Next
‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’
प्रेस रिलीज
Monday, May 28, 2018 | 02:14 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत प्रचंड मोठे विकास कार्य केले असून, हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून, राज्याच्या वतीने आपण मोदी सरकारचे आभार मानतो,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले.

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘मोदी सरकारची चार वर्षे ही संपूर्ण देशाच्या प्रगतीची वर्षे आहेत. या सरकारने अतुलनीय काम केले आहे. सरकारने सामान्य माणसासाठी काम केले असून, वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. या काळात मोदी सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. महाराष्ट्रात दुष्काळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आठ हजार कोटी रुपये इतकी आतापर्यंतची सर्वाधिक मदत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ झाला आहे. केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने कोल्ड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंग प्रकल्प मंजूर केले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.’

‘राज्यातील सिंचनाचे अर्धवट पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात महाराष्ट्रात आतापर्यंतचे महामार्गांचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे. राज्यात चार हजार किलोमीटर लांबीचे महामार्गांचे काम सुरू झाले असून, दहा हजार किलोमीटरच्या कामाची प्रक्रिया चालू आहे. राज्याच्या कोणत्याही भागात गेलो, तरी रस्ते आणि महामार्गांचे काम चालू असलेले दिसेल,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

‘अनेक दशके रेंगाळलेले महाराष्ट्राचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आताचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रचंड निधी मंजूर केला आहे. मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एकाच अर्थसंकल्पात चाळीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी जागा मिळण्याचा प्रश्न पंधरा वर्षे रेंगाळला होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ तीन दिवसात जागा मिळवून दिली व तेथे आता काम सुरू आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी केंद्राने सर्व परवानग्या दिल्या. महाराष्ट्राला केंद्राकडून प्रचंड मोठे पाठबळ लाभले आहे,’ असे ते म्हणाले.

आर्थिक विकास, गरिबांचे कल्याण, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावणे, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार देणे अशा अनेक बाबतीत मोदी सरकारने प्रभावी कामगिरी केली केल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search