Next
प्रेक्षणीय तिरुवन्नमलई
BOI
Wednesday, June 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अरुणाचलेश्वर मंदिर
उत्तर तमिळनाडूतील अनेक गावांचा महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध आहे. त्यातील तिरुवन्नमलई हे एक ठिकाण. येथील अरुणाचलेश्वर मंदिर अत्यंत सुंदर असून, त्याशिवाय आणखीही बरीच पर्यटनस्थळे येथे आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात तिरुवन्नमलईचा फेरफटका...
........
उत्तर तमिळनाडूतील अनेक गावांचा महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध आहे. त्यातील तिरुवन्नमलई जिल्ह्यात काही ठिकाणी मराठी माणसे स्थायिक झाली होती. शिवाजी महाराज जिंजीच्या मोहिमेनंतर तिरुवन्नमलई येथे गेले होते. तेथील मंदिराची गोपुरे त्यांनी दुरुस्त करवून घेतली. मंदिरांसमोरील पर्वतावर कार्तिकातील दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञाही त्यांनी दिली होती. वेल्लोर, जिंजी, तंजावर, वृद्धाचलम, चिदंबरम या परिसरात महाराजांचा सहा महिने मुक्काम होता.

दक्षिण भारतात मोठ्या गोपुरांची मंदिरे भरपूर आहेत. त्यातही तमिळनाडूमधील काही मंदिरे एकसारखी असली, तरी त्या प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. आतील कलाकुसर, शिल्पेही वेगळी आहेत, प्रत्येकाचा निर्मिती काळ व निर्माता वेगळा आहे. तसेच अनेक राजवटींचे प्रभावही त्यावर दिसून येतात. सातव्या शतकात अन्नामलाई पर्वताचा प्रथम उल्लेख सापडतो. येथील तिरुवन्नमलई मंदिरात चोला राजांचे इ. स. ९००मधील शिलालेख आहेत; पण इ. स. ७००मधील नयनार संत शिवभक्त सम्बन्दर यांच्या काव्यसंग्रहात याचा उल्लेख दिसून येतो. मंदिराला भव्यता प्राप्त होण्याचे श्रेय विजयानगर व होयसळ राजवटीकडे जाते.

तिरुवन्नमलई (या मंदिराला अरुणाचलेश्वर असेही संबोधले जाते) मंदिराशी संबंधित शिव-पार्वतीची एक कथा सांगितली जाते. कैलास पर्वतावरील बागेमध्ये शिव-पार्वती खेळत बसलेले असताना पार्वतीने शिवाचे डोळे झाकून घेतले. त्या वेळी एकदम अंधार पडला व तो बराच काळ राहिला. अखेर पार्वती व इतर शिवभक्तांनी तपश्चर्या सुरू केली. नंतर शिवाने अन्नामलाई पर्वतावर अग्निस्तंभासारखे उभे राहून सृष्टीला प्रकाश दिला. त्यानंतर शिव पार्वतीमध्ये विलीन झाले व त्यांनी अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले. तिरुवन्नमलई गावामध्ये आठ दिशांना आठ शिवलिंगे स्थापन करण्यात आलेली आहेत.

इ. स. ७०० सुमारास तिरुवन्नमलई कांचीपुरमच्या पल्लव राजवटीच्या आधिपत्याखाली होते. तसेच इ. स. ८५० ते १२५० या कालावधीत ते चोला राजवटीशी निगडित होते, असे शिलालेखावरून दिसून येते. या काळात चोला राजांनी मंदिरासाठी मदत केल्याचा उल्लेख शिलालेखात दिसून येतो. इ. स. १३२८पासून होयसळ घराण्याची सत्ता येथे आली. १३३६ ते १४८५पर्यंत येथे संगम राजवट होती. त्यानंतर इ. स. १४९१ ते १५७० या कालावधीत तुलवा राजवट आली. तालिकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर काही काळ हे ठिकाण तंजावरच्या नायक राजवटीच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतर १७व्या शतकात हे ठिकाण कर्नाटकच्या नबाबाच्या आधिपत्याखाली आले. १७९०मध्ये हा भाग टिपू सुलतानाच्या आधिपत्याखाली आला. टिपूच्या पाडावानंतर तिरुवन्नमलई ब्रिटिशांच्या ताब्यात आले.

अरुणाचलेश्वराचे मुख्य मंदिर डोंगराच्या पायथ्याशी पूर्व दिशेला आहे. २५ एकर जागेवर हे मंदिर संकुल असून, आशियातील मोठ्या मंदिरामध्ये याची गणना होते. याच्या चारही बाजूंनी किल्ल्याच्या तटबंदीसारखी भक्कम भिंत आहे. पूर्व-पश्चिम भिंत ७०० फूट, दक्षिणेकडची भिंत १४७९ फूट, तर उत्तरेकडील भिंत १५९० फूट लांब आहे. पूर्वेकडील मुख्य राजगोपुर ११ माजली असून, त्याची उंची २१७ फूट आहे. त्याची निर्मिती विजयनगरच्या राजा कृष्णदेवराय याने केली. गोपुराच्या आतील बाजूला मोहित करणारी नृत्यमुद्रांची शिल्पे आहेत. कृष्णदेवरायाने एक हजार खांबांचा सभामंडप, तसेच तलावही बांधला. मंदिराचे विमान शिल्पांनी मढविलेले आहे. मंदिराचा रस्ता बाजारपेठेतूनच जातो. मंदिरासमोर इतर सर्व ठिकाणांप्रमाणेच रस्त्याच्या दुतर्फा पूजासामग्रीची दुकाने आहेत. आत प्रवेश करताच मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा झोत लगेचच जाणवतो. एका दरवाजातून आत गेल्यावर दुसरा, तिथून आत गेल्यावर तिसरा दरवाजा दिसतो. आत गेल्यावर डावीकडे श्री गजाननाच्या विशाल मूर्तीचे दर्शन होते. पुढे गेल्यावर मुख्य मंडप, नंतर अर्धा मंडप, नंतर गर्भागृह अशी रचना आहे. आत शिवाबरोबर सूर्य व विष्णूच्याही प्रतिमा आहेत.

पश्चिमेला अन्नामलाई पर्वत असून, त्याची परिक्रमा १४ किलोमीटर लांबीची आहे. तिला स्थानिक भाषेत गिरिवलम म्हणतात. भक्तगण पौर्णिमेच्या दिवशी अनवाणी प्रदक्षिणा करतात. चोला राजे, तसेच येथे राज्य करणारे इतर राजे कलाप्रेमी असल्याने या देवळाची भरभराट होत गेली. राजे प्रबळ होते आणि प्रदेश धनधान्याने समृद्ध होता. त्यामुळे अशी मंदिरे उभी राहिली.

सातनूर धरणसातनूर धरण : तमिळनाडूतील थेनपेन्नई नदीवरील हे एक मोठे धरण आहे. हा पाटबंधारे प्रकल्प असून, धरणाजवळ एक सुंदर बगीचाही आहे. तसेच येथे प्राणिसंग्रहालयही असून, मगरी हे तेथील मुख्य आकर्षण आहे. जवळच लहान मुलांसाठी पोहण्याचा तलावही आहे. हे सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून, तिरुवन्नमलईपासून ३१ किलोमीटरवर आहे.

सातनूर प्राणिसंग्रहालयमामांडूर व नरसपलाईयम : ही जुळी गावे कांचीपुरमपासून १५ किलोमीटरवर आहेत. या गावांत १३०० वर्षांपूर्वीच्या गुंफा आहेत. कांचीपुरमचा पल्लव राजा राजमहेंद्रवर्मन याने या गुंफा आणि मंदिरे करवून घेतली. येथे असलेल्या

चार गुंफा मामांडूर गुंफा म्हणून प्रसिद्ध आहेत. या गुंफांमध्ये चित्रमेघा नावाचा तलाव असून, तोही राजा राजमहेंद्रवर्मन यानेच बांधला. पहिली गुंफा नरसिंहाला समर्पित आहे. गुहेच्या दर्शनी भागात अष्टकोनी आकाराचे दोन खांब घनाकृती ठोकळ्यांमध्ये बसविल्यासारखे दिसतात. या घनाकृती ठोकळ्यांवर एखाद्या मुकुटाप्रमाणे कमळफुलांचे नक्षीकाम केले आहे. या दोन खांबांमागे खांबांची दुसरी रांग आहे.

मामांडूर व नरसपलाईयम
तेथे शिलालेख असून, या शिलालेखावरून पल्लव सहाव्या-सातव्या शतकात, तर चोला राजवट अकराव्या शतकात राज्य करीत होती, असे दिसून येते. दुसरी गुंफा शिवाला (रुद्रावलीसवरम) समर्पित आहे. तिसरी गुंफा सर्वांत मोठी असून, बहुधा खडक चांगला नसल्यामुळे ती पूर्ण केलेली नसावी, असे वाटते. चौथी गुंफा दक्षिणेकडे असून, तीही अपूर्ण आहे. तिच्या छताला, खांबांना भेगा पडल्याचे दिसून येते. नरसपलाईयम गावाच्या हद्दीत एक नैसर्गिक गुंफा असून, साधारण दुसऱ्या शतकातील तमीळमधील ब्राह्मी लिपीतील शिलालेख तेथे दिसून येतो.

जवाधू पर्वतजवाधू पर्वत : हा साधारण २५०० ते ३५०० फूट उंचीचा पूर्व घाटातील पर्वत असून, निसर्गरम्य असे ठिकाण आहे. तिरुवन्नमलईपासून ते ७५ किलोमीटरवर आहे.

बिमा प्रपात : जमुनामर्थुरपासून पाच किलोमीटरवर असलेला हा वर्षातील आठ महिने दिसणारा धबधबा आहे. तो संरक्षित जंगलात असून, तो जेथे पडतो, तेथे पर्यटक स्नान करण्यासाठी येतात.

बिमा प्रपातअरणी : तिरुवन्नमलईपासून ३७ किलोमीटरवर असलेले हे गाव रेशीम उद्योगासाठी व भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे भाताच्या २८० आधुनिक गिरण्या आहेत. येथे हातमाग, तसेच यंत्रमागही आहेत. मुख्यत्वे रेशीम उद्योगासाठी आणि रेशमी साड्यांसाठी हे गाव भारतात प्रसिद्ध आहे. हे गाव विणकरांचे गाव म्हणून आणि सरकारला विक्रमी महसूल देणारे गाव म्हणून ओळखले जाते. फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यातील १७५१मधील युद्ध येथे झाले. हे अरणी गाव कमंडलनागा नदीच्या काठावर वसले आहे. या गावात एक किल्ला असून, त्यात सध्या कार्यालये सुरू आहेत.

मराठीशी संबंध असलेले अरणी हे तमिळनाडूतील आणखी एक गाव. हे गाव पल्लवांकडून चोला राजांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ते विजयनगर राजांच्या ताब्यात गेले. इ. स. १६४०मध्ये वेदाजी भास्कर पंत या मराठी माणसाला या गावाची जहागिरी देण्यात आली होती. ती १९४८चे जमीनदारी विधेयक पारित होईपर्यंत त्यांच्याच वारसाकडे होती. रघुनाथ पंडित या मराठी कवीचेही या गावात वास्तव्य होते. त्यांचा जन्मः साधारणपणे सतराव्या शतकातला. (परंतु त्यावर इतिहासकारांचे एकमत नाही). मराठी काव्य परंपरेतील ते एक श्रेष्ठ पंडित व कवी होते. त्यांचे संस्कृत व फार्सी या भाषांवर प्रभुत्व होते. ‘महाभारतातील कथा’ या विषयावरील हे मराठीतील महत्त्वाचे कवी होते. त्यांची मुलगी तंजावरच्या आनंदतनयाच्या मुलाला दिली होती. नल-दमयंती स्वयंवराच्या आख्यानात रघुनाथ पंडितांनी शृंगार व करुण रस फार उत्कृष्टरीत्या ओतले आहेत. त्यामुळे या एकाच आख्यानावरून त्यांची कीर्ती चिरकाल राहिली आहे. या आख्यानाशिवाय गजेंद्रमोक्ष व रामदासवर्णन ही प्रकरणेही रघुनाथ पंडितांनी लिहिलीं आहेत. त्यांनी लिहिलेल्या दमयंती स्वयंवर गीतातील काही ओळी अशा -

तेथील एक कलहंस तटीं निजेला।
जो भागला जलविहार विशेष केला।।
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो।
पक्षी तनु लपवि, भूप तया पाहतो।।


तिरुवन्नमलईपासून चेन्नई १९४ किलोमीटर असून, पुदुच्चेरी येथील जवळचा विमानतळ ८७ किलोमीटर. तिरुवन्नमलई रेल्वे मार्गावरही आहे; पण सध्या रेल्वे सेवा विस्तारीकरणाच्या कारणाने बंद आहे. तिरुवन्नमलईमध्ये राहण्याची चांगली सोय होऊ शकते. कांचीपुरम, वेल्लोर, जिंजी, तंजावर, त्रिचनापल्ली, चिदंबरम ही येथून पर्यटनासाठी जाण्यासारखी जवळची काही ठिकाणे आहेत. या सदराच्या पुढच्या भागात ‘चिदंबरम’ या ठिकाणाची माहिती घेऊ या. (या लेखासाठी आर्किटेक्ट शौनक कदम यांनी काही पारिभाषिक शब्दांची उकल करून दिली.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

अरुणाचलेश्वर मंदिर
( तिरुवन्नमलई तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sugandha Deshpande About
खुप सुंदर लिहिले आहे आणि मराठी चा संबंध कळला
1
0
सतीश चौगुले About
खूप छान माहिती
1
0
Dattatray phadke About
माधवराव खूप छान माहिती उपलब्ध करून दिलीत. विशेषतः "अरणी" बद्दल मला नव्याने वाचावयास मिळाले. 1640 ते 1947 एवढा काळ मराठी अधिपत्या खाली होता हे विशेष.
1
0
Anuradha kamat About
Too good .... very nicely written ... just had a fast trip of the land .... great efforts Bro ...
1
0

Select Language
Share Link
 
Search