Next
लेखणीची शक्ती दाखविणाऱ्या काशीबाई
BOI
Wednesday, October 10, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

पूर्वी विविध प्रकारच्या बंधनांमुळे केवळ ‘चूल आणि मूल’ यांतच अडकून पडावे लागलेल्या स्त्रियांनी आज आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रौत्सव आजपासून सुरू होतो आहे. ते औचित्य साधून आम्ही घेऊन येत आहोत ‘नवरत्ने’ नावाची लेखमालिका. पूर्वीच्या काळी अनेक बंधने असूनही धडाडीने वेगळे कर्तृत्व गाजवणाऱ्या नऊ स्त्रियांबद्दल माहिती देणारे लेख यात असतील. स्वित्झर्लंडमधील आरती आवटी यांनी ही लेखमालिका लिहिली आहे. आजचा पहिला लेख आहे मराठी साहित्यविश्वात स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या, पहिल्या प्रसिद्ध मराठी लेखिका काशीबाई कानिटकर...
...........
डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या चरित्रकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो, त्या काशीबाई कानिटकर यांची खरी ओळख म्हणजे मराठीतील पहिल्या प्रसिद्ध लेखिका. त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यविश्वात स्त्रियांना आदराचे आणि मानाचे स्थान मिळवून दिले. मराठी साहित्य क्षेत्रात स्त्रियांचे योगदान मोजण्याची सुरुवात काशीबाई कानिटकरांपासूनच झाली, असे म्हणता येईल. त्याआधी स्त्री साहित्यिकांना केवळ संतवाङ्मयाशी जोडले गेले होते; पण काशीबाईंनी मात्र अनेक वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळले आणि साहित्य क्षेत्रात अगदी मुक्त संचार केला. 

१८६१ साली सांगली जिल्ह्यातील अष्टे या गावी सधन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या काशीबाई शालेय शिक्षणापासून वंचितच राहिल्या होत्या. नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे पती गोविंद कानिटकर यांची इच्छा आणि आग्रहाखातर त्या घरीच लेखन-वाचन शिकू लागल्या. लवकरच त्यांनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवले. पुढे अनेक वर्षे त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवला. त्यांचे वाचन अफाट होते. नवनवीन पुस्तके मिळवून वाचायची त्यांना आवड होती. अनेक वेगवेगळे लेखक आणि लेखनप्रकार वाचल्यानंतर जॉन मील या इंग्लिश लेखकाच्या, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दलच्या लेखनाने त्या खूपच प्रभावित आणि अस्वस्थ झाल्या. त्यामुळे त्यांच्याही एकूण लेखनात स्त्री-स्वातंत्र, स्त्रियांचे मानसिक-वैचारिक शोषण-पोषण हे विषय आणि त्यांची स्त्रीवादी भूमिका सातत्याने आणि प्रामुख्याने दिसे. 

डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे प्रसिद्ध चरित्र तर त्यांनी लिहिलेच; पण त्या व्यतिरिक्त प्रामुख्याने ‘रंगराव’ आणि ‘पालखीचा गोंडा’ या दोन कादंबऱ्या आणि  ‘शेवट तर गोड झाला’ आणि ‘चांदण्यातील गप्पा’ हे दोन लघुकथासंग्रहही त्यांनी लिहिले. १९४८मध्ये त्यांचे निधन झाले.

काशीबाईंचे बरेचसे लेखन प्राचार्य मीरा कोसंबी यांनी इंग्रजीत अनुवाद करून "Feminist Vision or Treason Against Men?" या नावाने प्रकाशित केले आहे. तसेच सरोजिनी वैद्य यांनी ‘श्रीमती काशीबाई कानिटकर : आत्मचरित्र आणि चरित्र’ या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे.  

पूरक परिस्थिती आणि मिळालेली संधी याचा पुरेपूर लाभ घेऊन केवळ नवऱ्याची इच्छापूर्ती म्हणून ज्याची सुरुवात केली, त्या लेखन-वाचनाचा उपयोग करून काशीबाईंनी मराठी साहित्यात स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला. 

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत. काशीबाईंनी लिहिलेले डॉ. आनंदीबाईंचे चरित्र ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. काशीबाईंबद्दल सरोजिनी वैद्य यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search