Next
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० ते १७ जानेवारीदरम्यान
१५० हून अधिक चित्रपट पाहण्याची पुणेकरांना संधी
BOI
Tuesday, December 11, 2018 | 03:01 PM
15 0 0
Share this article:

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या मध्यवर्ती संकल्पनेचे  सोमवारी पुण्यात अनावरण करण्यात आले. या वेळी (डावीकडून) मकरंद साठे, सतीश आळेकर, डॉ. जब्बार पटेल, समर नखाते आणि अभिजित रणदिवे उपस्थित होते.

पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा १० ते १७ जानेवारी, २०१९ दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख संकल्पना  असून, त्याअंतर्गत या महोत्सवात महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार आहे’, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्याचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या व दर वर्षी सिनेप्रेमींच्या उत्सुकतेचा विषय ठरणाऱ्या ‘पिफ’मध्ये या वर्षी ११४ देशांमधून १६३४ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी या वेळी नमूद केले. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते.

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही पुण्यात चार ठिकाणी दहा स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यात पुण्यातील सिटीप्राईड कोथरूड, सिटीप्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड मंगला आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा  (एनएफएआय) समावेश आहे.


या वेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘महात्मा गांधी यांचे योगदान केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अनेक भारतीय आणि जागतिक चित्रपटांमधून त्याचा प्रत्यय येतो. या वर्षी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावरील आणि शिकवणीवरील काही जागतिक दर्जाचे चित्रपट ‘पिफ’मध्ये पाहायला मिळतील.’

या महोत्सवात वर्ल्ड काँपिटिशन, मराठी काँपिटिशन, पुरस्कारार्थी, विद्यार्थी विभाग ‘लाईव्ह अॅक्शन’ आणि ‘अॅनिमेशन’, ‘थीम-इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी, माहितीपट, देश विशेष, ट्रिब्यूट, आशियाई चित्रपट,जागतिक चित्रपट, सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय चित्रपट,आजचा मराठी चित्रपट, विशेष स्क्रीनिंग, कॅलिडोस्कोप अशा विविध विभागातील चित्रपट पहायला मिळतील.

या महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, ११ डिसेंबरपासून या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीस सुरुवात होणार आहे. सिनेप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा सिटी प्राईड मंगला चित्रपटगृह येथे जाऊन ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ करणे अपेक्षित आहे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन २० डिसेंबरपासून वर दिलेल्या तीन ठिकाणी सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसात या वेळात करता येणार आहे. १८ वर्ष पूर्ण असलेले विद्यार्थी, ‘फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून ६०० रुपयांमध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणीशुल्क ८०० रुपये इतके आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search