Next
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन
BOI
Saturday, April 21, 2018 | 10:38 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडेतीन वाजता पार पडणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे असणार आहेत. पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, औरंगाबाद येथील साकेत प्रकाशनने पुस्तकाची निर्मिती केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने कायमच प्रथम क्रमांकावर राहिला, याचे विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. फडणवीस सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांचा सामान्य नागरिकांना, कुटुंबांना, तसेच समुदायांना कसा फायदा झाला आणि त्यांचे जीवनमान कशा पद्धतीने सुधारले, या संदर्भातील यशोगाथांचा पुस्तकात समावेश आहे. राज्याच्या वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाच हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून, विविध समाजघटकांशी बोलून आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.

‘जलयुक्त शिवार’चे अफाट यश, मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी होणारी मदत, मिरज ते लातूर जलदूत एक्स्प्रेसची यशोगाथा, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रांच्या सततच्या प्रयत्नातून नागपुरात साकारण्यात येत असलेल्या ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची कहाणी, केळीच्या झाडाच्या खोडांपासून विविध उत्पादनांची निर्मिती करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या ‘ताप्ती’ची वाटचाल आणि राज्यातील इतर ठिकाणच्या यशोगाथांचा यात समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांमुळे राज्याचा विकास कसा वेगाने होतो आहे, केंद्राच्या विविध योजनांचा फायदा घेण्यात महाराष्ट्र कसा अग्रेसर आहे, शेतीसह पायाभूत सुविधा निर्मितीत महाराष्ट्राने कशी बाजी मारली आहे, याचा ऊहापोह पुस्तकात करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पक्षाचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी यांचेही मनोगत पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mankar Laxman About
Congratulation for publication of "Man on mission Maharashtra" book
0
0
Dr Kishor Batwe About
हार्दीक अभिनंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search