Next
महाभारताचा उपसंहार (पूर्वार्ध)
महाभारताचे मर्म उलगडणारा एक अद्वितीय ग्रंथ
BOI
Sunday, February 10, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:पुण्यातील ‘चिपळूणकर आणि मंडळी’ या प्रकाशन संस्थेने ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ नऊ भागांत प्रसिद्ध केले. त्याचा सर्वांगीण परामर्श घेणारा विवेचक उपसंहार सिद्ध करण्याचे संशोधनपर काम रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य यांनी स्वीकारले आणि चार वर्षांत समर्थपणे पार पाडले. ‘उपसंहार’ या हजार पानी ग्रंथाची पहिली आवृत्ती सन १९१८मध्ये प्रसिद्ध झाली. त्या ग्रंथाबद्दल आणि ग्रंथकर्त्याबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर.. त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
..................
‘जय नावाचा इतिहास अर्थात महाभारत’ हे वेदव्यास रचित महाकाव्य हजारो संशोधकांच्या अभ्यासाचा विषय ठरले आहे. एक लाख श्लोक एवढा त्याचा विस्तार आहे. त्याच्या योग्यतेचा अन्य ग्रंथ जगात आढळत नाही. हे नुसते काव्य नसून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा भारतवर्षाचा इतिहास आहे. मानवी संस्कृतीशी संलग्न सर्व विषय त्यात समाविष्ट आहेत; आणि यात जे नाही ते कुठेच असणार नाही, अशी महाभारताची ख्याती आहे. शंभर वर्षांपूर्वी  (सन १९०४ ते १९१२ दरम्यान) पुण्यातील ‘चिपळूणकर आणि मंडळी’ या प्रकाशन संस्थेने ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ नऊ भागांत प्रसिद्ध केले. त्यावर लोकमान्य टिळक असे म्हणाले होते, की ‘या सगळ्याचा सर्वांगीण परामर्श घेणारा विवेचक उपसंहार कुठे आहे?’ ते संशोधनपर प्रचंड काम पेलू शकणारी योग्य विद्वान व्यक्ती कोण, याचा शोध घेताना एकच नाव पुढे आले. रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य. त्यांनीही ते काम स्वीकारले आणि समर्थपणे पार पाडले. अशा रीतीने महाभारताच्या भाषांतराचा ‘उपसंहार’ हा १०वा ग्रंथ चार वर्षांत सिद्ध झाला. हजार पानी या ग्रंथाची पहिली आवृत्ती सन १९१८मध्ये प्रसिद्ध झाली. वैद्यांच्या लेखनाची महत्ता लक्षात घेऊन लोकमान्यांनी त्यांना १९०५ सालीच ‘भारताचार्य’ ही पदवी बहाल केली होती. या ‘उपसंहारा’च्या केवळ वाचनाने आपल्या ज्ञानात प्रचंड भर पडेल. माहितीचा अफाट खजिना त्यात भरलेला आहे.

ग्रंथाचा परिचय करून घेण्यापूर्वी भारताचार्यांचे चरित्र थोडक्यात पाहू. सन १८९१मध्ये कल्याणला त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण ‘एलफिन्स्टन’मध्ये झाले. एमए, एलएलबी या पदव्या घेताना ‘जगन्नाथ शंकरशेट’पासून अनेक पारितोषिके त्यांना मिळाली. श्रेष्ठ दर्जाची वाङ्मयीन निर्मिती त्यांच्या हातून झाली. ‘श्रीकृष्ण चरित्र’, ‘एपिक इंडिया’, ‘भारतीय वीरगाथा’, ‘दुर्दैवी रंगू’ यांसह २९ ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘गीतारहस्या’च्या दर्जाचा ‘महाभारताचा उपसंहार’ त्यांच्या हातून परिपूर्ण झाला आणि विद्वन्मान्य ठरला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू आणि नंतर कुलपती झाले. त्यांनी काही काळ वकिली केली. उज्जैनला ‘सेशन्स जज’ म्हणून काम केले. ग्रंथलेखन आणि व्याख्याने यांद्वारे ज्ञानसाधना करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले. गणित व ज्योतिषाचे शिक्षणही त्यांनी घेतले. ‘महाभारत : ए क्रिटिसिझम’ आणि ‘रिडल ऑफ रामायण’ हे त्यांचे इंग्रजी ग्रंथही विलक्षण लोकप्रिय ठरले. ‘उपसंहार’ प्रथम प्रसिद्ध लेखक ह. ना. आपटे लिहिणार होते; परंतु ‘महाभारता’वरचा वैद्य यांचा व्यासंग लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी त्यांचेच नाव सुचवले.

सन १९०८मध्ये पुण्यात भरलेल्या ग्रंथकार (साहित्य) संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी लिहिलेला ‘संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास’ मराठी-इंग्रजीत प्रसिद्ध झाला. सन १९०५ ते १९२० या काळात त्यांनी टिळकांबरोबर अखंड काम केले. परिषदा, व्याख्याने, समित्या, गणेशोत्सव यांच्यातून स्वदेश, स्वधर्म आणि प्राचीन साहित्य या विषयांवर शेकडो व्याख्याने दिली. अनेक संशोधन संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांना प्रवासाची आवड होती. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर हिंडून त्यांनी त्याच्या विशेष नोंदी करून ठेवल्या. ग्वाल्हेरला असताना ते सतार शिकले. कल्याणला ‘फारसी’ भाषा शिकले. घोड्यावर बसणे आणि तालमीचा त्यांना शौक होता. म. म. दत्तोपंत पोतदार यांच्या शब्दात ते ‘साहित्यातील भीष्माचार्य’ आणि संशोधनातून ‘भारताचार्य’ झाले. २० एप्रिल १९३८ रोजी त्यांची जीवनयात्रा संपली.

‘उपसंहार’ ग्रंथाच्या प्रारंभी बाळकृष्ण पांडुरंग ठकार यांनी विस्तृत ‘प्रकाशकीय प्रस्तावना’ लिहिलेली आहे. तीसुद्धा वाचनीय आहे. सन १८०४च्या दसऱ्याला महाभारताच्या भाषांतराचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्याचा उपोद्घात ह. ना. आपटे यांनी लिहिला होता. पुस्तकरूपाने हजारो पाने प्रसिद्ध करणे - तेही संशोधन स्वरूपाचे – त्या काळी किती कठीण काम होते, हे लक्षात येते. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. ‘चिपळूणकर आणि मंडळी’, ‘चित्रशाळा प्रेस’, ‘निर्णयसागर’ यांसारख्या प्रकाशनांनी प्रतिकूल परिस्थितीत अमूल्य ‘अक्षर’ वाङ्मय प्रसिद्ध करून आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. ‘उपसंहारा’च्या शेवटी परिश्रमपूर्वक तयार केलेली विषयसूची आणि भरतवर्ष व जंबुद्वीपाचा नकाशा दिलेला आहे.

या ग्रंथाचे पुनर्मुद्रण पुण्यातील प्रफुल्लता प्रकाशनाने पहिल्या आवृत्तीनंतर सुमारे १०० वर्षांनी, ११ ऑक्टोबर २०१६ रोजी केले. त्याची अभ्यासपूर्ण प्रस्तावना डॉ. सुचेता परांजपे यांनी लिहिली आहे. ‘उपसंहार’ या शब्दाचा अर्थ त्यांनी सुरुवातीला सांगितला आहे. ‘उप’ म्हणजे जवळ किंवा एकत्र आणि ‘संहार’ म्हणजे विनाश नसून ‘गुंफणे’, ‘संकलन करणे’ असा त्याचा अर्थ आहे. ग्रंथरचनेमागची प्रेरणा, उद्देश, त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भातील नेमका अर्थ आणि त्याचे विश्लेषण हे सर्व चिकित्सक संशोधनाच्या द्वारे लेखकाला संकलित करावयाचे असते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी, एक लाख श्लोक वाचून, संदर्भासाठी कोणतेही ग्रंथ किंवा सूची उपलब्ध नसताना ‘उपसंहार’ लिहिणे हे किती जिकिरीचे, अवघड काम होते हे लक्षात येईल. वैद्यांनी ते आव्हान लीलया पेलले. त्या विषयावरचा त्यांचा व्यासंग आयुष्यभर चालू होता. त्यामुळेच केवळ चार वर्षांत हे लेखन शक्य झाले. ही एकच व्यक्ती भाषातज्ज्ञ, धर्मज्ञ, तत्त्वज्ञ, आणि शास्त्रज्ञ होती. अनेक विषयांच्या ज्ञानामुळे त्यांना ठाम निष्कर्ष काढता आले. धर्म आणि तत्त्वज्ञान हा सगळ्या विवेचनाचा गाभा आहे. धर्म हा आचारात्मक असतो आणि तत्त्वज्ञान विचारात्मक. अठरा या आकड्याचे महत्त्व पाहा. महाभारताची पर्वे १८, गीतेचे अध्याय १८, युद्धसेना १८ अक्षौहिणी, युद्ध १८ दिवस चालले - तशीच ‘उपसंहारा’ची प्रकरणेही अठराच आहेत. ह. ना. आपटे यांनी १९०४ साली उपोद्घातात म्हटल्याप्रमाणे ‘उपसंहार’ हा महाभारतरूपी प्रचंड राष्ट्रीय ग्रंथमंदिराचा कळस ठरलेला आहे.

ग्रंथाच्या प्रारंभी सहा पानी ‘प्रस्ताव’ आहे. त्यात ग्रंथप्रशंसा, प्राच्य आणि पाश्चात्य विद्वानांचा अभ्यास व मते, वैदिक आणि ग्रीक - बौद्ध वाङ्मयाशी संबंध, महाभारत आणि भारतीय युद्धाचा काळ, महाभारताच्या श्लोकांचे कोष्टक आणि मुंबई, बंगाल, मद्रास पाठ यांची माहिती आहे. देशभर उपलब्ध असलेल्या महाभारताच्या प्रतींमधील एकूण श्लोकसंख्या निरनिराळी आहे. साधारण ९६ हजार ते एक लाख १० हजार ५०० म्हणजे सरासरी एक लाख श्लोक. ‘हरिवंश’ ही १२ हजार श्लोकांची पुरवणी महाभारताला जोडलेली आहे. त्यानेच ग्रंथ परिपूर्ण होतो.

यानंतर प्रत्यक्ष ‘उपसंहारा’ची सुरुवात होते. एकूण १८ प्रकरणे आहेत. आपण एकेकाचा थोडक्यात परामर्श घेऊ.

प्रकरण पहिले : महाभारताचे कर्ते (पृष्ठसंख्या ५७)
कृष्णद्वैपायन व्यासकृत प्रचलित ‘महाभारत’ अनुष्टुप छंदात एक लाख श्लोकांचे आहे. वैशंपायन आणि सौती यांनी व्यासांच्या मूळ ‘जय नायक इतिहासा’त भर घातली. धर्माचे (शैव आणि वैष्णव) एकीकरण करणे, हा सौतीचा उद्देश होता. सांख्य, योग इत्यादी तत्त्वज्ञानांमधील विरोध त्याने नाहीसा केला. अनेक राजांच्या आणि ऋषींच्या कथा संकलित करून ग्रंथात टाकल्या. नल-दमयंती आख्यान त्यातच आहे. त्याशिवाय ज्ञानसंग्रह हा विस्तारामागचा हेतू आहे. धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भूगोल, ज्योतिष इत्यादी विषयांची माहिती त्यात एकत्रित केलेली आहे. भारतवर्षातील देश (राज्ये) आणि नद्या यांची माहिती भीष्मपर्वात आहे. धर्म व नीतीचा उपदेश वारंवार आढळतो. पुढे होणाऱ्या गोष्टींची भविष्यवाणी व्यक्त केली आहे. ग्रंथातील वर्णनांची शैली उच्च दर्जाची आहे. सर्व दृष्टीने महाभारत हे जगातील एक श्रेष्ठ महाकाव्य ठरले आहे.

प्रकरण दुसरे : महाभारताचा काल (पृष्ठे ५७)
इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात कालनिर्णय हा महत्त्वाचा प्रश्न असतो. जसजसे नवे पुरावे पुढे येतात, तसे जुने सिद्धांत मागे पडतात. मूळचे भारत कोणत्या काळात घडले आणि हल्ली ‘महाभारत’ ग्रंथाचे जे स्वरूप आहे, ते कधी प्राप्त झाले, या दोन गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. सिंधू संस्कृतीचा काळ ३०-४० वर्षांपूर्वी इसवी सनपूर्व दोन ते अडीच हजार वर्षे, असा मानला जायचा. महाभारत युद्धाचा काळ इसवी सनपूर्व १५०० निश्चित केला होता. आता सिंधू संस्कृती आणखी दोन हजार वर्षे मागे जाते. ग्रंथातील उल्लेख आणि ज्योतिषाच्या आधारे कलियुगाची सुरुवात इसवी सनपूर्व ३१०२ ही असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बहुतेक विद्वानांनी ते आता मान्य केले आहे. म्हणजे कौरव-पांडवांचे युद्ध आणि श्रीकृष्णाचा काळ त्याच्या मागे काही दशके जातो. विविध प्रकारचे पुरावे, ग्रांथिक उल्लेख आणि अनुमान यांच्यावरून कालाचा सखोल विचार दुसऱ्या प्रकरणात झालेला आहे. त्यानुसार कालाचा लंबक शतकांच्या फरकाने फिरत राहतो.

इथपर्यंत फक्त दोन प्रकरणांचा विचार झाला आहे. ‘उपसंहारा’चा अल्प परिचय एका लेखात करून देणे अशक्यप्राय आहे. शिवाय हा ग्रंथ म्हणजे भारतीय विद्येचा (Indology) अभ्यासक्रमच आहे. उत्तरार्धात पुढील १६ प्रकरणांचा ऊहापोह करू.

(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(‘उपसंहार’ हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pratibha Ranade About 83 Days ago
मनापासून आभार.
0
0
Madhav Vidwans About 246 Days ago
Nice
0
1

Select Language
Share Link
 
Search