Next
दिल की ये आरजू थी...
BOI
Sunday, July 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पत्रकार आणि प्रतिभासंपन्न शायर, गीतकार हसन कमाल यांचा आज (एक जुलै) अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘दिल की ये आरजू थी..’ या गीताचा...
........
आज एक जुलै! या दिवसाचे चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्व पाहू या. हा दिवस बासरीवादक व संगीतकार पं. हरिप्रसाद चौरसिया, दिग्दर्शक मेहुलकुमार आणि लेखक-गीतकार हसन कमाल यांचा जन्मदिवस आहे. निर्माता-दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांचा स्मृतिदिवस आजच असतो. गायक सुरेश वाडकर एक जुलै १९९८ या दिवशी विवाहबद्ध झाले होते.

या दिवसाचे औचित्य साधून ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या गीतकार हसन कमाल यांच्या एका गीताचा. त्याआधी या प्रतिभासंपन्न शायराच्या जीवनप्रवासावर एक धावता कटाक्ष टाकू या! एक जुलै १९४३ रोजी लखनौमध्ये जन्मलेल्या हसन कमाल यांनी आज त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. अमृतमहोत्सवी हसन कमाल यांनी लखनौच्या विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आणि ते पदवीधर झाले. १९६५मध्ये पत्रकारिता क्षेत्रात त्यांची कारकीर्द सुरू झाली. मुंबईतील ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकात ते उपसंपादक म्हणून काम पाहू लागले. यामधून आलेल्या अनुभवातून, मिळालेल्या ज्ञानातून आणि घेतलेल्या परिश्रमातून १९७४मध्ये ते ‘उर्दू ब्लिट्झ’चे संपादक झाले. हे वृत्तपत्र खूप लोकप्रिय बनले आणि त्यामुळे हसन कमाल या नावाला एक वजन प्राप्त झाले. या वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत आणि ते लोकांना आवडतही असत.

हसन कमालपत्रकारिता करत असतानाच हसन कमाल शायरीही करत असत! त्यांच्या अप्रतिम शायरीमुळे त्यांनी कवी म्हणून परदेशातही काही कार्यक्रम केले. परदेशातील शेरोशायरीच्या कार्यक्रमांमध्ये शायरी सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रणेही येत असत! त्यामधून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘बंबई रात की बाहो में’ या चित्रपटापासून चित्रपटांचे गीतकार म्हणून हसन कमाल यांची वाटचाल सुरू झाली. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिलसिला’ चित्रपटाकरिता त्यांनी ‘सर से सरके सरके चुनरिया ...’ हे गीत लिहिले होते व ते लोकप्रिय झाले होते. त्यानंतर त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ चित्रपटाची सर्व गीते लिहिली आणि ती सर्व देशभर लोकप्रिय ठरली. त्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाला प्रतिष्ठा लाभली. बी . आर. चोप्रांनी आपल्या चित्रसंस्थेतील पुढील कित्येक चित्रपटांसाठी हसन कमाल यांचीच निवड केली.

‘आज की आवाज’, ‘मजदूर’, ‘अवाम’, ‘दहलीज’, ‘तवायफ’, ‘प्रतिज्ञाबद्ध’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. तसेच त्यांनी ‘बटवारा’, ‘यतीम’, ‘हथियार’, ‘ऐतबार’ या चित्रपटांच्या संवादलेखनाचे काम केले. टीव्ही मालिकांचा काळ सुरू झाल्यावर त्यांनी ‘महाभारत कथा,’ ‘सौदा’, ‘ कानून’, ‘औरत’, ‘परमवीरचक्र’, ‘उसूल’, विष्णू पुराण’, ‘अकबर - दी  ग्रेट’, ‘झाँसी की रानी’, ‘महाराणा प्रताप’ अशा काही टीव्ही मालिकांचे संवाद लिहिले.

‘आज की आवाज’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी हसन कमाल यांना १९८४चा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. या व्यतिरिक्त त्यांना ‘ नेहरू कल्चरल असोसिएशन ऑफ यूपी, तसेच हिंदी उर्दू साहित्य अॅवॉर्ड ऑफ यूपी व मौलाना अबुल कलाम आजाद अॅवॉर्ड अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

१९८२च्या ‘निकाह’ चित्रपटासाठी हसन कमाल यांनी लिहिलेली सर्व गीते आशयसंपन्न होती. ‘फजा भी है जवाँ जवाँ......’, ‘बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी....’, ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये ....’, ‘दिल की ये आरजू थी.....’ ही ‘निकाह’मधील गीते आजही ऐकावीशी वाटतात. यापैकी ‘दिल के अरमाँ आँसुओं में बह गये’ हे सलमा आगा यांनी गायलेले आणि संगीतकार रवी यांनी स्वरबद्ध केलेले गीत तर प्रचंड लोकप्रिय ठरले होते आणि ‘बिनाका गीतमाला’ या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या वार्षिक कार्यक्रमात १९८३चे द्वितीय क्रमांकाचे गीत म्हणून या गीताचा सन्मान करण्यात आला होता.

‘निकाह’ चित्रपटातील अशा एकापेक्षा एक सुंदर गीतांपैकी एका सुनहऱ्या गीताचा आस्वाद आज घेऊ या. चित्रपटात तसा प्रेमाचा त्रिकोणच होता. नायकाकडून प्रेमाची अपेक्षा पूर्ण न झालेली नायिका आणि नंतर तिला दुसरा नायक/सहनायक भेटतो. तिच्या सौंदर्यावर लुब्ध होतो. तिच्यावर प्रेम करू लागतो आणि त्या मन:स्थितीत आपल्या मनाचे भाव कळण्यासाठी नायिकेपुढे तो गातो! पण त्या वेळी ते पाहून नायिकेच्या मनात काय विचार येतात? पहिल्या प्रेमातील अपेक्षाभंग, तशातच दुसरे प्रेम पुढे! ती अशा मन:स्थितीत या सहनायकाला काव्यातून सांगते!

थोडक्यात काय, तर नायक आनंदी मन:स्थितीत आणि नायिका दु:खी मनस्थितीत! एक वेगळे द्वंदगीत! हसन कमाल नायकाची आनंदी मनःस्थिती वर्णन करताना लिहितात, महेंद्र कपूर गातात, संगीतकार रवी मस्त चालीतून गाण्याचा प्रभाव वाढवतात....

दिल की ये आरजू थी कोई दिलरुबा मिले 
लो बन गया नसीब के तुम हमसे आ मिले

आमच्या मनाला वाटत होते, आमच्या हृदयात अशी भावना होती, की एखादी भावणारी प्रिया, मनपसंत साथीदारीण भेटावी. आणि काय बघा आश्चर्य, तुम्ही आम्हाला भेटलात आणि आम्हाला वाटले आमचे नशीब उजळले. तुम्हीच माझ्या मनाला भावणारी साथीदार आहात!

‘ती’ भेटल्यामुळे तो अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त करतो; पण या प्रीतीच्या प्रांतात तिने दाहक अनुभव घेतले आहेत. त्यामुळे दु:खी मनाने ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते -

देखे हमें नसीब से अब अपने क्या मिले 
अब तक तो जो भी दोस्त मिले बेवफा मिले!

बघा ना आमच्या (फुटक्या) नशिबामुळे आम्हाला काय मिळाले? (आम्ही त्यांच्यावर भरपूर प्रेम केले, पण) आजपर्यंत जे मित्र आम्हाला मिळाले, ते प्रतारणा करणारेच मिळाले. आमच्या प्रेमाची त्यांनी जाण ठेवलीच नाही.

तिच्या तोंडून तिचे हे दु:ख ऐकून तो तिला सांगतो - 

आँखों को एक इशारे की जहमत तो दीजिए 
कदमों में दिल बिछा दूँ इजाजत तो दीजिए 
गम को गले लगा लूँ जो गम आपका मिले 

माझे प्रेम स्वीकारण्याबद्दलचा एक नेत्रकटाक्ष टाकण्याचे कष्ट तुम्ही घ्या. (जहमत म्हणजे कष्ट) तुम्ही परवानगी दिली, तुम्हाला मान्य असेल, तर तुम्ही जेथे पाय ठेवाल, त्या ठिकाणी आधी मी माझे हृदय अंथरून ठेवीन! (ही उपमा, पण आशय हा, की तुम्हाला फुलासारखं जपेन!) (आणि तुमच्या जीवनात आतापर्यंत मिळालेल्या दुःखाबद्दल म्हणत असाल, तर एवढंच सांगतो की, तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केलात, की) तुमच्या दुःखाला मी मिठी मारीन, अर्थात तुमचे दु:ख केवळ तुमचे होणार नाही, तर ते माझेही होणार व त्यामुळे तुमच्या दुःखाची तीव्रता मी कमी करीन.

‘त्याने’ एवढे आश्वस्त केले, तरी ‘ती’ म्हणते -

हमने उदासियों मे गुजरी है जिंदगी 
लगता है डर फरेब-ए-वफा से कभी कभी 
ऐसा न हो के जख्म कोई फिर नया मिले

(काय सांगू तुम्हाला अहो) आम्ही आमच्या जीवनात उदासवाणेपणाच अनुभवला आहे. (मन निराश झाले आहे. आणि तशातच कधी कधी अशीही) भीती वाटते की, प्रेमात, निष्ठेत पुन्हा एकदा आम्हाला धोका मिळेल. (माझे प्रेमातले असे दाहक अनुभव असल्यामुळेच असे वाटते, की आता आपण पुन्हा कोणावर प्रेम करू लागलो, तर) न जाणो पुन्हा एखादी नवीन जखम आम्हाला मिळेल. (प्रेमातली पहिली जखम अद्याप ताजीच आहे.) 

‘तिच्या’ मनाची अशी साशंक व उदासवाणी अवस्था ऐकल्यावर ‘तो’ तिला सांगतो. येथे चित्रपटाच्या कथानकात ते दोघे आधी एकदा भेटलेले असतात; पण पुढे त्यांना दूर व्हावे लागलेले असते. त्या अनुषंगानेच हसन कमाल हे शेवटचे कडवे लिहताना अशी शब्दरचना करतात -

कल तुम जुदा हुए थे जहाँ साथ छोडकर 
हम आज तक खडे है उसी दिल के मोडपर
हमको इस इंतजार का कुछ तो सिला मिले

भूतकाळात ज्या ठिकाणी तुम्ही आमच्यापासून अलग झालात, आमची साथ सोडली, त्याच वळणावर (हृदयातील त्याच भावनांना सांभाळत) आम्ही आजपर्यंत (तुमची वाट बघत) उभे आहोत. (तुमच्यासाठी थांबलेले आहोत.) आमच्या या प्रतिक्षेचे आम्हाला काही चांगले फळ मिळावे (अर्थात तुमची प्राप्ती व्हावी) असेच आम्हाला वाटते.

असे हे एक अनोखे द्वंदगीत! सतारीचा मधुर वापर! सलमा आगा यांचा अनुनासिक वाटणारा, पण वेगळा आवाज व जोडीला महेंद्र कपूर! संगीतकार रवींची उत्कृष्ट चाल! आणि हसन कमाल यांचे साधे सोपे, पण प्रभावी शब्द व उपमा! ‘सुनहऱ्या’ गीतात आणखी वेगळे काय हवे, नाही का? १९८०मध्ये गीतकार साहिर यांचे निधन झाल्यावर बी. आर. चोप्रांनी आपला नेहमीचा गीतकार गेल्यामुळे ते स्थान हसन कमाल यांना दिले, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. या प्रतिभासंपन्न शायराला अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श.वा. बोरगांवकर About 237 Days ago
अप्रतिम
0
0

Select Language
Share Link