Next
भारतीय सैन्याच्या ताफ्यात स्वदेशी ‘धनुष’
‘मेक इन इंडिया’चा शक्तिशाली आविष्कार
BOI
Monday, April 08, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:जबलपूर :
धनुष ही पहिली संपूर्ण देशी बनावटीची शक्तिशाली तोफ सोमवारी (आठ एप्रिल २०१९) भारतीय सैन्याच्या ताफ्यात समाविष्ट झाली. ३८ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता या तोफेत आहे. सियाचेनसारख्या बर्फाळ, डोंगराळ प्रदेशापासून राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशापर्यंत कोणत्याही प्रदेशात ही तोफ सहजपणे कार्यरत राहू शकते. जबलपूर येथील ‘गन कॅरिएज फॅक्टरी’मध्ये या तोफांची निर्मिती झाली आहे. तेथेच सोमवारी ही तोफ लष्करात समाविष्ट करून घेण्याचा कार्यक्रम झाला. अशा ११४ तोफांच्या निर्मितीची मागणी फॅक्टरीकडे नोंदविण्यात आली आहे. 

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे अध्यक्ष सौरभ कुमार यांनी या तोफांची पहिली बॅच लष्कराच्या जबलपूर येथील मध्यवर्ती दारूगोळा भांडाराकडे सुपूर्द केली. या वेळी झालेल्या औपचारिक सोहळ्याला अनेक लष्करी अधिकारी उपस्थित होते. 

‘धनुष’चे डिझाइन १९८०च्या दशकात आयात केलेल्या स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स या तोफांवर आधारित आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८६मध्ये या तोफांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाबद्दलचा करार झाला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बोफोर्स तोफा वादात अडकल्या होत्या. 

बोफोर्स तोफांच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी लष्कर, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड यांनी साधारणतः दशकभरापूर्वीच एक कार्यक्रम हाती घेतला होता. त्याअंतर्गत ही निर्मिती करण्यात आली आहे. २०१४नंतर या कामाला अधिक गती प्राप्त झाली. 

बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात उंचावरच्या ठिकाणी अत्यंत उत्तम कामगिरी केली होती. त्या युद्धात भारताचा विजय होण्यामध्ये या तोफांचाही मोठा वाटा होता. त्या तोफांच्या डिझाइनच्या आधारे जबलपूर येथील गन कॅरिएज फॅक्टरीतील ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने ‘धनुष’ तोफा विकसित केल्या.

‘धनुष’ची वैशिष्ट्ये :
- ‘बोफोर्स’वर आधारित, मात्र स्वदेशी बनावटीची, दीर्घ पल्ल्याची, नव्या पिढीतील पहिली तोफ
- १५५ मिमी/४५ कॅलिबरची भारतीय ताफ्यातील पहिलीच तोफ.
(कॅलिबर म्हणजे तोफगोळा जिथून डागला जातो, त्या नळीचा आतला परीघ)
- ही मध्यम प्रकारची तोफ असून, सध्या असलेल्या मध्यम प्रकारच्या तोफांचा कॅलिबर १३० मिमी.
- कोणत्याही प्रकारच्या युद्धभूमीत कार्यरत राहू शकते.
- ३८ किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता.
- अत्याधुनिक अशी इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम आणि एन्कोडर्स असल्यामुळे लक्ष्यभेदाचे ठिकाण अचूकपणे निश्चित करण्यास मदत.
- जुलै २०१६ ते जून २०१८ या कालावधीत विविध प्रकारच्या युद्धभूमीवर घेतलेल्या चाचण्या यशस्वी. या कालावधीत पाच हजार ‘राउंड्स’ फायर करण्यात आले. 
- चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यास परवानगी मिळाली.

‘धनुष ही खात्रीशीर आणि आटोपशीर अशी तोफ असून, जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. हा खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’चा आविष्कार आहे,’ अशी प्रतिक्रिया लष्करी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

२०१४नंतर गती...
२०१४मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर संरक्षणविषयक अनेक नवे करार केले गेले. तसेच आधी केलेल्या करारांतर्गत प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू झाली. अमेरिकी बनावटीच्या ‘एम-७७७’ या १४५ तोफांसाठी पाच हजार कोटींचा करार करण्यात आला. तसेच, के-नाइन वज्र या स्वयंचलित १०० तोफांसाठी २०१८मध्ये दक्षिण कोरियाशी ४३०० कोटींचा करार करण्यात आला.

‘एमएच-६०आर’ या प्रकारची २४ हेलिकॉप्टर्स भारताला विकण्याच्या २.५ अब्ज डॉलर्सच्या व्यवहाराला मंजुरी दिल्याचे अमेरिकेने नुकतेच जाहीर केले आहे. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय नौदलाची शक्ती वाढणार आहे. 

(‘धनुष’ची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search