Next
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
प्रेस रिलीज
Thursday, July 18, 2019 | 11:31 AM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर १७ जुलैला भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांचेही या वेळी स्वागत करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीने राज्यात प्रचंड विजय मिळवला तसाच विजय आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवायचा आहे. राज्यात गेल्या पावणेपाच वर्षांच्या सत्तेच्या काळात महायुती सरकारने उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांत राज्य पहिल्या क्रमांकावर नेण्याचे काम केले आहे. या आधीच्या सरकारला ५० वर्षांत जी कामे करता आला नाहीत, ती या सरकारने केली आहेत. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी राज्यात पुन्हा सत्ता हवी आहे.’


‘चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मंत्री म्हणून समर्थपणे विविध विभागांची जबाबदारी पेलली असून, मेहनतीने त्या खात्यांचे काम राज्यात उभे केले. एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांचा मूळ पिंड संघटनेचा आहे. सामान्य कार्यकर्त्यांना जोडून घेऊन संघटन उभे करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांनी संघटनेच्या कामासाठी राज्यभर प्रचंड प्रवास केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी गेली साडेचार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कारकीर्दीत सरकार व संघटनेने सहयोगाने काम केले आणि संघटनेचा विस्तार झाला. आपण दानवे यांचे अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, नवनियुक्त राष्ट्रीय संघटनमंत्री संतोषजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब पाटील-दानवे यांचा मी आभारी आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व घटकपक्षांच्या महायुतीला विजयी करायचे आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसोबतच महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठीही तेवढेच प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी राहिलेली कामे पूर्ण करायची असून, राज्यात पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.’


आमदार लोढा म्हणाले, ‘मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण असून, त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या प्रयत्नाने युतीचा एकतर्फी विजय होईल.’

या वेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती व प्रवीण दरेकर, कामगारमंत्री व प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, सरचिटणीस आमदार  सुजितसिंह ठाकूर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, आमदार राज पुरोहित, आमदार तमिळ सेल्वन, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह व गणेश हाके उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search