अडचणीच्या वेळी आपल्याला त्वरित व सहजगत्या कोणते कर्ज मिळू शकत असेल, तर ते सोने तारण कर्ज होय. सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँका/पतपेढ्या, तसेच केवळ सोने तारण कर्ज देणाऱ्या खासगी वित्तीय संस्था हे कर्ज कमीत कमी वेळात व कमीत कमी कागदपत्रे घेऊन सरसकट देऊ करतात. शिवाय अशा कर्जासाठी जामीनही द्यावा लागत नाही. अडचणीच्या वेळी तारणहार ठरणाऱ्या या पर्यायाविषयी जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ..........
सोने तारण कर्जासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून, त्यानुसार सोने तारण कर्ज दिले जाते. सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे सोने तारण कर्ज आपल्याला मिळू शकते.
- १८ वर्षांवरील कोणीही एकटा अथवा संयुक्तपणे स्वत:च्या मालकीच्या असणारे सोने तारण ठेवून कर्ज घेऊ शकतो. यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवशकता नसते.
- किमान २० हजार व कमाल रक्कम बँकेनुसार कमी-अधिक असते. उदा.: स्टेट बँक कमाल २० लाख, युनियन बँक कमाल पाच लाख, एचडीएफसी बँक दहा लाख, आयसीआयसीआय बँक १५ लाख, फेडरल बँक २५ लाख, बँक ऑफ बडोदा दोन लाख रुपये इतके सोने तारण कर्ज देऊ करते. मणप्पुरम व मुथूट फायनान्स यांसारख्या एनबीएफसीज ५० लाख ते एक कोटीपर्यंत सोने तारण कर्ज देऊ करत आहेत.
- असे कर्ज डिमांड लोन, ओव्हरड्राफ्ट व बुलेट पेमेंट या तीन पद्धतींनी घेता येते. यातील डिमांड लोन व ओव्हरड्राफ्ट कर्जासाठी तीन वर्षांची मुदत मिळू शकते, तर बुलेट पेमेंट पद्धतीचे कर्ज व्याज व मुदलासह एक वर्षाने एकरकमी फेडावयाचे असते.
- मार्जिन : यातील डिमांड लोन व ओव्हरड्राफ्ट प्रकारच्या कर्जासाठी २५ टक्के मार्जिन असते. त्याला एलटीव्ही (लोन ट्रू व्हॅल्यू) असे म्हणतात. बुलेट पेमेंट कर्जासाठी ३५ टक्के इतके मार्जिन ठेवले जाते. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दागिने तारण ठेवताना बाजारातील गेल्या ३० दिवसांच्या २२ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत विचारात घेतली जाते. सोन्याच्या शुद्धतेनुसार हे प्रमाण ठरविले जाते. यासाठी संबंधित बँकेच्या मान्यताप्राप्त सराफाकडून व्हॅल्युएशन केले जाते.
- सोने तारण कर्जासाठी राष्ट्रीयीकृत व खासगी बँका एमसीएलआर अधिक दोन टक्के इतका व्याजदर आकारतात. सध्या या बँकांचा एमसीएलआर ८.२५ ते ९ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने सोने तारण कर्ज १०.२५ ते ११ टक्के इतक्या व्याजाने मिळू शकते. सहकारी बँका, पतपेढ्या यांचा व्याजाचा दर १२ ते १४ टक्के इतका असू शकतो. मणप्पुरम व मुथूट फायनान्स यांसारख्या खासगी वित्तीय कंपन्यांचा व्याजदर १२ ते २५ टक्के इतका असू शकतो.
- सोने तारण कर्जासाठी ०.५ टक्के इतके प्रोसेसिंग चार्जेस व त्यावर लागू होणारा जीएसटी याशिवाय सराफाचे व्हॅल्युएशन चार्जेस अर्जदाराला द्यावे लागतात.
- यासाठी कर रकमेइतकी प्रॉमिसरी नोट, गोल्ड प्लेज अॅग्रिमेंट करावे लागते.
- काही कारणाने कर्जदार परतफेड करू शकला नाही, तर कर्जदाराला नोटीस देऊन तारण असलेल्या सोन्याची विक्री करून आलेल्या रकमेतून व्याजासहित वसुली केली जाते व उर्वरित रक्कम कर्जदाराला दिली जाते.
या कर्जाची कमाल रक्कम व व्याजदर हा बँकेनुसार कमी-अधिक असतो हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
अशा कर्जाला बँकांना कमी जोखीम असल्याने हे कर्ज सहज व कमी व्याजात, तसेच त्वरित (अगदी तास-दीड तासातही) मिळू शकते. म्हणून अगदी गरजेच्या वेळी अन्य कुठल्याही प्रकारच्या कर्जापेक्षा सोने तारण कर्ज घेणे निश्चितच सोयीस्कर असते. याशिवाय शेतीसाठी सोने तारण कर्जास विशेष सवलत आहे.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)