Next
झिम्माड पावसाचं भंडारदरा
BOI
Wednesday, June 28, 2017 | 06:59 PM
15 0 0
Share this article:

फोटो : एमटीडीसी

झिम्माड पाऊस आणि हिरवागार आसमंत यांची भुरळ पडलेल्या लोकांसाठी भंडारदरा हा भूलोकीचा स्वर्ग आहे. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात भंडारदरा आणि परिसराची रमणीय सफर...
..........
पाऊस हा धरणीचं सगळं रूपडं बदलून टाकणारा, घामेजलेल्या वातावरणाला ओलेतं करून टाकणारा ऋतू असला, तरी तो सगळ्यांच्या आवडीचा असतोच, असं नाही. भरपूर पाऊस पडत असला, की मनातले मोर थुईथुई नाचायला लागणारे प्राणी निसर्गाचे खरे आस्वादक असतात. पावसानं आसमंत कसा बदलून टाकला आहे, उन्हाच्या चटक्यांमध्ये होरपळणाऱ्या डोंगरदऱ्यांना कसं हिरवंगार करून टाकलं आहे आणि गारव्याची जादू सगळ्या वातावरणात भरून टाकली आहे, हे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढते. हातातली कामं बाजूला ठेवून मग मोकळ्या निसर्गाकडे पाय वळतात आणि या हिरव्या ऋतूचा मनमुराद आनंद घेतला जातो. पावसाची सततची हजेरी ही ‘पिरपिर’ न वाटता नादमधुर ‘रिमझिम’ वाटते आणि पायाखालच्या चिखलाचा त्रास न होता पायवाटांच्या बाजूनं तुरूतुरू पळणाऱ्या झऱ्यांची, ओहोळांची भुरळ पडते. झिम्माड पाऊस आणि हिरवागार आसमंत यांची भुरळ पडलेल्या लोकांसाठी भंडारदरा हा भूलोकीचा स्वर्ग आहे.

भंडारदरा हे मुद्दाम विकसित केलेलं, पर्यटकांसाठी भरपूर सोयीसुविधा असलेलं, त्यांच्या मनोरंजनसाठी खास ठिकाणी उभारलेलं असं विकसित पर्यटनस्थळ नाही. तरीही पावसाळ्याच्या काळात मनाला वेड लावणारी ही एक भन्नाट जागा आहे. भंडारदरा परिसराला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. नजर ठरणार नाही अशा उंचीचे डोंगर, बघताना थरकाप उडावा अशा दऱ्या आणि मुक्त जंगल, असा हा निसर्गरम्य परिसर आहे. नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातला हा परिसर ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर येतो. भंडारदऱ्याचं भौगोलिक स्थान लक्षात घेऊन इंग्रजांनी या ठिकाणी १९२६ साली धरण बांधलं. आशिया खंडातलं हे सर्वांत मोठं धरण आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारदऱ्याकडे जायला लागल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतो. डोंगराचे वेधक कडे, त्यावरून खाली झेपावणारे शुभ्र, फेसाळ धबधबे, खळाळून वाहणाऱ्या नद्या, हे दृश्य वेड लावतं.


भंडारदरा धरणाचा जलाशय खूप मोठा आहे. याच परिसरात विल्सन तलाव आहे आणि त्याच्या काठावर स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळून काही प्रमाणात पाण्यात खेळण्याचा आनंद घेता येतो. धरणातून पाणी सोडल्यानंतर ते एका विशिष्ट आकारात बाहेर पडतं आणि लांबून पाहिलं, तर त्यातून छत्रीच्या आकाराचा धबधबा तयार होतो. तो ‘अंब्रेला फॉल’ या नावाने प्रसिद्ध आहे. धरणातून पाणी सोडण्याच्या काळात आणि विशेष म्हणजे पावसाळ्यातच हा धबधबा दिसू शकतो.
रंधा धबधबा हे इथलं आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. शेंडी गावापासून ११ किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण रस्त्यापासून थोडं आत आहे. सुरक्षितपणे गाड्या लावून थोडं चालून आत जायला लागतं. धबधब्याचा परिसर भन्नाट आहे. दोन मोठ्या कड्यांच्या मधून खोल दरीत कोसळणारा हा जोरदार पाण्याचा प्रवाह पाहताना निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्यापुढे आपण थक्क होतो. अलीकडे या भागात सुरक्षित पर्यटनासाठी प्रशासनाने धबधबा पाहण्यासाठी कठडे उभारले आहेत. धबधब्याचा जोर प्रचंड असून, दरी खोल असल्यामुळे सुरक्षित कठड्यांवरूनच धबधबा पाहणं उत्तम. जंगल पाहण्याची, ऐकण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांसाठीही भंडारदरा हा स्वर्ग आहे. इथे दाट झाडीमुळे विविध प्राणी, पक्ष्यांची वस्ती आहे आणि नशीब जोरावर असेल, तर त्यांचं दर्शनही घडू शकतं.

शेंडीपासून २२ किलोमीटरवर असलेला, घाटघर हा परिसर इथला सगळ्यात उंचावरचा भाग आहे. इथे प्रचंड पाऊस कोसळतो. घाटमाथा असल्यामुळे वाटाही अरुंद आहेत आणि इथे बहुतांश वेळा धुक्याचं साम्राज्य असतं. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरला घेऊन जाणारा रस्ता भन्नाट आहे. घाटघरच्या माथ्यावरून खाली खोल दरीत कोकण परिसराचं दर्शन घडतं, म्हणून हा कोकणकडा अशा नावानं प्रसिद्ध आहे. भंडारदरा इथं महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची निवासव्यवस्था असून, तिथं राहण्याची आणि जेवण्याची उत्कृष्ट सोय आहे. मंडळाची रहाण्याची सोय तळ्याकाठी असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. शेंडी आणि परिसरात काही खासगी हॉटेल्सची सोयसुद्धा उपलब्ध आहे. भंडारदरा सुविकसत पर्यटनस्थळ नसल्यामुळे इथे इतर ठिकाणांसारखी हॉटेल्सची बजबजपुरी नाही किंवा प्रत्येक गोष्टीचा धंदा करून पर्यटकांकडून पैसे वसूल करण्यासाठी टपलेले एजंटही नाहीत. त्यामुळे काही वेळा इतर ठिकाणांसारख्या सोयीसुविधा मिळू शकणार नाहीत; पण निसर्गाचं देणं एवढं मोठं आहे, की त्यापुढे हे सर्व फिकं पडावं.

डावीकडे अमृतेश्वर मंदिर आणि उजवीकडे अंब्रेला फॉल

याच परिसरात रतनगड हा किल्ला आणि अमृतेश्वराचं प्राचीन मंदिरही आहे. स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन आणि पाऊस-पाण्याचा अंदाज घेऊन तिथे जाणं जास्त योग्य. साम्रद गावातून एखादा वाटाड्या बरोबर घेऊन सांधण दरीसुद्धा पाहून येता येऊ शकते. मुख्य म्हणजे हा सगळाच प्रचंड पावसाचा प्रदेश असल्यामुळे पावसातून येणाऱ्या ऐन वेळच्या अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो, याचीही तयारी ठेवायला हवी. निसर्गाच्या सान्निध्यात आणि निसर्गाचा एक भाग म्हणून राहायचं असेल, तर भंडारदरासारख्या ठिकाणांना पर्याय नाही.

कळसूबाई शिखर
भंडारदरा परिसरात भटकण्याची ठिकाणं खूप आहेत. रतनगडापासून अलंग, कुलंग, मदन यांसारखे आव्हानात्मक किल्लेही आहेत. अगदी छोटी आणि सर्वांना घेऊन जाता येईल, अशी भटकंती करायची असेल, तर कळसूबाई शिखराचा पर्याय निवडायला हरकत नाही. अकोले-भंडारदरा रस्त्यावर बारी गाव लागतं. तिथूनच कळसूबाईकडे जाण्याची वाट आहे. महाराष्ट्रातलं सर्वांत उंच असलेलं हे ठिकाण ट्रेकिंग करणाऱ्यांचं अतिशय लाडकं आहे. सर्वांत उंचीवरचं असलं, तरी ते चढून जाण्यास धोकादायक किंवा आवाक्याबाहेरचं अजिबात नाही. मुख्य डोंगर चढून गेल्यानंतर वरच्या कड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता शिडीचीही व्यवस्था आहे, त्यामुळे वरपर्यंत जाणं सर्वांच्या सोयीचं आहे. ऐन पावसाळ्यात इथे वारा आणि पाऊस यांचा जो खेळ सुरू असतो, तो केवळ विलोभनीय.

कसं जायचं?
मुंबईपासून अंतर (कल्याण-कसारा-इगतपुरीमार्गे) : १४३ किलोमीटर
पुण्याहून अंतर (मंचर-नारायणगाव-आळेफाटामार्गे) : १७३ किलोमीटर
नाशिकहून अंतर : ७३ किलोमीटर
 
- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search