Next
‘खेळता खेळता आयुष्य’ जगलेला कलावंत
BOI
Monday, June 10, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:

लेखन, नाट्यलेखन-दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रांत अत्यंत दर्जेदार कामगिरी केलेले प्रतिभावान कलावंत गिरीश कार्नाड यांनी १० जून २०१९ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कामगिरीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप....
..............
एखादा माणूस किती क्षेत्रांत उत्तम कामगिरी करू शकतो, हे गिरीश कार्नाड यांच्या आयुष्याकडे पाहिले की कळते. लेखन, नाट्यलेखन, सिनेमाचे दिग्दर्शन या गोष्टी करत असतानाच, समकालीन प्रश्नांचे, वास्तवाचे भान सुटू न देता ते प्रश्न या माध्यमातून अभिव्यक्त करणे, हे नक्कीच सोपे नव्हे. एखाद्या विषयाची प्रचंड आवड असल्याशिवाय आणि त्यात झोकून दिल्याशिवाय हे करणे निश्चितच शक्य नाही. गिरीश कार्नाड यांचे हेच वेगळेपण आहे. 

ज्ञानपीठ या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, कन्नड साहित्य परिषद पुरस्कार, कालिदास सन्मान यांसह पद्मश्री आणि पद्मविभूषण हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्याशिवाय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि हिंदी, तसेच कन्नड भाषेतील चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठीचे पुरस्कार वेगळेच. नामवंत कानडी नाटककार गुब्बी वीरण्णा यांच्या नावाने दिला जाणारा नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरची ऱ्होड्स स्कॉलरशिप मिळवून त्यांनी १९६० ते ६३ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एमए केले होते. १९८७-८८मध्ये ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘फुलब्राइट’ कार्यक्रमांतर्गत नाटककार म्हणून कामगिरी बजावली. गिरीश कार्नाड यांच्या व्यक्तिमत्त्वाला किती पदर होते, याचा थोडा अंदाज यावा यासाठी ही संक्षिप्त यादी दिली आहे. ही यादी आणखी बरीच मोठी आहे.

तरुणपणी वैधव्य आलेल्या कृष्णाबाई माणकीकर यांनी मुंबईच्या वैद्यकीय सेवेमध्ये असलेल्या डॉ. रघुनाथ कार्नाड यांच्याशी विवाह केला; मात्र विधवा पुनर्विवाहासंदर्भात समाजात पुरेशी जागृती नसल्यामुळे त्यांचा विवाह पाच वर्षे लांबला होता. नंतर त्यांचा विवाह आर्य समाजांतर्गत ग्राह्य धरण्यात आला. कृष्णाबाईंना शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांना डॉक्टर व्हायची इच्छा होती. त्या मार्गावर जाण्यासाठी सुरुवातीला नर्स होण्याचे शिक्षण घेत असताना त्यांची डॉ. रघुनाथ कार्नाड यांच्याशी भेट झाली होती. पाच वर्षांनी त्यांचा विवाह झाल्यानंतर झालेल्या चार मुलांपैकी गिरीश हे तिसरे अपत्य. आपल्या आई-वडिलांच्या वादग्रस्त विवाहाविषयीची ही सगळी गोष्ट गिरीश कार्नाड यांनी आपल्या आत्मचरित्रात सुरुवातीलाच लिहिली आहे. 

प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात झाल्यानंतर त्यांचे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरित झाले. त्यांच्या आई-वडिलांना नाटक या विषयात रुची असल्यामुळे सिरसीमध्ये त्यांचा नाटक मंडळींशी (फिरून नाटक सादर करणारे कलावंत) संबंध आला. ‘यक्षगान’ हा कर्नाटकातील स्थानिक कलाप्रकार त्यांना विशेष आवडे. पुढे ‘हयवदन’सारख्या नाटकात त्यांनी त्या कलाप्रकाराचा प्रभावी उपयोग केला. धारवाडमध्ये बीए झाल्यावर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमए केले. 

चेन्नईत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये सात वर्षे काम केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ते शिकागोमध्ये असताना ‘नागमंडल’ या त्यांच्या मूळ कन्नड नाटकाच्या इंग्रजी आवृत्तीचा वर्ल्ड प्रीमिअर मिनेपोलिसमधील गुथ्री थिएटरमध्ये झाला होता. (या नाटकाला पुढे कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.) कन्नडमध्ये लिहायला त्यांना विशेष आवडे. दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक यावर आधारित ‘तुघलक,’ लिंगायत चळवळीवर आधारित ‘तळेदंड,’ बाली, ओडाकालू बिम्बा अशी त्यांची अनेक कानडी नाटके प्रसिद्ध आहेत. पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून समकालीन परिस्थितीवर भाष्य करण्याचे तंत्र त्यांनी नाटकांमधून हाताळले. 

संस्कार (१९७०) या कन्नड सिनेमातून त्यांनी अभिनय आणि पटकथालेखनाचा श्रीगणेशा केला. हा सिनेमा यू. आर. अनंतमूर्तींच्या कादंबरीवर आधारित होता आणि पट्टाभिराम रेड्डी यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. कन्नड सिनेमाला पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देण्याचा मान या सिनेमाने दिला. 

आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ या पुस्तकावर आधारित असलेल्या मालगुडी डेज या टीव्ही मालिकेत गिरीश कार्नाड यांनी स्वामीच्या वडिलांची भूमिका केली होती. 

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ या कादंबरीवर आधारित असलेल्या चित्रपटापासून (१९७१) त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्या सिनेमासाठी त्यांना सहदिग्दर्शक बी. व्ही. कारंथ यांच्यासह उत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि कानडी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. अनेक माहितीपटही त्यांनी केले. कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे, मध्ययुगीन कवी कनक दास आणि पुरंदरदास, सूफी परंपरा आदी विषयांवर त्यांनी केलेल्या इंग्रजी माहितीपटांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 

निशांत, मंथन, स्वामी, पुकार हे त्यांचे काही हिंदी चित्रपट. ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटीलसोबत अभिनय केला होता. तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही त्यांनी कामे केली होती. नागेश कुकनूर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांत त्यांनी अभिनय केला. ‘इक्बाल’मधली क्रिकेट प्रशिक्षकाची त्यांनी केलेली भूमिका विशेष गाजली. डोर, आशायें या सिनेमांतही त्यांनी काम केले. ‘एक था टायगर’ (२०१२) आणि ‘टायगर जिंदा है’ (२०१७) हा त्याचा सिक्वेल हे त्यांचे अखेरच्या टप्प्यातले चित्रपट. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या पुस्तकाच्या ऑडिओबुकसाठी डॉ. कलामांचा आवाजही कार्नाड यांनी दिला आहे. 

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीटीआय) आणि संगीत नाटक अकादमी या संस्थांचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली होती.

ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेले मराठी लेखक वि. स. खांडेकर यांनी आपल्या कादंबरीतून सर्वांपुढे आणलेल्या ययाती-देवयानीच्या कथेला गिरीश कार्नाड यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नाटकाचे स्वरूप दिले. १९६० साली, वयाच्या तेविसाव्या वर्षी गिरीश कार्नाड यांनी हे नाटक लिहिले. या नाटकाने त्यांना ओळख मिळवून दिली. वासनेभोवती फिरणाऱ्या या नाटकात चार मुख्य आणि कणखर स्त्री-पात्रे आहेत आणि ती कथेचा कणा आहेत. ययातीला असलेली अमरत्व आणि तारुण्याची हाव यात दिसते. एका अर्थी मानवी वृत्तींचे चित्रण यात करण्यात आले आहे. पुढे गिरीश कार्नाड यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.  

ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश लागू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकाचे दृक-श्राव्य चित्रण दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अभिनेते, नाटककार गिरीश कार्नाड यांच्या पुढाकारातून चित्रित करण्यात आले होते आणि त्याची नंतर सीडी काढण्यात आली होती, अशी आठवण डॉ. लागू यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली होती.

‘१९७२नंतर दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील माणसे मुंबई-पुण्याकडे येऊ लागली. कनिष्ठ व उच्च मध्यमवर्गीय ही प्रतवारी ठळकपणे जाणवू लागली. यातूनच जगण्याचे विषय व आधीच्या पिढीला पुढच्या पिढीने तपासण्याचे काम सुरू झाले. मूल्यांचा ऱ्हास, बेकारी, काळा बाजार, बाजारातील वस्तू गडप होणे, नियमांची होत नसलेली अंमलबजावणी यातून आमच्या पिढीला निराशा येत गेली. जगण्यातील भ्रष्टपणाला विरोध म्हणून तेव्हा तेंडुलकर ते कानिटकर व नंतर आमच्या पिढीच्या नाटककारांत ती अभिव्यक्त  होत गेली. या सर्व प्रक्रियेला देशपातळीवरील ‘पॅन इंडिया’ पद्धतीचे स्वरूप येत गेले. हेच विषय तेव्हा बंगालमध्ये बादल सरकार, कर्नाटकात गिरीश कार्नाड, तर मुंबईत विजय तेंडुलकर मांडत होते,’ अशी आठवण ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. त्यात आळेकर यांनी कार्नाड यांची समकालीन ज्येष्ठ नाटककारांशी तुलना केली असून, त्या सर्वांच्या विचारधारांमध्ये असलेले साम्य मांडले आहे.

ते स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आणि हिंदू धर्मातील सनातन, कर्मठ विचारांना असलेला विरोध ते सातत्याने मांडत. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वक्तव्यांतून अनेकदा वादही निर्माण झाले. 

१९ मे १९३८ रोजी तेव्हाच्या मुंबई प्रांतातील माथेरानमध्ये जन्मलेल्या गिरीश रघुनाथ कार्नाड यांनी १० जून २०१९ रोजी कर्नाटकात बेंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांनी हात घातलेल्या प्रत्येक कलाप्रकाराशी ते लीलया खेळले म्हणजे त्यात त्यांनी मुशाफिरी केली आणि उत्तम निर्मिती केली.

‘आडाडता आयुष्य’ या गिरीश कार्नाडांच्या कानडीतील आत्मचरित्राचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावाने केला आहे. त्याच्या पहिल्या पानावर दिलेला ‘आडाडता आयुष्य’चा अर्थ पाहिला, की कार्नाड यांना आत्मचरित्रातून आपल्या आयुष्याविषयी काय सांगायचे आहे, त्याचा अंदाज येतो. 

आत्मचरित्राच्या पहिल्या पानावरील मजकूर असा - 

‘नोडनोडता दिनमान, आडाडता आयुष्य’ (बघता बघता दिनमान, खेळता खेळता आयुष्य) ही कन्नड म्हण सुप्रसिद्ध कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे यांनी आपल्या एका गाजलेल्या कवितेची ओळ म्हणून वापरली. कवितेच्या ओळीत त्या म्हणीला दुहेरी अर्थच्छटा आहे. वरवर पाहता त्याचा हलकाफुलका, आनंदी अर्थ दिसतो - ‘आयुष्य म्हणजे माझ्यासाठी जणू एक खेळच होता.’ पण वरचा तवंग बाजूला करून आपण खोलात शिरलो, की त्याचा मर्मभेदी गाभा उकलतो, 
‘खेळात दंगलो मी जगण्याचे भान हरपले
पकडला डाव खेळाचा, आयुष्य निसटुनी गेले’

गिरीश कार्नाड यांना आदरांजली!

(गिरीश कार्नाड यांचे साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search