Next
मुले का चिडतात..?
BOI
Saturday, March 10, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


सोबत असलेल्या मुलांना मारणं, ढकलणं, चावणं, त्यांच्या वस्तू फेकणं, अॅक्टीव्हिटीजला अजिबात न बसणं, हट्टीपणा करणं अशा सीमाच्या अनेक तक्रारींची यादी आईला रोज सगळीकडे ऐकून घ्यावी लागायची. या तक्रारी ऐकून आई काळजीत पडायची. सीमाला समजवायची. सीमा सगळं नीट ऐकायची, शहाण्यासारखं वागेन असंही सांगायची, पण परत तिच्या तक्रारी सुरूच राहायच्या... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तन समस्येबद्दल...
......................
सीमाच्या शाळेतून, पाळणाघरातून, संस्कार वर्गातून सतत तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे तिची आई अगदी वैतागून गेली होती. सीमाच्या तक्रारी गेल्या सहा महिन्यांत खूपच वाढल्या होत्या. या तीनही ठिकाणी सोबत असलेल्या मुलांना मारणं, ढकलणं, चावणं, त्यांच्या वस्तू फेकणं, अॅक्टीव्हिटीजला अजिबात न बसणं, हट्टीपणा करणं अशा अनेक तक्रारींची यादी आईला रोज सगळीकडे ऐकून घ्यावी लागायची. 

या तक्रारी ऐकून आई काळजीत पडायची. सीमाला समजवायची. सीमा सगळं नीट ऐकायची, शहाण्यासारखं वागेन असंही सांगायची, पण परत तिच्या तक्रारी सुरूच राहायच्या. रागाच्या भरात आईने तिला तीन-चार वेळा मारलंही होतं, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. शेवटी शाळेतल्या बाईंनी सुचवलं म्हणून सीमाची आई भेटायला आली. 

भेटायला आल्यावर आईने स्वत:ची ओळख करून दिली आणि सीमाची ही समस्या सांगितली. काय करावं, तिच्या समस्या कशा सोडवाव्यात आईला समजत नव्हतं. त्यामुळे हे सगळं सांगताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. तिचं बोलून झाल्यावर आणि ती थोडी शांत झाल्यावर सीमाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल अधिक सविस्तर माहिती घेतली. त्यातून लक्षात आलेली समस्या अशी, की सीमा अगदीच लहान होती तोपर्यंत तिची आई घरीच होती. म्हणजे सीमाच्या जन्मापासून ती साडे तीन वर्षांची वगैरे होईपर्यंत तिची आई पूर्ण वेळ तिच्याबरोबर असायची. ती रोज सीमाला घेऊन फिरायला जायची. तिच्याबरोबर खेळायची. 

सीमा आणि तिचे आई-बाबा नेहमी एकत्र वेळ घालवायचे. त्यामुळे लहानपणापासूनच या वातावरणाची सीमाला सवय झाली होती, पण तिचा अधिक चांगला विकास व्हावा असा विचार करून आईने ती अडीच वर्षांची झाल्यावर तिला थोडा-थोडा वेळ पाळणाघरात पाठवायला सुरुवात केली आणि नंतर शाळेतही घातलं. ती दोन्हीकडे छान रुळल्यावर आईने स्वत:चं ब्युटी पार्लर सुरु करण्याचा निर्णय घेतला. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करून आईने पार्लर सुरु केलं. सीमाच्या बाबांनीही आईला खूप उत्तम साथ दिली. पार्लर छान सुरू झालं. आई आपला नवा बिझनेस आणि सीमा, घर आणि ही तारेवरची कसरत आनंदाने पार पाडत होती, पण सीमाच्या या वर्तन समस्या सुरू झाल्या आणि आईचा गोंधळ व्हायला लागला. नक्की काय झाल.? सीमा अचानक अशी का वागायला लागली.? आपण पार्लर सुरू करून चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना.? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. त्यामुळे शिक्षकांनी सांगितल्यावर ती लगेच समुपदेशनासाठी आली. 

आईच्या बोलण्यातून सीमामध्ये निर्माण झालेल्या वर्तन समस्यांचे कारण उलगडत गेले. त्यामुळे पुढच्या काही सत्रांसाठी सीमाच्या आई-वडिलांना एकत्र भेटीला बोलावले. सुरुवातीला सीमाच्या समस्येची कल्पना त्यांना दिली. शाळेतील, पाळणाघरातील तिची मागवलेली निरीक्षणे व आई वडिलांबरोबर इतरही मुद्यांवर झालेल्या सविस्तर चर्चेतून असं लक्षात आल, की सीमाला लहानपणापासून आई सतत बरोबर असण्याची सवय होती, पण आईने सुरु केलेल्या नव्या व्यवसायामुळे त्याच्यात बदल झाला. आईबरोबर मिळणारा वेळ कमी झाला. आई-बाबा आणि सीमा यांना एकमेकांबरोबर पूर्वीप्रमाणे वेळ घालवणं थोडं अवघड जात होतं. हा बदल स्वीकारणं सीमाला अवघड जात होतं. 

तिचं वय लहान असल्याने तिला या बदलांमुळे जाणवणारी अस्वस्थता तिच्या या अशा वर्तनातून व्यक्त होत होती. लक्षवेधी वर्तन तिच्याकडून केले जात होते. ज्यातून या सगळ्या वर्तन समस्या निर्माण झाल्या होत्या. हे सगळं ऐकल्यावर आपण व्यवसाय बंद करावा असं सीमाच्या आईला वाटलं. परंतु व्यवसाय बंद न करताही विविध उपचार तंत्र वापरून आपण सीमाला हा बदल स्वीकारायला कशा पद्धतीने मदत करू शकतो, कोणते छोटे परंतु महत्वाचे बदल करायला हवेत. याबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आई-वडिलांनी अपेक्षित सहकार्य केल्याने सीमाच्या समस्या हळूहळू सुटत गेल्या. 
(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search