Next
मायानगरी दुबईमधील ‘गोल्ड सुक’ अर्थात सुवर्णपेठ
BOI
Sunday, April 14, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:‘संयुक्त अरब अमिराती’मधील दुबई हे साऱ्या जगाचेच एक मध्यवर्ती आकर्षणस्थान आहे. तेथील ‘बुर्ज खलिफा’पासून डेझर्ट टूरपर्यंत अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. तेथील एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे पर्यटकांना खेचून घेणारे महत्त्वाचे स्थान म्हणजे ‘गोल्ड सुक’ अर्थात सुवर्णबाजार. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर या वेळी लिहीत आहेत या ‘गोल्ड सुक’बद्दल...
............
‘संयुक्त अरब अमिराती’मधील दुबई हे राज्य विमानाने पुण्या-मुंबईपासून सुमारे तीन तासांच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे, साऱ्या जगाचेच ते एक मध्यवर्ती आकर्षणस्थान आहे. दुकाने, हॉटेल्स, पर्यटन-ठिकाणे, विमानतळ इत्यादी सर्व जागी देशोदेशींचे चित्रविचित्र लोक बघायला मिळतात. वाहतूक, सुरक्षा, अंमली पदार्थ यांच्या संदर्भातील काही कडक, पण अत्यावश्यक नियम जर सोडले, तर दुबईत मुक्त वातावरण आहे. जगातील सर्वांत उंच मनोरा ‘बुर्ज खलिफा’, दुबई मॉल, पाम जुमेरा, फाउंटन पाम आयलंड, म्युझियम, क्रीक, मरीना, स्किइंग, मशीद, मिरॅकल गार्डन, अॅक्वेरियम, ऑपेरा हाउस, ग्लोबल व्हिलेज, सफारी पार्क, डेरा आयलंड, डेझर्ट टूर आणि अशीच अनेक स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे पर्यटकांना खेचून घेणारे महत्त्वाचे स्थान म्हणजे तिथले ‘गोल्ड सुक’ अर्थात सुवर्णबाजार. आठवड्याचे सातही दिवस हा ‘जव्हेरी बाजार’ सकाळी १० ते रात्री १० या वेळेत उघडा असतो. फक्त शुक्रवारी, तो सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळी चार ते रात्री १० अशी वेळ असते. दुबईच्या मध्यवर्ती विभागात, ‘अल् रास डेरा’ येथे सोन्याची झगमग आणि सुंदर रोषणाईने सजलेली सुमारे ४०० दुकाने उभी आहेत. जवळच भाजीपाला आणि मासळी बाजारसुद्धा आहे. समजा सोने खरेदी करायचे नसेल, तरीही तिथे भेट दिल्याशिवाय दुबईची यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. तिथे, काचांच्या मागे प्रदर्शित होणारी सोन्याची आभूषणे आणि जडजवाहिर आपल्याला आश्चर्याचाही सुखद धक्का देतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतके नाजूक, सुबक, कलापूर्ण आणि मोठमोठ्या आकाराचे दागिने तिथे बघायला मिळतात. या पिवळ्याधमक धातूचा (२२ असो वा २४ कॅरेट) दर्जा १०० टक्के राखण्यासाठी सरकारची करडी नजर सर्वत्र असते. हिरे-माणके, अन्य मौल्यवान खडे, मोती, प्लॅटिनम आणि काही ठिकाणी चांदीच्या वस्तूही मिळतात. भाव कमी करण्यासाठी इथेही ‘घासाघीस’ होत असते; त्यामुळे दिल्लीच्या बाजाराप्रमाणे, झगमगाटाला बळी न पडता, संकोच न करता किंमत कमी करून घ्या. प्रत्यक्ष सोन्याच्या वजनापेक्षा कलाकुसरीची मजुरी जास्त असते. एके ठिकाणी ‘जमले’ नाही, तर शेजारी दुसरे दुकान आहेच!

६५ किलोची अंगठी
अरेबिकमधील ‘सुक’ या शब्दाचा अर्थ ‘बाजार’ असा होतो. या सर्व बाजाराचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. काही दुकाने ४० वर्षांहून जुनी आहेत, तर काही नव्याने थाटलेली आहेत. तसा या सुवर्णपेठेचा इतिहास १०० वर्षांहूनही जुना आहे. पिढ्यान् पिढ्या वडिलोपार्जित सोन्याचा व्यवसाय चालू राहिलेला आहे. दर ग्रॅमवर किंवा कॅरेटप्रमाणे सोन्याची विक्री होते. दुबईत १० ग्रॅम सोन्याचा दर ३२ हजार रुपये आहे; तर तोच मुंबईत ३४ हजार रुपये आहे. म्हणजे किमतीत फार फरक नाही. तो पूर्वी बराच असे. त्यामुळे सोन्याची तस्करी होई. सध्या प्रत्येक प्रवाशाला जास्तीत जास्त एक लाख रुपयाचे सोने दुबईतून भारतात नेता येते. त्याची पावती जवळ ठेवावी लागते. अर्थात ही मर्यादा दर वेळी तपासून घ्यावी. ‘गोल्ड सुक’ हे जगातील सर्वांत ‘वजनदार’ अंगठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘गिनीज बुक’मध्ये नोंदला गेलेला उच्चांक म्हणजे सुमारे ५७ किलो सोने आणि ५.१७ किलो जडजवाहिर त्यात बसवलेली मोठ्ठी अंगठी! (ती कोण घालत असेल, हे कुबेरच जाणे!) तिची किंमत साधारण साडेचार कोटी रुपये आहे.दुबईत सोनेखरेदीवर कुठलाही कर नाही. शेअर बाजाराप्रमाणे सोन्याच्या दरात रोज चढ-उतार होत असते. मुक्कामाच्या बहुतेक हॉटेल्समध्ये हे दर कळू शकतात. त्याचा अभ्यास करूनच खरेदी करावी. १२ आणि १८ कॅरेटचे सोनेही उपलब्ध असते. त्यात मिसळलेल्या धातूनुसार रंगीत दागिने मिळतात. दर्जाबाबत चिंता नसते; परंतु अधिकृत दुकानांमधूनच खरेदी करावी. बहुतेक विक्रेत्यांना इंग्रजी आणि हिंदी येते. त्यामुळे तुमचे ‘बजेट’ आणि पसंती (काय घ्यायचे आहे) यानुसार ते मदत करू शकतात. घासाघीस केल्यास ३० टक्क्यांपर्यंत किंमत कमी होऊ शकते. रोख किंवा कार्डाद्वारे खरेदी करता येते. दागिन्यांमध्ये इतकी विविधता आणि अजस्र आकार आहेत, की डोळे विस्फारले जातात. वेळ वाया जाऊ नये, असे वाटत असेल, तर नेमक्या खरेदीवर लक्ष केंद्रित करावे. नुसताच आनंद घ्यायचा असेल, तर डोळ्यांनी कितीही सोने लुटावे! जाणकारांच्या माहितीनुसार, या बाजारात कुठल्याही दिवशी किमान १० टन सोने उपलब्ध असते. दुबईचे भौगोलिक स्थान सुवर्णविक्रीला खूपच अनुकूल आहे. सर्वांत मोठी सोन्याची बाजारपेठ म्हणजे भारत अगदीच जवळ आहे. एका बाजूला सोन्याच्या खाणी असलेला आफ्रिका देश फार दूर नाही. तिथून हिऱ्यांची आयातही होते. चीनबरोबर अमिरातीचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापार चालतो. तिथे सोने विकलेही जाते आणि उपलब्धही होते. शंभर वर्षांपूर्वी करमाफी जाहीर करून द्रष्ट्या ‘यूएई’ सरकारने जगभरातून व्यापाऱ्यांना आकर्षित केले, तेच धोरण पुढेही चालू ठेवले. अरेबियन गल्फमधे सोयीचे बंदरही होते. जागा आणि अन्य सोयीही पुरवण्यात आल्या. त्यामुळेच भविष्यात दुबई हे ‘सोन्याचे शहर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दर्जाबाबत हमी आणि विश्वास हा त्याचा भक्कम पाया आहे.

दुबईसारखे शारजातही ‘गोल्ड सुक’ सेंट्रल मार्केटमध्ये आहे. अर्थात त्याची व्याप्ती लहान आहे. हिरे-मोत्यांसाठी तिथेच ‘रोल गोल्ड मार्केट’ आहे. अजमन शहरातही सुवर्णबाजार आहे. नेकलेस, अंगठ्या, बांगड्या यांचे नावीन्यपूर्ण प्रकार तिथे मिळू शकतात. अबूधाबीतही सोन्याच्या दागिन्यांचा व्यापार चालतो. तिथे किमान १०० दुकाने आहेत.

हा झाला दुबई आणि अन्य राज्यांतील सोन्याचा बाजार. तिथेच मसाल्याच्या पदार्थांची फार मोठी उलाढाल चालते. तोही बाजार बघण्यासारखा आहे. जगातील सर्वोत्कृष्ट केशर दुबईत मिळते. एक ग्रॅम केशराची किंमत ५०० रुपयांपासून पुढे कितीही असू शकते. उत्तमोत्तम कलाकुसरीचे गालिचे हेसुद्धा संयुक्त अरब अमिरातीचे वैशिष्ट्य आहे. त्यांची किंमत (दिवाणखान्यात बसतील असे) २० हजार ते काही लाख रुपये असते. सोने हा हौसेचा आणि श्रीमंतीचा एक भाग आहे. खाद्यपदार्थ आणि गृहसजावटीलासुद्धा महत्त्व आहेच. दुबईत गेल्यावर सर्वच क्षेत्रांतली/वस्तूंची समृद्धी बघावयास मिळते. त्यामुळे आपल्या डोळ्यांचे पारणे फिटते.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prachiti About 100 Days ago
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे प्रत्येक दुकानाच्या बाहेर बंदूकधारी सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. संपूर्ण बाजार cctv द्वारा नियंत्रित आहे. इथल्या कायद्याच्या आणि पोलिसांचा बडगा किती आहे हे ह्यावरून लक्षात येते.
1
0

Select Language
Share Link
 
Search