Next
पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील
संदेश सप्रे
Friday, October 26, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

आकाशकंदिल बनविण्यात व्यस्त असलेल्या महिला

देवरुख : महिला बचत गटांच्या पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील श्री सद्गुरू सेवा सहकारी संस्थेतील महिलांनी एक नवी वाट चोखाळली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने या गटातील महिलांनी आकाशकंदील बनवण्याची ऑर्डर स्वीकारली असून, त्यांनी बनविलेले तब्बल साडेतीन हजार कंदील मुंबई-पुण्यातील घरांची शोभा वाढवणार आहेत. महिलांनी बनवलेले आकाशकंदील, मातीच्या पणत्या, फराळ, कापडी पिशव्या, ज्वेलरी यांचे प्रदर्शनही भरविले जाणार आहे.

आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार माल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत या गटांनी उपलब्ध करून दिला आहे. महिलांनी तयार केलेले हे आकाशकंदील पुण्या-मुंबईतील घरांची शोभा वाढवणार आहेत. मातृमंदिर या सेवाभावी संस्थेत महिलांसाठी काम करणार्‍या शारदा सावंत यांनी २०१०मध्ये श्री सदगुरू सेवा सहकारी संस्था स्थापन केली. परिसरातील महिलांना संघटीत करून त्यांना रोजगाराचे प्रशिक्षण देत गेल्या आठ वर्षांत त्यांनी नव-नवे उपक्रम राबवले आहेत. मातीचे गणपती, करवंटीपासून आकर्षक भेटवस्तू, बांबूपासून गिफ्ट, मातीच्या पणत्या, आकर्षक राख्या, गोधडी, भेटवस्तू, विविध स्पर्धांसाठी चषक, सन्मानचिन्ह बनविणे अशी कामे त्या महिलांकडून करून घेतात.

यात या वर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्यांनी साडेतीन हजार आकाशकंदिलांची ऑर्डर त्यांनी स्वीकारली. विविध रंगांचे, आकाराचे, नावीन्यपूर्ण आकाशकंदील संस्थेच्या कार्यालयात बनविण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. मुंबईतील प्रणव कासकर यांनी याकामी संस्थेच्या महिलांना प्रशिक्षण दिलेच, शिवाय आकाशकंदिलांसाठी लागणारे सर्व साहित्य आणि कागदही पुरवला. दसर्‍याच्या मुहूर्तावर हे काम सुरू झाले. प्रणव कासकर स्वतः देवरुखात बसून ही ऑर्डर पूर्ण करून घेत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात हे आकाशकंदील विकले जाणार आहेत.

परिसरातील ८० महिला सध्या आकाशकंदील बनविण्याच्या कामात मग्न आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत या महिला संस्थेत काम करतात. ज्या महिलांना शक्य आहे त्या महिला पुढील काम घरात जाऊन पूर्ण करतात. यातून जेवढे काम तेवढे अर्थार्जन असा सोपा फंडा वापरण्यात आला आहे. या कामात सावंत यांच्या नेतृत्वाखाली धनश्री ठीक आणि महेंद्र घुग महिलांना मदत करीत आहेत.

ऑर्डर वगळता २०० प्रकारचे पारंपरिक आकाशकंदील, मातीच्या पणत्या, फराळ, कापडी पिशव्या, ज्वेलरी अशा महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ३१ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या काळात देवरुखच्या मातृमंदिर संस्थेत  होणार आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना संस्थाध्यक्षा सावंत म्हणाल्या, ‘आम्ही या महिलांना प्रशिक्षण देऊन हंगामी वस्तू बनवून घेतो. यातून या महिलांना वर्षभर रोजगार मिळतोच. शिवाय  यात दिवसाची कमाई ४०० ते ५०० रुपयांपर्यंत जाते. संसार सांभाळणार्‍या महिलांसाठी हीच कमाई उपयोगी पडते. हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.’

संपर्क :
शारदा सावंत - ८४२१६ ६२२४८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BalKrishna Gramopadhye About 212 Days ago
Good idea . Worth trying . Any followers? may be , not many are Aware of it .
1
0
G.D.kamble About 353 Days ago
खुप सुंंदर उपक्रम कोकणात सहकाराला चालना देनारा
2
0

Select Language
Share Link
 
Search