Next
... आणि यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला!
BOI
Tuesday, July 03, 2018 | 08:00 AM
15 1 0
Share this story


‘यमगरवाडीत फिरून, त्यांच्या समस्यांवर उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यातूनच अनेक टप्प्यांनंतर मग यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. एकेक कार्यकर्ते घडत गेले आणि मग पारध्यांसह अन्य भटक्या समाजांसाठीही काम सुरू झालं....’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा तिसरा भाग...
......................
भटक्या विमुक्त जमातींचे सुरुवातीचे प्रश्न काय होते? आणि नंतरच्या काळातले प्रश्न काय आहेत? ते तुम्ही कसे समजावून घेतलेत?
गिरीश प्रभुणे : यमगरवाडीचं काम ज्या वेळेला सुरू करायचं ठरलं, त्या वेळी यमगरवाडी हे डोळ्यासमोर नव्हतं. मग पालापालातून हिंडणं, सगळीकडे जाणं सुरू झालं. गेल्यानंतर लक्षात यायचं, की आपण काही सांगितलं, तरी त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. नंदीबैल घेऊन हिंडणारा पोरगा आहे किंवा स्वतःला मारून घेऊन फिरणारे मरीआईवाले किंवा खेळ करणारे डोंबारी आहेत, त्यांची समस्या काय आहे? आम्ही त्यांना विचारलं, की मुलांना शाळेत का नाही घालत? शाळेत घातलं, की शिक्षण मिळेल. शिक्षण घेतलं, की नोकरी लागेल. म्हणजे इतका सरळ आम्ही प्रश्न हाताळत होतो. यमगरवाडीला शाळा सुरू करायचं ठरलं, त्या आधी तीन दिवसांचं एक शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये भटक्या विमुक्तांच्या समस्यांना उत्तरं शोधणं, यावर चर्चा झाली होती. समस्या म्हणजे राहायला घरं नाहीत. घर बांधायला गावं नाहीत. गाव असेल, तर कुठली तरी गल्ली, कुठेतरी घर असतं. आई-वडील यांच्यापैकी कोणीतरी कामाला जाणार. पैसे आणणार, पगार आणणार, घर चालणार, चूल पेटणार, असं सगळं असतं; पण यांच्या बाबतीत घराची संकल्पना या सगळ्याला छेद देणारी आहे. कुठल्याही गावामध्ये तीन-चार दिवसांपेक्षा अधिक थांबता येत नाही. गावचा पोलिस पाटील ग्रामपंचायतीतल्या रजिस्टरमध्ये सगळ्या नोंदी करून घेतो - यांच्या घरामध्ये, पालात कोंबड्या किती आहेत? गळ्यात मंगळसूत्र आहे का? त्यात वाट्या किती आहेत? सोनं किती आहे? कपडे किती आहेत? चादरी किती आहेत? मुलं किती आहेत? किती जण आले? या नोंदी कशाकरिता? तर ही भटकी लोकं आहेत, येतात, काही चोऱ्या करतात. दुसऱ्या गावातून चोऱ्या करून इकडे येतात. मग पोलीस यांनाच विचारतात, की तुमच्याकडे आले तर तुम्ही का नाही नोंद ठेवली? म्हणून इंग्रजांच्या काळापासून या भटक्यांच्या सगळ्या नोंदीचं रेकॉर्ड असतं. आता त्याला मुसाफिरी नोंद म्हणतात. आणि ही नोंद ठेवली तर त्याचं त्यांना काय? काही नाही. तीन दिवसांपेक्षा जास्त राहायचं नाही, नंतर निघून जायचं. यांना स्थिर केलं, तर यांची संख्या कळणार ना! 

आम्ही अनेक ग्रंथ धुंडाळले. १९३१ला जनगणना झाली होती. त्या वेळेला यांची नोंद केली होती, ती १५ लाख होती. त्या वेळची जी जनगणना होती, ती गावात जे सापडले त्यांची; पण इंग्रजांचे अधिकारी सर्वदूरपर्यंत गेले असतील का? आजही जनगणना करणारे जात नाहीत. मग ज्या गावात एस. टी. स्टँड, रेल्वे स्टेशन आहे, त्या गावांच्या नोंदी तेवढ्या होतात. मध्ये रस्त्याने जाणारे जे असतील, त्यांची नोंद कोण घेणार? मग आम्हीच एक सर्वेक्षण केलं. त्यातून लक्षात आलं, की या सगळ्यांना स्थिर करायचं असेल, तर त्यांची नक्की संख्या कळली पाहिजे, सरकारपर्यंत हा विषय गेला पाहिजे. सरकारने वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ तयार केलेलं आहे. महामंडळांच्या योजना कागदावर खूप आहेत. घरबांधणीची योजना आहे, बकऱ्या देण्याची योजना आहे, कोंबड्या देण्याची योजना आहे. मी त्यांना विचारलं, की किती जणांनी याचा लाभ घेतलाय? लाभ घेतलेली गावं सांगा. गावामध्ये आम्ही जाऊन बघू. प्रत्यक्षात कागदावर नोंदणी करून पैसे उचललेले आहेत, असं लक्षात आलं. प्रत्यक्षात कुठेही आम्हाला वसंतराव नाईक महामंडळाकडून लाभ घेतलेला अमुक एका जातीतला माणूस भेटला नाही. हे काम करायचं असेल, तर विशिष्ट भाग नीट करून घेतला पाहिजे, असं ठरलं. म्हणून मग सोलापूरला आम्ही शिबिर घेतलं. 

आधीच्या तीन-चार वर्षांत आम्ही जिथे हिंडलो होतो, तिथल्या वेगवेगळ्या अत्याचारग्रस्त पारधी महिला शिबिरात होत्या. पोलीस कस्टडीमध्ये अत्याचार झालेल्या, कुठे शेतात पाल ठोकलंय आणि पोलिसांची गाडी आली म्हणून पुरुष वर्ग पळून गेल्यावर महिला सापडल्या नि त्यांच्यावर अत्याचार झाला, अशा अत्याचार झालेल्या साधारणतः एक-दीड वर्षात सुमारे शे-दोनशे महिला सापडल्या होत्या. एकदा आम्ही एखाद्या पालावर जाऊन अत्याचारित महिलेचं प्रकरण हाताळलं, की ते कुटुंब कधीही आम्हाला सोडत नाही, म्हणजे अजूनही आम्हाला सोडत नाही. या सगळ्यातून लक्षात आलं, की एक प्रश्न घेऊन आपण त्याचा माग काढत जावा आणि त्या अत्याचाराचे प्रकरण कलेक्टरपर्यंत जाईपर्यंत पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेऱ्या करत जावे. दुसऱ्या दिवशी दुसरे प्रकरण, तिसऱ्या दिवशी तिसरं प्रकरण, चौथ्या दिवशी चौथं प्रकरण. पहिलं अजून चालूच आहे, तोपर्यंत ही प्रकरणं. मग अशा मालिकाच्या मालिका असल्यामुळे समस्या सोडवण्याच्या ऐवजी समस्येला केवळ स्पर्श करणं आणि मग सगळ्यांना घेऊन जाणं, असं व्हायला लागलं. मग लक्षात आलं, की यानेही प्रश्न सुटत नाही. त्यांच्या एकेका बाईबरोबर सात-आठ, दहा-दहा मुलं असायची. काही वेळेला डझनभर मुलं. काही वेळेला कळायचंच नाही. आज दोन मुलं दिसत आहेत, पुढच्या खेपेला आणखी दोन मुलं कुठून तरी आलेली असायची. दोन-चार दिवस एखादी बाई एका ठिकाणी राहिली, तर ती भीक मागून इकडून-तिकडून यायची. सोबत पंधरा-वीस मुलं. ‘ही कोणाची मुलं,’ असं विचारलं, तर ‘माझी’ म्हणून सांगते. आता घरात एवढी मुलं. मग नाव विचारायला गेलं, तर ‘नाही, हे सवतीचं पोरगं आहे’ म्हणते. म्हणजे सात-आठ मुलं हिची, सात-आठ सवतीची. सवत कुठे आहे? ती गेली दुसऱ्या नवऱ्याबरोबर निघून. म्हणजे हिची सवत, तिने दुसरा नवरा केला, पोरं इथंच सोडली. तिला तिकडे मुलं झालेली. अशी मालिकाच्या मालिका, कुटुंबंच्या कुटुंबं, तांडेच्या तांडे त्या मराठवाड्यात बघितले आणि मग लक्षात आलं, की याला कुठेही उत्तर नाही, आपणच काहीतरी केलं पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे. 

मग त्यासाठी सुरुवात कशी झाली? कार्यकर्ते कसे मिळाले?
गिरीश प्रभुणे : एक उदाहरण सगळ्यांना दाखवता येईल, ज्याला मॉडेल म्हणता येईल, असं काहीतरी केलं पाहिजे, असं वाटलं. म्हणून मग आधी शैक्षणिक गोष्टींवर भर दिला. पहिल्यांदा सगळी मुलं एकत्र आणावीत, त्यांची शाळा सुरू करावी, असं ठरवलं. अंगणवाडी प्रकल्प सुरू केला. संघाच्या एका कार्यकर्त्याने स्वतःची अठरा एकर जमीन त्यासाठी दिली. तिथं तो प्रकल्प सुरू झाला. मी संघटनमंत्री, म्हणजे मी हिंडलं पाहिजे महाराष्ट्रभर. प्रत्येक जिल्ह्यात गेलं पाहिजे. प्रत्येक जातीचा शोध घेतला पाहिजे. प्रकल्पाचे कोणी बघायचे? शहरातून येणारे काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात सुरुवातीला मिळाले; पण तिथे आल्यानंतर त्या समस्या, त्यांची भांडणं, त्यांच्या मारामाऱ्या, त्यांचे खाण्याचे प्रकार, हे सगळं पाहून कुणी काही टिकलं नाही. मग अशा परिस्थितीत शहरातल्या कार्यकर्त्यापेक्षा इथेच कोणी मिळतो का बघावे, असे ठरले. कार्यकर्ता कसा असावा? दारू न पिणारा, निर्व्यसनी, चांगला व्यवस्थित वागेल असा, शिकलेला; पण हे सगळं ज्याच्याकडे आहे, तो इथे येऊन राहणारा नसायचा. इथे माणसं तयार कशी होणार? त्याचं कुठेही प्रशिक्षण केंद्र नाही महाराष्ट्रात. बरोबर हिंडता-हिंडता आमचं दहा-बारा जणांचं एक टोळकं तयार झालं होतं. त्यांना घेऊन मी कोर्टकचेऱ्या वगैरे सगळ्या ठिकाणी जात होतो. त्या हिंडणाऱ्यांमध्ये तुकाराम माने म्हणून एक कार्यकर्ता होता. तो भरपूर दारू प्यायाचा. दिवसभर आमच्याबरोबर असायचा, त्या वेळी दारू नाही प्यायचा; मात्र रात्री घरी गेला, की दारू प्यायचा. सकाळी पुन्हा ताजातवाना होऊन आमच्याबरोबर असायचा. पारधी म्हणण्यापेक्षा तो कैकाडी समाजाचा होता आणि उत्तम जाणकार होता. त्या तीन चार जिल्ह्यांतले पाल न् पाल, रस्ते न् रस्ते त्याला माहिती होते. लक्ष्मण मानेंच्या चळवळीत त्याने काम केलं होतं. लग्न झालं होतं, दोन मुलं झाली होती आणि अकरावी झालेला होता. बायको त्याला त्याच्या दारूमुळे सोडून गेली होती. एकदा मी त्याला म्हणालो, ‘आपण कार्यकर्ता शोधतोय.’ तो स्वतःहून मला म्हणाला, ‘कार्यकर्ता कसा पाहिजे तुम्हाला?’ मग त्याला सांगितलं, की ‘दारू न पिणारा हवा, अमुक हवा, तमुक हवा.’ माझ्याबरोबर दुसरा पंडित भोसले म्हणून कार्यकर्ता होता, पारधी समाजातला. तो मला म्हणाला, ‘तुम्ही गेली सहा वर्षं शोधताय असा माणूस; पण तो तर भेटत नाही. केवढे आले आणि केवढे गेले. तुम्ही अजून पळून जात नाही, म्हणून आम्ही तुमच्याबरोबर राहिलेलो आहोत; पण असा कार्यकर्ता केव्हा मिळणार? हा तुकाराम माने अकरावी झालेला आहे. त्याला इच्छा आहे काम करायची. आता तो थोडीशी घेतो रात्रीची; पण ते सोडून द्या ना. त्याच्याकडे दुर्लक्ष करा.’ त्यानं हा एक मार्ग दाखवला आणि लक्षात आलं, की तुकाराम मानेची इच्छा आहे, पंडित भोसलेची इच्छा आहे. कोणीही आपल्याबरोबर राहत नाही; पण हे दोघे जण सर्व ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. सर्व पोलीस स्टेशनपर्यंत आलेत, सर्व पालापालापर्यंत आलेत आणि यांना आपण कार्यकर्ते समजत नाही आणि जो येत नाही, त्याला मात्र आपण कार्यकर्ता म्हणतो. त्याला मी म्हटलं, ‘अरे फारच चांगलं. माझ्या कसं काय लक्षात आलं नाही. या मग आता उद्यापासून इथे.’ 

लगेच मग आम्ही झोपड्या बांधल्या. तुकाराम माने कैकाडी असल्यामुळे त्यानेच झोपड्या तयार केल्या. झोपडी बांधण्याकरिता मी सुतार शोधायला लागलो. मी आणखी काहीतरी शोधायला लागलो. मग पैसे देऊन कोण येईल का बघायला लागलो. हा म्हणाला, ‘कशाला पैसे द्यायचे, मी बांधतो ना.’ आणि चार दिवसांमध्ये त्याने एक झोपडी बांधली. आता स्वयंपाकाला काहीतरी करावं लागणार, कामाला बाई आणावी लागणार, मुलं येतील राहायला. पंडित भोसले म्हणाला, ‘काका याची बायको आहे, तिला आणू आपण.’ आम्ही गेलो त्याच्या बायकोला आणायला. बायको म्हणाली, ‘मी नाही येणार. हे दोन दिवस दारू पिणार नाहीत. चौथ्या दिवशी परत पिणार. मला त्यांच्याबरोबर संसार नाही करायचा.’ मग त्याचं आम्ही पुन्हा लग्न लावलं आणि त्याला नवीन बायको आणून तो आणि ती, असा तो यमगरवाडीचा प्रकल्प सुरू झाला. आता जवळ जवळ १७-१८ वर्षे झाली, ते दोघेजण तिथे राहतात. वेगळ्या दिशेने जाणारा एक प्रकल्प, एक वेगळा मार्ग त्यांना दाखवून गेला. संघाची वेगळी वाटचाल सुरू झाली. त्याचं कारण हा तुकाराम माने. त्याचं दारूचं व्यसन पूर्ण नष्ट झालं. कारण सतत चांगली माणसं तिथे यायला लागली, सतत कार्यकर्ते यायला लागले. रात्री मुक्कामाला राहायला लागले. त्याला दारू प्यायला जायला सवड राहिली नाही. आणि अशा पद्धतीने सवयीने दारू सुटली. आता तो नंबर एकचा कार्यकर्ता झाला आहे. 

असे एकेक कार्यकर्ते तयार होत गेले. पारधी सामाजातला एक कार्यकर्ता आहे, समीर शिंदे म्हणून. तोही असाच. आम्ही अनेक आंदोलनं केली. मग काही महिला कार्यकर्त्या आल्या. ज्ञानेश्वर भोसले म्हणून एक कार्यकर्ता, तोही असाच सापडला. मंगळवेढ्याला एक मोठं आंदोलन सुरू केलं होतं. पोलीस कस्टडीमध्ये एका पारध्याला पकडून आणून टाकलं होतं. त्याला मारहाण झाली. त्या मारहाणीमध्ये तो दगावाला. त्याच्या दगावण्यामुळे सगळा शोध सुरू झाला. मारहाण करणाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं. त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली. हा पारधी चोर नव्हता. त्याला संशयानं पकडून आणलेलं होतं. आतापर्यंत पारध्याच्या मृत्यूचा शोध महाराष्ट्रात कधी घेतला गेला नव्हता. आम्ही तो घेतला. सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्यावर टीका केली. मग तिथले एसपी, अपूर्व चंद्रा नावाचे तिथले कलेक्टर आणि पद्मनाभन नावाचे पोलीस अधीक्षक यांच्यापुढे आम्ही मांडलं, की या सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदर पारध्यांची संख्या जवळपास ५० हजार आहे. एवढ्यांना तुम्ही गोळ्या घालून मारून काही होणार नाही. त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. आणि पुनर्वसन करायचं असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन आखला पाहिजे. तुम्ही, पोलिसांनी सहकार्य केलं, तर तो आखता येईल. अशी आमची चर्चा चालली असताना, मंगळवेढ्याच्या रमेश काळेचा मृत्यू झाला, आंदोलन उभं राहिलं. रमेश काळेला पकडून आणण्याकरिता कुठलाही कायदा, कुठलाही पुरावा नव्हता. केवळ संशयित म्हणून कोणीतरी म्हणालं, पारधी चोऱ्या करतात म्हणून त्यांना पकडून आणलं. केस दाखल झाली नाही. पोलीस कस्टडीत टाकलं. कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना त्याला पकडून आणलं, पोलीस कस्टडीत तो मेला. मारणारे कोण पोलीस आहेत, ते माहिती आहे. ड्युटीवर कोण होतं, ते माहिती आहे. हे सगळं होतं, तरीसुद्धा पोलिसांवरती केस दाखल करायला मात्र तीन महिने लागले. आणि आम्ही हाच मुद्दा घेऊन कोर्टापुढे उभे राहिलो. यानं चोरी केली आहे का? माहीत नाही. यानं गुन्हा केला आहे का? माहीत नाही; पण मग पोलिसांनी त्याला पकडून आणलं आणि आत टाकलं. त्याला कोणी मारलं आहे, हे माहिती आहे. ते दहा पोलीस तिथेच होते. सकाळी हे तिघं जण होते, रात्री हे तिघं जण होते, पहाटे हे तिघं जण होते. या नऊ-दहा पोलिसांपैकी कुणीतरी याला मारलेलं आहे. सर्व जणांनी मारलेलं आहे. जो ड्युटीवर आला त्यानं मारलेलं आहे. त्याला शॉक ट्रीटमेंट दिली आहे. त्याच्या अंगावर वळ आहेत. त्याच्या पायाची हाडं मोडली आहेत, हेही दिसतंय. त्याला तीन दिवस अन्नपाणी दिलेलं नाही आणि त्याच कालावधीत हे सगळं करणारे हे नऊ जण आहेत आणि त्यांचा म्होरक्या, पीएसआय दहावा. असं सगळं आहे, तरीसुद्धा तुम्ही त्यांना अटक करत नाही आहात. हा गुन्हा कुणी केलाय, हे माहीत आहे. जो मेला त्याने गुन्हा केला की नाही, हे माहीत नाही. तरी त्याला पकडला. एकच कायदा दोन घटनांना वेगवेगळा लावला गेला होता. त्या कायद्यातील त्रुटी आम्ही दाखवल्या. 

न्यायाधीशांनी सांगितलं, ‘यांना ताबडतोब अटक करा.’ पोलिसांनी तेरा जणांना अटक केली. ज्या न्यायाधीशांनी अटकेचा आदेश दिला, त्याच न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे त्यांना रविवारी उभं केलं. तीन मिनिटांत त्यांना जामीन मिळाला. आम्ही त्याला हरकत घेतली. म्हणजे लढा उभा करत असताना कायद्यासाठीच परत पावलापावलाला आम्ही हरकत घेत होतो. आम्ही तिथे उभेच होतो. अटक करत नव्हते, केली अटक. अटक केली, सोडलं. सोडल्यानंतर आम्ही म्हटलं, की आम्ही दोन महिने तुमच्या मागे लागलो होतो, तरी पारध्यांना सोडलं नाही तुम्ही. त्यांचा रिमांड वाढवत राहिलात, जामीन दिला नाहीत. गुन्हा आहे का? नाही! गुन्हेगार आहेत का? नाही! पुरावा आहे का? नाही! पुरावा शोधण्याकरिता तुम्ही त्याचा रिमांड मागत होता. इथं पुरावा आहे, सगळं काही आहे. मग जामीन दिलात कसा? आम्ही हायकोर्टात अपील केलं. आठ दिवसांत हायकोर्टानं आमचं अपील मान्य केलं. त्यांचा जामीन रद्द झाला. त्यांना परत अटक झाली. आणि पूर्ण केस चालेपर्यंत ते अटकेत होते. आत्ता म्हणजे तीन महिन्यांपूर्वी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हा लढा जवळपास दहा वर्षे चालला होता; पण या लढाईमुळे भटक्या समाजातल्या सर्व जातींपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. सर्व पारध्यांपर्यंत जाऊन पोचलो. त्यातून दोन भाग केले - एक आंदोलनात्मक विकासाचा आणि दुसरा शिक्षणाचा. जी मुलं दिसतील त्यांना शाळेत आणायला सुरुवात केली. मग बघता बघता पारध्यांप्रमाणेच डोंबारी, कोल्हाटी, नंदीवाले, मरीआईवाले, लमाणी, अशा जवळजवळ २०-२२ जमातींमध्ये काम सुरू झालं. 

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link