Next
‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 10:47 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५’ ‘स्टार प्रवाह’ घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका सहा ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.

पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. या कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मिळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या आजीची धडपड असलेले कथानक हे या मालिकेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

‘अग्निहोत्र’नंतर बऱ्याच वर्षांनी सुहास जोशी ‘स्टार प्रवाह’ची मालिका करत आहेत. या मालिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या ‘ही एक कौटुंबिक मालिका आहे. मी साकारत असलेली आजी तुम्हाला तुमच्या आजीची नक्कीच आठवण करून देईल याचा मला विश्वास आहे.’

या मालिकेविषयी ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या, ‘स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपली सतत धडपड असते. शर्यतीत अव्वल राहण्याच्या प्रयत्नात आपण आपली नाती मात्र विसरत चाललोय. याच विसर पडलेल्या नात्यांची आठवण करून देणारी ही मालिका असेल.’

आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. बांदेकर यांचा सुपुत्र सोहम या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. ‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणसाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search