Next
तुम क्या जानो तुम्हारी याद में...
BOI
Sunday, September 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्यारेलाल संतोषी यांचा स्मृतिदिन सात सप्टेंबर रोजी होऊन गेला. त्याचे औचित्य साधून ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में...’ या त्यांनी लिहिलेल्या गीताचा...
..................
ही चित्रपटांची दुनिया खूप विचित्र आहे. खूप वेगळी आहे. जेव्हा येथे एखाद्याच्या पदरात यश येते, तेव्हा त्याला धो-धो पैसा मिळतो; मात्र जेव्हा त्याचे दिवस फिरतात, तेव्हा त्याला या दुनियेतील कोणीही विचारात नाही. जी व्यक्ती एक वेळ अमृत पिते, तिला नंतर घोटभर पाणीसुद्धा मिळत नाही. असे नशीब असलेल्या एका कलावंताचा स्मृतिदिन सात सप्टेंबरला होऊन गेला. तो कलावंत म्हणजे लेखक, दिग्दर्शक व गीतकार प्यारेलाल संतोषी होय! 

त्यांचे मूळ नाव प्यारेलाल श्रीवास्तव! सात ऑगस्ट १९१६ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. माध्यमिक शाळेत असतानाच ते कविता करून काव्यसंमेलनात भाग घेऊ लागले होते. १९३५-३६च्या सुमारास ते मुंबईत आले. तेव्हा त्यांनी अभिनेत्री, निर्माती जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसची आई) यांच्याकडे सहायक म्हणून कामाला सुरुवात केली. हे साह्य निर्मिती, दिग्दर्शन, गीतलेखन अशा सर्व बाबतींत होते. १९३७मधील ‘मोती का हार’ या जद्दनबाईंच्या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिकाही केली होती. ‘जीवन स्वप्न’ या चित्रपटात चार गाणीही लिहिली होती. 

नंतर ते ‘रणजित मूव्ही टोन’ या संस्थेत दाखल झाले. तेथे १९३८ ते १९४१ या काळात त्यांनी १७-१८ चित्रपटांसाठी गाणी लिहिली. १९४१मध्ये ते ‘बॉम्ब टॉकीज’ संस्थेत गेले. तेथे त्यांनी ‘अंजान’, ‘बसंत’ ‘संग्राम’ या चित्रपटांसाठी गाणी लिहिली व १९४३मध्ये ‘किस्मत’ या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास शाहिद लतीफ यांना साह्य केले. 

प्रभात या नावाजलेल्या चित्रसंस्थेकरिता १९४६मध्ये त्यांनी ‘हम एक है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून आपला दिग्दर्शनाचा प्रभाव दाखवला. ते आधी लेखक व गीतकार म्हणून ओळखले जात होतेच; पण नंतर ते उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. कारण यानंतर त्यांनी शहनाई (१९४७), खिडकी (१९४८) या चित्रपटांचे दिग्दर्शक व गीतकार म्हणून काम पाहिले. तेथेच त्यांची जोडी संगीतकार सी. रामचंद्र यांच्याबरोबर जमली. ‘शहनाई’ या चित्रपटाने संगीताचा एक नवीन प्रवाह आणला. ‘खिडकी’ चित्रपट तसाच! आणि १९५० मध्ये ‘सरगम’... हे चित्रपट हिट आणि त्यांची गाणीही हिट!

अर्थात याच काळात त्यांनी अन्य चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यामध्ये निराला, छमछमाछम, रागरंग, तीन बत्ती चार रास्ता, छोटे बाबू इत्यादी चित्रपटांचा उल्लेख आवश्यक ठरेल. प्यारेलाल संतोषींची गाणी कशी होती? त्यामध्ये ‘मार कटारी मर जाना’सारखे प्रेमातील अपयशी जिवाचे मनोगत होते. तसेच ‘आना मेरी जान संडे के संडे...’सारखे कामचलाऊ शब्दांचे गीतही होते. ‘जब दिल को सताए गम...’सारखे संगीताचे महत्त्व सांगणारे आशयसंपन्न गीत लिहिणारा हा गीतकार ‘हाँ मैं हूँ एक खलासी....’ अगर ‘मैं हूँ अलाद्दीन...’ असले शब्द वापरून ‘म्युझिकल कॉमेडी’ पद्धतीचे गीत लोकप्रिय करताना दिसतो; पण प्रेमातील अर्थपूर्ण गीते लिहिताना त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार कधी ‘वो हमसे चूप है, हम उनसे चूप है....’सारख्या (सरगम) गीतातून बहरतो, तर कधी ‘महफिल में जल उठी शमा...’सारख्या (निराला) गीतातून अश्रूंचे बांध फोडतो. ‘ओ नींद न मुझको आए....’ची (पोस्ट बॉक्स ९९९) प्रेमातील शिकायत आपणही नकळत गुणगुणू लागतो. 

प्यारेलाल संतोषी फक्त गीतकार नव्हते. पटकथा व संवादलेखक संतोषींनी झूला (१९४१), स्टेशन मास्तर (१९४२) हे चित्रपट आकर्षक बनवले होते. दिग्दर्शक संतोषींच्या कलेचा आविष्कार खिडकी, सरगम, अपनी छाया, चालीस बाबा एक चोर यांसारख्या वीस चित्रपटांतून पाहायला मिळतो. ‘शिनशिनाकी बुबला बू’ हा चित्रपट त्यांनी निर्माण केला होता व दिग्दर्शितही केला होता. १९५७च्या ‘हम पंछी एक डाल के’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते व त्याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. 

...पण १९५२नंतर त्यांचा काळ संपुष्टात येऊ लागला! एकेक चित्रपट अपयशी ठरू लागले. साध्या चहासाठी शंभराची नोट देऊन चिल्लर परत न घेणारा, १९४५ ते १९५२च्या कालावधीत एकेका चित्रपटासाठी एकेक लाख रुपये मानधन घेणारा हा कलावंत नंतरच्या काळात अक्षरशः कफल्लक झाला. ‘शराब’ व ‘शबाब’ या पायी ते रसातळाला पोहोचले. त्यांचेच मित्र, परिचित त्यांना टाळू लागले. एकदा दाराशी आल्यावर त्यांना बघून जे दार बंद केले गेले, ते उघडलेच गेले नाही. रात्रभर ते त्या दाराशी बसून होते. 

सात सप्टेंबर १९७८ रोजी वयाच्या ६२व्या वर्षी ते हे जग सोडून गेले. संतोषींचा मुलगा राजकुमार संतोषी त्यांच्यासारखाच उत्कृष्ट दिग्दर्शक बनला. आज संतोषींची फक्त तीच आठवण चित्रपट जगतात आहे असे नव्हे, तर त्यांच्या आशयसंपन्न प्रीतिगीतांमुळे आजही ते आपल्यातच आहेत. त्यामधीलच एक सुनहरे गीत आपण आज पाहू या. 

एखाद्यावर आपण जिवापाड प्रेम करावे; पण त्या व्यक्तीला त्याचे काहीच वाटत नाही, हे लक्षात आल्यावर जिवापाड प्रेम करणारा तो अगर ती यांच्या भावना काय असतील, ते संतोषींनी किती समर्पक शब्दांत आणि अलंकारिक भाषेत काव्यात उतरवले आहे, ते बघा. असे वाटते, की हा अनुभव जणू काही त्यांनी स्वत:च घेतला होता. त्याच्या/तिच्या भावना उतरवताना ज्याच्यावर प्रेम केले त्याला ते सांगतात, की -

रैन गुजारी तारे गिन गिन, चैनसे जब तुम सोए

तुम्हाला काय ठाऊक, की आम्ही तुमच्या आठवणीने अश्रूंचे किती बांध फोडले ते? (जेव्हा जेव्हा) रात्रीच्या शांत प्रहरी तुम्ही सुखासीनतेने निद्रादेवीच्या अधीन झालात, तेव्हा (तेव्हा तेव्हा आम्ही मात्र तुमची आठवण होऊन बैचेन झाल्यामुळे फक्त) आम्ही आकाशातील तारे मोजत बसलो. 

कितनी कलियाँ खिली चमन में, खिलके फिर मुरझा गई 
बिरहन की इस भोले मन को बार बार समझा गई 
रोके जवानी काटी जिसने प्रीत के बीज बोए 

(सभोवार बगीच्यात किती तरी कळ्या उमलून त्यांचे फुलात रूपांतर होते. तद्वत आमच्या मनरूपी) बागेतही (तुमच्या सहवासाच्या, तुमच्या प्रेमाच्या) कलिका (रूपी इच्छा निर्माण झाल्या) उमलल्या; पण हाय रे दुर्दैवा, त्या कलिका पूर्ण उमलून त्यांचे फुलात रूपांतर होण्याआधीच त्या कोमेजल्या गेल्या. (थोडक्यात काय, तर तुमच्या प्राप्तीच्या आशा-आकांक्षा मनात निर्माण झाल्या; पण त्यांची पूर्तता झाली नाही.) (अर्धवट उमलून सुकून गेलेली ती फुले या) विरहात दु:खी झालेल्या माझ्या मनाला वारंवार समजावून गेली, (की अगं वेडे हा प्रीतीचा खेळ असाच विचित्र असतो) की ज्याने कोणी हा प्रीतीचा अंकुर आपल्या मनात रुजवला त्याने त्याचे तारुण्य अश्रू ढाळण्यातच घालवले (हे लक्षात ठेव).

विरहाग्नीत पोळलेली ही प्रेमिका आपले दु:ख व्यक्त करताना पुढे सांगते, की -

कितने बादल घिरे गगन में घिरके फिर न बरसे 
प्यास दबाकर दिल की दिल में इतना तडपे तरसे 
दर्द हमारा दिल जाने या नैना खोए खोए

(आकाश किती तरी कृष्णमेघांनी भरून येते; पण कित्येकदा त्यातील एक मेघसुद्धा वर्षाव करत नाही. त्याप्रमाणे मनरूपी) आकाशात (इच्छा-आकांक्षांचे) बरेच मेघ येतात (पण त्यातील एकही इच्छा पूर्ण होत नाही); पण इच्छापूर्तीचा आनंद न देताच ते मेघ निघून जातात. (तुमच्या प्रीतीच्या बाबतीत तसेच घडले.) मनातल्या इच्छा आम्ही व्यक्त न करता मनातच ठेवल्याने आमच्या मनाची एवढी तडफड झाली, की बस. आमचे हे दु:ख आमच्या हृदयालाच ठाऊक (दुसऱ्याला ते कसे कळावे?) (तुमची वाट बघून, तुम्हाला शोधून शोधून आमचे हे) नेत्र मात्र आता निस्तेज झाले आहेत. ते आमच्यापासून जणू हरवून गेले आहेत.

फक्त दोन कडव्यांचे हे गीत; पण केवढे आशयसंपन्न! त्याची आशयसंपन्नता जाणून संगीतकार सी. रामचंद्र यांनी त्याची साजेशी चाल सुयोग्य वाद्यमेळाने तयार केली. स्वरसम्राज्ञीचा स्वर तर या गीतात एवढा दर्दभरा जाणवतो, की जणू काही त्या ते दु:ख जगत आहेत असे वाटते. १९५२च्या ‘शिनशिनाकी बुबला बू’ या चित्रपटातील हे गीत. आज त्याला जवळजवळ ६४-६५ वर्ष झाली तरीही ते आवर्जून ऐकावेसे वाटते. एवढे ते ‘सुनहरे’ आहे. 

पी. एल. संतोषी अशीच सुंदर सुंदर गीते लिहीत होते. सुंदर दिग्दर्शन करत होते; पण प्रत्येकाचा एकेक काळ असतो. ‘किस्मत हमारे साथ है, जलनेवाले जला करे’ असे काव्य लिहिणाऱ्या संतोषींची किस्मत बदलली. सारे होत्याचे नव्हते झाले. विस्कटलेला डाव खेळातला असो अगर जीवनाचा असो, तो थोडाच पुन्हा पहिल्यासारखा मांडता येतो? संतोषींनाही ते जमले नाही. म्हणूनच त्यांनी त्याच दु:खात या जगाचा निरोप घेतला. ‘सुनहरी गीते’ लिहिणाऱ्याचा शेवट ‘सुनहरा’ झाला नाही.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search