Next
‘पुण्याच्या तोंडचे पाणी पळण्याची भीती’
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 05:23 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘जवळपास एक कोटीपर्यंत जाणारी लोकसंख्या, वाढत्या नागरीकरणाने उध्वस्त झालेली पाणलोट क्षेत्रे, नदी-ओढ्यांचे अडवलेले प्रवाह आणि जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अजिबात होत नसलेले प्रयत्न यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी भविष्यात पळवले जाऊ शकते,’ अशी भीती जिओमॉर्फोलॉजी संशोधक डॉ. श्रीकांत गबाले यांनी व्यक्त केली.

‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ आयोजित ‘जलोत्सव २०१८’मध्ये बुधवारी (२१ मार्च) बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली. हे व्याख्यान घोले रोडवरील नेहरू सभागृहात झाले. या वेळी माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते गबाले, तसेच पाटबंधारे खात्यातील कर्मचारी भारत व्हनमाने, लक्ष्मण केंगार यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, ‘पुण्याला स्वतः:चे पाणी नाही. शेजारच्या धरणातून ते मिळवावे लागते. वाढत्या नागरीकरणामुळे पुणे परिसराची लोकसंख्या एक कोटीवर जाणार आहे. वाढत्या बांधकामांमुळे लगतची पाणलोट क्षेत्रे आणि पाण्याचे प्रवाह उध्वस्त होत आहेत. निम्मे प्रवाह संपले आहेत. नद्या आणि ओढे यांना अडवले किंवा वळवले जात आहे. टेकड्या उभ्या चिरल्या जात आहेत.  त्यामुळे चेन्नईसारखा पूर एक दिवस पुण्यात येणार हे निश्चित आहे. शिंदेवाडीने त्याची चुणूक दाखवली आहे. पुण्यात पावसाचे फक्त दोन टक्के पाणी साठवले जाते. बाकीचे वाहून जाते. दुसरीकडे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शहरात काहीही प्रयत्न होत नाहीत. उलट सिमेंटचे भरमसाट रस्ते बांधले जात आहेत. पुढील काळात जमिनीखालील पाण्याची पातळी निम्म्याने खाली जाऊ शकते. ही स्थिती भयावह असून, पुढील काळात पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले जाणार आहे.’

पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व्हनमाने, केंगार यांनी सांगोला तालुक्यातील जुनावणे गावातील लघु पाटबंधारे तलावावर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सवय लावून ५६ हेक्टरचे सिंचन क्षेत्र ६५० हेक्टरवर कसे नेले याची यशोगाथा सांगितली. ‘कालव्याला पाणी सोडण्याऐवजी पंपाने शेतकऱ्यांना देऊन मीटरद्वारे ठिबक केले पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले.

अभियंता दिगंबर डुबल यांनी गुंजवणी धरणाला कालवे न काढता थेट शेतात ठिबक सिंचन कसे केले जाणार याची माहिती दिली. अशा स्वरूपाचा हा देशातील पहिला प्रयोग ठरणार आहे. फेस्टिव्हलचे संयोजक सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. दीपक पोफळे, अनघा रत्नपारखी, हेमंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 154 Days ago
More than a year has passed since this was released . After all , a press release is a press release . People forget it , in no time At all .
0
0

Select Language
Share Link
 
Search