Next
काहे कोयल शोर मचाए रे...
BOI
Sunday, April 15 | 06:45 AM
15 0 0
Share this story

शमशाद बेगमआपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने एक काळ गाजविणाऱ्या नामवंत पार्श्वगायिका शमशाद बेगम यांची जन्मशताब्दी काल, १४ एप्रिलपासून सुरू झाली. तसेच, २३ एप्रिलला त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या औचित्याने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी गायलेल्या ‘काहे कोयल शोर मचाए रे’ या गीताचा...
............. 
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शमशाद बेगम यांची जन्मशताब्दी काल, १४ एप्रिलपासून सुरू झाली. १४ एप्रिल १९१९ रोजी लाहोरमध्ये शमशाद बेगम यांचा जन्म झाला. ‘शद्दो’ हे त्यांचे घरातले नाव! संगीताच्या मार्गावरून जाण्यासाठीचे प्रोत्साहन त्यांना त्यांचे चुलते अमिरुद्दीन यांच्याकडून मिळाले. मोहरमच्या दिवसांत शमशाद बेगम यांचेकडून ‘मर्सिया’ गाऊन घेतल्या जात!

शमशाद बेगम बारा वर्षांच्या असताना जेनोफोन कंपनीचे लोक नव्या गायकांच्या शोधात होते; पण त्या आवाजाच्या चाचणीसाठी आपल्या मुलीने घराबाहेर पडावे ही कल्पनाच त्यांच्या वडिलांना रुचली नाही. पण शमशाद यांच्या चुलत्यांनी भावाला खूप प्रयत्न करून पटवून दिले, की शमशादने ती चाचणी देण्यास जाणे कसे आवश्यक आहे ते! आणि मग शमशाद चाचणी देण्यास गेल्या! ते वर्ष होते १९३२ आणि चाचणी घेण्याची जबाबदारी सोपवली होती संगीतकार गुलाम हैदर यांच्यावर! शमशाद यांचा आवाज ऐकून हैदर खूश झाले आणि तेथे लगेचच १२ गीतांचा करार करण्यात आला! तो करार सहा महिन्यांचा होता. दोन-चार महिने प्रशिक्षणात गेले आणि नंतर गायलेल्या त्या बारा गाण्यांनी एवढी लोकप्रियता मिळवली, की त्या रेकॉर्ड कंपनीने त्यांची शंभर गाणी ध्वनिमुद्रित केली.

१९३७पासून शमशाद आकाशवाणीसाठीही गाऊ लागल्या! नंतर १९४०मध्ये ‘यमला जाट’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. तो शमशाद बेगम यांची गाणी असलेला पहिला चित्रपट. परंतु तो पंजाबी भाषेत होता. आणि १९४१मध्ये ‘खजांची’ हा हिंदी चित्रपट आला. या चित्रपटातील गुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केलेली गीते शमशाद बेगम यांनी गायली होती व ती प्रचंड लोकप्रिय ठरली होती. नंतर मग एकएक चित्रपटांची रांगच लागली. ‘खानदान’, ‘जमींदार’, ‘पूँजी’ ‘कैसे कहूँ’, ‘शिरीन फरहाद’! १९४१ ते १९४५ या काळात हे शमशाद यांच्या गाण्यांचे चित्रपट आले.

... पण हे सर्व लाहोरमध्ये घडत होते आणि तेथून शमशाद यांच्या लोकप्रियतेच्या वार्ता मुंबईत येऊन धडकत होत्या. निर्माता दिग्दर्शक मेहबूब यांनी शमशाद यांना मुंबईत बोलावले; पण आपल्या मुलीला इतक्या लांब पाठवण्यास शमशाद यांचे वडील तयार नव्हते. अखेर मेहबूब खान यांनी हर प्रकारे प्रयत्न करून शमशाद बेगम यांच्या वडिलांना राजी केले. पालक म्हणून त्या मुलीची काळजी घेण्यास मेहबूबही तयार झाले. स्वतंत्र घर, गाडी या गोष्टीही त्यांनी तिला दिल्या. ज्या चित्रपटासाठी शमशाद मुंबईत आल्या, तो ‘तकदीर’ हा चित्रपट अभिनेत्री नर्गीसचा पहिलाच चित्रपट होता. यामधील गाणी गायल्यानंतर ‘पन्ना’ चित्रपटासाठी करार झाला! त्यानंतर ‘शिरीन फरहाद’ चित्रपटासाठी लाहोरला जाऊन आल्यानंतर शमशाद कायमच्या मुंबईतच राहिल्या.

पुढे हिंदी चित्रपटसंगीताचे इंद्रधनुष्य कितीतरी वर्षे शमशाद यांच्या स्वरात रंगले. एकेक स्मरणीय गीते त्यांनी गायली. ‘कभी आर कभी पार लागा तीरे नजर’ या गीतातील नखरा, ‘सैया दिल में आना रे...’मधील मोहक लडिवाळपणा, ‘छोड बाबुल का घर...’मधील विषाद, ‘गाडीवाले गाडी धीरे हाक रे..’मधील खडा स्वर! शमशाद बेगम यांच्या गाण्यातील ही विविधता आणि वैशिष्ट्ये यांमुळेच हिंदी चित्रपटगीते स्मरणीय बनत गेली.

आरपार, सीआयडी, मदर इंडिया, बहार, नगमा, दर्द, दुलारी, बाबुल असे अनेक चित्रपट शमशाद यांच्या गाण्यांमुळे तेव्हा गाजलेच; पण ते १९६५ ते १९७५च्या दशकात मॅटिनीला लागले, तेव्हाही लोकप्रिय ठरले. शमशाद यांचा स्वर कसा होता. अनुवासिक, ठसकेबाज, मोहक, की आणखी कसा? तो रमोला, मेहताब, मनोरमा, रेहाना, मुन्नवर सुलताना या अभिनेत्रींना शोभला आणि नंतर आलेल्या नर्गिस, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, मधुबाला, वहिदा रेहमान अशा अनेक नायिकांनाही शोभला! एवढेच नव्हेतर कक्कू, मिनू मुमताज, हेलन, कुमकुम या सहनायिकांकरिताही शमशाद यांनी गीते गायली आणि लोकांना ती आवडली.

१९४१ ते १९६८ पर्यंत त्यांनी गायलेली गाणी चित्रपटामधून पुढे येत होती. लता मंगेशकर यांच्या आगमनानंतर शमशाद यांची लोकप्रियता कमी झाली; पण त्यांच्या स्वराचे वैशिष्ट्य तेच राहिले. ‘गंगा मांग रही बलिदान’ हा शमशाद यांची गाणी असलेला शेवटचा चित्रपट १९८१मध्ये पडद्यावर आला. त्यांच्या जीवनात त्या मुलाखती आणि फोटो यांपासून कटाक्षाने दूर राहिल्या! त्यांच्या आवाज हीच त्यांची ओळख! १९५० पर्यंत प्रचंड लोकप्रियता व त्यानंतर थोडी थोडी ओहोटी व १९८१नंतर तर पूर्ण विजनवास, असा त्यांच्या जीवनाचा प्रवास होता.

चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांमागे त्या कधीही धावल्या नाहीत. पद्म व अन्य पुरस्कार/सन्मान त्यांना अतिशय उशिरा मिळाले; पण त्याबद्दल त्यांच्या मनात बिलकुल खंत नव्हती. त्यांची मुलगी ‘उषा रात्रा’ यांनी त्यांना शेवटपर्यंत उत्तम तऱ्हेने सांभाळले. सकाळी प्रार्थना, नंतर नातवंडांना सांभाळणे, संगीत ऐकणे, गाणी गुणगुणणे अशा पद्धतीने अखेरच्या काळातही समाधानी व निरोगी जीवन जगून त्यांनी २३ एप्रिल २०१३ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा जन्म एप्रिल महिन्यातील आणि मृत्यूही एप्रिल महिन्यातच! 

अशा या एका महान गायिकेने जी अनेक ‘सुनहरी’ गीते गायली आहेत, त्यापैकीच एक गीत आज पाहू या! अभिनेत्री नर्गिस यांच्या ‘तकदीर’ या पहिल्या चित्रपटाच्या वेळी शमशाद बेगम यांनी त्यांच्यासाठी पार्श्वगायन केले होते. त्यानंतर ‘मेला’ आणि ‘आग’ या चित्रपटांतही त्यांनी नर्गिसकरिता गाणी म्हटली होती.

‘आग’ म्हणजे राज कपूर यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट! या चित्रपटात नर्गिसबरोबरच कामिनी कौशल आणि निगार सुलताना याही नायिका होत्या. या चित्रपटाला राम गांगुली यांनी संगीत दिले होते. गीतकार बेहजाद लखनवी यांचे साधे-सोपे शब्द असलेल्या पण भावनेला हात घालणाऱ्या या काव्याला शमशाद बेगम यांचा आवाज कसा सुंदर न्याय देतो, ते ऐकण्यासारखे आहे. प्रारंभी त्या एक आलाप घेतात व नंतर गातात...

काहे कोयल शोर मचाए रे 
मोहे अपना कोई याद आए रे 
उसने काहे को नैन फिराए रे
ओ... कोई जा के उसे समझाए रे

(कोकिळेचे मधुर कूजन ऐकू आल्यामुळे आनंदी न होता प्रियकराच्या विरहामुळे ती म्हणते) ही कोकिळा आरडाओरडा का बरे करीत आहे? (त्यामुळेच) मला आपलं कोणी तरी आठवत आहे. (आपल्या माणसाची आठवण येत आहे.) ‘त्याने’ (माझ्यावरून दुसरीकडे) का नजर फिरवली आहे? (तो मला का बरे दुरावला आहे?) (अरे) कोणी तरी जाऊन जरा त्याला समजावून सांगा रे! (त्याची समजूत काढा!)

मेरे दिल से जो निकले ‘हाय’ रे 
कोई दोष मेरा बतलाए  रे 
कह दो कह दो कोयल से ना गाए रे 
ओ.... मोहे अपना कोई....

(प्रियकराच्या विरहाच्या दुखा:मुळे) माझ्या मनाला जे दु:ख होते (आणि त्यामुळे माझ्या तोंडातून ‘हाय’ असा दु:खवाचक शब्द बाहेर पडत आहे.) यामध्ये माझे काय चुकले ते कोणीतरी येऊन मला सांगेल का? (खरेच या माझ्या मन:स्थितीत हे कोकिळेचे कूजन मला ऐकायला नको वाटते. म्हणूनच) कोणी त्या कोकिळेला जाऊन सांगा, की तू गाऊ नकोस.

मोरे नैन में नीर भर आए रे 
मोहे बीतें वो दिन याद आए रे 
हाय, आग लगी हृदय में 
ओ... कोई हृदय की आग बुझाए रे...

(या विरहाच्या अवस्थेमुळे) मला रडू येत आहे. मला भूतकाळातील (सुखद) दिवस आठवतात. माझ्या हृदयात लागलेली ही विरहाची आग कोणी तरी विझवा रे!

मेरा जीवन पल पल जाए रे 
रहूँ कब तक आस लगाए रे 
कोई जाके उसे समझाए रे
ओ... मेरी मौत से पहले आए रे

(या विरह अवस्थेत) क्षणा क्षणाने माझे जीवन संपत चालले आहे. (तो येईल या) आशेवर मी आणखी किती काळ जगत राहू? कोणी जाऊन ‘त्याला’ समजावून सांगा, की माझा मृत्यू होण्याआधी तू ये!

एका दु:खी प्रेयसीची ही मन:स्थिती संगीतात गुंफताना संगीतकार राम गांगुली यांनी हवाई गिटार, बासरी, ढोलक या वाद्यांच्या साथीने रंगत आणलेली आहे. तसेच शमशाद बेगम यांचा प्रारंभीचा आलाप मनाला खेचून घेतो. पूर्ण गाण्यातला मोकळा स्वर, अजिबात न चोरता खणखणीतपणे लावलेला स्वर, आवश्यक तेथे घेतलेल्या हरकती व मुरक्या यांमुळे हे गाणे काळजाला भिडते. पडद्यावरचे याचे सादरीकरण नर्गिसच्या अभिनयाने व राज कपूरच्या दिग्दर्शनाने, छायाप्रकाशाच्या खेळामुळे गीताला ‘सुनहरे’ बनवून जाते.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
शशिकांत वा. बोरगगांवकर About 279 Days ago
अप्रतिम अविस्मरणीय
0
0

Select Language
Share Link