Next
‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो’
प्राची गावस्कर
Monday, October 01, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

कौशल इनामदारकौशल इनामदार हे संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव. संगीत क्षेत्रातच आपल्याला कारकीर्द करायची आहे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली. बरोबरीचे लोक आयुष्यात स्थिरावले तरी कोणत्या क्षेत्रात कारकीर्द करायची याचा निर्णय झाला नव्हता; मात्र सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांना साथ दिली आणि ते यशस्वी झाले. ‘नकारात्मक व्हायला मला वेळच नसतो,’ असे ते म्हणतात. ‘बी पॉझिटिव्ह’ सदरात आज जाणून घेऊ या कौशल इनामदार यांच्या सकारात्मक विचारांबद्दल...
........
- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कोणता?
- माझे आई-वडील हा माझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत. त्यांनी मला सतत काहीतरी करत राहण्याची प्रेरणा दिली. ‘एखादी गोष्ट आली नाही, कुठल्याही गोष्टीत यश आले नाही तरी आयुष्य वाया गेले असे नसते. शिकलेली गोष्ट नेहमीच उपयोगी ठरते. कोणताही क्षण वाया जात नसतो,’ हे लहानपणापासून त्यांनी मला शिकवले. 

- संगीत क्षेत्रात येण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
- आपण नेमके कुठल्या क्षेत्रात जायचे हे मला कितीतरी वर्षे कळत नव्हते. खरे तर माझा जो प्रॉब्लेम झाला तो अनेक मुलांचा होत असेल. अकरावीपासून पदवीचे शिक्षण घेईपर्यंत नेमकी कोणत्या क्षेत्रात कारकीर्द करायची हे निश्चित झाले नव्हते. अकरावीला कला शाखा निवडली, तेव्हा मला नागरी सेवेच्या परीक्षा द्यायच्या होत्या. बारावीत गेल्यानंतर ‘या परीक्षा द्यायच्या नाहीत,’ इतकेच नक्की ठरले होते. पदवीच्या पहिल्या वर्षाला गेलो तेव्हा असे वाटले, की राजकारण हे चांगले क्षेत्र आहे. आपण या क्षेत्रात जाऊन कारकीर्द घडवावी. देशाचा पंतप्रधान व्हावे, असे मला वाटत होते. दुसऱ्या वर्षी मला वाटले, की पत्रकारितेत जावे, तर तिसऱ्या वर्षाला येईपर्यंत मला वकील होण्याचे वेध लागले होते; पण कलाक्षेत्रात येण्याचा विचारही माझ्या मनाला स्पर्शून गेला नव्हता. दोलायमान परिस्थितीत असताना मी वकिलीचे शिक्षण घेण्याचे ठरवले. दोन वर्षे मी ते शिक्षण घेतले. पहिल्या वर्षी मला त्यात अपयश आले. मग मी लेखक व्हायचे ठरवले. मालिकांसाठी लेखन केले; पण मी बेचैन होतो. जेव्हा गाणी लिहायला आणि त्यांना चाली द्यायला लागलो, तेव्हा मला जाणवले, की यात मला मनापासून आनंद मिळतोय. तोपर्यंत माझे मित्र शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय करू लागले होते, कमवायला लागले होते. आयुष्यात काय करायचे आहे, ते त्यांचे ठरले होते; माझे मात्र ठरत नव्हते; पण जेव्हा मी संगीत क्षेत्रातच राहायचे ठरवले, तेव्हा मात्र कोणत्याही अडथळ्याने, आमिषाने मी मागे फिरलो नाही. या दरम्यान, माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी ज्योतिष्याकडे जाण्याचा सल्ला दिला. माझा फारसा विश्वास नव्हता; पण तरीही मी गेलो. त्याने मला सांगितले, ‘संगीत सोडून काहीही कर. त्यात तुला यश नाही.’ परत येताना मी ठरवले, की संगीतातच कारकीर्द करायची. असा विचार केला, की मी संगीतात कारकीर्द करू नये, असे संकेत त्याला मिळाले असतील; पण अशी कोणती तरी वरचढ शक्ती असेल, की ती असे ठरवेल, की ‘मला संगीतातच यश मिळेल. संगीतच माझे प्राक्तन आहे.’ संगीत क्षेत्रात यायचा निर्णय खूप उशिरा घेतला गेला; पण यासाठी मला मदत झाली ती माझ्यातील सकारात्मक ऊर्जेची. 

- तुमच्या आयुष्यातील असा एखादा कठीण प्रसंग, की ज्या वेळी सकारात्मक ऊर्जेमुळे तग धरता आला?
- आपल्याला आवडत्या कलाक्षेत्रात काम करत असताना उपजीविकेसाठी काही नावडती कामे करावी लागणे हे फार रुचत नाही. काही काळ मी टेलिव्हिजनसाठी पार्श्वसंगीत करत होतो. माझी ८० टक्के कमाई या कामातून होत होती. रोज स्टुडिओमध्ये जायचे, दिवसभर काम करायचे, परत यायचे असे चालू होते; पण यातून शैथिल्य येत आहे की काय असे वाटू लागले. कला क्षेत्रात अस्थिर असणे म्हणजे स्थैर्य असते. अखेर मी ते काम सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्यातील सकारात्मक ऊर्जेची मदत झाली. त्याचबरोबर माझ्या बायकोचा सकारात्मक दृष्टिकोन, पाठिंबाही महत्त्वाचा ठरला. तिने सांगितले, ‘तुझे मन या कामात रमत नाही. बाहेर पडायचे आहे, तर खुशाल बाहेर पड. मी आहे बरोबर, काहीतरी नक्की करू.’ एका रात्रीत माझा ८० टक्के कमाईचा स्रोत बंद झाला. माझे सगळे चांगले काम त्यानंतर झाले आहे. कठीण निर्णय घ्यावेच लागतात. भीती सगळ्यांनाच वाटते; पण त्यातून पुढे जावे लागतेच. 

- निराशा आली की तुम्ही काय करता?
- अनेक लोक निराशा आली, की गाणी म्हणतात. मीही गाणी म्हणतो. अनेक गोष्टी करतो. अनेकदा चाल लावायची असते; पण सुचतच नसते काही. अशा वेळी मी जनसंपर्क वाढवतो. चांगले वाचन, लोकांशी बोलणे, चित्रपट, नाटके बघणे, चिंतन, मनन करणे अशा अनेक गोष्टी करतो. स्वतःबरोबर चांगला वेळ घालवणे हा माझा उत्तम उपाय आहे. मुंबईत प्रवास करताना जो वेळ मी स्वतःबरोबर घालवतो, तो अधिक चांगला असतो. एरव्ही आपण काहीतरी देण्याच्या प्रयत्नात असतो. निराश, उदासवाणे वाटत असले, की मी ‘इन्पुट’कडे वळतो. बाहेरून मी प्रेरणा घेत असतो. चांगले वाचन, इतरांचे ऐकणे, संवाद साधणे याद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न मी करतो. 

- सकारात्मक राहण्यासाठी लोकांना काय सांगाल?
- सकारात्मक जगणे ही आपली गरज आहे. ती चैन किंवा मजेची गोष्ट नाही. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांमध्ये राहा. दुसरी गोष्ट म्हणजे मदत मागायला लाजू नका. तिसरी गोष्ट म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येकाला निराशा कधी ना कधी येतेच. अशा वेळी आपली अवस्था लपवून ठेवण्याऐवजी मोकळेपणे आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा. निराशेच्या प्रदेशानंतर आशेचा प्रदेश असतो. तो बघण्यासाठी मदतीची गरज असते. अशा वेळी संकोच न बाळगता मोकळेपणे बोला. आपले सगळे चांगले काम मनःस्थिती सकारात्मक असेल तेव्हाच होते. त्यामुळे निराश, हताश वाटत असेल तर अपराधी वाटून न घेता, संवाद साधा. 

- सकारात्मकतेसाठी कोणत्या गोष्टींची भूमिका महत्त्वाची ठरते?
- कला, पुस्तके, माणसे या सगळ्या गोष्टी माझे आयुष्य समृद्ध करतात. आजूबाजूला काही घडत नसेल, तर मला निराशेच्या गर्तेत जायला होईल. रिकामा वेळ असला, की मी काहीतरी करत असतो. नकारात्मक विचारांसाठी मला वेळ नसतोच. बाहेर सकारात्मक काहीतरी घडत असतेच. कुणीही नकारात्मक विचाराला स्थान देऊ नये. नकारात्मक वाटले, तर काहीतरी करावे. झाडे लावा, गाणे लावा, काहीही करा; पण सतत स्वतःला गुंतवून ठेवा. सकारात्मक राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. 

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. कौशल इनामदार यांच्या मुलाखतीचा व्हिडिओही सोबत देत आहोत. कौशल इनामदार यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या वाचकांसाठी सादर केलेल्या ‘झोका मंद झुले’ या कवितेचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search