Next
मधुमेह नियंत्रणासाठी बदला जीवनशैली
BOI
Wednesday, November 14, 2018 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

सध्याच्या काळात मधुमेह होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, तरुण वर्गातही याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. हा जीवनशैलीचा आजार मानला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ठराविक जीवनशैली राखावी लागते. १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेहदिन म्हणून पाळला जातो.  या निमित्त मधुमेहतज्ज्ञ डॉ. योगेश कदम यांनी लिहिलेला हा मार्गदर्शनपर लेख ...   
.....

आपल्या देशात २०१७ मध्ये मधुमेहाने एकूण सात कोटी वीस लाख लोक ग्रस्त होते. २०२५पर्यंत ही आकडेवारी दुप्पट होण्याची शक्यता आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही मधुमेहामुळे हृदय विकाराची जोखीम निर्माण होते. तथापि, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या हृदयाच्या आरोग्यावर त्याचा जास्त प्रभाव पडतो. स्त्रियांमध्ये जोखीम घटक जास्त उच्च आहे. जगभरामध्ये स्त्रियांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये मधुमेह हे नववे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे दर वर्षी दोन कोटींपेक्षा अधिक मृत्यू होतात. सामाजिक, आर्थिक स्थितीमुळे  मधुमेहग्रस्त स्त्रिया व मुलींना त्याचा प्रतिबंध, लवकर निदान होणे, उपचार व काळजी यामध्ये अडथळा येत असल्याचा अनुभव आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. 


आजार ओळखणे, त्यास प्रतिबंध करणे व देखभाल करणे यामध्ये मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची महत्त्वाची भूमिका असते. कुटुंबात एकाला मधुमेह असेल तर, नियमीतपणे आरोग्य तपासण्या आणि छाननी करून मधुमेहाचे लवकर निदान करून घेणे महत्त्वाचे ठरते, ज्यायोगे किचकट गुंतागुंतींना प्रतिबंध करता येईल. वारंवार लघवीला जावे लागणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, थकवा येणे यांसारख्या मधुमेहाच्या प्रारंभिक खुणांबाबत जागरूक असणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्यात किंवा मधुमेहाची प्राथमिक स्थिती असलेल्या नातेवाईकांमध्ये अशा खुणा दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तणाव आणि खाण्याच्या सवयींचा जीवनशैलीवर प्रचंड प्रभाव पडतो. सध्याच्या काळात अनारोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे असंख्य आजार आपल्यावर आक्रमण करत आहेत. स्त्री व पुरूष दोघांनाही त्याचा धोका आहे, तथापि स्त्रियांवर याचा प्रभाव होण्याचा जास्त धोका असतो. लक्षणे सारखी असली तरी, त्या स्थितीचे प्रभाव आणि आवश्यक असलेली काळजी स्त्रियांसाठी खूपच भिन्न असू शकते. 


बहुतांश लोक समजतात की मधुमेह हा केवळ उच्च रक्त शर्करेचा आजार आहे. हे खरे असले तरी, अनियंत्रित उच्च रक्त शर्करेमुळे हृदयरोग, अंधत्व आणि मूत्रपिंड निकामी होणे अशा आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची जोखीम असते, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.    अनियंत्रित शर्करेमुळे अनेक मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचा पाय गमवावा लागला आहे. याशिवाय, मधुमेह असलेल्या लोकांमध्ये संक्रमणे विकसीत होण्याचा धोका जास्त असतो. रक्तातील साखरेची पातळी सामान्य किंवा त्या पातळीच्या आसपास राखली, तर मधुमेहाला विलंब होण्यास किंवा त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींना प्रतिबंध करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रक्त शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी तिची नियमित तपासणी केली पाहिजे. शरीराच्या अवयवांची, विशेषतः डोळे, मूत्रपिंड व पायाची  नियमित तपासणी केली पाहिजे.

गर्भावस्थेतील मधुमेह ‘मेलिटस’ हा भारतीय स्त्रियांमध्ये सामान्य बनत चालला आहे. काही भागांमध्ये तर याचा वीस टक्के प्रादुर्भाव आहे. जेव्हा मधुमेह नसलेल्या एखाद्या स्त्रीच्या रक्तातील साखरेच्या पातळ्या गर्भधारणेदरम्यान वाढतात तेव्हा त्याला गर्भावस्थेतील जेस्टेशनल डायबेटिस मेलिटस (जीडीएम) म्हणतात. या स्थितीमुळे प्रसुतीनंतर माता व बाळाला भविष्यात मधुमेह होण्याची मोठी जोखीम असते. नियमीत व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन आरोग्य जपल्यास मातांमध्ये मधुमेह विकसित होण्यास प्रतिबंध किंवा विलंब होऊ शकतो.


टाईप दोन मधुमेहाची ८० टक्के प्रकरणे निरोगी जीवनशैली अंगिकारून टाळता येऊ शकतात. जेव्हा एखाद्या कुटुंबातील सदस्य पौष्टिक आहार घेतात आणि एकत्र व्यायाम करतात तेव्हा, संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन उपचार, नियमीत देखरेख, निरोगी जीवनशैली आणि सातत्याने शिक्षण देत राहणे आवश्यक असते. रुग्णाच्या उष्मांक आणि पोषक घटकांच्या आवश्यकता विचारात घेऊन कुटुंबाच्या आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे इन्शुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि त्यामुळे शर्करा पातळी नियंत्रित राहते. एकट्याने व्यायाम करण्यापेक्षा, कुटुंब आणि समुहांसह एकत्रितपणे व्यायाम केल्यामुळे हालचालींमध्ये सातत्य राहते आणि त्याचे चांगले परिणाम मिळतात. मधुमेहाची लक्षणे ओळखण्यासाठी कौटुंबिक सदस्यांनाही शिक्षित करणे आवश्यक असते.

थोडक्यात म्हणजे, मधुमेहाचे निदान झाल्याचा रुग्णाच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. कुटुंबाचा पुरेसा सहभाग असल्यास, मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. जनजागृती, माहिती आणि सक्रिय संभाषणाद्वारे मधुमेहाचा नव्हे, तर निरोगी आयुष्याचा वारसा निर्माण करणे शक्य आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search