Next
पालघरमधील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार
प्रेस रिलीज
Friday, June 01, 2018 | 11:15 AM
15 0 0
Share this article:

पालघर, गोंदिया पोटनिवडणुकीनंतर मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह उपस्थित होते.

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले. भाजपा प्रदेश कार्यालयात ही  परिषद झाली. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये व अतुल शाह उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषीमंत्री व माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पालघर लोकसभा मतदारसंघात जनतेने भाजपावर विश्वास दाखवला व राजेंद्र गावित यांना विजयी केले. निकालाचा आनंद आहे; पण ज्या प्रकारे निवडणूक झाली त्यामुळे कडवटपणा निर्माण झाला. मित्रपक्षाने भाजपाच्या दिवंगत खासदाराच्या मुलाला भाजपाच्या विरोधात निवडणुकीत उभे केले. ही कडवट लढाई टाळता आली असती, तर बरे झाले असते. निवडणुकीनंतर आमच्यापुरता कडवटपणा संपला आहे. कै. चिंतामण वनगा यांचे चिरंजीव व कुटुंबाचे भाजपा नेहेमीच स्वागत करेल. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा पराभव आम्ही मान्य करतो. गेले वर्षभर तेथे तीव्र दुष्काळ होता, निवडणूक ऐन उन्हाळ्यात झाली, त्याचा फटका भाजपाला बसला. पराभवाबद्दल आत्मचिंतन करून भाजपा २०१९ मध्ये या मतदारसंघात विजय मिळवेल.’ 

ते म्हणाले, ‘आम्ही शिवसेनेचा नेहेमीच सन्मान केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही युतीचे शिल्पकार मानतो. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा आदर करतो. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना समान विचाराचे भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढले, तर दोघांचेही नुकसान होईल म्हणून दोन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. युतीसाठी एकतर्फी निर्णय होऊ शकत नाही. सेनेलाही पुढे यावे लागेल. ज्या पक्षांसोबत सैद्धांतिक लढाई आहे, त्यांच्यासोबत शिवसेना जाईल असे वाटत नाही.’

‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा भाजपाला फटका बसला. यंत्रे बंद पडल्याने मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले, याची आयोगाने दखल घ्यावी’, असे फडणवीस यांनी नमूद केले.   ‘निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून त्यावरील आरोपांचे उत्तर आयोगाने द्यायला हवे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search