Next
हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत पद्धती
BOI
Tuesday, October 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


आपलं भारतीय संगीत हे सुरुवातीपासूनच आध्यात्मिक संगीत मानलं गेलं आहे. ईश्वरप्राप्तीचं, आराधनेचं एक साधन म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं गेलं. ईश्वराची उपासना करताना, मन एकाग्र करण्यासाठी सर्वांत सशक्त माध्यम म्हणून संगीताचा उपयोग केला जात होता. प्राचीन काळापासून चालत आलेल्या धृपद गायनातही हीच भावना होती... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी पाहू या ‘हिंदुस्थानी संगीत’ आणि ‘कर्नाटक संगीत’ या भारतीय संगीताच्या पद्धतींबद्दल...
...................
देशातील सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम कलांवर होत असतो. त्यानुसार आपल्या देशावर झालेल्या परकीय आक्रमणांमुळे, विशेषत: मुघलांच्या आगमनानंतर या मूळ भारतीय संगीतात विशेष बदल घडून आले आणि ‘हिंदुस्थानी’ आणि ‘कर्नाटक’ अशा दोन संगीत पद्धती प्रचलित झाल्या. सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं, तर हिंदुस्थानाच्या उत्तर भागातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल या प्रांतात जी संगीत पद्धत प्रचलित झाली, ती हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या प्रांतांत प्रचलित झाली ती कर्नाटक संगीत पद्धती म्हणजेच दाक्षिणात्य संगीत पद्धती. म्हणजे झालं असं, की मुघलांच्या राजवटीचा परिणाम उत्तर भारतात जास्त झाला. त्या मानाने दक्षिण भारतावर तो फार झाला नाही. त्यामुळे दक्षिण भारतातील संगीत हे फारसं बदललं नाही. 

याउलट उत्तर भारतातील संगीत हे काळानुसार बदललं. प्रामुख्यानं राजदरबारात संगीतकलेला आश्रय मिळाल्यानं, मुस्लिम संस्कृतीतील नवनवीन प्रकार या संगीतात समाविष्ट झाले. या शासकांनी संगीत कलेला प्रोत्साहन तर दिलं; पण त्यांच्या आवडीनुसार त्याचं स्वरूपही बदललं. संगीत हे फक्त ईश्वर आराधनेसाठी न राहता,  करमणुकीचं, मनोरंजनाचं एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. फारसी, अरबी भाषांतील अनेक रचनांचा त्यांत वापर होऊ लागला. ख्यालगायकीच्या शास्त्रीय संगीताच्या परिचयानंतर अनेक उपशास्त्रीय गीतप्रकार त्यांत समाविष्ट झाले, जे प्रामुख्याने करमणूकप्रधान होते. ठुमरी, टप्पा, गझल, होरी, कव्वाली असे नवनवीन गीतप्रकार प्रचलित होऊ लागले. त्यासाठी उर्दू, फारसी भाषेबरोबरच, अवधी, ब्रिज  अशा हिंदीच्या बोलीभाषा संगीतात वापरल्या जाऊ लागल्या. धृपदातील संस्कृतप्रचुर भाषेपेक्षा, या भाषा लोकांना जास्त जवळच्या वाटू लागल्या आणि लोकांनी संगीतातला हा बदल अगदी सहजपणे स्वीकारला, आपलासा केला. त्यामुळे सहाजिकच वेगळी अशी उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती जन्माला आली. ती नवीन रूपात बहरू लागली.

दक्षिणेतील संगीत पद्धती ही त्या मानाने या बदलांपासून दूर राहिली. आपल्या मूळ रूपाला धरून राहिली. तिच्यावरचा भक्तिसंगीताचा प्रभाव तसाच राहिला आणि म्हणूनच उत्तर हिंदुस्थानी संगीतापेक्षा आपलं वेगळेपण जपत, ती भारतातील दुसरी संगीत पद्धती (शैली) म्हणून प्रचलित झाली. अशा प्रकारे हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धती-शैली भारतात प्रचलित झाल्या.

या दोन्हीही संगीत पद्धतींमधील काही मूलभूत सिद्धांत मात्र समान आहेत. जसे...

- सप्तकातील बारा स्वर हे संगीतातील मूळ स्वर आहेत.
- सप्तकातून थाट आणि थाटांमधून रागांची निर्मिती होते.
- राग आणि ताल हे दोन महत्त्वाचे आधार आहेत. 
- आलाप-ताना यांच्या साहाय्यानं राग सजवला जातो.
- स्थानिक भाषांचा वापर रचनांमध्ये केला गेला आहे.

या दोन वेगवेगळ्या शैली म्हणून विकसित झाल्याने, त्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीत खूप फरक आहे.

हिंदुस्थानी शैलीतील गायन, वादन हे विलंबित लयीत, एक राग जास्त वेळ आळवून केलं जातं, तर कर्नाटक शैलीतील गायन आणि वादन हे तुलनेनं द्रुत लयीत सादर केलं जातं आणि एक राग कमी वेळात सादर केला जातो. हिंदुस्थानी संगीत पद्धतीत स्वर दीर्घ स्वरूपात लावून गायला जातो, तर कर्नाटक पद्धतीमध्ये तो आंदोलित स्वरूपात गायला जातो. हिंदुस्थानी संगीत पद्धतीत राग सादर करताना वैयक्तिक कल्पनाशक्तीचा वापर (इम्प्रोव्हिजेशन) दिसून येतो, तर कर्नाटक संगीत पद्धतीत, ज्येष्ठ संगीतकारांनी केलेल्या रचना (कृती) सादर करण्याकडे कल दिसून येतो. 

उस्ताद आमीर खुस्रो हे उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जनक मानले जातात, तर पुरंदरदास हे कर्नाटक संगीताचे पितामह मानले जातात. पुरंदरदासांनी कर्नाटक संगीतात अनेक रचना केल्या. त्याचबरोबर संगीत शिक्षणाच्या दृष्टीनं फार मोलाचं कार्य केलं. आजही त्यांनी विकसित केलेली शिक्षण पद्धती दक्षिणेत प्रचलित आहे. त्यांच्यानंतर त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितार आणि शामा शास्त्री ही कर्नाटक शैलीची त्रिमूर्ती मानली जाते. त्यांनी केलेल्या रचनांना कृती म्हणून संबोधले जाते. त्या कर्नाटकात आजही गायल्या जातात. यापूर्वीच्या संगीतकारांनी केलेल्या रचना जशाच्या तशा सादर केल्या जातात. त्या आलाप आणि ताना यांनी सजवल्या जातात. या भक्तिसंगीताच्या रचनांमध्ये प्रामुख्याने हिंदू देव-देवतांचं वर्णन, त्यांची स्तुती, मंदिरं, पूजा-अर्चा हे विषय असतात. कन्नड, तेलुगू, तमिळ यांबरोबरच संस्कृत भाषेमध्ये या रचना असतात. नृत्य शैलींमध्ये भरतनाट्यम्, कथकली हे प्रकार प्रचलित आहेत. वीणा, व्हायोलिन, बासरी, मेंडोलिन ही वाद्यं, नृत्य व गायनाच्या साथसंगतीस, तसेच स्वतंत्र वाद्य वादनासाठी वापरली जातात. व्यंकटमखी नावाच्या शास्त्रकारानं ७२ थाटांची रचना प्रचलित केली आणि त्यानंतर अनेक नवनवीन राग तिथे प्रचारात आले. कर्नाटक संगीताची तालपद्धतीही खूप मोठी आहे. मृदंगम्, घटम् सारखी तालवाद्यं साथीसाठी वापरली जातात.

हिंदुस्थानी संगीत पद्धतीत, सारंगी, व्हायोलिन, हार्मोनिअम, तबला ही वाद्यं साथीला वापरली जातात. सतार, सरोद, बासरी, संतूर, व्हायोलिन, तबला ही वाद्यं स्वतंत्र वादनासाठी वापरली जातात. उत्तरेत कथ्थक ही नृत्यशैली जास्त लोकप्रिय आहे.  त्याखालोखाल ओडिसी, मणिपुरी या नृत्यशैली प्रचलित आहेत.

हिंदुस्थानी संगीत पद्धतीत, अनेक संगीतकारांनी रचना (विलंबित व द्रुत ख्याल, बंदिशी, तराणे) केल्या. पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी ख्यालगायकीला, रागस्वरूपांना शास्त्रीय स्वरूपात मांडून त्याचं स्टॅंडर्डायझेशन केलं. मूळ ३२ थाटांमधून फक्त दहा थाट निवडून, ती थाटपद्धती प्रचलित केली. स्वरलिपी पद्धती तयार करून, बंदिशींचं नोटेशन, पुस्तकांच्या स्वरूपात जतन करून ठेवण्याच्या सुविधांसह उपलब्ध करून दिली, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत त्या मूळ स्वरूपात पोहोचतील. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी उत्तर भारतात संगीत प्रसाराचं महत्त्वपूर्ण कार्य करून, विशिष्ट वर्गापुरतं राहिलेलं संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. विशेषतः माजघरात ते पोहोचवलं, म्हणजेच स्त्रिया-मुली यांनाही त्याचा आस्वाद घेता येऊ लागला, संगीत शिकता येऊ लागलं. 

पुढे पुढे या दोन्हींही पद्धती जस-जशा विकसित होत गेल्या, तशा काही कलाकारांनी दोन्ही शैलींचा अभ्यास केला आणि एका शैलीतले राग दुसऱ्या शैलीत सादर केले जाऊ लागले. या आदान-प्रदानामुळे दोन्हीकडचे काही राग, स्वरूपं सारखी, पण वेगेवेगळ्या नावांनी गायली व वाजवली जाऊ लागली. कर्नाटकमधील शिवरंजनी, कीरवाणी यांसारखे राग हिंदुस्थानी पद्धतीत लोकप्रिय झाले, तर इकडचे भूप, मालकंस यांसारखे राग कर्नाटकात वेगळ्या नावाने लोकप्रिय झाले. 

या माहितीबरोबरच एक गोष्ट नमूद करावी लागेल, की मागील दोन लेखांमध्ये, जगभरात लोकप्रिय होत असलेल्या ज्या भारतीय संगीताचा मी वारंवार उल्लेख करत होते, तो उत्तर भारतातील हिंदुस्थानी संगीत पद्धतीबद्दल होता. कारण हीच पद्धती भारतीय संगीत म्हणून जगभर लोकप्रिय झाली. कर्नाटक संगीत पद्धतीतील भरतनाट्यम् या नृत्यशैलीने विसाव्या शतकात भारताबाहेर लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली.

पुढील लेखात आपण जाणून घेऊ ‘राग’ या संकल्पनेबद्दल.

ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link