेमाविषयी...
..........

हा सिनेमा बघितलाच नाही असे काही लोक जगात असू शकतील; पण हा सिनेमा बघून तो न आवडणारं कदाचित पृथ्वीतलावर कुणीच नसेल! दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही १९४२ची प्रेमकथा. जगात आजपर्यंत सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मांडणाऱ्या सिनेमांवर वेळोवेळी जितके सर्व्हे झाले किंवा जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या मान्यवरांनी आपापल्या पसंतीच्या अशा १० सर्वोत्तम प्रेमकथांची निवड केली, तेव्हा इतर काही सिनेमांची निवड निश्चितच इकडेतिकडे झाली; पण अढळ स्थान एकाच सिनेमाचं राहिलं तो म्हणजे ‘कॅसाब्लांका’!!

काय विशेष आहे या सिनेमात? तर अतोनात गोड असणारी आणि दिसणारी इंग्रिड बर्गमन. इंग्रिडने अख्खा सिनेमा व्यापून टाकलाय. कुणीसं म्हटलंय – ‘सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो.’ फार कमी जणींच्या देखण्या, अनुपम सौंदर्याला सहजसुंदर, सशक्त अभिनयाची जोड असते. इंग्रीड सुंदर तर होतीच; पण अत्यंत नैसर्गिक अभिनयाची सम्राज्ञी होती. तिच्या नुसत्या ‘असण्याने’ हा सिनेमा एका मोठ्या उंचीवर गेलाय.

कॅसाब्लांका हे मोरोक्कोमधलं शहर. दुसरं महायुद्ध ऐन भरात आलंय. जर्मन सैन्याची बऱ्याच ठिकाणी आगेकूच सुरू झाली आहे. त्यांचं सैन्य कॅसाब्लांकात घुसण्याआधी, तोपर्यंत फ्रेंचांची वसाहत असणाऱ्या कॅसाब्लांकामधून अमेरिकेत पळून जाऊ इच्छिणारे लोक त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्याच्या खटपटीत असतात. त्यात कित्येकांचे जीवही जात असतात; पण हिटलरच्या संभाव्य आक्रमणातून सुटण्यासाठी अमेरिका गाठणं हे बहुतेकांचं उद्दिष्ट असतं.

काही स्वातंत्र्य चळवळींचा अनुभव गाठीशी असणारा आणि पॅरिसमधल्या एका प्रेमभंगाचं दु:ख पचवलेला रिक ब्लेन (हम्फ्रे बोगार्ट) हा कॅसाब्लांकमधल्या एका नाइटक्लबचा मालक आहे. त्याच्या क्लबमध्ये तऱ्हेतऱ्हेची माणसं येत असतात, मोरोक्कोमधून सुटून अमेरिकेत पळण्याची संधी शोधत! आणि अर्थात अशा लोकांच्या मागावर असणारे तिथले स्थानिक पोलीस आणि जर्मन सैनिकही!! लुई रेनॉ(ल्ट) हा तिथल्या फ्रेंच वसाहतीचा भ्रष्ट पोलीस अधिकारी. तो मात्र रिकशी दोस्ती जुळवून असतो. त्या वेळी त्या जर्मनव्याप्त प्रदेशातून पोलिसांचा ससेमिरा टाळून दोघा जणांना मोरोक्कोबाहेर जाता येईल असे जर्मन ऑथॉरिटीचे स्टॅम्प असलेले कागदपत्र ‘उगार्तो’ नावाच्या भामट्याच्या हातात आलेले असतात. ते कागदपत्र तो एखाद्या ‘गरजू गिऱ्हाईका’ला विकण्यासाठी रिकच्या नाइटक्लबमध्ये येतो; पण दरम्यान पोलिसांच्या ताब्यात सापडतो. ती मौल्यवान कागदपत्रं मात्र रिकच्या ताब्यात राहतात.

एक दिवस रिकच्या क्लबमध्ये अचानक त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचं इल्साचं (इंग्रीड बर्गमन) आगमन होतं. ती त्यांच्या जुन्या मित्राला पियानोवादक सॅमला तिथे पाहून रिकची चौकशी करते. सॅम उडवाउडवीची उत्तर देतो. तिने तिथून जावं असं सुचवतो... भूतकाळ आठवून ती रिकसाठी ‘बॅड लक’ असल्याचं सांगतो... ती चमकते.. दोन क्षण तसेच जातात... ती त्याला त्यांच्या आवडीचं जुनं गाणं म्हणायला सांगते. 

Play it Sam. For old times’ sake. Play ‘As Time Goes By... सॅम  गाणं आठवत नसल्याचं नाटक करतो. मग इल्सा ते आठवून देण्यासाठी गुणगुणणं सुरू करते. सॅम न राहवून गायला सुरुवात करतो.... 

‘You must remember this
A kiss is just a kiss, a sigh is just a sigh. 
The fundamental things apply 
As time goes by.

And when two lovers woo 
They still say, "I love you." 
On that you can rely 
No matter what the future brings 
As time goes by.....

ते जुन्या आठवणी जाग्या करणारं गाणं कानावर पडल्यावर रिक तावातावाने सॅमला ते बंद करायला सांगण्यासाठी तिथे येतो. ‘मी तुला म्हटलं होतं ना हे गाणं पुन्हा कधीच वाजवायचं नाही म्हणून?’ ... सॅम त्याला नजरेने बाजूला बघण्याचा इशारा करतो... रिकची नजर इल्सावर जाते. इल्साला तिथे बघून रिक हादरतो.... त्यांची नजरानजर......त्याक्षणी दोघांना आतून काय वाटतं त्याची आपण कल्पना करु शकतो.......आपल्याला जीव लावून अचानक गायब झालेली लाडकी...आत्ता?...इथे?...माझ्या क्लब मध्ये?.......कुठे होती इतकी वर्षं?.......आणि इंग्रीडचे बोलके डोळे...खूप काही सांगून जाणारे....तो स्वतःला सावरेपर्यंत इन्स्पेक्टर लुईस, इल्साच्या नवऱ्याला व्हिक्टर लाझ्लोला (पॉल हेन्रीड) घेऊन तिथे येतो... व्हिक्टर हा झेक क्रांतिकारी आहे आणि तिथून त्याला पोलिसांच्या हतावर तुरी देऊन अमेरिकेला पळायचंय. त्यांची ओळख होते... धूर्त इन्स्पेक्टरला रिक आणि इल्साच्या मैत्रीच्या नात्याबद्दल संशय येतो, त्या वेळचे त्याचे मार्मिक डायलॉग्ज ऐकण्यासारखे !..... जुजबी बोलणं होऊन इल्सा आणि व्हिक्टर निघतात.... रिक आणि इल्साची काही क्षणांसाठी एकमेकांत अडकलेली नजर त्यांचं पूर्वीचं नातं ढवळून काढणारी... 

त्या संध्याकाळी बार बंद होऊन लोकं गेल्यावर रिक एकटाच पीत बसलाय... जुन्या आठवणींनी हळवा झालाय... या वेळी तो आपणहून सॅमला तेच लाडकं गाणं म्हणायला सांगतो... पुन्हा एकदा सॅम ‘As Time Goes By’  पियानोवर गातोय...रिकसाठी!... रिक भावविभोर.... ‘जगाच्या पाठीवर इतक्या देशांत इतक्या शहरांत इतके कॅफे असताना हिने इथेच यावं?!!!!’ हे त्याचे त्यावेळचे उद्गार त्याच्या हृदयातली भळभळती जखम दाखवतात. रिकच्या डोळ्यांसमोर ते इल्साबरोबरचे पॅरिसमधले गुलाबी दिवस आहेत... त्यांच्या त्या भेटी... एकमेकांविषयीची ओढ...असोशी... आणि मग एक दिवस नाझी सैन्याचं पॅरिसवर आक्रमण होणार असल्याची बातमी आल्यावर रिकने इल्सासह तिथून निघून जायचं ठरवणं....त्यांची तिथली शेवटची भेट... ‘आपण ट्रेनमध्येच लग्न करू’  म्हणत रिकने रंगवलेली स्वप्न आणि त्या वेळची तिची अवस्था... पण त्यांची झालेली  ताटातूट... भर पावसात रेल्वेस्टेशनवर वाट पाहणाऱ्या रिकला इल्सा येत नसल्याचा मिळालेला निरोप.... आणि उद्ध्वस्त झालेला रिक... हा संपूर्ण फ्लॅशबॅक सीन फारच सुरेख...  

पुढच्या रात्री इल्सा रिकला भेटायला त्याच्याकडे येते... तिला त्याच्याशी  बोलायचंय.... पण तो खूप...खूप दुखावला गेलाय. त्या सगळ्या जुन्या आठवणींनी त्याला विव्हळ केलंय..... 

तू का आली आहेस इथे? ...जगात इतक्या जागा असताना?...’
‘तू इथे आहेस हे माहित असतं तर नसतेच आले रे.. ‘ 

पण तो सगळे जुने प्रसंग उकरून काढतो... 

मला लख्ख आठवतोय त्या वेळचा तुझा आवाज - मी येईन राजा, आपण जाऊ इथून दूर... ट्रेनमध्ये बसून...वाटेत थांबायचंच नाही... जात राहू दूर - असं म्हणाली होतीस...किती दिवस झाले?... 
‘मी मोजणं सोडलंय!’
‘पण मी नाही ..मला एकेक दिवस आठवतोय... विशेषतः तो शेवटचा दिवस... त्या पावसात मी उभा स्टेशनवर वाट बघत आणि तू नाही आलीस.... नाहीच आलीस... गेलीस निघून माझ्या आयुष्यातून...का? का?’.....पण तो हे सगळं बोलेपर्यंत इल्सा निघून गेलीय..
  
पुढच्या काही प्रसंगात इल्सा आणि व्हिक्टरला समजतं, की मोरोक्कोच्या बाहेर निसटून जाण्याचे ऑफिशियल परवान्यांचे कागदपत्र रिककडे आहेत... व्हिक्टर रिकला त्यासंबंधी विचारतोही; पण रिक ते व्हिक्टरला द्यायला नकार देतो... ‘नकाराचं कारण बायकोला विचार’ असंही सांगतो..
.  
त्यानंतरच्या रात्री इल्सा पुन्हा रिककडे येते.. ते कागदपत्र देण्याची विनंती करते. रिक द्यायला तयार होत नाही.... इल्साला व्हिक्टरने तिथून सुखरूप निघून जायला हवंय... अचानक ती पिस्तुल काढून रिकवर रोखते.... ‘मला... मला हवे आहेत ती कागदपत्रं....दे नाहीतर मी गोळी चालवेन’.......रिक तिच्यासमोर उभा राहतो..... ‘चालव गोळी....मी धन्य होईन....’ ....ती एक क्षण निर्धाराने पिस्तुल रोखते... पण.... पण... तिच्या हातून पिस्तुल गळून पडतं... तिच्या लाडक्या रिकला गोळी घालणं तिला शक्यच नसतं..... ती त्याला सांगते, ‘राजा मी खूप प्रयत्न केले तुला विसरण्याचे ....पण नाही विसरू शकले मी तुला....’...ती त्याच्या मिठीत कोसळते... रिकला भेटल्यावर तिच्याही मनात त्याच्यावरचं ते जुनं प्रेम उफाळून आलंय.... पॅरिसमधल्या त्या रात्री तिलाही विसरणं शक्य नसतं... त्यांच्या भेटी.... एकमेकांचा तो आवेगी सहवास.... आणि मग.. .ताटातूट?... तिच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहतायत.... पॅरिसमध्ये त्यांची ताटातूट झाल्यावर तिची झाललेली अवस्था... इतक्या वर्षांनंतर पुन्हा आयुष्यात आलेलं हे तिचं प्रेम तिला आता परत हवं असतं आणि त्यासाठी ती रिकला गळ घालते की त्याच्याकडच्या कागदपत्राचा वापर करून त्याने व्हिक्टरला अमेरिकेला जाऊ द्यावं आणि ती मात्र रिकबरोबर - आपल्या प्रेमाबरोबर - कॅसाब्लांकात कायमची राहील म्हणून! इन्ग्रिडचा हा सीन फक्त तिचाच!!... तिच्यासाठी बघावा पुनःपुन्हा... 

दरम्यान व्हिक्टरला इल्सा आणि रिकच्या प्रेमाबद्दल समजतं आणि तो त्या कागदपत्रांचा वापर करून रिकनेच इल्सासह कॅसाब्लांका सोडून निघून जावं असं सुचवतो...

विमानतळावरची ती रात्र. रिकने इन्स्पेक्टर लुईसच्या मदतीने दोघांसाठी विमानाची व्यवस्था केलीय... इल्सा आणि व्हिक्टर विमानतळावर आले आहेत... इल्सा खूश आहे... तिच्या रिकबरोबर तिला जायला मिळणार... तिच्या प्रेमाबरोबर नव्याने आयुष्याची सुरुवात?...

प्रत्यक्षात, अगदी शेवटच्या क्षणी रिक व्हिक्टरला इल्साला घेऊन त्या विमानातून जायला सांगतो... इल्सा हादरते.. .रिक असं का वागतोय तिला कळत नाहीये.... रिक तिला समजावतो... स्वतःच्या मनावर दगड ठेवून... तिने उर्वरित आयुष्य आता नवऱ्याबरोबरच काढणं उचित आहे... तेच योग्य आहे व्हिक्टरच्या भविष्यासाठी, वगैरे... अशी तिची आणि स्वतःचीही समजूत घालून... त्या वेळी ती त्याला विचारते ‘पण मग ‘आपल्या’ स्वप्नांचं काय?

इल्सा : But what about us?
रिक : We’ll always have Paris. We didn’t have, we, we lost it until you came to Casablanca. We got it back last night.
इल्सा : When I said I would never leave you.
रिक: And you never will.  ..... 

तिला नवऱ्याबरोबर अमेरीकेला जायला रिक भाग पाडतो......स्वतः तिथेच कॅसाब्लांकात एकाकी जीवन जगण्याचा निर्णय घेतो... आपल्या प्रेमाला हृदयाच्या एका कप्प्यात जपत... त्या गोड मधुर आठवणी जपत!!!...हा सीन बघताना असा क्वचितच एखादा प्रेक्षक असेल ज्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या नसतील.... 

कॅसाब्लांका ही एक असफल प्रेमकथा! ... इंग्रिडच्या भावोत्कट अदाकारीने कमालीची परिणामकारक केलेली!!... मायकेल कर्टिझचं दिग्दर्शन आणि मॅक्स स्टिनरचं संगीत लाभलेला अप्रतिम सिनेमा! त्यातले हम्फ्री बोगार्ट आणि इंग्रिडच्या तोंडचे कित्येक डायलॉग्ज गेली ७०-७५ वर्षं सर्वांच्या काळजात कायमचे रुतून बसलेत....

Kiss me. Kiss me as if it were the last time.’.....
‘Here’s looking at you, kid’
‘We’ll always have Paris. We didn’t have it before... we’d... we’d lost it until you came to Casablanca. We got it back last night’...

प्रत्येक वेळी हा सिनेमा बघताना, ते सारे डायलॉग्ज पुन्हापुन्हा ऐकताना आणि इंग्रिडच्या डोळ्यांतले चमकणारे अश्रू बघताना आपण अक्षरशः स्पेलबाउंड होतो... आपल्याही डोळ्यांच्या कडेला चुकार अश्रू जमल्याची जाणीव होते...

..... ‘कॅसाब्लांका’ हे एक अशक्य गारुड आहे! मोहून टाकणारं! पुनःपुन्हा इंग्रिडच्या मोहात पाडणारं.....!!!
 
(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link