Next
माझ्या कविता रोजचा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या : सुशीलकुमार शिंदे
मानसी मगरे
Thursday, June 20, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:

सुशीलकुमार शिंदेसुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला नुकताच युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘माझ्या कविता माणसाच्या जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, जाणिवांशी साधर्म्य असलेल्या आहेत,’ असे ते म्हणतात. पुरस्काराच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
...........
आपल्याला मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. तुम्ही साहित्याकडे कसे वळलात, याबद्दल थोडे सांगा
- पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भाटनिमगाव हे माझे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी इंदापूरला होतो. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात यावे लागले. पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि त्यानंतर एमबीए पूर्ण केले. वयाच्या १८व्या वर्षापर्यंतचा काळ ग्रामीण भागात गेल्यामुळे ग्रामीण जीवनाचा प्रभाव होता. गावात साहित्याचे वातावरण असण्याचा तसा संबंध नव्हताच. आयुष्यातला पहिला कवितासंग्रह महाविद्यालयात आल्यावर माझ्या हातात पडला. तोपर्यंत कविता या फक्त पाठ्यपुस्तकातच असतात आणि ते तेवढेच आपले आवडते कवी असतात, हा माझा समज होता. परंतु असे असले, तरी गावात अध्यात्माची परंपरा खूप पूर्वीपासून होती. एकनाथी भारूडे, भागवत सप्ताह, रामायण अशा आपल्या परंपरागत साहित्याशी संबंधित गोष्टी नियमितपणे गावात व्हायच्या. त्यांचा सहवास मला लहानपणापासून लाभला. याशिवाय, माझे वडील सुरुवातीपासूनच एक उत्तम वाचक होते. त्यामुळे घरात वाचनाची पार्श्वभूमी होती. अगदी शाळेत असतानापासून पुस्तके, कादंबऱ्या यांचाही सहवास होता. त्यातून वाचनाची गोडी लागत गेली. 

साहित्यातील प्रत्यक्ष वाटचाल कशी सुरू झाली? पहिला कवितासंग्रह कसा साकारला?
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जावे लागले. मुंबईतल्या या पाच-सहा वर्षांच्या वास्तव्यात असंख्य गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या. बाहेरचे जग अनुभवायला मिळाले. दरम्यानच्या काळात मी एका कादंबरीचे लेखन करत होतो. परंतु मुंबईत वावरत असताना आजूबाजूची परिस्थिती, लोकलचा प्रवास, धारावीसारख्या झोपडपट्ट्यांच्या भागातून असलेला प्रवास, तिथल्या लोकांचे आयुष्य, माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि बाहेरून आलेल्या माणसाची तिथे राहण्यासाठीची रोजची धडपड, जगण्याची स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा कळत-नकळतपणे माझ्यावर खूप खोल परिणाम होत गेला. संवेदनशील असल्याने आजूबाजूला घडणाऱ्या या सगळ्या क्रियांवर माझ्या बाजूने द्यावीशी वाटणारी प्रतिक्रिया मी लेखनाच्या माध्यमातून नोंदवत होतो. तेव्हा कविता म्हणावे असे काहीच लिहिले गेले नव्हते; परंतु कवितासदृश काहीतरी लिहिले जात आहे, इतकेच मला कळत होते. पुढे काही जाणकार मित्रांना ते लेखन दाखवले. ‘याची नीट मांडणी केली, तर या उत्तम कविता होऊ शकतात’ असे त्यांनी सांगितले. त्यावर काही काळ काम केले. पुढे मित्रांच्याच सांगण्यावरून ग्रंथाली प्रकाशनाकडे या कविता पाठवल्या. त्यांच्याकडून या कविता छापण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुस्तक प्रकाशनापूर्वी मी या सगळ्या कविता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. रणधीर शिंदे यांना पाठवल्या. त्यांनी सगळ्याच कवितांचे कौतुक केले. पुस्तकासाठी त्यांनी सुरेख अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनाही कविता पाठवल्या. त्यांना पुस्तकाचे मलपृष्ठ लिहिण्याची विनंती केली. त्यांनी ती लिहिलीदेखील. ‘तुझं लेखन हे अरुण काळे आणि नामदेव ढसाळ यांच्या लेखनाच्या जवळ जाणारं आहे,’ असे जेव्हा मला डहाके सर म्हणाले, तेव्हा ती माझ्यासाठी मोठी पावती होती. मुळात कोल्हटकर, नामदेव ढसाळ, अरुण काळे ही कवितेचा एक वाचक म्हणून माझ्यासाठी नेहमीच मोठी नावे होती आणि त्यांच्या जवळ जाणारी माझी कविता आहे, अशी प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या सगळ्यांशी माझे खरेच आत्मिक नाते आहे, याचा खूप आनंद झाला. मग ‘ग्रंथाली’कडून लतिका भानुशाली यांनी या कवितासंग्रहाचे काम हाती घेतले. कवितांच्या बाबतीत त्यांच्याकडून केल्या गेलेल्या काही मागण्यांची पूर्तता करून अखेर ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय...!’ हा कवितासंग्रह २०१६मध्ये प्रकाशित झाला. 

‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय...!’ या कवितासंग्रहाची नेमकी संकल्पना काय आहे? 
- माझा मूळ पिंड गद्य लिहिण्याचा होता, आहे. त्यामुळे कविता मी लिहू शकेन याबद्दल मी नेहमीच साशंक होतो. या सगळ्या कवितांची थीम अशी काही नक्कीच ठरवलेली नव्हती. जाणीवपूर्वक त्या लिहाव्यात असेही झाले नाही. भालचंद्र नेमाडे सर ज्याप्रमाणे एकदा मला म्हणाले होते, की ‘कविता ही जगण्याचं ऊर्ध्वपातन होऊन येते..’ तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले असे मी म्हणेन. आपल्या आजूबाजूला असंख्य छोट्या-मोठ्या घटना सातत्याने घडत असतात. यातल्या प्रत्येक छोट्या घटनेवर येणारी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही काही एखादी मोठी कादंबरी असू शकत नाही. मग काय, तर त्यातूनच एखादी छोटी, तेवढ्यापुरती कविता नक्कीच होऊ शकते. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस, धारावीसारख्या झोपडपट्टीत राहणारा एखादा माणूस आणि त्याच वेळी मी काम करत असलेल्या कॉर्पोरेट कंपनीतला एखादा माणूस ही अशी कितीतरी वेगवेगळी आयुष्ये मी एकाच दिवसात पाहायचो. त्यामुळे यातून आलेल्या या कवितांमधूनही तेच येत गेले. कोणतेही मोठे शहर हे आज सर्वस्वी मूळ तिथल्या लोकांचे राहिलेले नाही. मुंबई तर नाहीच नाही. मूळच्या मुंबईकरांपेक्षाही बाहेरून येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांची संख्या आज अफाट आहे. हे बाहेरून आलेले लोक, त्यांचे आयुष्य, त्यांचे रोजचे उदरभरण हे सगळेच मुंबईच्या जगण्याचा भाग होऊन गेले आहे. या विस्थापित माणसांचे मुंबईतील आयुष्य या कवितांमधून आले आहे, असे मी म्हणेन. 

‘कुठल्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो,’ असे एक वाक्य तुमच्या कवितेत आहे. त्यावर या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतही भाष्य करण्यात आले आहे. त्याबद्दल काय सांगाल?
- खरे तर हे वाक्य माझ्याकडून आले आहे ते अभिव्यक्तीच्या संदर्भात आहे. लेखकांची मुस्कटदाबी होते. त्यांनी ठराविक एका विषयावरचे लेखन करू नये किंवा त्याबाबत व्यक्त होऊ नये असा दबाव टाकला जातो. संपूर्ण देशभरात या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात. हे पाहताना निश्चितच मी अस्वस्थ होतो आणि मग हेदेखील ठरवले जाते, की जे वाटते आहे, ते प्रसंगी विरोध पत्करून धाडसाने व्यक्त करता आले पाहिजे. तेवढी तयारी एक लेखक म्हणून मी ठेवली पाहिजे. विशेषतः स्त्रीविषयक लेखन करताना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, त्यांना विरोध होतो. परंतु आमच्यासारखे ग्रामीण भागातून आलेले लेखक आयुष्यभर हेच पाहत आलेले असतात, की स्त्री ही सोशिकच असते, ती अनंत काळची सोशिक असते. त्यामुळे स्त्रीबाबत आम्ही हे मांडताना निश्चितच तसाच सूर लागतो, जो साहजिकही असतो. परंतु माझ्या कवितासंग्रहाचा विचार केला, तर त्यातली स्त्री अशी दिसत नाही, ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारी दिसते. ती उभे राहण्याच्या तयारीत असलेली अशी दिसते. त्यामुळे जे जसे असेल आणि जसे वाटेल तसे ते लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा धाडसीपणा एक लेखक म्हणून माझ्यात असावा, असा प्रयत्न निश्चित असतो.

कवितासंग्रहातील कोणत्या बाबीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असे वाटते?
- संग्रहाच्या नावात शहर आले असले, तरी या सगळ्याच कविता शहरावरच्या आहेत, असे नक्कीच नाही. माझी पार्श्वभूमी ग्रामीण भागाची आहे. आजवरच्या आयुष्याचा बहुतांश काळ मी ग्रामीण भागात व्यतीत केला आहे. तेव्हा तिथल्या परिस्थितीचाही अर्थातच मोठा प्रभाव माझ्यावर आणि पर्यायाने माझ्या लेखनावर आहे. गावातली संस्कृती, तिथल्या स्त्रियांची परिस्थिती, आजच्या युगातही असलेले मागासलेपण, पुरुषप्रधान संस्कृतीच्या विचारांचा आजही असलेला पगडा या गोष्टीही या संग्रहातल्या काही कवितांमधून आल्या आहेत. इतकेच नाही, तर गावाकडील स्त्री आता बदलते आहे, काहीतरी सकारात्मक घडते आहे, ती बदलाच्या दिशेने पाऊल टाकते आहे, अशा काही घटना, ज्या मी स्वतः अनुभवल्या आहेत, अशा घटनांचा परिणाम म्हणूनदेखील काही सकारात्मक कविता यात आल्या आहेत. थोडक्यात, वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातील कवितांचा या संग्रहात समावेश आहे. स्त्री-जाणिवांच्या संदर्भातील कविता, लेखक म्हणून माझ्या अभिव्यक्तीवर आलेल्या कविता अशा अनेक प्रकारच्या कवितांचा या संग्रहात समावेश आहे. नेमक्या कोणत्या बाबीसाठी हा पुरस्कार मिळाला, हे सांगणे खरे तर खूप अवघड आहे, परंतु माणसाच्या रोजच्या जगण्याशी साधर्म्य असलेल्या, त्याच्याशी संवाद साधणाऱ्या या कविता आहेत. त्या पुरस्कारायोग्य समजल्या जाण्यामागे कदाचित हेच कारण असू शकते.

साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या नेमक्या भावना काय आहेत?
- हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझी जबाबदारी वाढली असेच मी म्हणेन. त्यातही युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा तुमचे साहित्य चांगले आहे, म्हणून दिला जात नाही, तर आज जे लिहिले आहे, त्यातून तुमच्याकडून पुढे खूप काही चांगले लिहिले जाण्याची शक्यता आहे हे सांगणारा हा पुरस्कार आहे असे मला वाटते. अधिक चांगले लिहिण्याची तुमची क्षमता आहे आणि तिला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार आहे, असे वाटते. पुरस्कार मिळाल्यानंतर लेखकाच्या बाबतीत दोन शक्यता असतात. एक तर तो प्रोत्साहन म्हणून घेणे आणि पुढे आणखी चांगली वाटचाल करणे आणि दुसरे म्हणजे तिथेच थांबून स्वतःतील लेखक संपवणे. म्हणजे, काहींच्या बाबतीत इतका मोठा पुरस्कार मिळाला, तर झाले, आता हात आभाळाला टेकले अशी लेखकाची धारणा होते आणि तो लेखक तिथेच संपतो. मी मात्र हा पुरस्कार नक्कीच प्रोत्साहन म्हणून घेत आहे. माझ्यासाठी लेखन ही वेगळी गोष्ट आहे आणि पुरस्कार ही वेगळी गोष्ट आहे. त्या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याचे काम माझ्याकडून कधीच होणार नाही. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे. परंतु त्यामुळे जबाबदारी वाढली आहे, इतकेच मी समजेन. 

‘आजच्या पिढीकडून सकस लेखन केले जात नाही,’ अशी ओरड हल्ली बऱ्याचदा होते, याबद्दल काय वाटते? 
- पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, तेंडुलकर आणि अशा असंख्य लेखक-कवींची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आणि मराठीत आहे. परंतु यांनी त्या काळात लिहिलेले साहित्य हे त्या त्या काळातील परिस्थितीवरची त्यांची प्रतिक्रिया होती. माणसाची प्रतिभा वेगवेगळीच असते. ती सारखी असावी असा आपला का प्रयत्न असतो, हे मला कधीच उमगत नाही. बहुतांश वेळा साहित्याच्या बाबतीतले आपले आदर्श खूप उच्च प्रतीचे असतात. आधीचे हे सगळे लोक महान होतेच, आहेतच; पण आज पुन्हा पुलं किंवा तेंडुकरच व्हावेत अशी आपली अपेक्षा का असते..? आजचा लेखक-कवी आजच्या परिस्थितीनुसार लेखन करणार, त्यामुळे त्यात बदल असणारच. त्याशिवाय लेखन शक्य नाही. तेव्हा दर्जेदार साहित्याची अपेक्षा नक्कीच असावी. परंतु तसेच साहित्य असावे ही अपेक्षा कुठेतरी मला खटकते. दुसरा मुद्दा असा, की आज लिहिणाऱ्या लेखकांची दखल घेतली जात नाही असेही नाही. मला वाटते, दर्जेदार लेखन करणारे आजच्या पिढीतही असंख्य आहेत, ते नेहमीच होत राहिले आहेत. फक्त हे नवोदितांचे किंवा या पिढीचे साहित्य आजच्या परिस्थितीचा तराजू लावून पाहिले, तरच ते दर्जेदार वाटेल, सकस वाटेल.    

प्रादेशिक भाषेतील लेखकांच्या बाबतीत आपल्याला काय वाटते? 
- आजवर दर्जेदार लेखन करणारे किंवा प्रसिद्ध असलेले लेखक काय लिहीत आले आहेत, तर त्या वेळची परिस्थिती, आजूबाजूला असणारे वातावरण, माणसाच्या रोजच्या जगण्यातली गोष्ट सांगणारे लेखन पोहोचलेले किंवा दर्जेदार समजले गेलेले आपण पाहतो. ज्यांच्या कादंबऱ्यांच्या हजारो प्रती खपतात आणि ज्यांना लाखो-करोडो रुपये रॉयल्टी मिळते असे लेखक मोठे, असे जर कोणी म्हणत असेल, तर मी याला नक्कीच विरोध करीन. याउलट या काळात सर्वांत चांगले कोण लिहू शकेल, तर त्याचे उत्तर प्रादेशिक लेखक असे आहे. कारण रॉयल्टी मिळवणारे लेखक हे माझा प्रकाशक काय विचार करेल, याला रॉयल्टी मिळेल का, ते वाचकाला रुचेल का, चालेल का हा विचार करून लिहिणारे असतात. याउलट प्रादेशिक लेखक या सगळ्या गोष्टींपासून दूर असतात. त्यामुळे दर्जेदार साहित्याचा विचार करता स्वतःसाठी लिहिणारे, स्वतःची प्रतिभा फुलवत लिहिणारे प्रादेशिक लेखक हे उत्तम आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करू शकतात असे मला वाटते.

(सुशीलकुमार शिंदे यांचे मनोगत आणि त्यांनी केलेले कवितेचे सादरीकरण पाहा सोबतच्या व्हिडिओत... ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ हा त्यांचा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search