Next
जाने क्यूँ दिल जानता है..
BOI
Sunday, August 05, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:


‘एक लडका और एक लडकी सिर्फ दोस्त भी हो सकते है, बिलकुल.’ तो म्हणाला. ‘राइट. आमची मैत्री आम्हाला भरपूर कम्फर्ट देते. ते एक असतं ना, की, ‘तू है तो आय विल बी ऑलराइट’, तसं. ‘आम्ही आमच्या मैत्रीत इतके मस्त मश्गुल आहोत, की त्याला वेगळं लेबलिंग लावून घेऊन आयुष्यभराचा करार करावा असं नाही वाटत आम्हाला. आमच्या मैत्रीत आमचं असं डिस्जेंडर होऊन एकमेकांना पाहणं आम्हाला आवडतं. त्याचं अन्य कशात तरी रूपांतर केलंच पाहिजे असं नाही... आजच्या फ्रेंडशिप डेनिमित्त ‘हॅशटॅग (##) कोलाज’मध्ये वाचा मैत्रीच्या अनोख्या नात्याबद्दल...
..............................
ऑगस्टचा महिना होता. कॉलेज सुरू होऊन आठच दिवस झाले होते. अजून तसं सगळं सेट झालेलं नव्हतं. कॉलेजला जाण्या-येण्याचं आणि वर्गातल्या लेक्चर्सचं रूटीन अजून बसायचं होतं.. दुपार टळून गेली होती आणि आकाशात दबा धरून बसलेले ढग एकाएकी कोसळू लागले. कॉलेजच्याच आवारातल्या एका बाकड्यावर ती बसली होती. पाऊस सुरू झाला तसं आता कुठं जाऊन आडोसा घ्यावा हे न समजल्यानं ती पटकन एका झाडाखाली उभी राहिली. समोरून तो येत होता. त्यानं तिला झाडाखाली उभं राहिलेलं पाहिलं आणि त्याचं डोकंच सटकलं. तो भरभर चालत तिच्यापर्यंत गेला. 
‘ओ मॅडम, झाडाखाली काय करताय? दिसत नाहीये का पाऊस येतोय.’ तो कावला.
ती एकदम कावरीबावरी झाली. कॉलेजमधलं तिचं नवखेपण अजून बुजलं नव्हतं. त्यामुळं समोरून येऊन त्यानं असं रागावल्यानं ती रडवेली झाली. ती जागची हललीच नाही, हे पाहून तो पुन्हा चिडला.
‘अगं कळत नाहीये का? कॉलेजात शाळा शिकूनच आलीस ना? पावसात झाडाखाली उभं राहायचं नसतं, एवढंही कळत नाही,’ तो असं म्हणाला आणि एकदम तिची ट्यूब पेटली. तिचा रडवेला नूर ओशाळला. तिनं चीभ चावली आणि पटकन झाडाखालून दूर झाली. त्यानं तिला त्याच्या छत्रीत घेतलं.
‘कुठल्या स्ट्रीममध्ये आहेस?’
‘एफवाय बीएस्सी’
‘ओह ज्युनियर! सायन्स शाखेत आहेस आणि साधं विज्ञान कळत नाही, गाढव कुठची.’ तो अजूनही चिडलेलाच होता. पहिल्याच भेटीत आपल्याला गाढव म्हटल्यानं तिला त्याचा राग आला होता. समोर लायब्ररीची इमारत दिसल्याबरोबर ती पळत त्या इमारतीत शिरली. त्याला थँक्यू वगैरे म्हणण्याचा सोपस्कारही तिला करावासा वाटला नाही. ही दोघांची पहिली भेट...

ती आता एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिचा शेवटचा पेपर होता. परीक्षेमुळे महिनाभर दोघांची भेट झाली नव्हती. त्यामुळे आज तो तिला सरप्राइज द्यायला विद्यापीठातच आला होता. पाच वाजत आले होते. ती पेपर देऊन बॉटनी डिपार्टमेंटच्या बाहेर पडली. समोर त्याला पाहून तिला खूप आनंद झाला.
‘आज इकडं कुठं? काही काम होतं?’
‘गाढव, तुला भेटायला आलोय. पेपर कसा होता?’
‘ए, तुला कितीदा सांगितलं, मला गाढव म्हटलेलं आवडत नाही.’ ती फणकाऱ्याने म्हणाली.
‘सॉऽऽऽरी माझा गाढवपणा. लक्षातच राहत नाही. ’
‘पुन्हा गाढव.. तेरा कुछ नहीं हो सकता.’
‘ते जाऊ दे, पेपर कसा गेला?’ 
‘ठीक ठाक’, ती तोंड पाडून म्हणाली. तितक्यात तिथं जाधव सर आले. केमिस्ट्रीचे विभागप्रमुख. 
‘विद्यापीठ सुटत नाही वाटतं? सध्या काय करतोयस?’, जाधव सरांनी त्याला विचारलं. 
‘शिक्रापूरच्या ज्युनियर कॉलेजमध्ये केमिस्ट्री शिकवतोय.’
‘हं ती तर जमतेच तुला! चांगलं आहे’, तिच्याकडे पाहत सर म्हणाले. सरांशी तिची ओळख करून द्यायची राहिली, असा विचार करतच तो पटकन म्हणाला, ‘सर ही माझी मैत्रीण. बॉटनी डिपार्टमेंटला असते.’ सर हसले. 
‘माहिती असणाऱ्या गोष्टी काय सांगतोस. तुझ्यावर पडणारे फिशपाँड फक्त केमिस्ट्री डिपार्टमेंटचेच असायचे असं वाटतं का तुला?’ ‘म्हणजे...?’ त्याला सरांचं बोलणं रुचलं नव्हतं. ते काय म्हणताहेत हे दोघांच्याही लक्षात येत होतं.
‘पुढची डेव्हलपमेंट झाली की कळव. मी निघतो,’ सर हसून वळले.

ती दोघंही कॅन्टीनमध्ये शिरली. सरांच्या बोलण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. अशा प्रकारच्या कमेंट्सची, टॉन्ट्सची त्यांना सवयच झाली होती. त्यांनी कडक चहा ऑर्डर केला. ‘आज रात्री घरीच थांब ना. मी आईला कळवून ठेवते.’ ती उत्साहाने म्हणाली. ‘आज नको, उद्या सकाळीच प्रिन्सिपॉल सरांनी एक मिटिंग ठेवलीये. उशीर होतो मग. रविवारी येईन.’
‘बरं. मग आपण पिक्चर पाहायला जाऊ. तू बघून सांग कुठला? मी तिकीट बुक करून ठेवते.’
‘सूर्य कुठून उगवला. तू पिक्चर पाहणार आहेस. थिएटरमध्ये जाऊन झोपणारा प्राणी मी कधीच पाहिलेला नाही. तू ना नुसती गा.. काही नाही. कंट्रोल. येस कंट्रोल झालंय.’
‘गप्प बस, मी तेव्हा थकले होते. मी तुझ्याइतकी चाहती नसले तरी पाहते हं मीसुद्धा. तू कुठलं तिकीट काढायचं ते सांग फक्त.’
‘एवढीच जर माझी खातिरदारी होणार आहे, तर एखादा इंग्रजी हॉरर नाही तर अॅक्शन मूव्ही पाहू.’ 
‘इंग्रजी.. हॉरर.. अॅक्शन. ठीक आहे.’ ती लूक देत म्हणाली.. तिला इंग्रजी, हॉरर, अॅक्शन अशा कोणत्याच प्रकारातले चित्रपट आवडायचे नाहीत; पण आता त्याची मर्जी राखायचं ठरवलंच आहे, तर काय करणार.. तिने निमूटपणे तिकीट काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानं मोबाइलवर पाहून मनातल्या मनात एका हिंदी चित्रपटाचं नाव फायनल केलं. 

संध्याकाळचे आठ वाजले होते. ती रिसर्च संस्थेतून बाहेर पडली. ऑगस्टमधला पाऊस सुरू होता. तिने पटकन रिक्षा पकडली आणि ती वाडेश्वर हॉटेलला पोहोचली. कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचं गेट-टुगेदर ठरलं होतं. एकाकडून दुसऱ्याचे असं करत अचानक नव्या-जुन्या, ज्युनियर-सीनियर मित्र-मैत्रिणींचे नंबर मिळत गेले आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार होत गेला. ‘भेटू या एकदा’, हा नारा सर्वांनी एकेकदा देऊन झाला होता. सहा महिन्यांच्या या आंदोलनानंतर ते भेटणार होते. हॉटेलच्या सगळ्यांत जवळ रिसर्च संस्था असून, तिलाच या गेट टुगेदरला पोहोचायला उशीर झाला होता. तो ही तिची आतुरतने वाट पाहत होता. शेवटी तिने दर्शन दिलं, तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला.

‘सॉरी गाइज. आय अॅम नॉट गोइंग टू गिव्ह एनी एक्स्प्लेनेशन.. बट सॉरी.’ तिने आल्याआल्याच सरेंडर केलेलं पाहून सगळेच हसू लागले. ती आपसूक त्याच्या शेजारच्या खूर्चीत जाऊन बसली. दोघं एकमेकांकडे पाहून हसले. त्यांनाही प्रत्यक्ष भेटून पंधरा दिवस उलटले होतेच. तसं तर जवळपास रोजच फोनवर बोलणं व्हायचं; पण कामाच्या वेळा सांभाळताना प्रत्यक्ष भेटणं मागे राहायचं. गप्पागोष्टी, मजा सुरू झाल्यानंतरही अधूनमधून दोघं कानगोष्टी करत होते. शेवटी विरज्याने सर्वांदेखत त्याला विचारलं, ‘आता किती काळ तुम्ही असं कानगोष्टी करत राहणार. एकदाचं डिक्लेअर तरी करून टाका.’
‘सॉरी, काय डिक्लेअर करायचंय?’, त्याने विरज्याला विचारलं. ‘त्याचं सोड. तू तरी सांग. सात वर्षं झाली दोघांना एकत्र पाहतोय.’ विरज्यानं तिला प्रश्न केला. ‘मग? असं तू आयुष्यभर पाहणार आहेस. त्यात डिक्लेअर काय करायचंय?’ ती खळखळून हसली. ‘कम ऑन यार, तुम्हाला व्यवस्थित कळतंय मी काय म्हणतोय ते. बरं चल स्पष्ट विचारतो, लग्न कधी करताय?’
‘व्हॉट रब्बिश.’ अंगावर झुरळ पडल्यासारखं दोघं एकाच वेळी ओरडले. त्या दोघांची एकसारखी प्रतिक्रिया पाहून सगळेच चकित झाले. दोघंही सतत एकमेकांच्या सोबत एकमेकांसाठी उभं राहिल्याचं कित्येकदा तरी सर्वांनी पाहिलं होतं. दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. एकमेकांच्या आवडी-निवडी, एकमेकांच्या दुखऱ्या जागा सर्वच. ती दोघं रिलेशनशिपमध्येच आहेत, यावर जणू सर्वांनी शिक्कामोर्तबच करून टाकलं होतं. फक्त त्या दोघांकडून ऑफिशिअली येणं बाकी होतं. त्यांच्या नात्यातली मैत्रीपल्याडची गोष्ट सर्वांना दिसत होती; मात्र ती एका क्षणात दोघांनी अमान्य केल्यावर सगळेच हादरले. जणू त्यांचाच प्रेमभंग झाला होता. 
‘कसं शक्यय? तुम्ही उगीच नाटक करू नका.’ सगळेच एकमेकांशी बोलत त्यांना फैलावर घेऊ लागले.

‘हो ना. आम्हाला वेड्यात नका काढू.’ आणखी कोणीतरी म्हणालं.
‘अरे.., पण खरंच आमच्यात पक्की मैत्री आहे आणि यापलीकडे नात्यात गुंतण्याचा आमच्या मनात विचारही आला नाही.’ ती वैतागून म्हणाली.
‘प्लीज आणि तुम्ही त्या ‘मैंने प्यार किया’ काळातून बाहेर या बरं. ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते.’ दोनो सिर्फ दोस्त हो सकते है बिलकुल,’ तो  म्हणाला.
‘राइट. आमची मैत्री आम्हाला भरपूर कम्फर्ट देते. ते एक असतं ना, की, ‘तू है तो आय विल बी ऑलराइट’, तसं. आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो. चर्चा करू शकतो. भांडू शकतो. एकमेकांचा सहवास आम्हाला पूर्णपणे आवडतो आणि सात-आठ वर्षं मुलगी-मुलगी किंवा मुलगा-मुलगा मित्र असले, की तुम्ही त्यांनाही असंच रिलेशनशिपमध्ये आहात का असं विचारता का?’
‘हो, नाही विचारत कारण तिथं अपोजिट अॅट्रॅक्ट्सची भानगड नसते. आजच्या जमान्यात तर समलैगिंकही... तो वेगळाच मुद्दा... त्याला बाजूला ठेवू; पण तुम्ही इतकेच एकमेकांना कम्पॅटिबल आहात, तर मग तुम्ही वाट कशाची पाहताय? आजवर नाही विचार केला, हरकत नाही; पण अजूनही करूच शकता की.’ 

तो हसला, ‘आम्ही आमच्या मैत्रीत इतके मस्त मश्गुल आहोत, की त्याला वेगळं लेबलिंग लावून घेऊन आयुष्यभराचा करार करावा असं नाही वाटत आम्हाला. आमच्या मैत्रीत आमचं असं डिस्जेंडर होऊन एकमेकांना पाहणं आम्हाला आवडतं. त्याचं अन्य कशात तरी रूपांतर केलंच पाहिजे असं नाही. किमान आमच्या बाबतीत तरी. आम्हाला नक्कीच एकमेकांचं आकर्षण वाटतं. म्हणून तर ती आली तशी सरळ माझ्या शेजारच्या खुर्चीत बसली. हे आहेच. असणारच; पण त्या आकर्षणात एकमेकांना आयुष्यभरासाठी दिवस आणि रात्रीशी जोडून घेण्याचा अट्टाहास मुळीच नाही. आमच्या आकर्षणात स्पर्शाचीही ओढ आहे, पण शरीराची नाही. म्हणजे खरं तर आम्ही एवढा विचारच केला नाही, राइट सखी. हे तर तुम्ही छेडलं, म्हणून कदाचित मी इतकं काहीतरी बोलतोय. अँड बिलीव्ह मी, जसं आतून येतंय तसंच बोलतोय. म्हणजे सबकॉन्शसली हे सारं असंच आहे,’ असं बोलून त्यानं तिच्याकडे पाहिलं. जे काही बेाललो ते पटतंय ना, असं त्यानं न विचारताही तिला विचारल्याचं लक्षात आलं. तिनं उत्तरादाखल त्याला फक्त एक आलिंगन दिलं. दोघांनी अधिक मोकळेपणानं सगळ्यांकडे एक प्रसन्न नजर टाकली. बाकीचे मात्र सुतक असल्यासारखं उदास चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होते....

- हीनाकौसर खान-पिंजार 
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत. ‘हॅशटॅग (##) कोलाज’या त्यांच्या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search