Next
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे निर्विवाद यश
प्रेस रिलीज
Friday, December 15, 2017 | 12:39 PM
15 0 0
Share this article:

रावसाहेब पाटील-दानवेमुंबई : ‘राज्यातील दहा नगरपालिका नगरपंचायतींपैकी सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे तसेच सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो तसेच मतदारांचे आभार मानतो,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी सांगितले.

दानवे म्हणाले, ‘गुरुवारी निकाल जाहीर झालेल्या सात नगरपरिषदा-नगरपंचायतींपैकी फुलंब्री (औरंगाबाद), किनवट (नांदेड), हुपरी (कोल्हापूर), शिंदखेडा (धुळे) व सालेकसा (गोंदिया) या पाच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. या सात नगरपालिका–नगरपंचायतींच्या एकूण १२३ नगरसेवकपदांपैकी भाजपने सर्वाधिक ५० जागा जिंकल्या. तसेच सोमवारी निकाल जाहीर झालेल्या तीन नगरपालिकांपैकी त्रिंबकचे नगराध्यक्षपद भाजपाने जिंकले. त्या तीन नगरपालिकांच्या एकूण ५५ नगरसेवकपदांपैकी भाजपाने सर्वाधिक २५ जागा जिंकल्या. अशा रितीने सोमवार व गुरुवार अशा दोन टप्प्यात निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दहा नगरपालिकांमध्ये भाजपाने सर्वाधिक सहा नगराध्यक्षपदे आणि सर्वाधिक ७५ नगरसेवकपदे जिंकली आहेत.’

ते पुढे म्हणाले की, ‘मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या चारही विभागात भाजपला मतदारांनी आशिर्वाद दिला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट या राज्याच्या एका टोकाकडील नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवकपदाच्या १८ पैकी नऊ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले आहे. या यशाबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेषतः अशोक पाटील यांचे आपण खास अभिनंदन करतो.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार यांच्या कामाला राज्याच्या विविध भागात पसंती असून भाजपची सातत्याने निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी होत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी चालू केली आहे. राज्य सरकारच्या कामाबद्दल दिशाभूल करण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला असला, तरी नगरपालिका निवडणुकीतील निकालांनी मतदारांनीच चोख उत्तर दिले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बाबतीत भाजपाने जिंकलेल्या जागा या अन्य राजकीय पक्षांपेक्षा कितीतरी जास्त आहेत,’ असे ते म्हणाले.

‘नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या या टप्प्यातील नंदूरबार जिल्ह्यातील तीन व पालघर जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निकालातही भाजपने बाजी मारलेली दिसेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search