Next
माणूस समजून घेणे हा माझा छंद : आदित्य बीडकर
मानसी मगरे
Thursday, June 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आदित्य बीडकरबालपणापासूनच नाटिका, बालनाट्यांपासून अभिनयाची सुरुवात केलेला पुण्यातील अभिनेता आदित्य बीडकर सध्या ‘स्टार प्रवाह’वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत डॉ. बाबासाहेबांच्या मोठ्या भावाची भूमिका करत आहे. ‘अभिनयाची केवळ दैवी देणगीच असावी लागते असे नाही. ही कला सातत्यपूर्ण रियाजातून शिकता येते आणि त्यात स्वतःला घडवता येते,’ असे त्याला वाटते. माणूस समजून घेणे हा आपला छंद असल्याचे तो सांगतो. आदित्यशी विविध मुद्द्यांवर केलेली ही बातचीत...
................
अभिनयाची सुरुवात कधीपासून झाली? तुझ्या आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
- लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. छोट्या-मोठ्या नाटिकांमधून भाग घ्यायचो. जेमतेम १० वर्षांचा होतो तेव्हापासून नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. आवड लक्षात घेऊन पुढे प्रकाश पारखी यांच्या ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ या संस्थेत प्रवेश घेतला आणि नाटकाचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरुवात झाली. टिळक रस्त्यावरील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये माझे शालेय शिक्षण झाले. तिथे या सगळ्या गोष्टी होत्याच. गिरीश केमकर सर यांच्याकडून अभिनयाचे धडे मिळाले. त्यामुळे शालेय वयापासूनच नाटक आणि अभिनय या गोष्टींची गोडी लागली आणि सवयही झाली. दरम्यान प्रकाश पारखी यांच्याकडेही शिक्षण सुरू होतेच. त्यांच्यामार्फत अनेक लघुपटांमध्ये, जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी विशेष म्हणजे निर्मिती सावंत यांच्यासोबत ग्रामीण स्वच्छता अभियान या विषयावर एकात लघुपटात काम केले होते. दहावी झाल्यानंतर सर परशुराम (एसपी) महाविद्यालयात प्रवेश घेतला. मग हळूहळू फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक अशा लोकप्रिय स्पर्धांमधून नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात झाली. 

‘ग्रिप्स थिएटर’च्या बालनाट्यांमध्येही तू काम केले आहेस. तो अनुभव कसा होता?
- बालनाट्यांमध्ये मी शाळेपासूनच काम करत होतो. परंतु ‘ग्रिप्स थिएटर’ असा बालनाट्यासाठीचा एक विशाल प्लॅटफॉर्म पुण्यात उपलब्ध आहे हे ठाऊक नव्हते. काही नाट्यस्पर्धांमध्ये माझ्या भूमिका पाहिलेल्या सोनिया पटवर्धन यांनी मला ‘ग्रिप्स’च्या एका नाटकात काम करण्याविषयी विचारले आणि तिथून मी ‘ग्रिप्स’च्या बालनाट्यांमध्ये शिरलो. ग्रिप्स थिएटरच्या माध्यमातून नाटकाचे एक खूप मोठे भांडार माझ्यासमोर उघडे झाले होते. त्यात बाललैंगिक शोषणसारख्या सामाजिक आणि गंभीर विषयावर आधारित ‘बोल बिनधास्त’ या नाटकात काम करता आले. मुंबई-पुण्यातील अनेक शाळांमध्ये त्याचे प्रयोग करण्याची संधी मिळाली. या सगळ्याचे एक वेगळेच समाधान होते.  वेगवेगळे विषय, नवनवीन प्रयोग हे करत असताना माझे बालमन आणखी प्रगल्भ होत गेले. नाटकांसाठी नवनवीन विषयांवर विचार करण्याची आणि ते हाताळण्याची हातोटी वाढत गेली. बालनाट्यांमध्येही किती तरी प्रयोग करता येऊ शकतात, मोठ्यांचे किती तरी विषय हाताळता येऊ शकतात, हे ‘ग्रिप्स’ची नाटके करताना जाणवले. या सगळ्यांत विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

‘पुरुषोत्तम’ आणि ‘फिरोदिया’ करंडक यांमधील नाटकांची सुरुवात कशी झाली? तो अनुभव कसा आहे?
- अकरावीला सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर बारावीत पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी आमच्या महाविद्यालयातर्फे बसवण्यात आलेल्या ‘भूमिका’ नावाच्या नाटकात मी सहभागी होतो. ‘फिरोदिया’साठी मी ‘अक्रॉस’ या नाटकात काम केले होते आणि या नाटकाला त्या वर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा करंडकही मिळाला होता. शिवाय १४ स्वतंत्र पारितोषिकेही मिळाली होती. त्यामुळे ही सुरुवातदेखील खूप छान होती. विशेषतः प्रत्येकालाच या दोन स्पर्धांमधून खरे तर खूप काही शिकायला मिळते असे मला वाटते. त्याआधी मी जे करत होतो, तेच खूप काही आहे असे वाटत होते. परंतु या स्पर्धा करायला लागल्यानंतर हे जग खूप मोठे आणि वेगळे असल्याचीही जाणीव होते. इथे सगळेच बाहशाह आहेत, आपल्यापेक्षा खूप काही जाणणारे लोक इथे आहेत, तेव्हा खूप मेहनत करावी लागणार आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हापासून मग या क्षेत्राच्या बाबतीत मी अधिकच गंभीर झालो. केले जाणारे प्रत्येक काम लक्ष देऊन आणि मेहनतीने करण्याकडे कल वाढला. ‘पुरुषोत्तम’च्या वेळेस मी पहिल्यांदा ‘बॅकस्टेज’ काम केले होते. तेव्हा अभिनय करताना मध्येच मला ‘बॅकस्टेज’ करावे लागत आहे, हे मान्य करणे सुरुवातीला जरा जड गेले. परंतु हादेखील आपल्या शिकण्याचा एक भाग आहे. नाटक म्हणजे केवळ अभिनय नाही, तर त्याच्याशी निगडित सर्वच गोष्टी हाताळता आल्या पाहिजेत. तरच आपण परिपूर्ण होऊ शकतो, हे लक्षात आले आणि मग या बाबतीतील कोणतेही काम मन लावून करू लागलो.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत आदित्य बाळादादा यांच्या भूमिकेतसध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत आंबेडकरांचा मोठा भाऊ बाळाराम रामजी संकपाळ यांच्या भूमिकेत तू आहेस. या भूमिकेबद्दल थोडेसे सांग. 
- ‘फिरोदिया’साठी ‘अक्रॉस’ हे नाटक करत असताना अथर्व कर्वे या अभिनेत्याने मला तेव्हा तो करत असलेल्या ‘स्वातंत्र्यवीरायन’ या नाटकासाठी विचारले. या नाटकात ‘मिर्झा खान’ ही एक नकारात्मक भूमिका मी केली होती. हे करत असताना अनेक नव्या कलाकारांची आणि या क्षेत्रातील लोकांची भेट झाली. दरम्यान सोहम देवधर हा माझा मित्र डॉ. आंबेडकर यांच्यावरील मालिकेसाठी पात्रे निवडण्याचे काम करत होता. त्यातील भूमिकेसाठी त्याने विचारले. मी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. पुढे डॉ. आंबेडकरांचा अभ्यास करत गेलो. इतक्या मोठ्या महामानवाच्या चरित्र मालिकेत मला छोटी का होईना, पण संधी मिळाली याचा खूप आनंद झाला. ही भूमिका करताना समाधान वाटले. 

प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासोबत भूमिकेत आदित्यया वर्षी मार्चमध्ये मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले. सुरुवातीला मी खूप दडपणाखाली होतो. चिन्मयी सुमित, मिलिंद अधिकारी, अदिती द्रवीड यांच्यासारखी सर्वार्थाने मोठी अशी कलाकार मंडळी मालिकेत होती. परंतु हळूहळू या सगळ्यांनी सांभाळून घेतले. वातावरण हलके होत गेले आणि मी पूर्णपणे रुळलो. मालिकेत आंबेडकरांचे थोरले बंधू ‘बाळाराम रामजी संकपाळ’ यांच्या भूमिकेत मी आहे. बाळादादा असे मालिकेत संबोधले जाते. हे व्यक्तिमत्त्व कलेवर खूप प्रेम असलेले आहे. घरातील भावंडांत सगळ्यांत मोठे म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. त्यांना वेगवेगळी वाद्ये वाजवायला आवडायची. परंतु दोन वेळची खायची भ्रांत असलेल्या घरात त्या काळात कलेसाठी वेळ देणे, त्यावर खर्च करणे हे घरच्यांना झेपणारे आणि मान्य होणारे नव्हते. त्यामुळे घरच्यांचा विरोध त्यांच्या वाटेला आला. खूप वेगळे आणि विशेष असे हे पात्र आहे. मालिकेत बाबासाहेबांची लहानपणीची भूमिका करत असलेला अमृत हा जेमतेम पाच वर्षांचा खूप खेळकर असा मुलगा आहे. त्याच्यासोबत शूटिंग करणे ही केवळ धमाल होती. या वयात अभिनयाची इतकी समज आणि आवड असणे हे पाहून थक्क व्हायला झाले.   

सहायक दिग्दर्शक म्हणून स्पर्धा जिंकल्यानंतरअभिनयाव्यतिरिक्त लेखन-दिग्दर्शनासारख्या इतर कोणत्या बाबींत रस आहे? त्यावर कधी काम केले आहे का? 
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बॅकस्टेज भरपूर काम केले आहे. कारण पुरुषोत्तम, फिरोदिया स्पर्धा करताना आमच्या महाविद्यालयात असा एक नियम आहे, की तुम्ही अभिनय करणारे असाल, तरी स्टेजवरील, मागील आणि एकंदरीत सर्वच कामे सगळ्यांनीच करायची. मग सेट लावण्यापासून ते बॅकस्टेजला असलेल्या सर्व कामांपर्यंत प्रत्येक काम जमले पाहिजे. त्यामुळे आपसूक सगळे प्रकार हाताळत आहेच. यामुळे सगळ्याच कामांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. शिवाय मी अभिनेता, तर केवळ अभिनयच करणार असेही होत नाही. या छोट्या छोट्या कामांमधूनही एक गोष्ट शिकता आली, ती म्हणजे यातून स्वतःला प्रश्न विचारायला वेळ मिळतो. आपण काय करत आहोत, का करत आहोत, याचा काय उपयोग होईल, यातून काय शिकता येईल हे पाहण्याची आणि शोधण्याची सवय लागते. तशी ती लागत गेली. 

या व्यतिरिक्त लेखन आणि दिग्दर्शन करतो. खरे तर लेखन अजून फारसे जमत नाही. परंतु मला इच्छा आणि आवड आहे. दिग्दर्शन केले आहेच, करतोही. नुकतेच मी आणि माझ्या कॉलेजच्या काही मित्रांनी मिळून ‘बिहाइंड दी ट्रूथ’ या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘नूमवि’ शाळेकडून हे नाटक बसवले गेले होते. बऱ्याच स्पर्धांमध्ये या नाटकाला पारितोषिके मिळाली आहेत. आता आगामी सुमन करंडक, शिवाय पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी काहीतरी लेखन करण्याची खूप इच्छा आहे. त्याची तयारीही करत आहे. 

बालनाट्ये तू केली आहेस. सध्याच्या काळानुसार त्यांमध्ये समाधानकारक प्रवाह आहेत, असे वाटते का? या क्षेत्रात आणखी काय असावे असे वाटते?
- ‘ग्रिप्स थिएटर’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी अनेक बालनाट्यांमध्ये कामे केली. त्या वेळी वयही लहान होते, तेवढी समजही नव्हती. त्यामुळे विषय, आशय काय असावा, काय नसावा या गोष्टींवर फार विचार केला जायचा नाही. परंतु जसाजसा मोठा होत गेलो, तशा अनेक गोष्टी नव्याने समजत गेल्या. खरे तर यात ठोस असे काही सांगता नाही येणार, गुंतागुंत आहेच. बालनाट्यांमध्ये त्याच त्या विषयांवरील (स्टिरिओटाइप) नाटके होतात आणि दुसरा भाग असा आहे, की जिथे ‘ग्रिप्स’सारख्या काही चळवळी बालनाट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन प्रयोग करून पाहत असतात. पुण्यात अशा कितीतरी संस्था आहेत, ज्यामधून बालनाट्यांमध्ये खूप नवे प्रयोग होतात. त्यामुळे केवळ त्याच त्या विषयांवर होणारी नाटकेही आहेत आणि नवीन प्रयोग करू पाहणारी नाटकेही तेवढीच आहेत. ज्या नवीन गोष्टी प्रयत्न करून पाहायला हव्यात, त्याही होत आहेत आणि ज्या जुन्या गोष्टी जपून ठेवायला हव्यात त्यांचा वारसाही जपला जात आहे. त्यामुळे माझ्या मते सध्याच्या परिस्थितीत बालनाट्यांसाठीचे प्रयत्न समाधानकारकपणे सुरू आहेत. त्यात रोज नवीन गोष्टी होत आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत आदित्यनाटक, मालिका हे सगळे करत असताना अभ्यास आणि या सगळ्याचा ताळमेळ कसा बसवतोस?
- सध्या मी कला शाखेला द्वितीय वर्षाला आहे. ‘मानसशास्त्र’ हा माझा मुख्य विषय आहे. माणूस समजून घेणे हा सुरुवातीपासूनच माझा छंद राहिला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माणसांमध्ये वावरताना, त्यांच्या मानसिक बाबीही शिकता याव्यात यासाठी या विषयाची निवड केली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, नाटक करताना या अभ्यासाचा विशेष फायदा होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांशी दररोज संबंध येत असतो. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेताना या अभ्यासक्रमाचा फायदा होतो. कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या आवडत्या कलेशी जोडून घेतली, की ती गोष्ट स्पेशल होऊन जाते, हा ‘फंडा’ मला समजला. त्यामुळे अभ्यासाचा आणि कामाचा ताळमेळ घालणे फार जड जात नाही. माझ्या आवडीच्या म्हणजे मी काम करत असलेल्या नाटकाच्या क्षेत्राशी मी शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अभ्यास करायलाही उत्साह असतो. फक्त आता फार सवड मिळत नाही, ती काढावी लागते इतकेच. 

आधी ‘नाटक’ असे ठरलेले होते, का आधी ‘मानसशास्त्र’ असे ठरलेले होते?
- आधी नाटक हे ठरलेले होते. लहान असतानाच नाटक, चित्रपट, मालिका यांतून अभिनय करायचा आहे, हे ठरलेले होते. मुळात आपण जेव्हा लहान असतो, शाळेत असतो, तेव्हा तिथे आपल्याला विषय निवडण्याची संधी नसते. तिथे ठराविक विषय असतात आणि तेच शिकायचे असतात. परंतु जेव्हा महाविद्यालयीन पातळीवर येतो, तेव्हा ही विषयनिवडीची संधी असते. या वयात जग विस्तारत जाते, आपल्या आजुबाजूच्या अनेक गोष्टी कळतात. विशेषतः समज येते, आपल्या आवडीनिवडी आपल्यालाच नव्याने समजू लागतात. तसेच माझेही झाले. नाटक आवडते हे जसे समजले, तसेच मग अभ्यासक्रमांच्या विषयांबाबतही नव्याने समजले. सुरुवातीपासूनच माणूस या घटकाबद्दल मला उत्सुकता होती, ती आजही आहे. त्यामुळे मानसशास्त्र हा विषय निवडला. माझे काम म्हणजे नाटक आणि अभ्यासाचा विषय या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी पूरक आहेत, असे वाटते. 

अभिनयासाठी नियमित अशी काय विशेष तयारी करतोस? तुझ्या आजवरच्या कोणत्या भूमिका विशेष आवडल्या?
- मला वाटते, की रियाज किंवा यासाठीची तयारी या कधीही न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. सतत संबंधित वाचन, चित्रपट पाहणे, नाटकांचा अभ्यास करणे या गोष्टी होतातच. बघणे आणि समजून घेणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, असे वाटते. त्या दररोज सुरू असतात. अभिनयातील काही जागा करून पाहणे हेदेखील होते. मी अकादमीत शिकलो, त्याप्रमाणे अभिनयासाठीचा नवरसांचा व्यायाम मी नियमित करतो. या सगळ्यासोबत नाटक करतच असतो. त्यामुळे या तयारीसोबत प्रात्यक्षिक म्हणून सरावही होतच असतो. केलेल्या तयारीसाठी एक माध्यम म्हणून नाटक हाच एक चांगला सराव होतो.  

मी केलेल्या भूमिकांपैकी ‘फिरोदिया’च्या ‘अक्रॉस’ नाटकातील ‘पायथागोरस’ ही भूमिका आवडली. त्यानंतर ‘स्वातंत्र्यवीरायन’ या नाटकातील पूर्णपणे नकारात्मक शेड असलेली ‘मिर्झा खान’ ही भूमिकाही आवडली. नकारात्मक भूमिका करणे मला विशेष आवडते आणि आता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत केलेली ‘बाळादादा’ ही भूमिकाही विशेष आवडली. यापुढे विशेषतः ‘रोमँटिक’ भूमिका करायला जास्त आवडेल. कारण ती शेड मी आजवर केलेली नाही. याशिवाय नकारात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडेल. 

(आदित्य बीडकरच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search