
‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लेखन अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करून त्यात उत्तुंग यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. त्या अवलियाचं नाव आहे वसंत वसंत लिमये. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या त्यांची प्रेरणादायी गोष्ट...............
‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लिखाण अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करतो, त्याही क्षेत्रांत यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. ‘आयआयटी’तल्या शिक्षणानं स्थैर्याची इतकी सुरळीत वाट दाखवलेली असताना, हा तरुण वेगळ्या मार्गानं चालण्याचं का ठरवतो, या प्रश्नांचा शोध म्हणजेच आपल्या वेडात धुंद झालेल्या, स्वच्छंद असलेल्या बाळ्या म्हणजेच वसंत वसंत लिमये या साठ वर्षीय तरुणाची गोष्ट!

सुरुवात नावापासूनच करू या. लिहिता लिहिता मी या तरुणाचं नाव चुकीचं लिहिलं की काय, असं सगळ्यांना वाटेल; पण नाही, वसंत वसंत लिमये असंच त्याचं नाव आहे. या नावाचीदेखील वेगळीच गोष्ट आहे. खरं तर इतिहासाचा अभ्यास करताना चार्ल्स दुसरा, जोसेफ पहिला किंवा हेन्री तिसरा असं वाचलं होतं. जन्माला आलेल्या मुलाला आजोबांचं किंवा पणजोबांचं नाव ठेवण्यात आलेलं ऐकिवात होतं; पण या वसंत वसंत लिमये या नावामागची गोष्ट काय असावी याबद्दलचं कुतूहल काही केल्या गप्प बसू देईना. मग प्रश्न उपस्थित केला, तेव्हा कळलं, की त्याच्या आई-वडिलांनी (आईचं नाव वसुधा आणि वडिलांचं नाव वसंत) एकदा गमतीगमतीत म्हटलं होतं, की जेव्हा मुलगा होईल तेव्हा वसंत नाव ठेवू आणि मुलगी झाली तर वसुधा! त्यानंतर हे बोलणं दोघंही विसरून गेले. ज्या वेळी घरात छोट्या बाळाचं आगमन झालं, तेव्हा आत्याबाईला नाव ठेवण्याचा हक्क असतो; पण आत्यानं म्हटलं, जिनं जन्म दिला, तिचाच तो खरा अधिकार. त्यामुळे बाळाचं नाव त्याच्या आईनंच ठेवावं. आई गडबडून गेली. ती धावतच जिथं बाळाचे बाबा आहेत, त्या आतल्या खोलीत आली. बाळाचं नाव काय ठेवू, असं तिनं विचारलं. अचानक समोर आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं त्यांनाही काही सुचेना. अशा वेळी त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या बायकोबरोबर झालेला संवाद आठवला. ते उठले आणि बाहेर सजवलेल्या पाळण्यात पहुडलेल्या बाळाच्या कानात ‘वसंत’ असं नाव उच्चारलं. जमलेले सगळे चकित झाले. स्वतःचंच नाव आपल्या मुलाला ठेवणाऱ्या जावयाला विरोध कोण करणार? तरी काहींनी पाळण्यातलं नाव वसंत असू द्या; पण वापरात असलेलं नाव वेगळं ठेवू या असं सुचवलं; पण बाळाचे बाबा ठाम होते. मग काय बाळाचं नाव वसंत वसंत लिमये असंच रूढ झालं. तसं पाहता घरातले, नातेवाईक आणि मित्र-मंडळी बाळाला बाळ्या या टोपण नावानं हाक मारायला लागली ती गोष्ट वेगळी; पण कागदोपत्री वसंत वसंत लिमये या नावानं धमालच उडवली. अनेक मित्र ‘व्ही स्क्वेअर’ अशीही हाक मारायला लागले.
बाळ्याची आई जेव्हा शाळेत नाव नोंदवायला गेली किंवा कुठला फॉर्म भरून त्यावर कुटुंबीयांची माहिती भरायची असली, तर वसंत वसंत लिमये हे नाव ऐकून समोरचा माणूस आ वासून बघायचा. मग वैतागून ‘लक्ष नीट देऊन फॉर्म भरा’ असं सांगायचा; पण हेच नाव आहे असं सांगितल्यावर गप्प बसायचा.
शाळेत असताना बाळ्या खोडकर आणि उचापत्या होता. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींतच त्याचा जास्त वेळ जायचा. नववीपर्यंत उनाडक्या तर केल्याच; पण अकरावीपर्यंत वडिलांच्या हातचा भरपूर मारही खाल्ला. नववीत असताना बाळ्याचा वर्गात ३१वा क्रमांक आला. त्याचं प्रगतिपुस्तक पाहून वडील म्हणाले, ‘बाळ्या, आयुष्यात काही करायचं असलं, तर या ३१मधला तीन काढून टाकता आला तर बघ.’ त्यांनी जवळ घेऊन समजावून सांगितल्याचा परिणाम म्हणजे बाळ्यानं गंभीरपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि तो दहावीत वर्गात चक्क पहिला आला. अर्थात तरीही भटकणं, सिनेमा बघणं हे सगळं सुरू होतंच.

‘आयआयटी’त प्रवेश मिळण्यासाठी अभ्यास करायला हवा होता; पण तीन पेपर दिल्यानंतर बाळ्यानं चौथा पेपर दिलाच नाही, तो त्या वेळी ‘अनुभव’ हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बसला. पुन्हा घरातून बोलणी बसल्यावर त्यानं परत परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतातून ११७वा आला. ‘आयआयटी’त प्रवेश मिळाला आणि एका नव्या जगाचं दालन बाळ्यासाठी उघडलं गेलं. इथं अनेक गोष्टी करण्याला मोकळीक होती, स्वातंत्र्य होतं. भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत, साहित्य, नाटक, चित्रपट अशा अनेक गोष्टी आवडणाऱ्यांचे वेगवेगळे गट होते. इथं अनेक विषयांवर चर्चा होत. याच वेळी बाळ्या नाटकाकडेही ओढला गेला. ‘आयआयटी’त बसवलेली नाटकं बाहेरही सादर होत. विजय तेंडुलकरलिखित ‘तुघलक’ या नाटकात बाळ्यानं अजित ही भूमिका केली आणि विशेष म्हणजे तुघलक या मुख्य भूमिकेपेक्षाही अजित या पात्राच्या कामाचं सगळीकडे खूपच कौतुक झालं. या नाटकाचं दिग्दर्शन अच्युत वझे यांनी केलं होतं. या निमित्तानं बाळ्या नाटकासाठी लागणारे अनेक बारकावे शिकला.

‘आयआयटी’त येण्यापूर्वी बाळ्याला हायकिंगची (गिर्यारोहण) आवड निर्माण झाली होती. या भटकंतीकडेही तो अचानक ओढला गेला होता. सुरुवातीला शारीरिक श्रमांची आठवण येऊन पुन्हा कधी या फंदात पडायचं नाही, असंही त्यानं ठरवलं होतं; पण पुढल्या वेळी एका वेगळ्या ओढीनं तो निघाला आणि मग जातच राहिला. रात्रीचं टिपूर चांदणं, ती चढण चढून जाणं या साहसाची एक प्रकारची धुंदी मनावर पडली. इथूनच हिमालयाचं सुप्त आकर्षणही त्याच्या मनात निर्माण झालं. ‘आयआयटी’त असताना अभ्यास जमेल तसा, पण गिर्यारोहण मात्र मनोभावे असं सगळं सुरू होतं. ‘आयआयटी’चे मंतरलेले दिवस संपले आणि बाळ्याला पहिली नोकरी दिल्लीत करण्याची संधी मिळाली; मात्र या नोकऱ्यांमध्ये बाळ्याचं मन फारसं लागत नव्हतं. नोकरी सुरू असताना गिर्यारोहण करण्यासाठी सुट्टी काढायची, सुट्टी न मिळाल्यास ती नोकरी सोडायची. गिर्यारोहणावरून परतल्यावर दुसरी नोकरी शोधायची असं सत्र सुरू झालं.
गिर्यारोहणासाठी प्री-मान्सून म्हणजेच मे-जूनचा काळ आणि पोस्ट मान्सून म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांचा काळ योग्य असतो. या काळात शाळेतल्या मुलांमध्ये हा उपक्रम राबवू या, असं बाळ्याच्या मनात आलं. आठ ते १४ वयोगटासाठी हा उपक्रम राबवायचं ठरवलं आणि विशेष म्हणजे अनेक पालकांनी बाळ्याच्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. या गोष्टीमुळे बाळ्याचाही हुरूप वाढला; मात्र आपल्या आवडीच्या क्षेत्रातलं रीतसर शिक्षण आपण घेतलं पाहिजे, असं त्याचं मन या काळात म्हणायला लागलं. बाळ्यानं थोडी चौकशी करायला सुरुवात करताच स्कॉटलंडमध्ये असा निवासी कोर्स असल्याचं समजलं.

हा कोर्स करायचा म्हटलं तर कमीत कमी लाखभर रुपये लागणार होते. रक्कम मोठी होती. वडिलांकडून इतकी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता नव्हतीच. ‘आयआयटी’मधून बाहेर पडतानाच बाळ्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं, ‘आम्ही तुला पदवीपर्यंत शिकवून आमचं कर्तव्य पार पाडलं. आता आम्ही तुझ्याकडे म्हातारपणाची काठी म्हणून बघणार नाही. तसंच तूही आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून बघायचं नाही.’ थोडक्यात, त्याला त्यांच्याकडून मदत मिळणं अशक्य होतं. पैशांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्यात सात-आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता काय करायचं या प्रश्नाचं उत्तर अचानक एका आर्किटेक्ट असलेल्या व्यक्तीनं दिलं. ‘तू एकाकडे कर्जाऊ पैसे मागण्याऐवजी अनेकांकडे माग. मी तुला एक हजार रुपये देतो,’ असं त्यानं म्हटलं आणि बघता बघता या प्रयत्नांमधून बाळ्याकडे अवघ्या २२ दिवसांत पुरेशी रक्कम जमली. पैसे तर जमले, पण स्कॉटलंडला जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा यांची तयारी झालेली नव्हती. त्या वेळी पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणं तितकं सोपं काम नव्हतं; पण अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पासपोर्ट आणि व्हिसा बाळ्याच्या हातात पडला.


स्कॉटलंडमध्ये राहून एक वर्षाचा कोर्स बाळ्यानं पूर्ण केला. तिथे अनेक शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जायचे. गिर्यारोहण का करावं, ते कसं असतं याविषयीची माहिती या रोड शोमधून लोकांना स्लाइड शोद्वारे दिली जात असे. ठिकठिकाणी होत असलेल्या या शोमध्ये लोक चक्क तिकीट काढून येत. बाळ्या या शोच्या निमित्तानं अनेक गोष्टी शिकला. तिथं असतानाच तिथल्या हाय प्लेसेस या कंपनीमार्फत कामही करायला लागला. तिथल्या सहभागी झालेल्या लोकांना भारतात हिमालयाची सैर करवून आणण्याची जबाबदारी तो पार पाडू लागला. काहीच दिवसांत बाळ्या भारतात परतला आणि पुण्याजवळ मुळशीत त्यानं थोडी जमीन घेतली. तिथूनच भारतात बाळ्याच्या स्वतंत्र ‘हाय प्लेसेस’ कंपनीचा जन्म झाला. त्यातूनच गरुडमाचीमध्ये काम सुरू झालं. आज हाय प्लेसेस या कंपनीला २९ वर्षं पूर्ण झाली आहेत. याच दरम्यान मृणालसारखी तरुणी बाळ्याच्या आयुष्यात जोडीदार म्हणून आली आणि तिच्या भरभक्कम साथीमुळे त्याच्या आयुष्याला वेगळ्या प्रकारे स्थैर्यही लाभलं.
‘हाय प्लेसेस’ काय आहे? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तरुण वर्गाला त्यांची इच्छा असो वा नसो, मोठ्या प्रमाणात युद्धात सहभागी केलं जात होतं. योग्य अशा प्रशिक्षणाअभावी मोठ्या संख्येनं तरुण युद्धात आपला जीव गमावून बसले होते. त्या वेळी जर्मनीच्या ज्यू कुटुंबात जन्मलेल्या कर्ट हान या शिक्षणतज्ज्ञानं या तरुणांना युद्धासाठी योग्य रीतीनं प्रशिक्षित करणं किती आवश्यक आहे हे सांगितलं. त्याच्या मते शिक्षणात असो वा प्रशिक्षणात आउटडोअर लर्निंग आणि अॅडव्हेंचर (साहस) या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. ‘हाय प्लेसेस’ची निर्मिती करताना कर्ट हानच्या कार्याची प्रेरणा बाळ्याच्या मनात होती. ५५ एकर डोंगराळ भागातल्या परिसरात खूप काही करता येणार होतं. नैसर्गिकपणे वाढलेल्या जंगलाला हानी न पोहोचवता ‘हाय प्लेसेस’ उभं करायचं होतं. मृणालच्या कल्पनेतून प्रशिक्षणार्थींच्या निवासासाठी रिसॉर्टस् आणि तंबू उभे राहिले. त्यानंतर कँटीनपासून अनेक सुविधा उभारण्यात आल्या. हिरव्यागार जंगलझाडीत तांबड्या जांभ्याच्या दगडात सजलेलं हे बांधकाम बघायला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण येतात.


‘हाय प्लेसेस’मधल्या प्रशिक्षणात काय मिळतं? शहरी दुष्टचक्रात अडकलेल्या आणि यंत्रवत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला कितीतरी ताणतणावांतून प्रवास करावा लागतो. अशा वेळी गरुडमाचीतल्या निसर्गरम्य स्थळी एका वेगळ्या जगात आल्याचा आनंद तर मिळतोच; पण हा आनंद तितक्यापुरताच सीमित राहत नाही. इथं सरळ उंच रेषेतल्या काळ्याकुट्ट पाषाणासारख्या डोंगरांवर चढाई करणं, केवळ दोरखंडाच्या साह्यानं डोंगरकड्यावरून उतरणं, खवळलेल्या पाण्यातून हवा भरलेल्या टायरला बांधून दुसरा किनारा गाठणं, अडथळ्यांचे मार्ग पार करत डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर तंबू उभारून तिथेच अन्न शिजवणं आणि त्या थंडी-वाऱ्यातल्या रात्री एकमेकांबरोबर गप्पा मारत खाणं या सगळ्यांमधून संघटन किंवा टीमवर्कची भावना मनात निर्माण होते. भीती गळून अंगी धाडस निर्माण होतं. निर्णयक्षमता निर्माण होते. संकटाशी सामना तयारी करण्याची क्षमता येते. नियोजन कसं करावं, समस्या कशा हाताळाव्यात, जोखीम कशी उचलावी, नेतृत्व कसं असावं, मनुष्यबळ कसं वापरावं, व्यवसायाचा विस्तार कसा करावा, संवादकौशल्य कसं आत्मसात करावं, आपल्यातली कौशल्यं कशी विकसित करावी, व्यवस्थापन कसं करावं याचे धडे घेऊनच आलेला गट गरुडमाचीवरून नवी प्रेरणा घेऊन परततो. खरं तर या प्रशिक्षणामुळे जादूची कांडी फिरावी आणि अचानक त्या त्या व्यक्तीमध्ये बदल घडावेत असं काही होत नाही; पण ती व्यक्ती या प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर अंतर्मुख होते आणि तिला आपल्यातल्या गुणदोषांची, बळाची जाणीवही होते. आणि हळूहळू या गोष्टी पुढल्या प्रवासात ‘रिफ्लेक्ट’ व्हायला लागतात. गरुडमाचीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातले डायरेक्टर्स, मॅनेजर्स, शिक्षक, अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि अनेक साहसी गट अशा सगळ्यांनाच प्रशिक्षण दिलं जातं.

हाय प्लेसेस ही भारतातली अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारी पहिली कंपनी असून, ‘हाय प्लेसेस’पासून प्रेरणा आणि प्रशिक्षण घेऊन त्यानंतर भारतात सुमारे ४० प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या. ‘हाय प्लेसेस’नं फक्त गरुडमाची इथंच नव्हे, तर लेह, लडाखपासून अनेक ठिकाणी प्रशिक्षणांचं आयोजन केलं. हे प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिक स्तरावर किती आवश्यक आहे याचं प्रत्यंतर गरुडमाचीला गेल्यावर लक्षात येतं.

उंचच उंच हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निळंशार पाणी, आजूबाजूला दाट हिरवीगार झाडी आणि आल्हाददायक वातावरण, वर बघावं तर लगबगीनं चाललेले ढग डोंगराला वेढून काही तरी सांगतानाचं दृश्य गरुडमाचीला बघायला मिळतं. प्रशिक्षणाशिवाय गरुडमाची इथं तेलाचा बुधला, जुरासिक पार्क चित्रपटातल्यासारख्या दऱ्या-खोरी, देवराईचं राखलेलं जंगल, कालिकादेवीचं मंदिर, कॅमलबॅक डोंगराची कहाणी, डोंगरावरून खाली कोसळणारे नव्हे, तर चक्क उंच आकाशात उडणारे जादुई धबधबे, उघडी मुळं असलेली डोंगरदऱ्यांना बिलगलेली झाडं, कुंडलिका नदीचं उगमस्थान, तिथं असलेल्या तीन कुंडांचं रहस्य असं खूप काही बघून मन स्तिमित होतं.

आज गरुडमाची इथं म्हणजेच ‘हाय प्लेसेस’मध्ये १५० लोक काम करतात. यात वसंत वसंत लिमये सीईओ असून, मृणाल परांजपे, प्रेम मगदूम आणि मिलिंद कीर्तने हे उच्च पदांवर आहेत.


एका क्षणी स्वतःचं घर हवं या भावनेतून घराची तयारी सुरू झाली. आणि आताशा नामशेष होत असलेली वाडा संस्कृती मृणालच्या सौंदर्यदृष्टीतून पुन्हा उभी राहिली. वसंत वसंत लिमये आणि मृणाल परांजपे यांच्या घरात प्रवेश करताना आपण जुन्या ऐतिहासिक वाड्यात प्रवेश करतानाचा आनंद मिळतो. हे घर बांधताना दोघांनीही तीन वर्षं जुन्या वाड्यांचे भंगारातले अवशेष शोधून शोधून जमा केले. कधी खांब, तर कधी दार अशा गोष्टी मिळवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्वर्गीय आनंद पसरत असे. घर हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी विसाव्याचं ठिकाण असतं, या भावनेमुळे या वाड्यात कुठल्या चित्रपटाचं चित्रीकरण करायला किंवा त्याचा इतर काही उपयोग करायला वसंत वसंत लिमये किंवा मृणाल परांजपे परवानगी देत नाहीत; मात्र मित्र-मंडळींसाठी हा वाडा कधीही खुला असतो ही गोष्ट वेगळी!

वसंत वसंत लिमये यांच्या वडिलांना फोटोग्राफीची खूप आवड होती. लहानपणी त्यांच्याबरोबर डार्करूमध्ये काम करण्यापासूनच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. यातूनच वसंत वसंत लिमये यांचीही ही आवड विकसित होत गेली. त्यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन मुंबईत नरिमन पॉइंटजवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरलं होतं. त्याचं उद्घाटन गौतम राजाध्यक्षांच्या हस्ते झालं. पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन दीपा लागू यांच्या हस्ते, तर ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये भरलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकर्मी मोहन वाघ यांच्या हस्ते झालं. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

इतक्यावरच वसंत वसंत लिमये थांबत नाहीत, तर वडिलांमुळे लागलेली वाचनाची सवय त्यांनी आजही जोपासलेली बघायला मिळते. लहानपणी ‘माणूस’ या नियतकालिकात नाटककार अनिल बर्वेंची ‘थँक्यू मि. ग्लाड’ ही कथा क्रमशः प्रसिद्ध होत असे. वसंत वसंत लिमयेंचे वडील या कथेचं वाचन करत. त्यांच्या वाचनातून सगळी दृश्यं जिवंत होऊन समोर उभी राहत. एकदा वाचन संपल्यावर लक्षात आलं, की कथा संपलेली नाही, क्रमशः आहे. आता पुढला भाग ऐकण्यासाठी मुलं उतावीळ झाली होती; मात्र रात्रीचे अकरा वाजून गेले होते. असं असतानाही वसंत वसंत लिमये यांच्या वडिलांनी शेजारी जाऊन हाका मारून आपल्या मित्राला उठवलं आणि ‘माणूस’चा त्यापुढला अंक तेवढ्या रात्री शोधून मिळवला आणि पुढलं वाचन केलं. पुढे ‘आयआयटी’त गेल्यावर वसंत वसंत लिमये यांना इंग्रजी वाचनाची गोडी लागली. ‘थ्रिलर’ प्रकार आवडायला लागला.

एका कुठल्या तरी प्रसंगी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वसंत वसंत लिमये यांना, ‘बाळ्या तू लिहीत का नाहीस’ असं म्हटलं आणि त्यातूनच त्याच्या लिखाणाची सुरुवात झाली. भटकंतीवर आधारित ललित लेखांची मालिका तयार झाली. पुढे ग्रंथाली प्रकाशनानं ती ‘धुंद-स्वच्छंद’ या पुस्तकाच्या रूपानं ती प्रसिद्ध केली. या पुस्तकाचं प्रकाशन विजय तेंडुलकरांच्या हस्ते झालं. पहिल्याच पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यानंतर वसंत वसंत लिमये यांची
‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. लॉक ग्रिफिन ही कादंबरी मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेल्या एका दुर्घटनेपासून सुरू होते आणि ती वाचकाला अमेरिका, कॅनडा, स्कॉटलंडच नव्हे, तर जगभराची सैर करून आणते. यात तीन पिढ्यांचा संघर्ष, आजूबाजूची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा परामर्श वसंत वसंत लिमये यांच्यातल्या लेखकानं घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे घटनाक्रम लिहिताना ते ते देश, तिथली शहरं, त्यात घडणाऱ्या घटना, तिथले नियम या सगळ्यांचा लेखकानं बारकाईनं अभ्यास केला. इतकंच नव्हे, तर कादंबरी जिवंत वाटायला हवी यासाठी, वास्तव आणि कल्पना यातली धूसरता मिटवण्यासाठी लेखकानं अनेक दिवस परदेशात मुक्कामही ठोकला. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, स्पर्धेच्या तांडवनृत्यात, इच्छा असो वा नसो, माणूस फरफटत चालला आहे, अमेरिकेनं वरून घेतलेला लोकशाहीचा बुरखा आणि आतलं काळं चित्र या गोष्टी ‘लॉक ग्रिफिन’ या कादंबरीत वाचकासमोर उभं केलंय. तेलासाठी आणि सगळं जग पादाक्रांत करण्याच्या आसुरी इच्छेनं माणुसकीला, व्यक्तीला, तिच्या स्वप्नांना इथे थोडीही जागा नाही, हे विदारक वास्तव लेखकानं प्रखर भूमिका घेऊन यात मांडलं आहे.

‘कॅम्प फायर’ या पुस्तकानंही त्यानंतर धूम मचवली. ‘
कॅम्प फायर’मध्ये गिर्यारोहणाच्या वेडाचा प्रवास अधोरेखित केलेला बघायला मिळतो. एका उत्सुकतेपोटी गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायला गेलेला लेखक त्या अनुभवानं, त्या काटेरी क्षणांनी ओरबाडला जातो. ठणकत्या शरीराला आणि मनाला समजावत आता पुन्हा त्या वाटेकडे वळायचं नाही असं ठरवतो; पण तोच तरुण पुढे त्या वाटेनं, त्या कड्यांनी, त्या दऱ्याखोऱ्यांनी त्याला साद घालावी आणि त्यानं धावत सुटावं असा त्या वाटेवरून चालत राहतो. या तरुणाचं साहस बघतानाच पानोपानी त्याच्यातला एक संवेदनशील कवीही वाचकाला भेटतो. ‘कॅम्प फायर’ वाचताना गिर्यारोहण म्हणजे काय, त्यासाठीची तांत्रिक माहिती अतिशय हलक्याफुलक्या शैलीत लेखक वाचकाला करून देतो. इतिहासाचं स्तोम माजवू नये, हे खरं असलं तरी याच इतिहासात आपलं स्वत्व लपलं आहे, याचं भान लेखक करून देतो. औद्योगिकीकरणामुळे, सुबत्तेच्या हव्यासामुळे माणसानं निसर्गाची जी विल्हेवाट लावली आहे, त्यावर लेखक वाचकांना प्रश्न विचारतो. तो म्हणतो, ‘धुंद होणं म्हणजे बधिरता नाही, मस्ती म्हणजे बेतालपणा नाही.’ खरं तर धुंदीचा खरा आस्वाद घेणंच आपण विसरलो आहोत, असं त्याला वाटतं.

वसंत वसंत लिमये यांच्या ‘
विश्वस्त’ या कादंबरीनं इतिहासाचा वेगळाच पट वाचकांसमोर उभा केला. ‘विश्वस्त’ ही कादंबरी वर्तमानातून वाचकाला इतिहासात खेचत नेते. समीक्षकांनी या कादंबरीला ‘फिलॉसॉफिकल थ्रिलर’ असं म्हटलंय. इतिहास आणि संस्कृती यांच्या निर्मितीमध्ये विश्वस्त आणि वारसदार या दोन संकल्पनांच्या शोधाचा प्रयत्न ‘विश्वस्त’ या कादंबरीमध्ये करण्यात आला आहे. या कादंबरीसाठी वसंत वसंत लिमये यांनी इतिहास, भूगोल आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयांचा खोलात जाऊन अभ्यास केला. या कादंबरीत वास्तव आणि इतिहास यांची बेमालूम गुंफण वसंत वसंत लिमये यांनी केली आहे.

गिर्यारोहणामधले, साहित्यातले अनेक मानाचे पुरस्कार मिळवलेला ‘आयआयटी’तला एक बुद्धिमान तरुण किती क्षेत्रे पादाक्रांत करतो, याची ही एक छोटीशी झलक आपण बघितली असली, तरी वसंत वसंत लिमये यांना अजूनही अनेक स्वप्नं पूर्ण होण्यासाठी खुणावताहेत. त्यांच्या मनात नाटकाचा आणि सिनेमाचा किडा अधूनमधून वळवळत असतो. धर्म या विषयावर त्यांचं मन अस्वस्थ होऊन लिहिण्यासाठी खुणावत असतं. त्या त्या क्षेत्रातली मुसाफिरी करून ते त्यांची अभ्यासू वृत्ती, परिश्रम यांमुळे यशस्वी होतील ही खात्री आहेच.

शाळेत असताना ३१ वा क्रमांक मिळवणाऱ्या वसंत वसंत लिमयेंना वडिलांनी ‘३१मधला तीन आकडा काढून टाकता येतो का बघ,’ असं म्हटलं होतं. ते त्यांनी खरं करून दाखवलं. आज महाराष्ट्रच नव्हे, तर अख्ख्या भारताला त्यांचा अभिमान वाटावा, असं प्रचंड मोठं काम वसंत वसंत लिमये यांनी उभं केलंय. त्यांच्या उत्तुंग कार्याला मनापासून सलाम!
संपर्क : वसंत वसंत लिमये
ई-मेल : vasantlimaye@gmail.com
फोन : (०२०) २५३९ ४५४०