Next
रोमन हॉलिडे
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, November 14 | 02:28 PM
15 0 0
Share this story

काही प्रेमकथांमध्ये प्रेमी जीव अनाहूतपणे एकत्र येतात... सहवासातून दोस्ती होते... प्रेमळ साथ मिळते... पण ते प्रेम... एका कायमस्वरूपी नात्यात बदलेपर्यंत जुदाईचा क्षण येतो आणि ते बघणारा प्रेक्षकही हळहळतो... दिग्दर्शक विली वायलरची ‘रोमन हॉलिडे’ ही अशीच चुटपुट लावणारी प्रेमकथा... ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबर्नच्या हळुवार प्रेमाच्या प्रेमात पाडणारी कथा.... ‘लिव्ह्ड, लव्ह्ड अँड फिल्म्ड इन रोम’ असं जिचं सार्थ वर्णन केलं गेलं त्या ‘रोमन हॉलिडे’बद्दल आज ‘सिनेसफर’मध्ये...
...........
मुळात कॅरी ग्रँट आणि लीझ टेलरला घेऊन फ्रँक काप्रा ‘रोमन हॉलिडे’ ही फिल्म बनवणार होता; पण पॅरामाउंट स्टुडिओकडे ही कथा आली काय.... काप्रा जाऊन विल्यम वायलर दिग्दर्शक म्हणून आला काय.... त्याने ग्रेगरी पेकच्या साथीला अत्यंत लाघवी, गोड दिसणाऱ्या नाजूक ऑड्री हेपबर्नला ही भूमिका दिली काय आणि सिनेमाने इतिहास घडवला काय. सात ऑस्कर नामांकनं मिळाली आणि प्रत्यक्षात तीन ऑस्कर्स प्राप्त झाली, ज्यात अर्थातच ऑड्री हेपबर्नचं अभिनयाचं ऑस्कर होतंच!

असं म्हणतात, की त्या वेळी सिनेमा रिलीज होण्याआधी, खूप मोठा स्टार असणाऱ्या ग्रेगरी पेकने ‘इंट्रोड्यूसिंग ऑड्री हेपबर्न’ अशी तिची छोट्या लायनीत बोळवण न करता आपल्याबरोबरीने तिचं नाव ठळक अक्षरात पोस्टरवर असावं असा आग्रह धरला होता. त्याच्या मते ऑड्रीने अफलातून काम केलं असून तिला ऑस्करही मिळू शकतं.... खरोखरीच तसं घडलं नंतर! 

गंमत म्हणजे ज्या स्कूटरवरून दोघं रोम शहर फिरतात ती पिआज्जो कंपनीची व्हेस्पा स्कूटरसुद्धा (‘०’ सिरीज, शॅस्सी नंबर १००३) लोकांना भावली आणि त्या प्रकारच्या स्कूटर्सचा सेल रातोरात वाढला होता. विशेष म्हणजे या सिनेमात वापरल्या गेलेल्या त्या स्कूटरचा याच वर्षी म्हणजे मार्च २०१७मध्ये लिलाव होऊन ती चक्क दोन लाख युरोंना (दीड कोटी रुपये) विकली गेली. 

सिनेमा सुरू झाल्यावर आपल्याला दिसते ती युरोपमधल्या (कुठल्यातरी) देशाची प्रिन्सेस अॅना (ऑड्री हेपबर्न)... युरोपमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना सदिच्छा भेट देत असताना. लंडन, अॅमस्टरडॅम, पॅरिस करून ती पोहोचली आहे रोममध्ये. तिथे तिचं शाही स्वागत होताना दिसतं. तिच्या स्वागताप्रीत्यर्थ त्यांच्या देशाच्या राजदूताने जंगी पार्टी ठेवली आहे. एकेका प्रतिष्ठित पाहुण्याची ओळख करून दिली जात आहे. तिला ते शिष्टाचाराचं कृत्रिम स्मित करताना एकीकडे पायात बूट चावायला लागलाय. ती एकीकडे ते करत असताना कुणाचं लक्ष जाणार नाही अशा बेताने हळूच बुटातून उजवा पाय बाहेर काढून मोकळा करते. डाव्या पायाला खाजवूनही घेते. तेवढ्यात बूट सटकून तिच्या घोळदार झग्याबाहेर... मग तो उलटसुलट करत सावरताना तिची पंचाईत... हे पहिलंच दृश्य तिच्यातली ती अल्लड, मासूम बालिका दाखवणारं.

एकूणच सगळा शिष्टाचार, पाहुणचार, भेटीगाठी, कृत्रिम वागणं आणि अत्यंत व्यग्र शेड्युलच्या भडिमाराने ती प्रचंड वैतागली आहे. आक्रस्ताळी झाली आहे. तिच्यासाठी आलेला डॉक्टर तिला झोपेचं इंजेक्शन देऊन, त्याचा सावकाश परिणाम होईल सांगून जातो. तिला बरं वाटावं म्हणून तिला हवं ते तिनं करावं असंही सांगतो. ती समाधानाने हसते. 

सगळे जण गेल्यावर ती पटापट ड्रेस चढवते आणि चक्क त्या पॅलेसमधून बाल्कनीतून उडी मारून सटकते. सामान नेण्यासाठी आलेल्या एका टेम्पोमध्ये जाऊन लपते. टेम्पो पॅलेसच्या गेटच्या बाहेर आल्यावर ती हळूच डोकं वर काढते. आता रोमच्या रस्त्यांवरून टेम्पोत मागे बसून फिरताना तिला खूपच छान वाटतंय. एका ठिकाणी ती उतरते; पण आता त्या झोपेच्या इंजेक्शनचा अंमल चढायला लागलाय. जांभया देत ती फुटपाथवरच्या एका बाकावर झोपते. झोपेतच काही बडबडत वळताना ती बाकावरून पडणारच असते, तेवढ्यात तिथूनच घरी निघालेला ज्यो ब्रॅडली (ग्रेगरी पेक) हा पत्रकार तिला सावरतो. तिचा तोल जाणं आणि बडबड ऐकून त्याला ती दारूच्या नशेत आहे असंच वाटतं. ‘झेपत नसेल तर एवढी पिऊ नये माणसाने’ असं तो तिला सुनावतोसुद्धा. तिला घरी जाण्यासाठी टॅक्सी थांबवतो; पण आता ती एवढी झोपेत आहे, की पत्ता सांगणं दूरच, काहीच बोलू शकत नाहीये. निरुपायाने ज्यो तिला आपल्या अपार्टमेंटवर घेऊन जातो. (तिकडे पॅलेसमध्ये ती नसल्याचं लक्षात येऊन सर्वांचं धाबं दणाणलंय. शोधाशोध सुरू आहे. ती हरवल्याचं कोणालाही कळता कामा नये असं सांगून राजदूत ती आजारी पडली आहे असं खोटंच भासवून पुढच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल करवतो). 

सकाळ झाल्यानंतर, तिच्यापायी झोपायला उशीर झालेला ज्यो कसाबसा ऑफिसला जातो. आज त्याने रोमभेटीवर आलेल्या प्रिन्सेसची भेट घेणं अपेक्षित होतं म्हणून ऑफिसला गेल्या गेल्या तो संपादकाला इंटरव्ह्यू संपवूनच आल्याचं ठोकून देतो. चलाख संपादक त्याला घोळात घेत बरेच प्रश्न विचारतो आणि शेवटी प्रिन्सेस अचानक आजारी पडल्याने तिच्या सर्वच अपॉइंटमेंट्स कॅन्सल झाल्याची पेपरातली ठळक बातमी दाखवून त्याला खोटं बोलल्याबद्दल फैलावर घेतो. पेपरमधल्या तिच्या फोटोवर नजर गेल्यावर आपल्या घरी आपण जिला रात्री आसरा दिलाय ती हीच, हे लक्षात येऊन ज्यो क्षणभर दचकतो; पण त्याला लगेच पुढची सनसनाटी न्यूज दिसायला लागते. तो लगेच संपादकाला पटवून तिचा ‘न भूतो’ एक्स्क्लुझिव्ह इंटरव्ह्यू मिळवून दाखवण्याचं प्रॉमिस देतो आणि त्या बदल्यात पाच हजार डॉलर्सचं घसघशीत बक्षीस कबूल करून घेतो. 

ताबडतोब घरी येऊन अजूनही झोपेतच असलेल्या तिच्या तोंडून ती प्रिन्सेस असल्याची खात्री करून घेतो. मग मात्र आदल्या रात्री तिला कसंतरी लाकडी कॉटवर झोपवलेल्या तिला उचलून तो मऊ बेडवर अलगद उचलून ठेवतो... थोड्या वेळाने उठल्यावर तिला स्त्रीसुलभ जाणीव होते, की तिने एका सर्वस्वी अनोळखी माणसाच्या रूमवर रात्र काढली आहे... त्याचा सदरा पायजमा घालून.... पण मग ती स्वतःला सावरते आणि आपण प्रिन्सेस आहोत हे लपवून आपली ओळख ‘आन्या’ अशी करून देते... ती तयार होईपर्यंत ज्यो त्यांच्या फोटोग्राफर मित्राला अर्विंगला (एडी अल्बर्ट) फोन करून अर्जंट भेटायला येण्याची विनंती करतो; पण तो गडी ते टाळतो. इकडे प्रिन्सेस आंघोळ करून तिचे कपडे घालून निघते. महत्त्वाच्या कामासाठी अर्जंट जायला लागणार असल्याचं सांगून ज्योकडून परत करण्याच्या बोलीवर थोडे पैसे उधार घेऊन निघते.... ज्यो तिच्या नकळत तिचा पाठलाग सुरू करतो. त्याची सनसनाटी न्यूज डोळ्यांदेखत निघून चाललेली असते; पण तिने सुरक्षित असावं हेही कुठेतरी त्याच्या मनात...

प्रिन्सेस अॅना आयुष्यात प्रथमच इतकं स्वातंत्र्य महसूस करते आहे. चालणारे अंगरक्षक जवळ नाहीत... लवाजमा नाही... तिची ती!!... मोकळी... स्वच्छंद.... ती कडेच्या शॉपमधून सँडल्स विकत घेते...मग लहर आल्यावर एका सलूनमध्ये घुसून आपले लांब केस कापून चक्क बॉबकट करून घेते.... तिला आता आणखीच मोकळंढाकळं वाटतंय....मुक्त फिरतेय ती रोममध्ये... ज्यो अर्थातच तिच्या मागे... ती एका ठिकाणी बसून आइस्क्रीम एन्जॉय करते.. .ज्यो समोर जाऊन अचानक भेटल्याचं नाटक करतो... तिच्या ‘महत्त्वाच्या कामाची’ चौकशी करतो.... मग ती त्याला, ‘काम वगैरे काही नव्हतं. मी खोटं बोलले. खरं तर मी शाळेच्या होस्टेलमधून पळून आले आहे रात्री’ वगैरे थाप ठोकते.... तिला मजा करायचीय... गल्लीबोळात मुक्त फिरायचंय... रोडसाइड कॅफेत बसून कॉफी प्यायच्येय..... विंडोशॉपिंग करायचंय... पावसात भिजत फिरायचंय.... ज्योला मजा वाटते ते ऐकताना.... तिनं पुन्हा निघायचं म्हटल्यावर तो एकत्र एक दिवस तिला हवं तसं मजा करायला तिच्याबरोबर येण्याची तयारी दाखवतो आणी तिथून सुरू होते दोघांची मस्त सफर..... रोममध्ये धमाल एकत्र फिरणं.... त्यांना अर्विनही येऊन भेटतो... मग तो तिचे नकळत फोटो काढणं सुरू करतो.....

प्रिन्सेसचं ज्योबरोबर व्हेस्पा स्कूटरवरून रोममध्ये मुक्त फिरणं सुरू होतं..... ज्यो तिला ‘माउथ ऑफ ट्रुथ’ बघायला नेतो... अशी वदंता असते, की त्याच्या उघड्या तोंडातून आत हात घालायचा आणि जर का तुम्ही खोटं बोलणारे असाल तर तुमचा हात मनगटापासून कापला जातो.... प्रिन्सेस ते ऐकून दचकते.... ती तर खोटं बोललीय त्याच्याशी... ती त्यालाच आधी ट्राय करायला सांगते.... ज्यो हात त्या उघड्या तोंडात घालतो आणि हात तुटल्याची अॅक्टिंग करतो... ती घाबरते... पण मग त्याने कोटाच्या बाहीतून हात सुखरूप दाखवल्यावर त्याला लटकेच मारत त्याच्या मिठीत शिरते.... त्यांच्यात एक मोकळेपणा आलाय आता...
पुढे दोघे एका डान्सपार्टीत जातात... तिच्या शोधासाठी आलेले गुप्तहेर तिला पकडून नेणार तेव्हा ती ज्योला मदतीसाठी हाका मारते..... तुफान हाणामारी आणि ज्यो आणि अॅन तिथून नदीत उडी मारून सटकतात....

भिजून तिला हुडहुडी भरली आहे... बोलता बोलता दोघं जवळ येतात. एक गोड किस..... दोघं ज्योच्या अपार्टमेंटवर येतात. तिला त्याच्या सहवासात आता खूपच सुरक्षित वाटतंय. दिवसभरातल्या सर्वच घटनांनी... एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांनी दोघांच्यात अनोखा अनुबंध तयार झालाय. ती त्याच्या बाहुपाशात येते..... त्याच्या रूममधल्या रेडिओवरच्या न्यूज बुलेटिनमध्ये तिच्या देशाची जनता तिच्या अचानक गायब होण्याने प्रचंड काळजीत पडल्याचं आणि तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं तिला समजतं. तिला जाणीव होते आता तिला निघायला हवं...
.
तिला खरं तर त्याला सोडवत नाहीये.... कुठेतरी ती अडकते त्याच्या सहवासात... काय आहे ते?.... प्रेम?... सहवासाने निर्माण झालेली असोशी?... पण तिला कर्तव्य विसरून चालणार नाही... तिच्या देशाच्या जनतेसाठी एका युवराज्ञीने परत जाणं भाग आहे.... ती रडवेली होत त्याच्या मिठीत... त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळलंय...तो तिला कारमधून पॅलेसपर्यंत सोडायला जातो... गेटजवळ कार थांबवतो.... आता तो निर्णायक जुदाईचा क्षण....

अॅन – I have to leave you now. I'm going to that corner there and turn. You must stay in the car and drive away. Promise not to watch me go beyond the corner. Just drive away and leave me as I leave you.
ज्यो - All right.
अॅन - I don't know how to say goodbye. I can't think of any words.
ज्यो - Don't try.

ती न राहवून मोठ्या आवेगाने पुन्हा त्याच्या मिठीत शिरते.... पुन्हापुन्हा.... तो क्षण संपूच नये असं वाटणारी त्यांची असोशी.... ती उतरते.... तो एकटक बघत राहतो... ती जाते....

महालात परतल्यावर तिला विचारणा होते ती कुठे होती? का गेली होती? काय सांगायचं लोकांना? त्यावर तिचं सडेतोड उत्तर, ‘मला माझ्या घराण्याची आणि जनतेप्रति कर्तव्याची जाण नसती तर मी परत आलेच नसते!’.....

दुसऱ्या दिवशी ती पत्रकारांना मुलाखत देते तेव्हा ज्यो आणि अर्विनही हजर असतात. त्या वेळच्या त्यांच्या बोलण्यातून तिचं गुपित हे गुपितच राहील याची तिला त्यांनी दिलेली सूचक ग्वाही आणि त्या प्रेस कॉन्फरन्सदरम्यान तिची ज्योशी दृष्टादृष्ट होताना त्याच्या नजरेत अडकलेली, खूप काही सांगून जाणारी तिची नजर..... कॉन्फरन्स संपते.... सर्व पत्रकार निघतात. ज्यो तिथेच उभा.... त्याचं विमनस्क असणं अगदीच आपल्याला समजून येणारं..... तो वळून निघतो.... क्षणभर थबकतो.... त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ.... पण पुन्हा निग्रहाने वळून तो सावकाश पावलं टाकत त्या दालनातून बाहेर येतो. दी एंड. 

म्हटलं तर एक प्रेमकथा पण अधुरी.... एक रात्र आणि एक दिवसाच्या सहवासात झालेली दोस्ती आणि त्यातून उमललेलं खूप तरल, हळुवार प्रेम....ऑड्री हेपबर्नचा कमालीचा अभिनय आणि ग्रेगरी पेकची संयत साथ. रोममधलं त्यांचं एकमेकांच्या सहवासात मुक्त फिरणं.... मैत्री... जवळीक.... आणि सूचक प्रेम...

हा सिनेमा बघितला नसेल तर जरूर बघा. आणि बघितला असला तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघतच असणार ही खात्री!

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shyam About
This picture was copied in Hindi many times Chori Chori was one of them
0
0

Select Language
Share Link