Next
राष्ट्रपतिपदाची निवडणूक १७ जुलैला
BOI
Thursday, June 08, 2017 | 02:30 PM
15 0 0
Share this article:

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनवी दिल्ली : देशाचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला नवे राष्ट्रपती लाभणार असून, त्यासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी मतदान होणार असून, २० जुलैला मतमोजणी होणार आहे. नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी आपल्या पदाची शपथ घेतील. 

राष्ट्रपतींचे निवासस्थान नवी दिल्लीत ‘रायसीना हिल्स’ या टेकडीवर आहे. देशाचे आणि पर्यायाने या ‘रायसीना हिल्स’चे नवे अधिपती कोण, याची चर्चा आता सुरू झाली आहे. २५ जुलैपूर्वी किमान ६० दिवस निवडणुकीची घोषणा करणे बंधनकारक असल्याने मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, तसेच निवणूक आयुक्त डॉ. ए. के. ज्योती व ओ. पी. रावत यांनी हा कार्यक्रम घोषित केला. इच्छुक उमेदवार २८ जूनपर्यंत अर्ज भरू शकतात.

झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, महात्मा गांधींचे नातू आणि राजनैतिक अधिकारी गोपाळकृष्ण गांधी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यापासून ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची राष्ट्रपतिपदासाठी प्रामुख्याने चर्चा आहे. अर्थात,  ऐन वेळी एखादे अनपेक्षित नाव समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त राजकारणात नसलेल्याही अनेक नावांबद्दल राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे. यामध्ये रतन टाटा, अझीम प्रेमजी, नारायणमूर्ती, इतकेच नाही तर अगदी अमिताभ बच्चनपर्यंत अनेक जणांची नावे घेतली जात आहेत.

या निवडणुकीत खासदार आणि आमदार यांना निवडणुकीचा अधिकार असतो. ७७६ खासदार आणि ४१२० आमदारांच्या मतांची एकूण किंमत १०,९८,८८२ इतकी आहे. याबाबतची अधिसूचना १४ जून रोजी निघेल आणि मतदारांची नेमकी संख्या त्याच वेळी जाहीर होईल. संसदेच्या खोली क्रमांक ६२ मध्ये किंवा मुंबईतील विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील सेंट्रल हॉलमध्ये मतदान केंद्र असेल.

ठळक मुद्दे :
मतदार मंडळ : ७७६ खासदार व ४१२० आमदार
मतांची संख्या : १०,९८,८८२
बहुमतासाठी आकडा : ५,४९,४४२
एका खासदाराच्या मताचे मूल्य : ७०८
(आमदाराच्या मताचे मूल्य प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे म्हणजे तेथील लोकसंख्येवर आधारित असते.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search