Next
असिधारा व्रताची सुरुवात
BOI
Sunday, July 01, 2018 | 08:00 AM
15 1 0
Share this article:

गिरीश प्रभुणेज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे भटक्या-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासह अनेक प्रकारचं समाज कार्य गेली अनेक वर्षं अहोरात्रपणे करत आहेत. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या आणि मराठी साहित्याची आवड असलेल्या आरती आवटी यांनी गिरीश प्रभुणे यांच्या संघर्षमय वाटचालीबद्दल जाणून घेण्यासाठी सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांची पुण्यात प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. आतापर्यंत अप्रकाशित असलेली ही मुलाखत म्हणजे खूप महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तऐवज आहे. त्यांच्या कार्याची सविस्तर ओळख घडविणारी ही मुलाखत आजपासून क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज पहिला भाग...
.................
गिरीश प्रभुणे म्हणजे पारध्यांचे ‘परभुणे’ काका असं समीकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रूढ झालेलं आहे; पण त्यापूर्वीही तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतात. त्या वाटचालीबद्दल सांगा.
गिरीश प्रभुणे : पारधी समाजातल्या कामाच्या आधी मी दोन प्रकारच्या कामांत होतो. पुण्यात ‘ग्रामायण’ नावाची एक संस्था काम करायची. १९७२ला जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळी परिस्थितीत खेड्यातून शहराकडे, पुण्या-मुंबईकडे माणसांचे लोंढे यायला लागले. ‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगांवकर आणि पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत असलेले व्ही. डी. देशपांडे, प्रामुख्याने या दोघांनी आणि अजून काही जणांनी मिळून दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी ग्रामायण ही संस्था स्थापन केली होती. त्यात वेगवेगळ्या विचारसरणीचे म्हणजे समाजवादी, कम्युनिस्ट लोक होते, काही संघाची मंडळी होती, तर काँग्रेसचे लोकही होते. ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने करावा याची थोडीशी मांडणी त्यांनी त्या वेळी केली. त्यातून काही दुष्काळी भाग निवडला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर, दौंड अशा तीन-चार तालुक्यांतून सर्व्हे केला. मी त्या वेळेला संघाचा प्रचारक म्हणून थांबलो होतो आणि चिंचवडला स्थायिक झालो होतो. ‘असिधारा’ नावाचे एक साप्ताहिक मी त्या वेळेला चालवत होतो. सगळ्या नवीन घडामोडी घडत होत्या, जयप्रकाश नारायणांची चळवळ सुरू होती. त्या सगळ्या वातावरणामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं; पण काय केलं पाहिजे याची दिशा ठरली नव्हती. माजगावकरांच्या संपर्कात आल्यानंतर माजगावकरांनी ‘ग्रामायण’चं सगळं काम सांगितलं आणि एकदम वेगळं विश्व लक्षात आलं. खेड्यापाड्यांमध्ये रोजगार नाही, पाणी नाही, उद्योग नाही. त्यामुळे सगळं सोडून म्हणजे अनेक पिढ्या ज्या ठिकाणी राहिल्या, ते गाव सोडून लोकं चालली आहेत. गावंच्या गावं उठून शहराकडे यायला लागलेली आहेत. त्या ठिकाणी काहीतरी करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. जे मुंबईला गेले होते, त्यांच्यामध्ये राहून त्यांना पुन्हा गावी आणणं, असा एक चळवळीचा भाग होता. काही ठिकाणी बंधारे बांधणं, काही ठिकाणी पाणलोट विकासाची कामं, तर काही ठिकाणी वनीकरण, अशा १०-१२ विषयांवर कामं करायची होती. या सगळ्याच्या जोडीला अजून एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे महिला वर्ग. मजूर म्हणून काम करणाऱ्या, तसेच परित्यक्ता महिलाही त्यात होत्या. असे हे सगळे विषय घेऊन ‘ग्रामायण’च्या कामाला सुरुवात झाली आणि मी त्यांच्यात सहभागी झालो. 

गावात राहण्याचा अनुभव कसा होता?
गिरीश प्रभुणे : निमगाव नावाच्या एका गावामध्ये मी जवळजवळ दहा वर्षं राहिलो. गाव सोडून मुंबईला गेलेल्या सगळ्या दलितांना परत आणण्याची ती योजना होती. मी त्या कामात सहभागी झालो आणि माझ्या असं लक्षात आलं, की आपण आतापर्यंत जे जीवन जगलो, जे काम आतापर्यंत केलं, त्या संपूर्ण अनुभवापेक्षा या लोकांचं जीवन वेगळं आहे. १००-१०० एकर जमिनी आहेत, विहिरी आहेत, पाणी आहे. तरीसुद्धा त्या पाण्याचे नियोजन नाही. जमीन आहे, मग त्या जमिनीत काय लावलं पाहिजे, यासाठी गेल्या ५०-१०० वर्षांत कुणीही शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलेलं नाही. सरकारं आहेत, अनेक योजना जाहीर झालेल्या आहेत, ग्रामपंचायतींच्या योजनांचा तर पाऊस पडतो; पण त्यातलं काहीही खेड्यांमध्ये पोहोचत नाही/राहत नाही. म्हणूनच गाव पातळीवर नियोजन करणं आवश्यक आहे. जे गाव सोडून गेलेत, त्यांच्याविषयी कुणाकडे नोंद नाही. का गेलेत, का आलेत, कुठे राहतात, कसे राहतात, काही माहिती नाही. जे मुंबईत जाऊन राहतात, त्यांच्यामध्ये मी स्वतः सहा महिने जाऊन राहिलो. झोपडपट्टीमध्ये घराघरात समुद्राचं पाणी शिरायचं, सगळी घाण घरात यायची. झोपडी म्हणजे रेल्वेतील ‘थ्री-टायर’प्रमाणे असायची. उभ्याने स्वयंपाक करायचे. दिवसातले पाच-सहा तास पाणी घरात असायचं. घाण यायची; पण लोक त्याच्यातही जीवनातले ताणतणाव, आनंद, जे काय आहे ते त्यातच सगळं साजरं करायचे. मुलं शाळेत जात नसत. मुंबईला मुंबई विद्यापीठाच्या जवळ काही झोपड्या आहेत. त्या झोपड्यांमध्ये जी मुलं राहतात, ती शाळेत जातच नाहीत.

म्हणजे एकीकडे जगातले ज्ञान देणाऱ्या संस्था आहेत आणि तिथेच अंगठासुद्धा उठवायचा हे कळत नाही, अशी नवीन पिढी तयार होत होती. अशा सगळ्यांना मी परत गावात आणलं आणि पुढच्या दहा वर्षांत पुन्हा एकदा नव्याने नव्या रचनेचा अभ्यास होत गेला. काम करताना खूप काही नवीन शिकलो, नवीन गोष्टी लक्षात आल्या. मी नेहमी हे उदाहरण देतो. गावात बंधारा बांधायचा ठरला होता. तज्ज्ञ मंडळी असं समजायची, की खेड्यातल्या लोकांना काही कळतच नाही, खेड्यातल्या लोकांना काही ज्ञान नाही. म्हणून पाऊस किती पडतो, एका दिवसांत पाऊस किती पडला तर हा बंधारा किती भरेल, अशी सगळी माहिती घेऊन शहरातून मंडळी आली; पण प्रत्यक्षात ज्या दिवशी बंधारा बांधायला सुरुवात केली, त्या दिवशी एक गावकरी आला आणि म्हणाला, ‘इथे बंधारा बांधू नका, तो वाहून जाईल.’

आमच्याबरोबर असणारे इंजिनीअर त्यांना म्हणाले, ‘असं कसं शक्य आहे? आम्ही सगळा अभ्यास केलेला आहे. हा बंधारा वाहून जाऊ शकत नाही. तुम्हाला काय कळतंय? आम्ही तज्ज्ञ आहोत!’ मी थोडासा तटस्थ राहून त्या सर्वांचं निरीक्षण करत होतो. कारण मी इंजिनीअरही नव्हतो, की खेड्यातूनही आलेलो नव्हतो. त्यामुळे ते सांगतात ते, की हे सांगतात ते, नेमकं बरोबर काय, हे काही कळत नव्हतं. चार महिन्यांनी तो बंधारा उभा राहिला. दहा वर्षं न पडलेला पाऊस त्या वर्षी पडला, तोही दोन दिवसांत म्हणजे २४ तासांत पडला. २४ तासात बंधारा भरला आणि सर्व गाव, आम्हीसुद्धा, फोटो-बिटो काढण्यासाठी तिथे जमलो. आमच्या डोळ्यासमोर तो बंधारा वाहून गेला. लक्षात असं आलं, की ज्या लोकांनी श्रम केले होते, तो बंधारा बांधला होता, त्या लोकांना आनंद झाला. म्हणजे त्यांनी दहा-पंधरा वर्षांनी एवढं पाणी पाहिलं, ते वाहून गेल्याचा आनंद का झाला? माझ्यासमोर प्रश्न आला. पुन्हा एकदा तटस्थपणे विचार करताना असं लक्षात आलं, की यांना एवढा आनंद का झाला, तर ‘आपण जे सांगत होतो ते ऐकलं नाही. बंधारा वाहून गेला आणि आम्ही सांगितलं ते कसं खरं आहे,’ या भावनेने त्यांना आनंद झाला होता. तेव्हापासून ठरवलं, की आपण कुठलंही काम करत असताना, समोरचा सांगेल त्याच्याकडे मूळचं काही असणार आहे. ते काय आहे हे आधी बघावं, त्याला धरून मग आपली बांधणी, उभारणी करावी. पुढची दहा वर्षं त्याप्रमाणेच काम केलं. गावातल्या पहिल्या तीन महिन्यांत जे अनुभव आले त्यातला हा एक अनुभव होता. 

गावात पाणी आलं. जिथे टँकर आणून पाणी घ्यावं लागत होतं, तिथे पाणी तर आलं. वॉटरशेड आले, विहिरींनाही पाणी आलं. जी मुलं आमच्याबरोबर मुंबईतून आणली होती, जी तिथे शाळेत जात नव्हती, ती आता गावातल्या शाळेत जायला लागली. सहा-सात वर्षांनी त्यातली काही जणं दहावीला आली. त्यातल्या एका मुलाचे वडील आले. म्हणाले, ‘माझा मुलगा दहावी होईल. तुम्ही चिंचवडला राहता. त्याला कुठे तरी नोकरीला लावून द्या.’ दहा वर्षांपूर्वी जे संपूर्ण गाव उजाड होतं, ते सात-आठ वर्षांमध्ये पूर्ण हिरवंगार झालं. पाण्याचे आठ-१० बंधारे बारमाही पाण्याचे झाले. विहिरींमधे पाणी टिकू लागलं. सगळीकडे उत्तम परिस्थिती झली. पूर्वी एकदा इथे एक अपघात घडला होता. सहा-सात जण जागेवर मरण पावले होते. त्यांच्या पिंडाला शिवायला कावळा नव्हता गावात. कावळे बसण्याकरिता झाडं लागतात. गावात झाडं नाहीत. शिवारात धान्य असेल, तर पक्षी येतात, तेही नाही. आता ते सगळे पक्षी परतले होते. माणसं परत आली होती; पण गावातल्या व्यवस्थेत जे शिक्षण आहे, त्या शिक्षणामुळे माणसं परत चालली होती. म्हणजे ‘मायग्रेशन’ थांबलेलं नव्हतं. सर्व गाव सुस्थितीत आलेलं होतं. पाऊस आला, निसर्ग आला, सगळं काही आलं; पण माणसांना तो पैसा नको होता, कष्ट करून मिळणारा. त्यांना नोकरी हवी होती. आणि हे जे गावामधलं शिक्षण होतं, ते त्याला पाणलोटापासून, शेतीपासून, गावापासून, घरापासून पुन्हा दूर नेणारं होतं. मग लक्षात आलं, की आजही परिस्थिती साधारण तशीच आहे. पाणलोटामध्ये पाणी भरपूर आहे, गावामध्ये रस्ते झालेले आहेत; पण गावात राहणारा शिकलेला तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे जातोच आहे. अशा वेगवेगळ्या समस्या या दहा वर्षांत लक्षात आल्या आणि त्याच्यावर काम केलं. दुसरी समस्या म्हणजे पत्रकार. कुठे अत्याचार झालेले कळले, की हे तिकडे जायचे आणि पेपरला बातमी द्यायचे. मग चळवळ, आठ दिवस आंदोलनं वगैरे व्हायची, पुन्हा आहे तिथेच. मी ‘ग्रामायण’मध्ये ज्या क्षेत्रात काम करत होतो, त्यात प्रामुख्याने दलित वर्ग होता. 

गावातली सामाजिक स्थिती कशी होती?
गिरीश प्रभुणे : दलित वर्गामध्ये महिला आणि पुरुष अशा दोन घटकांमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं, की माझी बायको, माझी मुलगी, माझा (शहरातल्या लोकांचा) त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि इथला जो न शिकलेला आहे, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन यांमध्ये सूक्ष्मपणे पाहिलं, तर फार फरक नाही. मुलाला अधिक प्राधान्य, मुलीला कमी प्राधान्य, शिकायला गेली तर शाळेत जाईल इथपर्यंतच. मग तिला कपडे आहेत की नाहीत बघणार नाहीत. मुलाला बूट वगैरे सगळं देणार, मुलीला काही देणार नाहीत. शिकून काय करायचं आहे, तुझं लग्न करून द्यायचं आहे, परक्याचं धन आहेस. तिच्यावर खर्च कमी. नवरा आजारी पडला, तर तो चटकन दवाखान्यात जायचा. म्हणजे १० किलोमीटर, १५ किलोमीटर लांब जायचा. बायको आजारी पडली तर ती आडवी झाल्याशिवाय ती आजारी आहे हे कळतच नसे. आणि पुरुषांना थोडा खोकला आला, तरी लगेचच औषध घ्यायला जाणार. पाणी आणायचं, दळण आणायचं अशा सर्व कामांच्या ठिकाणी बाई. म्हणजे गावात पहाटेचा कोंबडा आरवायच्या आधी बाई उठते. सर्व झोपले की बाई झोपते. त्यांच्यासाठी पाणी, दळण अशा सगळ्या गोष्टी तिने आणलेल्या आहेत. हा काय करतो? काही नाही. आंघोळ-बिंघोळ करणार, जाणार, चव्हाट्यावर बसणार, कुठे आणखी तालुक्याच्या ठिकाणी जाणार, हेलपाटे घालणार, पैसे कुठून फुकट मिळतात का पाहणार.... अशी सगळी खेड्याची रचना, त्याच्यामध्ये आम्ही नवीन विचार रुजवले. नवीन लागवड, पाणी अडवा, पाणी जिरवा, असं सगळं केलं. तरीसुद्धा सुधारणा नाही. कारण योग्य शिक्षण नव्हतं. शिक्षण त्या गावाशी, गावातल्या समस्यांशी जोडलेलं नव्हतं. एकीकडे या सगळ्यातून मार्ग काढणं चाललं होतं. दुसरीकडे दलित चळवळ. दलितांमध्ये आंबेडकरवादी आणि इतर असे वेगवेगळे गट होते. मग त्यांचा सारखा कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद. गावात दळण घेऊन गेले, दळण ठेवलेलं असतं, कुणीतरी आलं, दळण मागे गेलं... यांची लगेच जातीवरून भांडणं. पाणी भरायला गेले, पाण्यावरून भांडणं. एकदा मंदिराच्या पुढे रिकाम्या जागेत बैठक घेतली. शहरातल्या सगळ्या मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश असतो. त्यामुळे कोण दलित आहे आणि कोण अमुक आहे, हे काही पाहिलं जात नाही; पण इथे मात्र दलित सगळे बाहेर थांबले होते. संपूर्ण गावाच्या विकासात दलित आघाडीवर होते; पण गावातल्या बैठकीत दलित मागे. मी या म्हटले, तर नाही म्हणाले! त्यांनी वरती यायचं नसतं. मग मंदिर प्रवेशाचं लक्षात आलं. गावाचा विकास झाला; पण मानसिक विकासामध्ये गावातला सामाजिक स्तर तसाच राहिला होता. मग आम्ही त्यात सुधारणेसाठी प्रयत्न सुरू केले. 

त्याची अंमलबजावणी नेमकी कशी करण्यात आली?
गिरीश प्रभुणे : गावामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ झाली होती. ही चळवळ बाबा आढावांनी केली होती. आढावांच्या चळवळीला सर्व जण एकत्र आले, की गावातील सर्वांची बैठक व्हायची. सर्व एकत्र यायचे. गावातला पाणवठा सर्वांकरिता खुला व्हायचा. आढावांची पदयात्रा पुढे जायची. दुसऱ्या दिवशी विहिरीवरती पाणी भरायला आले, तर त्यांना विरोध व्हायचा. ‘एक गाव एक पाणवठा’ झालाच नाही. मग सरकारी योजनांमध्ये गावागावात जिथे जिथे पाणवठे खणता येतील, विहिरी खणता येतील, तिथे खणल्या. दलित वस्तीमध्ये स्वतंत्र विहिरी झाल्या. स्वतंत्र विहिरी झाल्यामुळे त्यांना पाणी मिळालं; पण सवर्णांच्या विहिरीवर म्हणजे गावच्या विहिरीवर येऊन दलित पाणी भरू शकत नव्हते. आजही खूप मोठ्या प्रमाणात असं सर्वत्र आहे. त्याच काळामध्ये आम्ही काही प्रयोग केले. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र दलितांनी वाचलेलंच नव्हतं. दलितांचे ‘आंबेडकर जयंती’सारखे जे कार्यक्रम असायचे त्यात सवर्णांना शिव्या, ब्राह्मणांना शिव्या, सगळ्यांना शिव्या असं सगळं चालायचं. बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन इतकी वर्षं झाली, तरी अजून त्या काळात जी भाषा होती, तीच भाषा होती. म्हणून मग बाबासाहेबांचं चरित्र सांगायचं ठरलं. ते चरित्र सांगता सांगता, अन्य सगळ्या महापुरुषांची चरित्रं त्यांच्यापुढे ठेवायचं ठरलं. विवेकानंदांचं, महात्मा फुलेंचं, हेडगेवारांचं, लोकमान्य टिळकांचं, अशी विविध जणांची चरित्रं त्यांच्यासमोर ठेवून पूर्वी स्थिती कशी होती? आज आहे का? नाही. आज ‘एसटी’मध्ये सगळे एकत्र बसतात, हॉटेलात सगळे एकत्र येतात, रेल्वेमध्ये सगळे एकत्र बसतात. एकत्र येण्याबद्दल पूर्वी अत्यंत टोकाची म्हणजे कुणी एकत्र आला तर खून होईल, मारामारी होईल, अशी भूमिका होती. आता तसं राहिलेलं नाही. 

अशी वेगवेगळी उदाहरणं देऊन त्या चरित्र वाचनातून त्यांची मानसिकता तयार करणं चालू केलं. जे बौद्ध झालेले आहेत, त्यांना बुद्धवंदना येत नव्हती. पूजा-अर्चा कशी करायची ते माहीत नव्हतं. रोज दारू पिऊन येऊन बसायचे आणि बाबासाहेबांचा जयजयकार करायचे. मग आंबेडकर जयंती कशी साजरी करावी इथपासून ते शेतीतल्या कामापर्यंत असे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेतले. महिलांना मारणं हे सर्रास असायचं. काठी प्रत्येकाच्या घरात असायचीच. काठीचा उपयोग काय तर दिवसा शेळ्यांना, गुरांना मारायला आणि रात्री बायकोला मारायला. बायकोला का मारलं जातं? काहीही कारण नाही. एका बैठकीमध्ये आम्ही असे दोन वर्ग घेतले. एक महिलांचा घेतला, एक पुरुषांचा. त्यांना म्हणालो, ‘यादी करू आपण. तुम्ही बायकांना का मारता?’ तू तुझ्या बायकोला का मारतोस? मुलीला का मारतोस? मग विचारलं, की तुम्ही काय काय कामं करता? तुमच्या आणि तिच्या सगळ्या कामांची यादी. बायकोला का मारता, हे जसं महत्त्वाचं, तसंच तेपण महत्त्वाचं. कामाच्या यादीमध्ये असं लक्षात आलं, की शेतीत नांगर धरायचं काम सोडलं, तर बाकी कुठलंही काम पुरुष करत नाहीत. एवढं एकमेव काम यांच्या नावावर आणि बाकीची शंभर कामांची यादी बायकोच्या नावावर आली. सगळंच बायको करते, तर ती आजारी केव्हा पडते ते पाहिलं आहे का? नाही! आजारी केव्हा पडते, पडतच नाही आजारी. आडवी झाली किंवा बाळंतपण असेल तर बाळंतपणाच्या आदल्या दिवसापर्यंत ती सर्व कामं करत असते. आणि मग दोघांच्या पुढे मांडलं सगळं. ‘आता ठरवा तुम्हीच, काय केलं पाहिजे. आजपासून बायकोला मारणार नाही?’ सगळे गप्प बसले आणि उभे राहिले एकदम. ते म्हणाले, ‘असं कसं होईल बाईची जात आणि कांद्याची पात सारखीच.’ कांद्याची पात म्हणजे काय? कांद्याचं वरचं साल काढलं, तर आत परत कांदा असतो, ते काढलं की पुन्हा कांदा असतो. सगळ्यात शेवटी कोंब असतो, त्यातही पुन्हा कोंब असतो, कोंबात कोंब. कांदा हे उदाहरण असं आहे, की आत, आत, आत. बाईचं मन हे कुणालाही समजलेलं नाही. बाईच्या मनामध्ये काय आहे, कुणालाही कळत नाही. त्यामुळे कांद्याची पात आणि बाईची जात. मग म्हणाले, ‘तिशी दिवस बाईला मार लागतो. जसं गुराला तिशी दिवस मार लागतो, (तिशी दिवस म्हणजे ३६५ दिवस) मारलं तरच ती चालते.’ इतकी टोकाची भूमिका. मग म्हटलं, ‘ठीक आहे, तिशी दिवस मार पाहिजे आहे ना, काहीतरी कारण घडलं तरच मारायचं. कारण नाही घडलं तर मारायचं नाही. कारण सांगा काही तरी.’ असं त्यांना कारणावरती आणलं. शेवटी पुरुषांच्या मीटिंगमध्ये ठरलं, की कारण घडलं तरच मारणार. ‘छड्या सगळ्या माझ्याकडे आणून ठेवायच्या. तुला वाटलं आज मारायचं आहे बायकोला, तर माझ्याकडे यायचं, छडी घेऊन जायचं, मग मारायचं.’ असं आम्ही जवळजवळ दोन महिने केलं. आणि छडी न्यायला यायचे ना ते! कारण काय घडलं? ‘बायकोने असं असं केलं.’ मग तिला बोलावून आणायचं. इतक्या कौटुंबिक समस्यांपर्यंत शिरल्यानंतर बायकांचा मार थोडाफार कमी झाला. 

बायांना आम्ही विचारलं, की तुमचं काय? तर त्यांच्यामध्ये खुरपताना चर्चा ऐकायला यायच्या. चर्चा काय असायच्या... नवीन लग्न होऊन मुलगी आली, की ‘नवऱ्याने मारलं का? अरे, मारत नाही बायकोला? म्हणजे बायल्या नवरा आहे,’ अशी चर्चा असायची. म्हणजे नवऱ्याने मारलं नाही, तर तो बायल्या. आणि म्हणून बायको नवऱ्याला सांगायची, की तुम्ही मला मारलं नाहीत, तर बायल्या म्हणतात तुम्हाला. मला चिडवतात सगळे तुमच्या नावाने. म्हणून तुम्ही मारलं पाहिजे. मग लाडातून मारता मारता तो खरं लाथा-बुक्क्यांनी मारायला लागतो. हे सगळं समजावून सांगणं जिकिरीचं काम आहे. बाईने मार खाल्ला नाही, तर ती बाईची जात कसली? तिनं मार खाल्लाच पाहिजे, अशी मानसिकता. सासू-सुना हा अजून एक प्रश्न. सामाजिक चर्चेतून हळूहळू सगळे मार कमी झाले.

बी, बियाणं, शेती, पाणी यांत गावकरी तज्ज्ञ झाले. गुलाबाच्या वेगळ्या जाती, आंब्याच्या वेगळ्या जाती, बोराच्या वेगळ्या जाती अशा सर्व प्रयोगांत तज्ज्ञ झाले. आंबेडकरांबरोबरच डॉ. हेडगेवार, विवेकानंद असे अनेक महापुरुष त्यांना माहिती झाले. नाही तर त्यांना आंबेडकरांच्या पलीकडे जगामध्ये दुसरं काहीही माहिती नव्हतं. समजायला लागलं त्यांना. जग पाहायला लागले ते. गावामधले वादविवाद सारखे पोलीस स्टेशनला जायचे, ते प्रकार बंद झाले. नवरा-बायकोची भांडणं चव्हाट्यावर यायची बंद झाली. असे अनुभव दहा वर्षांच्या कालावधीत आले. मला लिखाणाचं अंग असल्यामुळे या सगळ्यावर ‘माणूस’मध्ये लिहून आणलं. अनेक ठिकाणी जाऊन मांडायचो. पाठिंबा मिळत गेला.

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग  https://goo.gl/tvAKS या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Subhash solanki About 270 Days ago
Chan
0
0
चैतन्य घाटे About 293 Days ago
मन समर्पित तन समर्पित और यह जीवन समर्पित
0
0
Anagha Pabalkar About 293 Days ago
Khup sunder mahiti
0
0

Select Language
Share Link
 
Search