Next
‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद
प्रेस रिलीज
Thursday, October 04, 2018 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहादरम्यान ‘शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात शेतकऱ्यांच्या व्यथांवर विचारमंथन करण्यात आले.

यात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले सहभागी झाले होते. अध्यक्षस्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांनी भूषविले. हा कार्यक्रम गांधीभवन कोथरूड येथे तीन ऑक्टोबरला झाला. या वेळी आप्पा अनारसे, रवी लाटे, सचिन पांडुळे, संदीप बर्वे उपस्थित होते.

पटेल म्हणाले, ‘४२ वर्ष मी शेती प्रश्नांसाठी झगडत आहे. पदावर असल्याने समर्थनाची भूमिका घेत असलो, तरी आतून माझा संघर्ष सुरू असतो. आयात खाद्यतेलावर ड्युटी वाढवण्याची भूमिका मी घेतल्याने देश पाच वर्षांत स्वयंपूर्ण होणार आहे. माझ्या प्रयत्नांमुळेच राज्या-राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. मोदी सरकारमुळे डाळी, इथेनॉल, आयात-निर्यात धोरण याबाबत चांगले निर्णय घेतले. मी शेतकरी आहे, दलाल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ यावे यासाठीच प्रयत्न करीत राहीन.’

पटेल यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांना स्वतःला चळवळीची पार्श्‍वभूमी असल्याने त्यांनी मूलभूत चिंतनही केले.

कॉम्रेड अजित नवले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. ‘भाजप’च्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्याची नीती आयोगाची कल्पना हा एक जुमलाच आहे. प्रक्रिया आणि विक्री या टप्प्यात नफ्याची निर्मिती होते, त्यात शेतकऱ्याला वाटा मिळाला पाहिजे. फक्त आयात-निर्यात धोरणाने काहीही होणार नाही.’

‘शेतमालाला घामाचे रास्त दाम देऊन गरिबाला अन्न देणे, आणि महागाई नियंत्रण करणारे सूत्र स्वामीनाथन आयोगाने सांगितले आहे, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे,’ असे नवले यांनी नमूद केले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘देशाचे अन्न स्वावलंबित्व जागतिक संघर्षात महत्त्वाचे आहे, म्हणून शेतकरी जगवला पाहिजे. शेती हा जीवाभावाचा प्रश्न असल्याने कोणत्याही पक्षाने पोकळ घोषणा करू नये.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search