Next
श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न!
BOI
Thursday, March 14, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपला मुलगा ऑटिस्टिक आहे, हे समजल्यानंतरही पुण्यातील श्रीकृष्ण गोडबोले आणि त्यांच्या पत्नीनं वास्तव स्वीकारून वाटचाल करायचं ठरवलं. श्रीकृष्ण यांनी नोकरी सोडून स्वतःची फॅक्टरी सुरू केली आणि त्यात मानसिक विकलांग, अपंगांनाही कामाची संधी दिली. त्यांना जणू आपल्या कुटुंबातच सामावून घेतलं. अशा मुलांसाठी आणखीही बरंच काही करण्याची त्यांची इच्छा आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज जाणून घेऊ या श्रीकृष्ण गोडबोले यांची प्रेरक गोष्ट...
.........
पुण्यातून बीएस्सी झालेला श्रीकृष्ण गोडबोले नावाचा एक तरुण एका कारखान्यात नोकरीला लागला. हळूहळू करत त्यानं स्वतःचं युनिट सुरू केलं आणि आज पुण्यातल्या भोसरी या भागात त्यानं उभारलेली ‘अल्फा’ ही टुमदार फॅक्टरी आपलं लक्ष वेधून घेते. एक कामगार ते मालक असा या तरुणाचा प्रवास कसा आणि कुठल्या कारणामुळे झाला, त्याची ही आगळीवेगळी गोष्ट!

पुण्यातल्या ‘नूमवि’सारख्या नामांकित शिक्षणसंस्थेत शिक्षण, त्यानंतर एस. पी. कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर श्रीकृष्णला नोकरी लागली आणि मग रीतसर लग्नही झालं. लग्नानंतर काहीच काळात मुलगा झाला. मुलाचं नाव सौमित्र ठेवलं. सौमित्रच्या आगमनानं घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं; मात्र सौमित्र चालायला-बोलायला लागण्याच्या वयात आला, तेव्हा तो सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा वागतोय, असं श्रीकृष्ण आणि त्याची पत्नी निमाच्या लक्षात आलं. मनातली शंका दूर करण्यासाठी ते डॉक्टरांकडे जातात आणि एक नवा आघात घेऊन दोघांना घरी परतावं लागलं. आपला मुलगा सौमित्र ‘ऑटिस्टिक’ आहे हे वास्तव त्यांना स्वीकारायचं होतं.

‘ऑटिस्टिक’ म्हणजे ही मुलं आत्ममग्न असतात. ती स्वतःच्याच कोशात जगतात. त्यांना जगाबरोबर व्यवहार करता येत नाहीत. अशा मुलांनी आपल्या पायावर उभं राहणं जवळजवळ अशक्य असतं. या विकारावर कुठलाही उपाय नाही. काही थेरपीजच्या साह्यानं त्यांच्यात थोडेफार बदल घडवून आणू शकतो, एवढंच. श्रीकृष्णचा मुलगा सौमित्र केवळ ऑटिस्टिकच नव्हता, तर त्याला ऐकायला आणि बोलायलाही येत नव्हतं. त्याला अगदी साध्या साध्या गोष्टी शिकवण्यातही असंख्य अडचणी होत्या. अशा वेळी श्रीकृष्णच्या पत्नीनं - निमानं आपली नोकरी सोडून सौमित्रकडे लक्ष द्यावं, असे सल्ले नातेवाईकांनी दिले; मात्र अशा नाजूक आणि कठीण प्रसंगीही श्रीकृष्णनं स्वतःला सावरलं आणि आपल्या पत्नीला नोकरी सोडू नये असं सांगितलं. आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी आपली पत्नी नोकरी सोडून पूर्ण वेळ घरातच थांबली, तर तिचं स्वतःचंही अस्तित्व आणि जगणं थांबल्यासारखं होईल, असं त्याला वाटलं. तसंच ती निराशेच्या गर्तेत जाईल, असंही त्याला वाटलं. सौमित्रची इतर मुलांपेक्षा जास्त काळजी घेणं आवश्यक आहे हेही त्याला कळत होतं; मात्र आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपण दोघं त्यातून पुढला मार्ग काढू, असं श्रीकृष्णनं ठरवलं. सौमित्रला वाढवताना त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण श्रीकृष्ण आणि निमा यांना आनंद देणारा वाटत होता. त्याच्याबरोबर राहण्यासाठी वेळ देताना अनेक तडजोडी कराव्या लागत होत्या; पण वास्तव स्वतःहून स्वीकारल्यानं त्याची खंतही वाटत नव्हती. सौमित्रला घेऊन चित्रपट बघणं, हॉटेलमध्ये जाणं या गोष्टी करणं अशक्य होतं. अशा वेळी कोण्या एकट्यानं जाणं यात त्यांना आनंद वाटत नव्हता. मग सिनेमा असो, वा हॉटेलिंग, या गोष्टी सौमित्रपुढे इतक्या महत्त्वाच्या नाहीत ही गोष्ट श्रीकृष्ण आणि निमा यांच्या लक्षात आली. अनेकदा सौमित्र काहीच खात नाही असं दिसलं. तो बोलत नसल्यामुळे तो का खात नाही याचं कारण समजायलाही मार्ग नसायचा. मग हळूहळू लक्षात आलं, की सौमित्रला बरं वाटत नसलं की तो खाणं सोडून देतो. सौमित्रचं न बोलणं हा अडसर सहवासानं आपोआपच दूर झाला. न बोलताही एका वेगळ्या भाषेनं या कुटुंबात जन्म घेतला. श्रीकृष्ण जास्त संयमी झाला. आयुष्याकडे बघण्याची त्याची दृष्टी अधिक व्यापक आणि सखोल होत गेली. 
श्रीकृष्ण आणि निमा यांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवून या काळात बचतीला जास्त प्राधान्य दिलं होतं. सौमित्र १५ वर्षांचा झाला आणि श्रीकृष्णनं स्वतंत्र उद्योग सुरू करायचं ठरवलं. श्रीकृष्णची ही गोष्ट इथून एक वेगळंच वळण घेते!श्रीकृष्णनं ‘अल्फा’ नावाची टुमदार अशी फॅक्टरी सुरू केली. इथं फायबर ग्लासचं उत्पादन केलं जातं. इथं जवळजवळ ७०हून अधिक कामगार असून, त्यातले अनेक जण मानसिक विकलांग किंवा अपंग आहेत. कामगारांना कामावर घेताना त्यांचा लंबाचौडा बायोडेटा, त्यांची कौशल्यं, त्यांची शैक्षणिक क्षमता, आपले स्वतःचे नियम आणि अटी या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णनं बाद केल्या आहेत. ‘ज्याला मनापासून काम करायचं आहे, त्यालाच काम’ हाच कामावर रुजू होण्यासाठीचा एकमेव निकष ‘अल्फा’मध्ये आहे.मानसिक विकलांग, अपंग व्यक्तींना कामावर घेताना त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणं, हा श्रीकृष्णचा उद्देश होता. ही दृष्टी आपल्याला सौमित्रमुळेच मिळाली, असंही श्रीकृष्ण सांगतो. सौमित्रच्या सहवासात राहिल्यानं अशा व्यक्तींना कुठलं काम चांगलं जमू शकतं, कुठलं काम आवडू शकतं हे श्रीकृष्णला कळत गेलं होतं. खरं तर अशी मुलं असणं याची अनेकदा पालकांना लाज वाटते. ते अशी मुलं समाजापासून लपवण्याचा प्रयत्न करतात; पण श्रीकृष्णनं मात्र वास्तव स्वीकारलं असल्यानं त्यानं अशा व्यक्तींना जास्तीत जास्त समजून घेतलं पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं. घरात अशा मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि बाहेरही उपेक्षा आणि सहानुभूती यांच्या नजरा झेलाव्या लागतात. अशा परिस्थितीत काम मिळणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं तर अत्यंत कठीण! त्यामुळेच श्रीकृष्णनं अशा व्यक्तींसाठी आपणच पुढे होऊन काहीतरी करायला पाहिजे, या विचारानं आपल्या फॅक्टरीत काही माणसं अशी घ्यायची, हे पक्कं ठरवलं. सौमित्रच्या सहवासानं श्रीकृष्ण खूप बदलला. त्यामुळे फॅक्टरीत वावरताना त्याचं कामगारांबरोबरचं नातं मालक आणि नोकर असं कधीच नव्हतं आणि आजही नाही. या गोष्टीमुळे श्रीकृष्ण आपला मालक नसून, आपल्यातलाच कोणी एक आहे, आपल्याला समजून घेणारा आपला एक मित्र आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात तयार झाली. यातून आपल्या अनेक अडचणी, प्रश्न, आपली सुख-दुःखं ही मंडळी श्रीकृष्णबरोबर शेअर करू लागली. याच वेळी श्रीकृष्णच्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अशी मुलं त्यांच्या घरातच चिंतेचा विषय असतात किंवा कित्येक घरांत गरिबीमुळे किंवा इतर कारणांमुळे ती नकोशीही झालेली असतात. अशा वेळी त्यांना राहायला भाड्यानं जागा कोणीही देत नाही. दिलीच तर ते महागडं डिपॉझिट आणि भाड्याची रक्कम त्यांना परवडतही नाही. म्हणून श्रीकृष्णनं फॅक्टरीजवळ असलेली एक चाळवजा इमारत भाड्यानं घेतली. या इमारतीचं डिपॉझिट फॅक्टरीकडून भरण्यात आलं. परगावावरून आलेल्या अशा मुलांना श्रीकृष्णकडे नोकरीही मिळाली आणि राहण्याचीही व्यवस्था झाली. नोकरीत स्थैर्य येताच, आत्मविश्वास येताच हीच मुलं दुसरीकडे जागा शोधतात आणि जातात. त्यामुळे हीच जागा येणाऱ्या दुसऱ्या गरजू मुलासाठी मोकळी होते. 

श्रीकृष्णकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक विकलांग असोत वा अपंग, अशा मुलांना एकट्यानं काम करणं कठीण असतं. अशा वेळी त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणा एकानं सोबत येणं या गोष्टीला श्रीकृष्णनं परवानगी दिली. या पालकांना आपल्या पाल्याबरोबर राहता येतं आणि लक्षही देता येतं. शिवाय कामही पूर्णपणे करता येतं. कामगारांपैकी कोणी आजारी पडल्यास, आपण ज्या डॉक्टरकडे जातो, त्याच डॉक्टरांकडे श्रीकृष्ण या कामगाराला आपल्या गाडीतून घेऊन जातो आणि आपल्याच कुटुंबातली व्यक्ती म्हणून तो खर्चही करतो. 

खरं तर प्रत्येक कारखान्याला एक कोरडा चेहरा असतो. तिथली स्वच्छता, तिथली माणसं ही यांत्रिक, रुक्ष वाटायला लागतात. तसंच ती परकेपणाची भावना देतात; मात्र ‘अल्फा’मध्ये वावरताना हा परिसर, ही वास्तू आपलीच आहे, आपल्या ओळखीची आहे, असा अनुभव येतो. हे सगळं अनुभवत असताना मी जेव्हा ‘अल्फा’च्या टेरेसवर जाऊन पोहोचले, तेव्हा तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. खरं तर कुठल्याही इमारतीत किंवा कारखान्याच्या टेरेसवर नको असलेलं सामान बघायला मिळतं. इथं मात्र सर्वत्र हिरवाई नजरेला पडत होती. 

अशा मुलांना बागकाम आवडतं हे श्रीकृष्णच्या लक्षात आलं होतं. तसंच श्रीकृष्णला स्वतःला बागकामाची आवड असल्यानं त्यानं आपल्या फॅक्टरीच्या टेरेसवर आणि फॅक्टरीच्या परिसरात कामगारांच्या मदतीनं सुंदर अशी एक बाग फुलवली. इथं फक्त फुलझाडंच नाहीत, तर भाज्या आणि फळंही पिकवली जातात. भुईमूग, मटार, टॉमेटो, वांगी, पालेभाज्या, डाळिंब, आंबा अशी विविध पिकं असलेली बाग बघून मन प्रसन्न होतं. आपलं काम संपल्यावर कामगार रोज एक तास देऊन या बागेची निगराणी करतात. या कामाचा त्यांना वेगळा मोबदला मिळतो. तसंच आलेलं उत्पादन म्हणजेच फळं, भाज्या यांची विक्री न करता ते सगळ्या कामगारांमध्ये वाटलं जातं. आपण पिकवलेल्या भाज्यांची, फळांची गोडी चाखण्याचा आनंद मिळतो, तो वेगळाच! तसंच आपल्या कामगारांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त राहावं, यासाठी श्रीकृष्णनं फॅक्टरीच्या जिन्यावर काही ठरावीक अंतरावर जिमची (व्यायाम करण्यासाठीची) साधनं ठेवली आहेत. या जिमचा उपयोग सगळे कामगार करतात. 

श्रीकृष्ण म्हणतो, ‘आपण कुटुंबात वाढतो, तेव्हा आपल्यावर चांगले संस्कार करणारे वडिलधारे आपल्याला आपसूकच मिळतात; पण या कामगारांना चांगल्या गोष्टी सांगणारं, शिकवणारं कधी कधी कोणीही नसतं. अनेकदा तर अनेक गोष्टी ठाऊकही नसतात.’ अशा वेळी या कामगारांचं पालकत्व आपण घेतलं पाहिजे या विचारानं श्रीकृष्णला अस्वस्थ केलं. कामगारांनी युनिफॉर्म व्यवस्थित घातला आहे की नाही, इथपासून सगळ्या गोष्टींत त्यानं स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याच्या कामगारांमधल्या वावरानं ते आपल्या अडचणी श्रीकृष्णजवळ बोलू लागले. त्यांना अल्फा फॅक्टरी म्हणजे आपलं दुसरं घरच असं वाटायला लागलं आणि यातूनच अनेक चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. कामगारांनीही श्रीकृष्णला पालकत्व बहाल केलं. फॅक्टरीची येण्याची वेळ सकाळी साडेआठ असली, तरी हे कामगार लवकर तयार होऊन तासभर आधीच म्हणजे साडेसातलाच येतात. तसंच काम संपल्यावर घरी जाण्याचीही त्यांना घाई नसते. शेवटी त्यांना ‘निघा आता घरी’ असं म्हणून बाहेर काढावं लागतं. श्रीकृष्ण म्हणतो, ‘माझ्या सौमित्रसारखीच अनेक मुलं आसपास आहेत ही गोष्ट मला कळल्यानं, मी जे काही सौमित्रसाठी करेन, तेच मला इतरांसाठी करता यावं यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यात थोडा-फार यशस्वी झालोय; पण माझं एक स्वप्न आहे. आपल्यानंतर सौमित्रचं काय हा प्रश्न जसा मला भेडसावतो, तसा तो अनेक पालकांना भेडसावत असणार. ही चिंता पालकांना अक्षरशः पोखरून टाकत असते. अशा मुलांच्या स्थिरतेसाठी मला एक जागा घ्यायची आहे. एक ट्रस्ट उभारायची आहे. या जागेवर ही मुलं राहतील, फळं, भाज्या पिकवतील, आणखी काही कामं करू शकतील. त्याबरोबरच इथं एक वृद्धाश्रमही उभारावा. तिथली ज्येष्ठ मंडळी या मुलांकडे बघू शकतील आणि या मुलांनाही त्यांचा आधार वाटेल. एक नवं विस्तारित कुटुंब या निमित्तानं तयार होईल.’श्रीकृष्णचं हेही स्वप्न साकार होवो; मात्र अशा वेळी अनेक प्रश्न मनात गर्दी करतात. शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत, संस्था आहेत; मात्र तिथे राहण्यासाठीचे आर्थिक निकष सगळ्यांना परवडणारे नसतात. अशा वेळी व्यवस्थेकडून वृद्धांसाठी, मानसिक विकलांग आणि अपंग लोकांसाठी काय व्यवस्था आहे? त्यांच्या जगण्यातली अस्थिरता कशी कमी करता येईल?.... असे अनेक प्रश्न! मात्र श्रीकृष्णनं शारीरिक आणि मानसिक व्याधींशी झगडणाऱ्या मुलांचा हा प्रश्न काही अंशी तरी सोडवला आहे. फक्त आपल्याच मुलाचं भविष्य न बघता अनेक मुलांचं भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या श्रीकृष्ण गोडबोले यांच्याशी संवाद साधायचा असल्यास खालील पत्त्यावर त्यांच्याशी जरूर संपर्क साधा.

पत्ता : अल्फा एंटरप्रायजेस, ८१/बी/१३, एमआयडीसी, भोसरी, पुणे 
फोन : (०२०) २७१२१७१५, २७१२९८११. 
 

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(ऑटिस्टिक मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांविषयीचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Archana phatak About 209 Days ago
No words...salute...
0
0
Shirin Kulkarni About 211 Days ago
Inspiring work! Salute to Mr. Godbole and Thanks to Deepa tai and BOI.
0
0
Seema Chavan About 213 Days ago
Very happy to the inspiring story of Shrikrishna Godbole.Salute to him.
0
0
Jayawant Desai About 214 Days ago
True innovative wok
1
0

Select Language
Share Link
 
Search